मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसद्गुरुलीलामृत|पूर्वार्ध|अध्याय सहावा| समास तिसरा अध्याय सहावा समास पहिला समास दुसरा समास तिसरा समास चवथा समास पांचवा समास सहावा अध्याय सहावा - समास तिसरा श्रीसद्गुरुलीलामृत Tags : प समास तिसरा Translation - भाषांतर श्री गणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । इकडे सद्गुरूनिधान पुनरपि घेती गुरूदर्शन । मग करिती तीर्थाटण । नाना देशीं ॥१॥आयोध्या मथुरा हरिद्वार । हिमाचलीं बदरीकेदार । जाती काशी विश्वेसर । क्षेत्रें पुनित करावया ॥२॥उत्तर तीर्थे सर्व करोनी । कांही वास इंदोर भुवनी । शरण्यासी तारोनी । सांप्रदाय वाढविती ॥३॥इंदोर येथें शिष्य फार । सद्गुरुचे झाले किंकर । त्यांतील जे सत्वागर । नामें सांगू तयांची ॥४॥भैय्यासाहेब मोडक म्हणोनी । अखंडा होते नामस्मरणी । सद्गुरु राहती त्यांचे सदनी । शुध्दभाव पाहोनिया ॥५॥जिजीबाई नामे करोनी । विप्रस्त्री सूज्ञ सद्गुणी । लागली श्रीसमर्थचरणी । देह सार्थक करावया ॥६॥जिजाबाईस तुकारामदर्शन । तैसे भैयासही जाण । करविलें स्वयें नेऊन । परमभाविक जाणुनिया ॥७॥रावसाहेब पळशीकर । दिवाण सद्गुणी चतुर । आणिक शिष्य असति फार । इंदोरग्रामी ॥८॥इंदोर हर्दा गोंदावली । सद्गुरुचीं स्थानें भलीं । बहुत दिवस वस्ती केली । परमक्षेत्रें पुण्यभूमी ॥९॥इंदुरी विशेष प्रसिध्द । आनंदसागर ब्रह्मानंद । गुरुकृपें झाले सिध्द । सर्वाधिकारी ।१०॥तया उपदेश त्या ग्रामीं । म्हवोनि विशेष पुण्यभूमी । वरचेवरी सद्गुरुस्वामी । वास करिती त्या ठायां ॥११॥कांही काळ करोनि वास । सद्गुरु निघाले दक्षिणेस । मार्गी उपदेश बहुतांस । देती ते नित्य काळी ॥१२॥बहूत लोक दर्शना येती । बहुतांच्या कामना पुरविती । नाना चमत्कार घडंती । आश्चर्य वाटे सकळांसी ॥१३॥दोघे कालिका उपासक । होते परममांत्रिक । जारणमारण उच्चाटणादिक । विद्येमाजीं कुशल ते ॥१४॥त्यांनी श्रीगुरु देखिले । नाना चमत्कार करिती भले । आपणाहून सामर्थ्य आगळें । दिसते म्हणती यांजपाशी ॥१५॥तरी एव्हढी विद्या शिकावी । म्हणजे वाढेल पदवी । काय युक्ती योजावी । विद्या धन मिळवाया ॥१६॥असुरू विद्येमाजी प्रविण । लेखिती आपणासारिखे जन । बहूत प्रकारे विनवोन । म्हणती मंत्र सांगावा ॥१७॥सद्गुरु वदती तयांसी । भक्ताभिमानी वैकुंठवासी । तोचि घडाविता कार्याशीं । आम्ही असो निमित्तमात्र ॥१८॥नाहीं पंचाक्षरी मंत्र । वेताळ नवचंडी यंत्र । सर्व हालविता सूत्र । प्रभू एक रामराय ॥१९॥आम्ही तयाचे किंकर । सदा गातो रघुवीर । न जाणो मंत्रसावर । सत्य सत्य जाणावें ॥२०॥ते न मानवें तयांसी । चोरितसे आम्हापाशी । बंधन करू नागपाशीं । म्हणजे वळती येईल ॥२१॥ऐसें चिंतिति अंतरी । फिरती सत्गुरु बरोबरी । गाठोनि एका डोंगरीं । नागपाश टाकिला ॥२२॥तत्काळ नाग निर्माण झाले । सर्वागासी बंधन केलं । सद्गुरु हासती तये वेळे । कैसी तृष्णा विद्येची ॥२३॥उभयतां वदती आम्हासी । मंत्र सांगावा निश्चयेसी । तरीच सोडू या पाशीं । नातरी घात घडेल ॥२४॥गुरु म्हणती रामभक्त । आमचा न होय घात । तुमचा मंत्र जाईल व्यर्थ । सर्प मृत झालिया ॥२५॥तामसी विद्येपासोनि । करिता नरकाची जोडणी । यम यातनेची जाचणी । भोगिता सर्व आठवेल ॥२६॥दो दिवसाचें सुखासाठीं । पापें साठविता कोटी । अद्याप अनुताप घ्या पोटी । म्हणजे सुख पावाल ॥२७॥सुख व्हावें शाश्वत । ऐसे करा काहीं हित । नातरी बुडाल समस्त । नर्ककुंडा माझारीं ॥२८॥साधका सिध्दी नाडती क। तुम्हांसी चेटकें बुडवितीं । न जाणता आपुली गती । दुजियासी काय देतां ॥२९॥बोध करिती बहुतापरी । न मानिती ते असुरी । म्हणती करितो फसवेगिरी । पाश सोडाया कारणें ॥३०॥तीन दिवस वाट पाहिली । रघुवीर समर्थ गर्जना केली । डोंगराखाली उडी घेतली । नाग झाले छिन्नभिन्न ॥३१॥देखोनि ऐसा चमत्कार । उभयतां वाटला विस्मय थोर । सामर्थ्य असता धुरंधर । तीन रात्रीं काढिल्या ॥३२॥जाईल आमुचे मंत्रबल । म्हणोनि सोशित हाल । तोडिले दुर्भेद्य व्याल । मानवी बल नव्हे हें ॥३३॥आधीं बहूत बोध झाला । वरी साक्षात्कार घडला । उभयतां अनुताप उपजला । धांवोनी चरण धरियेले ॥३४॥अनंत अपराधी मंदमती । बहूत भोगिल्या अपत्ती । कृपासागर गुरुमूर्ती । क्षमा दीनासी करावी ॥३५॥म्हणोनि लागती चरणीं । कृपा भाकिती करुणा वाणी । सोडवाया भवांतुनी । परमपातकी गुरुराया ॥३६॥सद्गुरु दयाघन वर्षले । मुमुक्षु चातकां शांतविलें । अनुग्रह देवोन लाविले । रामभक्तीसी ॥३७॥दोघे सेवा करिती गहन । एका निरोप देती जाण । सच्चिदानंद नामें करुन । फिरती गुरूसंनिध ॥३८॥अति कठिण सेवा करी । नामें झिजवी वैखरी । तूर्या अवस्थेतें वरी । सच्चिदानंद ॥३९॥येथेची सिध्दी नाडीती । साधका फसी पाडिती । अपूर्व कथा धरावी चित्ती । श्रोते साधक सूज्ञ हो ॥४०॥सद्गुरु रामेश्वर चालिले । आगगाडई समीप आले । अवकाश जाणोन स्थिर झाले । धर्मशाळे माझारी ॥४१॥कांही काळ लोटल्यावरी । गाडी आली अड्ड्यावरी । श्रीगुरु जाती तंववरी । गाडी चालू जाहली ॥४२॥सच्चिदानंदे अवलोकून । म्हणे श्रीगुरु वाचोन । कोठें धावतीस कुं करोन । स्थीर रहा ॥४३॥तप:सिध्दीचेनि बळें । गाडी पुढें न चाले । उपाय करोनि थकले । गाडीवाहक ॥४४॥सद्गुरु मनीं जाणती । बळेंचि विलंब लाविती । पाहोन शिष्याची कृती । बोलते झाले ॥४५॥साधोनिया साधनासी । सिध्दी उपभोग इच्छिसी । ही काय आठवळी तुजसी । तमोबुध्दी पूर्वीची ॥४६॥आम्हां गोसावियांप्रती । जाण्याची काय गडबड होती । उदयीक जाऊं पुढती । तुवां हें काय केलें ॥४७॥कली वाढला दुर्धर । काम्यकर्मी सकलनर । भलताच होईल जोजार । साधनीं व्यत्यय येईल ॥४८॥आम्हां सत्वर जाणें असे । तरी काय विलंब नसे । नेत्र मिटावे स्वल्पसे । मग पहा चमत्कृती ॥४९॥क्षण एक नेत्र मिटले । शिष्यासह गुप्त झालें । उघडोनि बा पाही डोळे । रामेश्वर नमन करी ॥५०॥सिध्दीची तो ऐसी स्थिती । परी साधकां दे अधोगती । अद्यापन जाय असक्ती । मुख न दावी द्वादशाब्दें ॥५१॥बोलोबि ऐसें तयासी । गुप्त झाले सत्वरेसी । प्रकटले इंदुरी ज्ञानराशी । सद्गुरुनाथ एकले ॥५२॥कांही काळ इंदुरी राहिले । इकडे रावजी निवर्तले । श्रीगुरुंनी मुंडन केलें । लोके आश्चर्य करिताती ॥५३॥आज वडील वैकुंठवासी । सांगते झाले लोकांसी । गोंदावलीची स्थिति कैसी । झाली पहा ॥५४॥गीताईस दु:ख झाले । सत्वगुणीं रावजी गेले । अण्णाबाळ उघडें पडले । कनिष्ठबंधू सद्गुरुचें ॥५५॥जेष्ठ सुतावाचोनि कांही । उत्तरक्रिया होणे नाहीं । ऐसा अभिप्राय सर्वही । विप्रें काडिला मंथुनी ॥५६॥सद्गुरुचा शोध करिती । आल्यागेल्या विचार पुसती । कांही कळेना निश्चिती । चिंता करिती अनिवार ॥५७॥तव अकस्मात दशमदिनी । तेथे आली गुरुजननी । मुंडन केलें पाहोनि । आश्चर्य करिती लोक सर्व ॥५८॥यथासांग क्रिया केली । सवेंचि स्वारी निघोनि गेली । सकळां हळहळ वाटली । धावा करिता गुरुचा ॥५९॥प्रकटती इंदुरांत । सदगुरु गोसावी वेष सोडित । राजयोग धरिती सतत । कौपीन कफनी फलगुरु ॥६०॥गणेश टोपी शिरीं घालिती । पाई खडावा वागविती । कुबडी स्मरणी झोळी घेती । कार्या कारण ॥६१॥उंची वस्त्रे जरतारी । मुद्रा द्वादश शरीरीं । केशरअक्षंती शोभे शिरी । वैष्णवी त्रिपुंड ॥६२॥एकांतवास सोडिला । शिष्य समुदाय असंख्य झाला । घेती घेवविती नामाला । श्रीरामप्रभूच्या ॥६३॥बहूत जन दर्शना येती । अनुग्रह घेतां सुखी होती । नित्य उठती भोजनपंक्ती । समाराधना गुरुगृहीं ॥६४दर्शनमात्रें आनंदवी । नानासंकटीं सोडवी । भावीक नास्तीक कामिक लावी । रामभजनीं सकळांसी ॥६५॥शास्त्री वैसिक वेदांती । कर्मठ शाक्त सिध्दांती । सकलांचें समाधान करिती । श्रेष्ठत्व दाविती नामाचे ॥६६॥नाम सकळाचें सार । नाम सकला आधार । कलियुगीं भवपार । नाम एकची पाववी ॥६७॥ऐसा करुनि उपदेश । प्रचति दाविती जनांस । हरिहटट केला कालिकतास । संत समुदाय मेळवुनी ॥६८॥नरनारी सेवा करिती । सकलां रामरुप पाहती । मायबापाहूनि प्रीति । सद्रुवरी सकलांची ॥६९॥सद्गुरु आमचा आप्तसखा । सद्गुरू आमुचा पाठिराखा । सद्गुरु चैतन्यची देखा । सुत्रे हालवी सकलाची ॥७०॥सद्गुरु संनिध असतां । कळिकाळाहाणू लाथा । ऐसी सकलांचे चित्ता । वाटतसे भावबळें ॥७१॥वैभव नृपाहून थोर । महाराज ऐसे वदती नर । गोंदावले गांवकामगार । गोंदावलेकर कोणी ह्मणे ॥७२॥सामर्थ्य पाहतां अदभूत । वास्तव ह्मणती समर्थ । भक्ति ज्ञान वैराग्ययुक्त । सत्पुरुष कोणी ह्मणे ॥७३॥सद्वस्तू सतशिष्या दाविती । तेणें सद्गुरु कोणी ह्मणती । गणूबुवा गोंदावलीप्रती । बोलती बालमित्र ॥७४॥गुरु दत्त ब्रह्मचैतन्य । नाम असे परम मान्य । चैतन्य ब्रह्मीं अनन्य । एकरुप जाहले ॥७५॥गोंदावलेकर महाराज ऐसें । नाम प्रसिध्द विशेषें । सकल सिध्दांमाजीं विलसे । सद्गुरु शिरोमणी ॥७६॥चहूदेशीं ख्याती झाली । महान साधू गुरुमाउली । नाना संकटीं पावलीं । बहुतांसी ॥७७॥शिष्यशाखा बहू झाली । अनेक साधनी लाविली । उपदेश वचनीं निवविलीं । अंतरें कित्येकांची ॥७८॥कोणी वाद करावया येती । कोणी छिद्रेची शोधिती । कोणी परिक्षा करु धांवती । सत्य की मिथ्या ॥७९॥ज्ञान पाहोन धरिती मौन । वृत्ती पाहोन होती लीन । तेच पाहून जाती शरण । नास्तिक आणि विकल्पी ॥८०॥नित्य भजन अन्नदान । नित्य अध्यात्म विवरण । नित्य उच्छाह आनंदधन । सद्गुरु संनिध ॥८१॥सकलां मुखीं रामनाम । हाती स्मरणीं संख्या नेम । सकलांचे सारिखें प्रेम । श्रीचरणीं ॥८२॥ इति श्रीसद गुरुलीलामृते षष्ठोध्यायांतर्गत तृतीयसमास: । ओंवीसंख्या ॥८२॥॥ श्रीसदगुरूनाथार्पणमस्तु ॥॥ श्रीराम समर्थ ॥ N/A References : N/A Last Updated : October 22, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP