भजनी पदे - विस्तृत माहिती

महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात एकतारी भजनी परंपरा आहे.


महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात एकतारी भजनी परंपरा आहे.
भजन--टाळ, मृदंग, किंवा पखावज या वाद्यांच्या साथीत ईश्वर गुणवर्णनपर व नामस्मरणपर काव्यरचना गाणे, यास ‘भजन’ असे म्हणतात. भजन हा भक्तिसंगीतातील व भक्तिमार्गातील एक महत्वपूर्ण प्रकार आहे. ह्या प्रकारचा उद्‌गम सामवेदापासून दिसत असला, तरी याचा स्पष्ट आढळ श्रीमद् भागवताच्या दशम स्कंधात होतो. भागवताचा कालखंड इ.स.पू.३०० असा मानतात. या काळापासून भजनाची परंपरा रुढ आहे. येथून भारतात वेगवेगळ्या प्रांतांत भजन रुढ झाले.
भजनास प्रांरभ करण्यापूर्वी सांप्रदायिक देवतेची प्रतिमा व्यासपीठावर ठेवतात. त्याची यथासांग हळद-कुंकू, बुक्का, गुलाल, हार, धूप-दीप इ. साधनांनी पूजा करतात. पूजा करणारा प्रमुख वीणेकरी असतो. तो देवतेची पूजा झाल्यावर वीणेची हार-फूल, गुलाल-बुक्का यांनी पूजी करतो. इष्टदेवतेचे, कुलदेवतेचे संस्कृत श्लोकात स्मरण करुन मग प्रांतीय भाषेत भजनास आरंभ करतो. काही संप्रदायात संस्कृत श्लोक न म्हणता प्रांतीय भाषेत भजनास सुरुवात करतात. भजनात वीणेकऱ्यास प्रमुख स्थान असते. वीणेकरी हा शुचिर्भुत, कपाळी गंध, मधोमध बुक्क्याचा टिळा व टोपी अथवा लांब केस राखलेला असा असतो. याने भजनाची दीक्षा घ्यावयाची असते, यासाठी संप्रदायिक ग्रंथांचा अभ्यास, सद्‌गुरु-अनुग्रह, सांप्रदायिक व्रतोत्सव हे सर्व पाळण्याची शपथ देवतेसमोर घ्यावयाची असते, तसेच त्या देवतेला अभिषेक करावयाचा असतो. तेव्हापासून तो वीणेकरी होतो. बाकीच्या भजनी मंडळींसाठी हा दीक्षाविधी तितकासा कर्मठ नसतो.
उत्तर हिंदुस्तानात भजन करणाऱ्या समूहास ‘भजनी मंडली’ असे म्हणतात. यात चैतन्य महाप्रभूंचे ‘हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल’ किंवा ‘कृष्ण कृष्ण जय कृष्ण’ किंवा ‘राधा राधेकृष्ण राधा’ हे भजन, तर चंडीदासाच्या भजनात ‘हरे रामा हरे रामा रामा रामा हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे’ हे भजन त्यांच्या पदांसह येते. बंगालमद्ये गौडी-संप्रदायाची भजने म्हणतात. चतुःसंप्रदाय आखाड्यात करताल, मृदंग यांवर तुलसीदसांची सगुण भजने तसेच सूरदास, मीराबाई, कबीर यांची निर्गुण भजने म्हणतात, तर शैव आखाड्यात चिमट्यावर पारंपरिक शैव पदे म्हणतात. वैष्णव भजनात अधूनमधून राम-कृष्णांच्या कथाही येतात. या कथा प्रमुख वीणेकरी किंवा पेटी वाजवणारा निवेदक सांगतो. ही भजनी मंडळी विशिष्ट उत्सवांना त्या त्या तीर्थक्षेत्री उपस्थित असतात. शैव आखाड्यात शिववर्णनपर चिमट्यांची भजने असतात. उत्तर हिंदुस्थानातील भजनात पेटीचा समावेश कालांतराने झाला. शैव भजनात पेटी, टाळ, वीणा नसते. चिमटा, मृदंग किंवा ढोल ही वाद्ये वापरतात. वैष्णव भजनात वीणेकरी अधूनमधून नाचतो तर शैव भजनात चिमटेकरी अधूनमधून नाचतो.
कर्नाटक संगीतामध्ये भजन म्हणणारे ‘भागवतर’ मृदंग, टाळ, वीणा वा तंवोरा, पेटी या वाद्यांसह भजन म्हणतात. त्यातला प्रमुख भागवतर फेर धरून नाचतो व त्यासोबत बाकीचे भजन म्हणतात. यातील पदे कथानकप्रधान असतात भजन ऐकणारे श्रोतेही त्यांच्याबरोबर पदाचे ध्रुवपद आळवितात. यात गणेश, सरस्वती इ. देवतांची स्तुती, प्रह्लाद, नारद यांचे माहात्म्यपर वर्णन, जयदेवाची ‘अष्टपदी’ राम-सीता, सुब्रह्मण्य यांचे गुणवर्णन येते. हा भजनाचा पहिला भाग झाला. दुसऱ्या भागात देवतेजवळची समई मधोमध ठेवून त्याभोवती प्रदक्षिणा घालून भजन म्हणण्याची प्रथा आहे. ‘उञ्च्छवृत्ती भजनी मंडळ’ म्हणून एक फिरते भजनी मंडळ असून ते रस्त्यावर भजन करीत जातात. लोक त्यांना कोरडी मिक्षा घालतात. तंजावर प्रांतात देवतेच्या पालख्यांपुढेही भजने म्हणतात. यात पुरंदरदास, बोधेंद्रगुरूस्वामी, त्यागराज, सदाशिव ब्रह्मेंद्र इत्यादींच्या रचना असतात. गुजरातमधील भजनी संप्रदायाचा नरसी मेहता हा प्रवर्तक होय. या पदरचनेत कृष्णकथा प्रामुख्याने गुंफलेली असते. ओरिसातील भजनी परंपराही रामकृष्णकथांनी युक्त असते. यात कथानिवेदनही वापरतात. प्रमुख वीणेकरी व पेटीवादक हा अधूनमधून कथा सांगत असतो व आपल्याबरोबर सर्वांना भजन म्हणायला सांगतो.
महाराष्ट्रात मुख्यत्वेकरून वारकरी संप्रदायाने भजनगायनाची परंपरा नामदेवांच्या काळापासून सुरू केली. यापूर्वी महानुभाव पंथात मठसंगीत होते. पण ते मठापुरते आणि मठातील शिष्यगणांपुरतेच मर्यादित स्वरूपात तसेच चक्रधरांच्या गुणस्तुतीपर कवनांतून उपलब्ध होते. हे भजन सर्वसामान्यांसाठी कधीही नव्हते. वारकरी संप्रदायाने भजन सर्वांना मुक्त केले. नामस्मरणाचा प्रमुख प्रकार म्हणून तसेच नवविघाभक्तीचा एक आविष्कार म्हणून भजन या घटकास वारकरी परंपरेने भक्तिमार्गात प्रमुख व महत्त्वपूर्ण स्थान दिले. वारकरी भजनात खोलगट टाळ, वीणा, पखावज ही तीन वाद्ये असतात. समोर पांडुरंगाची प्रतिमा असते. वीणेकरी मधोमध उभा असतो. त्याच्या डाव्या हाताला पखावजी असतो. भजनाचा आरंभ ‘जय जय राम कृष्ण हरी’ या नाममंत्राने होतो. ‘सुंदर ते ध्यान उभे विटेकरी’ हा तुकारामाचा अभंग व ‘रूप पाहता लोचनी, सुख जाले वो साजणी’ हा ज्ञानदेवाचा अभंग मंगलाचरण म्हणून गातात. यानंतर वीणेला व वीणेकऱ्याला बुक्का, हार घालून पूजा झाली, की मग भजनास आरंभ होतो. यात नामदेव, एकनाथ, तुकाराम, निळाबाराय या संतांच्या नाम-उपदेशपर अभंगांचा प्रमुख्याने समावेश होतो. भजनाचा पूर्वरंग झाल्यावर नाथांच्या गौळणी, भारुडे म्हणतात. भजनाच्या शेवटी विठ्ठल, ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम यांच्या आरत्या म्हणतात. पसायदान व नामदेवाचे चिरंजीवपद सामुदायिकपणे म्हणून भजन संपते.
वारकरी भजनांचे ‘फड’ आहेत. फड म्हणजे वारकरी भजनांचा समूह वारकऱ्याने आयुष्यभर त्या फडाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे, असा नियम आहे. वासकरबुवांचा फड, गुरवबुवांचा फड, कदमबुवांचा फड, करमरकरबुवांचा फड असे विविध फड पंढरपुरात आहेत. हे विशिष्ट समूह काही निवडक संतांचे अभंग परंपरेने गातात. हे अभंग फडांच्या पूर्वंसूरींनी ठरवून दिलेले असतात. त्याव्यतिरिक्त दुसरा अभंग म्हणावयाचा नसतो. हे फड आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत पंढरपुरात व कार्तिक वद्य प्रतिपदा ते अमावास्येपर्यंत आळंदीस असतात. वारकऱ्यांच्या या दोन प्रमुख वारकऱ्यांना फडांची हजेरी लागते. संतांच्या पालख्या पंढरपुरास येताने काही चक्री भजने करतात. ‘चक्री भजन’ म्हणजे लागोपाठ भजने म्हणणे. यात कधी कधी भजनाच्या शेवटच्या अक्षरापासून दुसऱ्या अभंगाला सुरूवात करतात. काही विशिष्ट देवभक्तांची सोंगे घेऊन त्यांच्यात अंभगरूपाने होणाऱ्या संवादास ‘सोंगी भजन’ म्हणतात. सांगली जिल्ह्यातील खुजगाव येथील सोंगी भजनी मंडळी प्रसिद्ध आहेत. ‘बारी भंजना’त अधिक सुरेल भजन कोण म्हणतो, याची स्पर्धा असते. ‘रिंगण भजना’त तीन वेगळ्या प्रकारची भजनी मंडळी गोलाकार उभी असतात. ते क्रमाने एकेक अभंग म्हणतात. ‘भारुड भजना’त केवळ नाथांची भारुढ गातात. ही सर्व विठ्ठलपंथी भजने आहेत.
वारकरी भजनी मंडळे महाराष्ट्रभर आहेत. दत्तपंथी भजनात वारकरी भजन असते, पण त्यात दत्तसंप्रदायातील पारंपरिक पदे नमन म्हणून म्हणतात. दर गुरूवारी भजन करणारी दत्तोपासक भजनी मंडळे महाराष्ट्रात सर्वत्र आहेत. आळंदीच्या वारकरी शिक्षणसंस्थेत खास भजनाचे वर्ग घेतले जातात. काही ठिकाणी बारमाही भजन असते. विठ्ठलपंथी प्रत्येक एकादशीस तर दत्तपंथी दर गुरूवारी भजन करतात. दत्तपंथी भजनात भक्ति-नृत्यही असते. काही भजनी मंडळे एकतारीवर भजने करतात. एकतारीवर भजन म्हणण्याचा प्रघात मांग, महार, कोळी, चाभांर या जमातींत विशेष आढळतो.
भजन हा गानपद्धतीनुसार सुगम शास्त्रीय संगीताचा किंवा सुगम संगीताचा प्रकार म्हणता येईल. पारंपरिक संतकवींची भजनरचना धृपद-धमार गायकीच्या अथवा शास्त्रीय रागदारीच्या अंगाने गाईली गेल्यास, त्या रचनेला ‘पद’ असे म्हणतात. ही रचना सुगम शास्त्रीय संगीताच्या-ठुमरी-दादरा गायकीच्या-अंगाने गाईली गेल्यास ‘भजन’ म्हणून ओळखली जाते. भजन हे एकच गायक गातो किंवा समूह स्वरात सामुदायिक रीत्याही म्हटले जाते. सुगम संगीताच्या अथवा लोकगीताच्या अंगाने भजन गाईले गेल्यास एकतारी, झांजा, चिपळ्या ही वाद्ये त्या बरोबर साथीला घेतली जातात. या पद्धतीने भजन म्हणत असताना काव्यार्थाला महत्त्व असल्यामुळे साहित्याची पुनरुक्ती केली, तरी सांगीतिक दृष्टया आळवणे हा भाग त्यात नसतो. याउलट ठुमरी-दादरा गायकीच्या अंगाने भजन गाईले गेल्यास तेथे संगीतदृष्टया कल्पनेचा विलास खूपच आढळतो आणि साहित्याचे महत्त्व कमी न करता पण संगीतदृष्टया विविध त-हांनी आळवून असे भजन गाईले जाते. भजन ज्या गायकीच्या अंगाने भजन गाईले जात असेल, त्यानुसार सोयीप्रमाणे तबला, पखावज, ढोलक इ. तालवाद्ये वापरली जातात. तेव्हा भजन हा गीतप्रकार शास्त्रीय रागदारीपासून ते सुगम तसेच लोकसंगीतापर्यंत वेगवेगळ्या संगीतप्रकारांच्या गायकीची डूब घेऊन भिन्नभिन्न प्रदेश-कालपरत्वे प्रसृत होत गेला आहे, हे दिसून येईल.
भजनात पारंपरिक चालींबरोबर शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेली भजनी पठडी गेल्या काही वर्षांत तयार झाली. यांनी भजन ऐकणारा भाविक आणि शास्त्रीय संगीतची आवड असणारा श्रोतृवर्ग तयार केला. या भजनात पेटीचा समावेश झाला. यात दोन स्वतंत्र पठडया निर्माण झाल्या. एक पारंपरिक चाली वीणा-टाळ-पखावज यांच्या साथीसह गाणारी पारंपरिक पठडी दुसरी पेटी-तबला-तंबोरा-वीणा-पखावज यांच्या साथीसह व रागदारीयुक्त गाणारी नवी पठडी अशा पठडीतील भजनी मंडळे शहरांतून दिसतात. मुंबईतील गिरणी कामगारांच्या भजन स्पर्धा होतात. अशा प्रकारच्या भजनांचे वर्ग प्रसिद्ध भजनकारांमार्फत चालवले जातात. मुंबईचे एकनाथबुवा हातिसकार हे या विठ्ठलपंथी भजनीपठडीतील प्रसिद्ध भजनकार होऊन गेले. नागपूरचे शामसुंदरबुवा भुजाड यांचाही या संदर्भात उल्लेख करता येईल.
रामदासी भजनात समर्थ संप्रदायाची पारंपरिक पदे येतात. यात समर्थगाथेतील भजने म्हटली जातात. तीनचार भजनांपाठोपाठ ‘समर्थ सद्‌गुरू माझे आई मजला ठाव द्यावा पायी’ असे नामस्मरणही म्हणतात. भजनाच्या शेवटी त्या त्या वाराची ‘सवाई’ म्हणून भजन संपते. यात पेटी, तबला, टाळ ही वाद्ये असतात. समर्थ रामदासांची प्रतिमा समोर ठेवतात.
शक्ती संप्रदायातील भजनात देविस्तुती, ‘उदे उदे ग अंबावाई’ या रचना मोठया करताळावर म्हणतात. साथीला ढोलके, तुणतुणे ही वाद्ये असतात. मंगळवार, शुक्रवार या दिवशींच्या भजनात मध्यंतरात जोगवाही मागतात. तुकाराम, रामदास यांचे अभंग म्हणतात. यात महालक्ष्मी, रेणुकादेवी, तुळजाभवानी, सप्तृश्रृंगी यांच्या प्रतिमा असतात.
गाणपत्य भजनात गणेशस्तुती नमनात गातात. ‘पार्वतीशनंदना मोरया गजानना, सुफलदुरितनाशना येई बा गजानना’ हे नामस्मरण करतात. यात एकनाथ, रामदास यांचे अभंग पेटी-टाळ-तबला-तंबोरा या साथीच गातात. यांच्यात दर संकष्टी चतुर्थीला भजन म्हणण्याचा प्रघात आहे.
भजनात प्रभुभक्ती व प्रभुवर्णन अभिप्रेत असते. पण त्याचसोबत जीवन कसे असावे, कसे बनविले पाहिजे, कसे सुधारले पाहिज, त्यासाठी कोणती साधने वापरायची याची देखील स्वच्छ कल्पना मनुष्याला मिळणे आवश्यक आहे. या भजनांमध्ये अशा प्रकारचा एक अल्पसा प्रयत्न केलेला आहे.

N/A

References : N/A
Last Updated : March 25, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP