भाऊबीज - भाव व भक्तिची भाऊबीज
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
गुरुवार ता. २३-१०-१९३०
भावभक्ती नामे युग्म जे विख्यात । उपजे चित्तांत जनाचिया ॥१॥
भ्रातृभगिनीचे नाते त्यांस होत । अपूर्व वर्तत प्रेमा त्यांचा ॥२॥
बहु अलंकार माने भूषवित । भगिनी तोषत भक्तीयोगे ॥३॥
जैसा जैसा भाव उद्भवे ह्रदयी । रति ईश पायी तैशी येता ॥४॥
भावासम भक्ति हे अनुसंधान । ठेवा ओळखून जाणावया ॥५॥
भावाचीये पाठी भक्ति उपजत । भावा अनुवर्तत भगिनी ती ॥६॥
भावाचिये तोषी भक्ति तुष्ट होय । भावासह लय पावे भक्ती ॥७॥
क्षणभर तीस वियोग साहेना । भावास सोडिना सहोदरा ॥८॥
संबंध तयाचा ऐसा जाणोनियां । धरावेंच तया संदेह, न ॥९॥
भाव भक्ती करा एकत्र अंतरी । लोभ निरंतरी त्यांचा ठेवा ॥१०॥
ऐशी भाऊबीज प्रयत्ने साधावी । नित्य आचरावी शाहाण्याने ॥११॥
तेणे मृत्युबाधा निश्चये चुकेल । यम, न पाहील तुम्हांकडे ॥१२॥
ऐसा जन्ममृत्यु संसार नासावा । योग जमवावा सहोदरां ॥१३॥
विनायक म्हणे माझा शुद्ध भाव । मजला सदैव भक्तीयोग ॥१४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2020
TOP