अध्याय सातवा - समास पहिला
श्रीसद्गुरुलीलामृत
॥ जशी माउली ग्रास देते मुलाला । तसें बोधुनी ज्ञान पाजी जनाला ॥
॥ धरेसारिखी ज्या वसे नित्य शांती ॥ नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ति ॥७॥
श्री गणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीसद्गुरुनाथायनम: । श्रीरामसमर्थ ।
जयजयाजी एकदंता । विघ्नहारी सुखदाता । वंदू श्रीशारदामाता । जगज्जननी मती देई ॥१॥
साधका साह्य हनुमंत । वंदन करुं तया सतत । भु:भूकारे दुमदुमवित लोकत्रय ॥२॥
तेहतीस कोटी देवभाव । एकचि नटला रामराव । वंदु दुजा धरुनि भाव । भक्ति सोहळा भोगावया ॥३॥
जयजय श्रीगुरुमाय । आम्हां अर्भकांची सोय । अपाय छेदुनि उपाय । करीतसे ॥४॥
आमुचे हित आम्हांसी । ठाऊक नसे निश्चयेंसी । परी माय जाणे मानसीं । वेळोवेळां सांवरीतसे ॥५॥
लोभ छंदे क्रिडा करितां । दु:खगर्ती पडेल आतां । जाणोन सदगुरुमाता । निवारीतसे तेथूनी ॥६॥
अहंता अज्ञान भरलें । वासना तस्करीं मोहिलें । विषय अमिषा दावोनि नेले । आडमार्गी जीवासी ॥७॥
विवेक इंद्रिये तोडिलीं । सुकृत भूषणें लुबाडिली । जन्ममृत्यूदरीं लोटलीं । अज्ञान बालकें विर्दयें ॥८॥
तेव्हां माय आठविली । दीर्घस्वरें करुणा भाकिली । तंव ती धांवोनि कुर्वाळी । त्रिविध ताप हराया ॥९॥
माय ममतें कुर्वाळी । सद्गुरु माया निर्दाळी । हेतूरहित प्रेमाजिव्हाळी । गुरुमायेची ॥१०॥
माय एक जन्मीची । गुरु माय जन्मोजन्मीची । सत्ता त्रिभुवनी जिवी । चाले अखंड ॥११॥
माय संसृतींत गोवी । सद्गुरु करीत गोसावी । दुजेपणाची यादवी । उठोच नेदी ॥१२॥
ऐसी गुरुमाय धन्य । भक्तिरस पाजवी स्तन । धरिता अश्रय मिओन । यम किंकर न शिवती ॥१३॥
धरितां सद्गुरुकास । सीमा नाहीं आनंदास । वेगुमानी कंळिकाळास । मानेना अल्पही ॥१४॥
माय पर गुरु माय । जी दिन अर्भकांची सोय । चुकवीतसे जन्म मरण घाय । बोघामृत पाजोनी ॥१५॥
माय वचनी विश्वासले । ते कृतकृत्य होवोनि गेले । नित्य पाहिजेत वंदिले । चरण तयांचे ॥१६॥
असो ऐसी गुरुमाउली । आम्हां गांवली गोंदावली । बोध कवळ मुखीं घाली । चमत्कृती दे वोनी ॥१७॥
आम्हीं अर्भकें अज्ञान । बसतों हटट धरोन । वैभवछंदा दावोन । बोध ग्रास घालितसे ॥१८॥
ऐसे जे वरचेवरी । माय मुखीं ग्रास भरी । तेचि बोलूं ये अवसरी । सात्विक परम ॥१९॥
पादपूर्णार्थ कांही । क्वचित येईल नवायी । जाणा साक्षात सर्वही । सद्गुरुवचनें ॥२०॥
ऐसा हा विवेक सिंधू । गुरुमुखींचा अनुवादु । सेवितां तो परमानंदु । अनुभवा येईल ॥२१॥
गुरुवचनीं अविश्वासे । ऐसा कोण पतित असे । दासबोधीं समर्थे ऐसें । पाहा प्रत्यक्ष कथियेलें ॥२२॥
वित्त दुश्चित न करावे । बोल ह्र्दयी धरावें । म्हणजे संसृतीचे गोवे । तुटोनि जाती ॥२३॥
असो गुरुबोधामृत । कवळ कवळी मुखीं घेत । बेसावे जी गुरुभक्त । विनंति माझी ॥२४॥
येथें काय निरुपिलें । श्रवणें काय हाता आले । तें तें संकलित कथिलें । अवधान द्यावें ॥२५॥
श्लोक गुरुबोधो महामंत्रो । ब्रह्मचैतन्यधी ऋषि: । देवतारामचंद्रश्व ओवीछंदस्तु प्राकृत: ॥१॥
धर्महानि: कलौवीजं । श्रध्दाशक्तिस्तु सात्विकी । रामनाम जपेन्नित्यं । सध्दर्म इति कालक्रम ॥२॥
नरदेहाचे सार । कांहीं करावा विचार । नातरी श्वानसूकर । पशु जैसे ॥२६॥
स्त्रिया पुत्र देह रक्षण । हे सकलांच प्रमाण । या व्यतिरिक्त अनुसंधान । असतां मनुष्य म्हणवावें ॥२७॥
एवं संसृतिजन्य विकार । तितुके दु:खाचे डोंगर । त्यांतून जावया पार । नरदेह एकला ॥२८॥
येथे ज्यानें आळस केला । तो पशुमाजीं गणला । या कारणें विवेक भला । केला पाहिजे ॥२९॥
येथें जें वाटे सुख । तें परिणामीं देई दु:ख । याकराणें साधकें विवेक । केलाचि करावा ॥३०॥
कली झाला सबळ । विवेकाचें न चले बळ । चित्त झालें विकल कोठें । सुख दिसेना ॥३१॥
अतृप्ती वासना दु:ख । माया उपजवी शोक । वासना माय दोष अनेक । करविती स्वसत्ते ॥३२॥
तेणें चित्त होय अंधळे । विश्रांती कोठें नाढळे । समाधान दुरी राहिलें । वृत्ति स्थीर होईना ॥३३॥
परमार्थचा नाहीं लेश । मायाभ्रमें कासाविस । तेणें गुणें आला त्नास । श्वासोच्छवास दु:ख भोगी ॥३४॥
इच्छेचा पाहतां व्यापार । विषयावरी प्रेम फार । कीर्ति असावी महिवर । अभिमान वाटे मस्तकीं ॥३५॥
ऐसा संसार दुर्धर । केवळ दु:खाचें डोंगर । यांतचि इच्छि नर । दीप्ती पतंग सुख जैसा ॥३६॥
ऐसी दु:खें भोगावयासी । मूळ वासना विवसी । अज्ञाने योजी घातासी । बहुतांच्या ॥३७॥
ती वासना कैसी परी । तुज सांगतों निर्धारी । बाळ खेळोन आले घरीं । वणवा लावोनी वनासी ॥३८॥
तेथें वृक्ष व्याघ्र जळती । वनचर प्राणी नेणो किती । बाळगृहीं असोन मित्ती । नाही प्राणी वधासी ॥३९॥
ऐसी वासना वृथा अज्ञान । नसतेंचि उठवी विघ्न । अलिप्त जीवा जन्ममरण । अज्ञानें घात करितसें ॥४०॥
आत्म्यास नाहीं जन्ममरण । हें सत्य आहे जाण । देहाचेनि दीर्घ स्वप्न । पडलें वासनेचेनि योगें ॥४१॥
उदकीं उठे बुकबुदाकार । आत्मत्वीदेहादि विकार । उदक बुदबुद प्रकार । भिन्न नाहीं ॥४२॥
तैसे देह अनंत दिसती । द्वैतभावें जाजावती । परी आत्माराम सर्वाभूतीं । एकला एक ॥४३॥
वासनायोगें भेड पडला । तेणें सुखदु:खाचा गलबला । स्वप्नीं राजपद पावला । पदच्युत झाला क्षणामाजीं ॥४४॥
सुख वाटलें तेंही मिथ्या । दु:खाचीही तीच वार्ता । परी लोभ शोक अहंता । जाच करिती ॥४५॥
सुखालागी करी तळमळ । आंत वासना मळमळ । देह पद्मपत्रीचें जळ । क्षणैक स्थिरावेना ॥४६॥
जेथें सुखाचे अधिष्ठान । तें नाथिलें अशाश्वत जाण । मृगजळीं शमवावी तहान । म्हणोनि प्राणी धांवतसे ॥४७॥
येथें कोणी भेटेल ज्ञानी । तरी सांगेल मृगजळ कहाणी । तंववरी हा लक्षयोनि । फिरतचि राही ॥४८॥
असो ऐसीही वासना । प्रपंची गोवित जना । असती दु:खे नाना । गणती नाही ॥४९॥
दरिद्र लोभ अधिव्याधि । मन अहंकार माया । बुध्दि । दुष्टा वासना भय शोक उपाधि । कामेषणा पिडितसे ॥५०॥
संसारॊ सुख इच्छिणें । इंगळावती झोंप घेणें । दोन्ही सारखीं प्रमाणें । पहावें सूक्ष्म दृष्टी ॥५१॥
परी तो संसार सोडवेना । सोडूं जातं सुटेना । या कारणें मूळ वासना । नाशिली पाहिजे ॥५२॥
वासना क्षय कैसा करावा । संसार कैसा जिंकावा । तो मार्ग गुरुसी पुसावा । दीन लीन होवोनी ॥५३॥
गुरुवाक्य विवरोनी । शरीर झिजवावें साधनीं । मुख्य नेम अनुसंधानीं । वासनाबीज भाजावें ॥५४॥
अखंड करावें नामस्मरण । अलक्षीं लावावें मन । भक्तिभावें जगज्जीवन । आपुलासा करावा ॥५५॥
तरी आधी करावें काय । केव्हां धरावें सद्गुरुपाय । जेणें चुकती हे अपाय । तेही आता परिसावें ॥५६॥
स्वधर्म करोनि जतन । कामक्रोध वर्जित मन । शांति क्षमा परिपूर्ण । निर्लोभ निर्ममत्व ॥५७॥
निरामय अंत:करण । भूर्ती दया परिपूर्ण । सम दृष्टी ठेवोन । गुणदोष न काढावें ॥५८॥
परपीडा परनिंदा । परद्रव्यापहार कदा । परस्त्री अभिलाष प्रमाद । स्वप्नीहीं येऊं न द्यावें ॥५९॥
पाप भय अनुताप विराग । करोनि अवगुणांचा त्याग । आदरें धरावा सत्संग । सद्गती कारणें ॥६०॥
सद्गुरुसी जावें शरण । वहावें तन मन धन । स्वस्वरुप घ्यावें ओळखूण । समाधान कारणें ॥६१॥
तरी सद्गुरू कैसा ओळखावा । काय पदार्थ त्यांना द्यावा । कोण अनुभव स्वयें घ्यावा । सद्गुरुपासोनी ॥६२॥
या प्रश्नाचें निरुपण । पुढील समासीं होईल जाण । स्थिर ठेवोनी मन । श्रवण करावें ॥६३॥
इति श्रीसद गुरुलीलामृते सप्तोमोध्यायांतर्गत प्रथमसमास: । ओवीसंख्या ॥६३॥
॥ श्रीगुरूचरणारविंदार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2019
TOP