सार्थपिड्गलछन्द:सूत्र -अध्याय सातवा

सार्थपिड्गलछन्द:सूत्र


आतां ह्या अध्यायांत त्रयोदशाक्षर पादाच्या अतिजगती छन्दापासून सव्वीस अक्षरें पादांत असणार्‍या उत्कृतिपर्यन्त असलेल्या छन्दांमधील प्रसिद्ध वृत्तें सांगावयाची आहेत. त्यापैकीं अतिजगती, शर्करी, अतिशर्करी, अष्टि, अत्यष्टि, धृति आणि अतिधृति ही सात छन्दें, अक्षरसंख्येनें वैदिक छन्दांचें अतिक्रमण करतात म्हणून ह्यांना अतिच्छन्दस्‍ असें म्हणतात व त्या पुढच्या सात कृतिसंज्ञक जाणाव्या. कारण त्यांच्या नांवांत कृति हा शब्द आहे. आतां प्रथम त्रयोदशाक्षरी अतिजगतीपासून सुरुवात करतात.

प्रहर्षिणी म्रौ ज्रौग्‍ त्रिकदशकौ ॥१॥
प्रत्येक पादांत म र ज र ग असे गण असून तीन व दहा अक्षरांनीं यति असतात त्या वृत्ताचें नांव प्रहर्षिणी असतें. जसें, ‘शोभा ये, स्मितवदनें प्रहर्षिणीला’ असे चरण रचावे. ॥१॥

रुचिरा ज्भौ स्जौग्‍ ॥२॥
रुचिरावृत्तांत ज भ स ज ग असे गण प्रत्येक पादांत असून चार आणि नऊ अक्षरांनीं यति असतो. ॥२॥

मत्तमयूरं म्तौ य्सौग्‍ समुद्र नवकौ ॥३॥
चरणांमध्यें म त य स ग असे गण क्रमानें असून चार व नऊ अक्षरांनीं यति असल्यास तें मत्तमयूर नांवाचें वृत्त असतें. मराठींत ह्याला मत्तमय़ूरी असें म्हणतात. श्रीशंकराचार्याच्या सुप्रसिद्ध हरिमीडे स्तोत्राचें हें वृत्त आहे. ॥३॥

गौरी नौ न्सौग्‍ ॥४॥
जिच्या पादांत न न न स ग असे गण असतात तिचें नांव गौरी होय. ॥४॥
येथून पुढें चौदा अक्षरांचे पाद असणार्‍या शर्करीछन्दांतील वृत्तें सांगतात. शर्करीलाच ग्रन्थान्तरांत शक्करी असें म्हणतात.

असंबाधा म्तौ न्सौ गाविन्द्रियनवकौ ॥५॥
असंबाधा वृत्ताच्या पादांत, म त न स ग असे गण असून पांच (इन्द्रिय) व नंतर नऊ अक्षरांनीं यति असतो. ॥५॥

अपराजिता नौ र्सौ ल्गौ स्वरऋषय: ॥६॥
अपराजिता वृत्ताच्या पादांत न न र स ल ग असा गणक्रम असून सात सात अक्षरांनीं यति असतात. ॥६॥

प्रहरणकलिता नौ भ्नौ ल्गौ च ॥७॥
येथें चकारानें ‘स्वरऋषय:’ ह्या पदाची अनुवृत्ति आहे म्हणून, प्रहरणकलिता वृत्तांत न न भ न ल ग असे गण असून सात सात अक्षरांनीं यति असतो असा सूत्रार्थ झाला. ॥७॥

वसन्ततिलका त्भौ जौ गौ ॥८॥
वसन्ततिलका वृत्ताच्या प्रत्येक चरणांत, त भ ज ज ग ग असे गण असतात. ॥८॥

सिंहोन्नता काश्यपस्य ॥९॥
काश्यप आचार्याच्या मतानें, पूर्वोक्त वृत्ताचें नांव सिंहोन्नता आहे. ॥९॥

उद्धर्षिणी सैतवस्य ॥१०॥
सैतव आचार्याच्या मतानें वसन्ततिलकेचेंच नांव उद्धर्षिणी असें आहे. ॥१०॥
आतां पंचदशाक्षरी अतिशर्करींतील प्रसिद्ध वृत्तें सांगतात.

चन्द्रावर्ता नौ नौ स्‍ ॥११॥
चन्द्रावर्तेच्या पादांत न न न न स असे गण असतात. जरी सूत्रांत विशेष सांगितला नाहीं तथापि ह्या वृत्तांत सात व आठ अक्षरांनीं यति करण्याचा पूर्वाचार्याचा संप्रदाय आहे. ॥११॥

मालर्तुनवकौ चेत्‍ ॥१२॥
चन्द्रावर्तेतच सहा व नऊ अक्षरांनीं यति असल्यास त्या वृत्ताचें नांव माला असतें. जसें, ‘स्मर अनुदिन मुररिपुपद मनुजा’ असें मालेचे चरण असतात. ॥१२॥

मणिगुणनिकरो वस्वृषय: ॥१३॥
त्याच चंद्रावर्तावृत्तांत आठ व सात अक्षरांनीं यति असल्यास त्या वृत्ताचें नांव मणिगुणनिकर होतें. ॥१३॥

मालिनी नौ म्यौ य्‍ ॥१४॥
येथें ‘वस्वृषय:’ हें पद अनुवृत्तीनें येतें. जिच्या पादांत न न म य य असे गण असून आठ व सात अक्षरांनीं यति असतो तें मालिनीवृत्त जाणावें. ॥१४॥
आतां षोडशाक्षरी पाद असलेल्या अष्टिछन्दांतील प्रसिद्ध वृत्तें सांगतात.

ऋषभगजविलसितं भ्रौ न्गौ स्वरनवकौ ॥१५॥
ज्याच्या पादांत भ र न न न ग असे गण असून सात व नऊ अक्षरांनीं यति असतात त्या वृत्ताचें नांव ऋषभगजविलसित जाणावें ॥१५॥
ह्यापुढें सतरा अक्षरांचा पाद असणार्‍या अत्यष्टि छन्दांतील प्रसिद्ध वृत्तें सांगतात.

हरिणी न्सौ म्रौ स्लौगृतुसमुद्रऋषय: ॥१६॥
ज्याच्या प्रत्येक चरणांत, न स म र स ल ग असे गण असून सहा, चार व सात अक्षरांनीं यति असतो, तें हरिणीनामक वृत्त होय. पूर्वी कांहीं लोक ह्यालाच ऋषभविलसित म्हणत असत. ॥१६॥

पृथ्वी ज्सौ ज्सौ य्लौग्‍ वसुनवकौ ॥१७॥
ज्याच्या पादांत ज स ज स य ल ग असा गणक्रम असून आठ व नऊ अक्षरांनीं यति असतो तें पृथ्वीनामक वृत्त जाणावें. मोरोपंत कवीच्या सुप्रसिद्ध श्लोककेकावलीचें वृत्त आहे. ॥१७॥

वंशपत्रपतितं भ्रौ न्भौ न्लौग्‍ दिगृषय: ॥१८॥
वंशपत्रपतित नांवाच्या वृत्ताच्या पादांत भ र न भ न ल ग असा गणक्रम असून दहा व पुढें सात अक्षरांनीं यति असतो. ॥१८॥

मन्द्राक्रान्ता म्भौ न्तौ त्यौग्‍ समुद्रर्तुस्वरा: ॥१९॥
मन्द्राक्रान्तेच्या चरणांत, म भ न त त ग ग असे गण असून चार, सहा व सात अक्षरांनीं यति असतो. कालिदासाच्या मेघदूतकाव्याचें वृत्त हें आहे. ॥१९॥

शिखरिणी य्मौ न्सौ भ्लौगृतुरुद्रा: ॥२०॥
शिकरिणी वृत्ताच्या चरणांमध्यें, य म न स भ ल ग असे गण आणि सहा व अकरा अक्षरांनीं यति असतो. जगन्नाथपंडिताची गंगालहरी व शिवमहिम्न: स्तोत्र ह्या वृत्तांत रचले आहे. ॥२०॥
आतां अठरा अक्षरांचा पाद असणार्‍या धृतिच्छंदांतलें प्रसिद्ध वृत्त सांगतात.

कुसुमितलतावेल्लिता म्तौ न्यौ याविन्द्रियर्तुस्वरा: ॥२१॥
ज्याच्या पादांत म त न य य य असे गण असून पांच, सहा व सात अक्षरांनीं यति असतो तें कुसुमितलतावेल्लिता नांवाचें वृत्त असतें. ॥२१॥
आतां पादांत एकोणीस अक्षरें असणार्‍या अतिधृतींतलें वृत्त सांगतात.

शार्दूलविक्रीडितं म्सौ ज्सौ तौ गादित्यऋषय: ॥२२॥
शार्दूलविक्रीडित वृत्ताच्या चरणांत, म स ज स त त ग हे गण क्रमानें असून बारा व सात अक्षरांनीं यति असतो. ॥२२॥
शार्दूलविक्रीडित वृत्ताच्या चरणांत, म स ज स त त ग हे गण क्रमानें असून बारा व सात अक्षरांनीं यति असतो. ॥२२॥
ह्यापुढें विंशत्यक्षरी पाद असलेल्या कृतींतलें वृत्त सांगतात.

सुवदना म्रौ भ्नौ य्भौ ल्गावृषि - स्वरर्तव: ॥२३॥
पादांत, म र भ न य भ ल ग असे गण व सात, सात आणि सहा ह्या अक्षरांनीं यति असतो तिचें नांव सुवदना होय. ॥२३॥

ग्लिति वृत्तम्‍ ॥२४॥
ग ल ग ल अशा गुरुलघूंच्या क्रमानें वीस अक्षरांचा पाद पूर्ण होतो. त्या वृत्ताचें नांव वृत्तच होय. उदाहरण, ‘पुण्यधाम रामनाम पूर्णकामकारि गाय रे सदैव’ असे चारी पाद रचावे. ॥२४॥
आतां प्रकृतिच्छन्दांतलें (पादाक्षरें २१) प्रसिद्ध वृत्त सांगतात.

स्त्रग्धरावृत्तांत, म र भ न य य य असे गण असून सात सात अक्षरांनीं तीन ठिकाणीं यति असतो ॥२५॥
ह्यापुढें सूत्रकार आकृति छन्दाचें (अक्षरें २२) वृत्त सांगतात.

मद्रकं भ्रौ त्रौ त्रौन्‍ न्गौ दिगादित्या: ॥२६॥
भ र न र न र न ग असे गण प्रतिचरणांत असून दहा व बारा अक्षरांनीं यति असतो त्या वृत्ताचें नांव मद्रक असतें. ॥२६॥
सूत्रकार, ह्यापुढें आकृतिच्छन्दांतील (पादाक्षरें २३) वृत्तें सांगतात.
अश्वललितं, न्जौ भ्जौ भ्जौ भ्लौग्रुदादित्या: ॥२७॥
अश्वललित नांवाच्या वृत्तांत न ज भ ज भ ज भ ल ग असा गणक्रम असून अकरा व त्यापुढें बारा अक्षरांनीं यति असतो. ॥२७॥

मत्ताक्रीडा मौ त्नौ नौ न्लौग्‍ वसुपञ्चदशकौ ॥२८॥
मत्ताक्रीडावृत्ताच्या एकेक पादांत, म म त न न न न ल ग असे गण असून आठ व पंधरा अक्षरांनीं यति असतो. ह्यापुढें संकृतिछन्दाचें (अक्षरें २४) वृत्त देतात. ॥२८॥

तन्वी भ्तौ न्सौ मौ न्याविन्द्रियस्वर - मासा: ॥२९॥
तन्वीवृत्ताच्या पादांत भ त न स म म न य असे आठ गण अनुक्रमानें असून पांच, सात व बारा अक्षरांनीं यति असतो. ॥२९॥
ह्यापुढें पंचवीस अक्षरांचा पाद असणार्‍या अभिकृतीमधलें वृत्त देतात. अभिकृतीच्या जागीं कित्येक अर्वाचीन छन्दोग्रन्थांत अतिकृति असें नांव आढळतें.

क्रौञ्चपदा भ्मौ स्भौ नौ नौग्‍ भूतेन्द्रियवस्वृषय: ॥३०॥
क्रौञ्चपदावृत्ताच्या चरणांत, भ म स भ न न न न ग असे गण असून पांच, पांच, आठ व सात ह्या अक्षरांनीं यति असतात. ॥३०॥
आतां शेवटच्या उत्कृतिच्छन्दांतील (पादाक्षरें २६) प्रसिद्ध वृत्तें देतात.

भुजड्गविजृम्भितं मौ त्नौ नौ र्सौ ल्गौ वसुरुद्रऋषय: ॥३१॥
भुजड्गविजृम्भित नामक वृत्ताच्या पादांत म अम अत न न न र स ल ग असें गण, क्रमानें असून आठ, अकरा व सात अक्षरांनीं यति असतात. ॥३१॥

अपवाहक वृत्ताच्या चरणांत, म न न न न न न स ग ग असे गण क्रमानें येत असून नऊ, सहा, सहा व पांच अक्षरांनीं यति असतात. येथें कृतिच्छन्दांचे प्रकार संपले ॥३२॥

दण्डको नौ र: ॥३३॥
प्रथम दोन न गण असून त्यापुढें सात र गण असल्यास त्या वृत्ताचें नांव दण्डक जाणावें. वरच्या वृत्तांत सव्वीस अक्षरें असल्यानें ह्या दण्डकाच्या पादांत, सत्तावीस अक्षरें अर्थातच येतात; कारण येथपर्यंन्तच्या छन्दांत उत्तरोत्तर एकेक वर्णानेंच पादवृद्धि झाली आहे. ‘चतु:शतमुत्कृति:’ (अ.४/१) हें उत्कृतीचें लक्षणसूत्र मागेंच गेलें आहे. आतां ह्या सूत्रांत शेवटी त्र्यक्षरी र गण दिला असल्यानें ह्यापुढें मात्र, तीन तीन अक्षरांनीं पुढच्या वृत्तांचे चरण वाढवावे; कारण येथील शेवटचा र गण हा तीन अक्षरांचा उपलक्षक आहे. ॥३३॥

प्रथमश्चण्डवृष्टिप्रपात: ॥३४॥
वर ३३ व्या सूत्रांत दिलेल्या पहिल्या दण्डकाचें नांव चण्डवृष्टिप्रपात असें आहे. ॥३४॥

अन्यत्र रातमाण्डव्याभ्याम्‍ ॥३५॥
मात्र, रात व माण्डव्य ह्या दोघांना सोडून इतर आचार्याच्या मतानेंच वरची संज्ञा आहे. अर्थात्‍ रात व माण्डव्य ह्या ऋषींच्या ग्रन्थांत वरील दण्डकाचें नांव दुसरेंच कांहीं आहे असें सूचित होतें. ॥३५॥

शेष: प्रचित इत ॥३६॥
ह्या चण्डवृष्टिप्रपाताच्या पुढचे उत्तरोत्तर एकेक र गणानें पादवृद्धि होणारे दण्डक, सामान्यत: प्रचितसंज्ञक जाणावे. ह्यांना दुसर्‍याही विशेषसंज्ञा, सूत्रानंतरच्या ग्रन्थांत सांगितल्या आहेत. दोन न गणानंतर एकेक र गणानें पादवृद्धि होणारे हे दण्डक, ९९९ अक्षरांच्या पादापर्यंत वाढतात. त्यांपैकीं कांहींची वेगवेगळीं नांवेही वृत्तरत्नाकराच्या नारायण-भट्टकृत टीकेंत दिलीं आहेत तेथें पहावीं. अर्ण, अर्णव, व्याल, जीमूत, लीकाकर, उद्गम, व शंख ही प्रथम दण्डकापुढें आठ ते चौदापर्यंत र गण वाढवून होणार्‍या दण्डकांची नांवे आहेत. प्रथम दोन न गण व त्यापुढें सात य गण असल्यास त्या दण्डकाचें नांव प्रचितक असेंच त्या ग्रन्थांत आढळतें. य गणवृद्धींनीं होणार्‍या दण्डकांचीं नांवें, सिंहविक्रान्त, मत्तमातड्लीलाकर, अनड्गशेखर, अशोकमञ्जरी वगैरे आहेत. सूत्रकारानें ह्या सर्वाना प्रचित असें सामान्य नांव दिलें आहे. सर्व दण्डकांत पादाच्या शेवटीं यति असतो; परंतु म्हणणारा दमल्यास मध्येंही सोईप्रमाणें यति करणारच ! संस्कृत काव्यांत श्यामला दण्डक वगैरे दण्डकांचीं प्रसिद्ध उदाहरणें असून मराठींतील चूर्णिकावृत्त दण्डक जातीचें आहे. असो. ह्या सूत्राच्या शेवटच्या इतिकारानें येथें सातव्या अध्यायाची समाप्ति सूचित केली. ॥३६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 24, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP