सार्थपिड्गलछन्द:सूत्र -अध्याय तिसरा

सार्थपिड्गलछन्द:सूत्र


पाद: ॥१॥
आतां प्रथम, वैदिकछन्द सविस्तर सांगण्याकरितां दोन परिभाषा (व्यापक नियम) देतात. हा अध्याय संपेपर्यंत ‘पाद:’ हें अधिकारसूत्र प्रवृत्त होतें. पाद म्हणजे चरण होय.

इयादि:पूरण: ॥२॥
छंदाचा पाद हा इय् , उव्‍, वगैरे विश्लेषण केलेल्या अक्षरांनीं पूरण केला जाणारा असतो; म्हणजे एखाद्या छंदाच्या पादांत सांगितल्यापेक्षां कमी अक्षरें भरल्यास ण्य वगैरे जोडाक्षरें, यांमध्यें विश्लेष करुन त्यांचे जागीं णिय वगैरे अक्षरें समजून अक्षरसंख्या पूर्ण करुन घ्यावी. तेवढया करितां छन्दोभंग मानूं नये. जसें, ‘तत्सवितुर्वरेणियम्‍’ येथें ण्यचे जागीं णिय मानून गायत्रीछन्दाचा अष्टाक्षरी पाद पूर्ण करुन घेतला. नाहींतर मूळ संहितापाठांत ‘तत्सवितुर्वरेण्यम्‍’ अशीं सातच अक्षरें (स्वर) आहेत, तीं वरच्या रीतीनें पुरीं केलीं असें समजावें. दुसरें उदाहरण ‘दिवं गच्छ सुव: पते’ येथें मूळचीं पदें ‘दिवं गच्छ स्व: पते’ अशीं आहेत. वैदिकछन्द पुरुषकृत नसून अनादिसिद्ध असल्यामुळें त्यांच्या पूरणापुरतीच ही कल्पना आहे; कारण त्यांत फेरफार करणें योग्य नाहीं. ह्यालाच उद्देशून, ‘छन्दसि दृष्टानुविधि:’ वेदांत जशी स्थिति दिसत असेल तिला अनुसरुन वेदसंबंधीं शास्त्रीय नियम ठरवावे. असा शास्त्रकारांनीं नियम ठरवून दिला आहे. वेदाच्या शब्दांत किंवा वृत्तांत लौकिक व्याकरण किंवा छन्द:शास्त्र ह्यांच्या नियमापेक्षां वेगळा प्रकार दिसल्यास त्यांना शास्त्रकार आर्षप्रयोग समजून त्या आर्षत्वाचेही वेगळे नियम बाधतात. त्यापैकीं हा नियम जाणावा. वेदांशिवाय इतर लौकिकछन्दोरचना ही मनुष्यांच्या स्वाधीन असल्यामुळें तेथें सर्वत्र, कवि पूर्णवर्णच घालतात म्हणून इत्यादिकांनीं पूरण करण्याची आवश्यकताच पडत नाहीं. आर्ष म्हणजे ऋषिसंबंधी अर्थात्‍ वैदिक होय.

गायत्र्या वसव: ॥३॥
गायत्रीछन्दाचा पाद वसुसंख्याक म्हणजे आठ अक्षरांनीं होतो. ‘अष्टौ वसव:’ ह्या पहिल्या अध्यायांतल्या सूत्रानें ह्या छन्द:शास्त्रांत लौकिकसंज्ञांनीं सूचित केलेल्या कृत्रिम संख्यांचेंही ग्रहण करावें असें सांगितलें आहे, म्हणून ह्यापुढें, वसु वगैरे संख्यांचें ज्ञापन होतें. ह्या तिसर्‍या सूत्रानें, छन्द:सूत्रांत जेथें जेथें गायत्रीचा पाद गृहीत असेल तेथें तेथें तो आठ अक्षरांचा धरावा हेंही सांगितलें आहे.

जगत्या आदित्या: ॥४॥
जगती छन्दाचा पाद म्हणजे बारा अक्षरें होत. कारण आदित्य (सूर्य) बारा असें पुराणांत प्रसिद्ध आहे.

विराजो दिश: ॥५॥
विराट्‍ छन्दाचा पाद दहा अक्षरांचा असतो. दिशा दहा हें लोकप्रसिद्धच आहे.

त्रिष्टुभो रुद्रा: ॥६॥
त्रिष्टुप्छन्दाचा पाद म्हणजे अकरा अक्षरें होतात. कारण वेदादिग्रंथांत रुद्र अकरा मानिले आहेत.

एक द्वि त्रि चतुष्पादुक्तपादम्‍ ॥७॥
वर सांगितल्याप्रमाणें ठराविक अक्षरांच्या पादांनीं गायत्र्यादिक छन्द, क्वचित्‍ एकपाद, कोठें द्विपाद, कोठें त्रिपाद व कोठें कोठें चतुष्पाद (चार चरणांचे) होतात. गायत्री मात्र बहुधा त्रिपादच असते व आठ आठ अक्षरांच्या चार पादांनीं फक्त अनुष्टुपच होते. कारण दुसर्‍या अध्यायांतल्या कोष्टक वगैरे प्रमाणें आर्षी (ऋषिसंबंधी) गायत्री २४ अक्षरांची असल्यामुळें तिच्यांत अष्टाक्षरी तीनच पाद संभवतात. तसेंच आर्षी अनुष्टुप ३२ अक्षरांची असल्यामुळे तीमध्यें चार पाद होतात. ऋषि म्हणजे वेद होय.

आद्यं चतुष्पादृतुभि: ॥८॥
ऋतु म्हणजे सहा इतक्या अक्षरांनीं युक्त असलेल्या चार पादांनीं चतुष्पाद्‍ गायत्रीछन्द संभवतें. ह्या सूत्रांत आद्यशब्दानें गायत्रीछन्द घेतलें, कारण ह्या अध्यायांत प्रथम गायत्रीछन्दाचेंच ग्रहण केलें आहे. चतुष्पाद्‍ गायत्रीचें उदाहरण. ‘इन्द्र: शचीपतिर्बलेन वीलित: । दूश्चयवनो वृषा लमत्सुसासहि:’ लौकिक गायत्री, नेहमींच षडक्षरी चार पादांची असते हें पुढें येईल.

क्वचिद्‍ त्रिपादृषिभि: ॥९॥
वेदांत क्वचित्‍ स्थलीं सात अक्षरांच्या (ऋषि = ७) तेन पादांची त्रिपाद गायत्री दिसते, म्हणजे तिचीं एकंदर २१ अक्षरें होतात.

सा पादनिचृत्‍ ॥१०॥
अशा एकवीस अक्षरांच्या त्रिपाद गायत्रीला पादनिचृत्‍ अशी विशेष संज्ञा आहे. मन्त्रप्रयोग करणाराला नामज्ञानानें विशेष पुण्य लागावें म्हणून येथें ही विशेष संज्ञा सांगितली आहे; नाहींतर वेद, अनादिसिद्ध, अकृत्रिम, सहज स्फूर्तिरुप असल्यामुळे छन्दांत कमीजास्त अक्षरें असतीं तरी कांही हरकत नव्हती. शिवाय वेदाड्गाचें पठनहि सांड्ग वेदाध्ययनविधीनें विहित असल्यामुळें, त्यांच्या उच्चारणांतही पुण्य आहे म्हणून इष्टफल नसलें तरीही पठनांत अदृष्ट पुण्यविशेष लाभतेंच म्हणून अशा विशेषसंज्ञा ह्या शास्त्रांत क्वचित्‍ स्थलीं दिसून येतील, ह्यानें छन्दांचीं पुरातन नांवेंही कळतात. महाभाष्यकार पतञ्जलि महर्षीनीं ‘इको यणचि’ ह्या सूत्रांवर, पाणिनीच्या सूत्राविषयीं लिहितांना म्हटलें आहें कीं, ‘सामर्थ्ययोगान्नहि किंचिदत्र पश्यामि शास्त्रं यदनर्थकं स्यात्‍’ म्हणजे ह्या अष्टाध्यायी सूत्रांपैकीं सर्वच अक्षरें समर्थ म्हणजे फलवान्‍ असल्यामुळें, ज्यांत कांहीच अर्थ (फल) नाहीं असें, त्यामध्यें मला किंचित्‍ही दिसत नाहीं; म्हणजे, बहुतेक सूत्रांना शास्त्रज्ञानरुपी लौकिकफलासहित अदृष्टपुण्यफल आहे, व कांहीं सूत्रांना दृष्टफल नसलें तरी केवळ पुण्यरुप अदृष्टफल आहेच. लौकिकदृष्ट्या प्रत्याख्यान (खण्डन) केलें असलें तरी सर्वथा निष्फळ असें कोणतेंच सूत्र नाहीं. तोच न्याय छन्द:सूत्र वगैरे इतर वेदांड्गसूत्रांविषयीही समजावा. कारण सर्वच वेदाड्गसूत्रकार आचार्य परमपूज्य महर्षि आहेत, व त्यांतही छन्द:शास्त्र तर वेदपुरुषाचे पायच आहेत असें पाणिनीय शिक्षेंत स्पष्टच आहे. ‘छन्द: पादौ तु वेदस्य’ वगैरे शिक्षासूत्रावरील आमचें विवरण पहा. असो, एकंदरीत अदृष्टपुण्यरुपी फलांकरितां तरी शास्त्रांत त्या सर्व सूत्रांचें पठनपाठन अवश्य आहे, मग त्यांत लौकिक दृष्टफल असो वा नसो.

षट्‍कसप्तकयोर्मध्येऽष्टावतिपादनिवृत्‍ ॥११॥
येथें, मागून त्रिपाद हें पद अनुवृत्तीनें आणून सूत्रार्थ देतों. पहिला सहा अक्षरांचा पाद, तिसरा सात अक्षरांचा पाद व त्या दोहोंच्यामध्यें अष्टाक्षरी पाद अशी त्रिपाद अतिपादनिवृत्‍ नांवाची गायत्री होते.

द्वौ नवकौषट्‍कश्च सा नागी ॥१२॥
प्रथम दोन नऊ अक्षरांचे पाद व तिसरा सहा अक्षरी पाद असतां नागी नांवाची त्रिपादगायत्री होते. नागीच्या शेपटांपेक्षां तिचें मस्तक मोठें असतें. नागी म्हणजे हत्तीण.

विपरीता वाराही ॥१३॥
हीच गायत्री वरच्या उलट असली म्हणजे, पहिला षडक्षरी व पुढचे दोन्ही नऊ नऊ अक्षरांचे असे असल्यास बाराही नावांची गायत्री होते. वराहाचे पुढचे पाय लहान असतात व मागचे त्याहून दीर्घ असतात.

षट्‍कसप्तकाष्टकैर्वर्धमाना ॥१४॥
पहिला पाद सहा अक्षरांचा, दुसरा सात अक्षरांचा  व तिसरा आठ अक्षरांचा असे वाढते पाद असल्यास ती वर्धमाना नांवाची त्रिपाद गायत्री असते. उदाहरण, ‘ईशाना वार्याणां, क्षयन्तीश्चर्षणीनाम्‍ । अपो या चामि भेषजम्‍’ ॥

विपरीता प्रतिष्ठा ॥१५॥
हीच वरच्या उलट म्हणजे क्रमाने, अष्टाक्षर, सप्ताक्षर व षडक्षर असे पाद असल्यास ती प्रतिष्ठासंज्ञक गायत्री होते. उदाहरण, ‘आप:पृणीत भेषजम्‍, वरुथं तन्वे ३ मम । ज्योक्च सूर्य दृशे’ ॥

तृतीयं द्विपाज्जागतगायत्राभ्याम्‍ ॥१६॥
ह्या सूत्रांत तृतीयपादानें, ह्या अध्यायांतील अधिकारक्रमानें प्राप्त असलेल्या विराट्‍ छन्दाचें ग्रहण होतें.

सूत्रार्थ -
पहिला जगतीछन्दाचा अर्थात्‍ बारा अक्षरांचा पाद व दुसरा गायत्र (गायत्रीचा) म्हणजे आठ अक्षरांचा अशा दोन पादांनीं द्विपाद्‍ विराट्‍ ह्या नांवाची गायत्री होते; कारण विराट्‍ छन्दाच्या दोन पादांची अक्षरेंही वीसच भरतात.

त्रिपाद्‍ त्रैष्टुभै: ॥१७॥
त्रिष्टुप्छन्दाच्या म्हणजे अकरा अक्षरांच्या तीन पादांनीं त्रिपाद्‍ विराट ह्या नांवाची गायत्री होते. येथें वरच्या सूत्रांतून विराडर्थक ‘तृतीयम्‍’ ह्या पदाची अनुवृत्ति आहे. ह्या व पुढच्या सूत्रांतीलही विशेष संज्ञा, पाठपुण्याकरितां व व्यवहार वगैरे करितां दिल्या आहेत असें जाणावें. येथें गायत्री ह्या पदाचा अधिकार संपला; कारण ह्या पुढील सूत्रांत उष्णिक असें वेगळ्या छन्दाचें ग्रहण आहे. त्यानें पहिला तत्समानजातीय संज्ञेचा अधिकार निवृत्त केला जातो.

उष्णिग्‍ गायत्रौ जागतश्च ॥१८॥
पहिले दोन गायत्रीचे अर्थात्‍ अष्टाक्षरी पाद व तिसरा जगती छन्दाचा (द्वादशाक्षर) पाद अशा तीन पादांनीं उष्णिक्संज्ञक त्रिपादछन्द होतें. येथें फक्त पादांची अक्षरसंख्या सांगितली आहे. त्यांच्या क्रमविशेषानें प्राप्त होणारीं निरनिराळी नांवें पुढे दिली आहेत.

ककुभ्‍ मध्ये चेदन्त्य: ॥१९॥
वरच्या सूत्रांत सांगितलेल्यांपैकी शेवटचा बारा अक्षरांचा पाद मध्यें असून त्याच्यामागें व पुढें एकेक अष्टाक्षरी पाद असल्यास ती उष्णिक्‍, ककुभ्‍ नांवाची असते. मूळसूत्रांत स्पष्टस्वरुप कळण्याकरितां ककुभ्‍ शब्दाचा संधि आम्ही केला नाहीं.
संधि केला असतां ‘ककुम्मध्ये’ असें होतें.

पुर उष्णिक्‍ पुरत: ॥२०॥
प्रारंभीच (पुरत:) तो बारा अक्षरांचा पाद असून पुढचे दोन्ही पाद अष्टाक्षरी असल्यास तिचें नांव पुरउष्णिक्‍ असें होतें.

परोष्णिक्‍ पर: ॥२१॥
पहिले दोन पाद अष्टाक्षरी व तिसरा बारा अक्षरांचा असल्यास परोष्णिक्‍ नांवाचें त्रिपाद्‍छन्द होतें. ‘उष्णिग्गायत्रौ जागतश्च’ ह्या १८ व्या सूत्रांत उष्णिक्‍ हें जें सामान्य नांव सांगितलें आहे त्याचेंच विशिष्ट पादक्रमाची अपेक्षा धरुन वेगळी संज्ञा सांगण्याकरितां पुढील सूत्रांत ग्रहण केले आहे. कारण १८ व्या सूत्रांतलें उष्णिक्पद अधिकारार्थ (पुढें चालणारें) आहे.

चतुष्पादृषिभि: ॥२२॥
ऋषि म्हणजे सात कारण सप्तर्षि लोकप्रसिद्ध आहेत. सप्ताक्षरी चार पादांनीं चतुष्पाद्‍ उष्णिक्‍ होते. आर्षी उष्णिक्‍ अठ्ठावीस अक्षरांची असते, हें दुसर्‍या अध्यायांत कोष्टक वगैरेंनीं सिद्ध झालेंच आहे. येथें उष्णिक्‍चा अधिकार संपला; कारण पुढच्या सूत्रांत तिसर्‍या अनुष्टुप्‍ छन्दाचा अधिकार सुरु होत आहे.

अनुष्टुब्गायत्रै: ॥२३॥
येथें वरुन चतुष्पाद्‍ हे पद अनुवृत्तीनें येतें. सूत्रार्थ:- अष्टाक्षरी (गायत्र) चार पादांनी, चतुष्पाद्‍ अनुष्टुप्छन्द होतें.

त्रिपात्क्कचिज्जागताभ्यां च ॥२४॥
ह्या सूत्रांतील चकारानें येथें गायत्र ह्या पदाची अनुवृत्ति होते. सूत्रार्थ - एक गायत्र म्हणजे अष्टाक्षरी पाद व त्यापुढचे दोन द्वादशाक्षरी (जागत) पाद अशा प्रकारची त्रिपाद अनुष्टुप्‍ क्वचित्‍ संभवते. ऋचा किंवा गाथा ह्या सामान्य नामांशी संबद्ध असल्यामुळें, गायत्र्यादि वैदिक छन्दांचीं नांवें स्त्रीलिंगी आहेत व त्यांच्याच अनुकरणानें बहुतेक लौकिक छन्दांचीं नांवेही स्त्रीलिंगी व काव्यात्मक आहेत हें ध्यानांत असावें.

मध्येऽन्ते च ॥२५॥
द्वादशाक्षरी दोन पादांच्या मध्यें किंवा पुढें एक अष्टाक्षरी पाद (गायत्र) असला तरीही त्रिपाद्‍ अनुष्टुप्‍चा अधिकार संपला. पुढच्या सूत्रापासून बृहतीचा अधिकार चालू होतो.

बृहती जागतस्त्रयश्च गायत्रा: ॥२६॥
एक द्वादशाक्षरी (जागत) पाद व त्यापुढचे तीन अष्टाक्षरी पाद अशा चार पादांनीं बृहती नामक छन्द होतें.

पथ्या पूर्वश्चेत्तृतीय: ॥२७॥
वर सांगितलें त्यांपैकीं पहिला म्हणजे बारा अक्षरांचा (जगतीचा) पाद तिसरा असून इतर तीन अष्टाक्षरी असले तरे ती पथ्यनामक बृहती होते.

न्यड्कुसारिणी द्वितीय: ॥२८॥
दुसरा द्वादशाक्षरी पाद असून बाकीचे तीन अष्टाक्षरी (गायत्र) असल्यास ती न्यड्कुसारिणी नांवाची बृहती होते.

स्कन्धोद्‍ग्रीवी क्रोष्ठुके: ॥२९॥
क्रौष्ठुकी नामक ऋषीच्या मतानें, वरच्या न्यड्कुसारिणीचेंच नांव स्कंधोद्‍ग्रीवी असें आहे.

उरोबृहती यास्कस्य ॥३०॥
यास्क नामक आचार्यांच्या मतानें तिचेंच नांव उरोबृहती असें आहे. ह्या शास्त्रांत इतर आचार्यांच्या नांवांचा असा उल्लेख जेथें असेल तेथें तो त्यांचा सन्मान करण्याकरितां व छन्दाचें ऐतिहासिक नामान्तर कळण्याकरितां आहे असें समजावें. सारांश अशा स्थळीं मतभेदानें एकाच छन्दाचीं अनेक नामें असतात. स्वरुपांत फरक नसतो असें जाणावें.

उपरिष्टाद्‍बृहत्यन्ते ॥३१॥
पहिले तीन अष्टाक्षर पाद असून शेवटचा द्वादशाक्षर (अर्थात्‍ जगतीचा) असल्यास तें उपरिष्टाद्‍बृहती नांवाचें छन्द होतें.

पुरस्ताद्‍बृहती पुर: ॥३२॥
प्रारंभी जागत पाद असून त्यापुढचे तीन अष्टाक्षरी असल्यास तें पुरस्ताद्‍ बृहती नांवाचे छन्द असतें.

क्वचिन्नवकाश्चत्वार: ॥३३॥

क्वचित्‍ स्थलीं नवाक्षरी चार पादांचीही बृहती होते. आर्षी बृहती छत्तीस अक्षरांची असते हें मागें दुसर्‍या अध्यायांतील कोष्टकांत सिद्धच केलें आहे. ऋषि म्हणजे वेद तत्संबंधीं ती आर्षी ह्या शब्दाची व्युत्पत्ति आहे.

वैराजो गायत्रौ च ॥३४॥
पहिले दोन पाद दशाक्षरी (वैराज=विराट्‍ छन्दाचे) व त्यापुढचे दोन अष्टाक्षरी (गायत्र) असल्यास तीही बृहतीच होते.

त्रिभिर्जागतैर्महाबृहती ॥३५॥
द्वादशाक्षरी तीनच पादांनीं महाबृहती नामक छन्द होतें.

सतोबृहती ताण्डिन: ॥३६॥
ताण्डि नामक आचार्याच्या मतानें महाबृहतीचेंच नांव सतोबृहती असें आहे. येथें बृहतीचा अधिकार संपला. यापुढें पड्क्तिच्छन्दाचा अधिकार सुरु होतो.

षड्क्तिर्जागतौ गायत्रौ च ॥३७॥
कोणतेतरी दोन बारा अक्षरांचे (जागत व दोन अष्टाक्षरी (गायत्र) असे सर्व मिळून चार पाद ( एकूण, चाळीस अक्षरें) असल्यास पड्क्तिनामक छन्द होतें.

पूर्वौ चेदयुजौ सत: पड्क्ति: ॥३८॥
वर सांगितले त्यांपैकीं पहिले म्हणजे द्वादशाक्षर पाद, पहिले व तिसरे (अयुज=विषम) असून इतर म्हणजे दुसरा व चवथा अष्टाक्षरी असल्यास तिचें नांव सत:पड्क्ति होय.

विपरीतौ च ॥३९॥
तसेंच वरच्या उलट म्हणजे विषम पाद (१/३) गायत्र व समपाद (२/४) जागत असल्यास तीही सत:पड्क्तिच होते.

आस्तारपड्क्ति: परत: ॥४०॥
ह्यामध्यें व पुढच्या तीन सूत्रांतही जागत ह्या पदाची अनुवृत्ति आहे. आतां सूत्रार्थ देतों. पहिले दोन पाद अष्टाक्षरी असून पर म्हणजे शेवटचे दोन (३/४) जगतीच्छन्दाचे अर्थात्‍ द्वादशाक्षर असल्यास तिचें नांव आस्तारपड्क्ति असतें.

प्रस्तारपड्क्ति: पुरत: ॥४१॥
पहिले दोन पाद जगतीचे (द्वादशाक्षर) असून त्यांच्या पुढचे दोन गायत्रीचे असल्यास ती प्रस्तारपड्क्ति होते.

विष्टारपड्क्तिरन्त: ॥४२॥
जेव्हां द्वादशाक्षरी दोन पाद अन्तर्भागी म्हणजे मध्यें असून त्याच्या सभोंवतीं अर्थात्‍ पहिला व चौथा पाद अष्टाक्षरी असतो तेव्हां ती विष्टारपड्क्ति होते.

संस्तारपड्क्तिर्बहि: ॥४३॥
मध्यें दोन अष्टाक्षर पाद असून दोन्ही बाजूस एकेक द्वादशाक्षर (जागत) पाद असतो तेथें संस्तारपड्क्तिच्छन्द असतें.

अक्षरपड्क्ति: पञ्चकाश्चत्वार: ॥४४॥
पांच पांच अक्षरांच्या चार पादांनीं अक्षरपड्क्ति: नांवाचें छन्द होतें. ह्यावर कोणी अशी शंका करील कीं, पड्क्तिच्छन्द तर चाळीस अक्षरांचें असतें, व येथें तर वीसच अक्षरांचा सांगितला हें कसें ? ह्याचें उत्तर असें कीं, येथें सिंहावलोकन न्यायानें पुढच्या सूत्रांतील ‘अल्पश:’ हें पद अपकर्षानें आणून त्यानें अल्पस्थलीं अशी वीस अक्षरांची अल्पपड्क्ति होते, असा अर्थ केला जातो.

द्वादप्यल्पश: ॥४५॥
येथें पञ्चकपदाची अनुवृत्ति करुन सूत्रार्थ देतों. वेदांत अल्पस्थलीं पञ्चाक्षरी दोन पादांचे म्हणजे दहा अक्षरांचें देखील पंक्तिछन्द दिसतें.

पदपड्क्ति: पञ्च ॥४६॥
येथेंही पञ्चकपद अनुवृत्त आहे. पञ्चाक्षरी पांच पादांनीं पदपड्क्ति नांवाचें छन्द होतें.

चतुष्कषट्कौ त्रयश्च ॥४७॥
ह्या सूत्रांतल्या चकारानें पञ्चकपदाचें ग्रहण होतें. पञ्चक म्हणजे पञ्चावयवी अर्थात्‍ पञ्चाक्षरी पाद होय.

सूत्रार्थ - जेव्हा पहिला पाद चार अक्षरांचा दुसरा सहा अक्षरांचा व त्यापुढचे तीन पांच अक्षरांचे असतात, तेव्हां तेथेंही पांच पादांची पड्क्तिच होते.

पथ्या पञ्चभिर्गायत्रै: ॥४८॥
अष्टाक्षरी (गायत्र) पांच पादांनीं पथ्यापड्क्ति नांवाचें छन्द होतें. येथें पड्क्तीचा अधिकार संपून त्रिष्टुब्जगतीचा अधिकार सुरु होतो.

जगती षड्‍भि: ॥४९॥
येथें ‘गायत्रै:’ हें पद अनुवृत्तीनें येतें. सहा अष्टाक्षरी पादांनीं अर्थात्‍ अठ्ठेचाळीस अक्षरांनीं जगती नांवाचें छन्द होतें.

एकेन त्रिष्टुब्‍ ज्योतिष्मती ॥५०॥
येथें ‘गायत्रै:’ हें पद अनुवृत्त असून ‘पञ्चभि:’ हें पदही मण्डूकप्लुतानुवृत्तीनें येतें. बेडूक (मण्डूक) जसा मधली कांही जागा सोडून पुढें एकदम उडी मारतो त्याप्रमाणें, जें पद मधलीं कांहीं सूत्रें सोडून त्यापुढच्या सूत्रांत जातें त्याची मण्डूकप्लुतानुवृत्ति झाली असें शास्त्रपरिभाषेंत समजतात. येथें प्रकरणबलानें व पुढच्या संबंधामुळें ‘एकेन’ ह्या पदाचा अर्थ, एका त्रिष्टुप्‍ पादानें सहित असा होतो; म्हणून एका त्रिष्टुप्‍  पादासह (एकादशाक्षर) असलेल्या पांच गायत्र पादांनीं ज्योतिष्मती नामक पांच पादांची त्रिष्टुप्‍ होते, असा सूत्रार्थ झाला. गुरुसहित पञ्चसंख्याक शिष्य आले, ह्या वाक्यांत जसे शिष्य चारच असून गुरु मिळवून पांच असा अर्थ होतो, त्याप्रमाणें येथेंही एक त्रैष्टुप्‍ व चारच गायत्र पाद पडतात म्हणून, पञ्चपाद व एकेचाळीस अक्षरें यांनीं युक्त अशी ही ज्योतिष्मती त्रिष्टुप्‍ होते. ‘यजमानपञ्चमा इडां भक्षयन्ति’ ‘वेदानध्यापयामास महाभारतपञ्चमान्‍’ वगैरे सुप्रसिद्ध वाक्यांतही अशाच प्रकारचें विजातीय वस्तूनें संख्यापूरण केलेलें प्रसिद्ध आहे, तसेंच त्या सूत्रांत समजावें; एक त्रैष्टुभ व पांच गायत्र असे सहा पाद समजूं नये. कारण तसें उदाहरण वेदांमध्यें कोठेंही दृष्ट नाहीं, आणि पूर्वीच्या पण्डितांनीं तसे व्याख्यानही केलेलें नाहीं. असो, असाच अर्थ पुढच्याही चार सूत्रांत समजावा.

तथा जगती ॥५१॥
एक द्वादशाक्षर पाद व इतर चार अष्टाक्षर अशा पांच पादांनीं (एकूण चव्वेचाळीस अक्षरें), वरच्या त्रिष्टुप्‍प्रमाणेंच ज्योतिष्मतीसंज्ञक जगती होते.

पुरस्ताज्ज्योति: प्रथमेन ॥५२॥
वर सामान्यरुपानें छन्दाचें नांव सांगितलें. आतां पादांच्या क्रमविशेषानें त्याच्याच विशेषसंज्ञा सांगतात. पहिला अकरा अक्षरांचा (त्रिष्टुप्‍चा) पाद असून पुढचे चार अष्टाक्षरी असल्यास ती पुरस्ताज्योति: ह्या नांवाची त्रिष्टुप्‍ समजावी. ह्या सूत्रांत व पुढेंही ‘तथा जगती’ ह्या पदांची अनुवृत्ति करुन दुसरे सूत्रार्थ होतात. त्यांपैकीं येथील पदांचा अर्थ पहिला पाद जागत व पुढचे चार गायत्र असतां ती पुरस्ताज्योति: ह्या नांवाची जगती होते.

मध्येज्योतिर्मध्यमेन ॥५३॥
मध्यें अर्थात्‍ तिसरा पाद त्रिष्टुप्‍चा असून त्याच्या मागें दोन व पुढें दोन अष्टाक्षरी पाद असे पांच पाद असल्यास ती मध्येज्योतिर्नामक त्रिष्टुप्‍ होते. अशाच रीतीनें तिसरा जागत पाद व त्याच्या मागें दोन व पुढें गायत्र पाद असल्यास तीही, मध्येज्योति:संज्ञक जगती होते. हा तथा जगती ह्या अनुवृत्तपदांचा अर्थ केला.

उपरिष्टाज्ज्योतिरन्तेन ॥५४॥
पहिले चार अष्टाक्षर पाद असून पांचवा त्रैष्टुभ्‍ असल्यास तें उपरिष्टाज्ज्योति: त्या नांवाचें त्रिष्टुप्‍ छन्द होतें. ह्यांपैकीं पांचवा त्रैष्टुभाऐवजीं जगतीचा असल्यास ती उपरिष्टाज्ज्योति:संज्ञक जगती होते (तथा जगती).

एकस्मिन्पञ्चके छन्द: शड्कमती ॥५५॥
मागून छन्द:पदाची अनुवृत्ति असतां येथें पुन्हां छन्द:पद पठित आहे. त्याच्या सामर्थ्यामुळें अधिकारानें प्राप्त होणार्‍या छन्दाचेंच ग्रहण येथें विवक्षित नसून वाटेल तें छन्द असा अर्थ येथें होतो. ज्या छन्दांत एक पांच अक्षरांचा पाद असून बाकीचे तीन पाद यथायोग्य शास्त्रोक्त असतात, तें छन्द शड्कुमती संज्ञक असतें. जसें एक पञ्चाक्षरी पाद व इतर तीन षडक्षरी पाद ( लौकिक गायत्री) असल्यास ती शड्कुमती गायत्री असते. असेंच इतर छन्दांविषयींही समजावें.

षक्टे ककुद्मती ॥५६॥
एक षडक्षर पाद असून इतर तीन यथाशास्त्र असल्यास तें छन्द ककुद्मती नामक असतें. जसें ककुद्मती गायत्री, वगैरे ह्या सूत्रांत वरुन ‘एकस्मिन्‍’ हें पद आलें आहे.

त्रिपादणिष्ठमध्या पिपीलिकमध्या ॥५७॥
त्रिपादात्मक छन्दाचा पहिला व तिसरा पाद अधिक अक्षरांचा असून मधलाच त्यांच्यापेक्षां अणु म्हणजे कमी अक्षरांचा असल्यास ती गायत्री वगैरे पिपीलिकमध्या ह्या नांवाची समजावी; कारण तिचा मधला भाग पिपीलिकेसारखा (मुंगीसारखा), दोन्ही टोकांपेक्षां बारीक असतो.

विपरीता यवमध्या ॥५८॥
वरच्या उलट स्थिति असतां म्हणजे मधला पाद मोठा असून पहिला व तिसरा कमी अक्षरांचे असल्यास ती गायत्री वगैरे जाति, यवमध्यासंज्ञक समजावी. कारण तिचा मध्यभाग यवा (सात्‍) सारखा दोन्ही टोकांपेक्षां मोठा असतो.

ऊनाधिकेनैकेन निवृद्‍भुरिजौ ॥५९॥
गायत्रींत एकंदर चोवीस अक्षरें असतात. त्यांत एक अक्षर कमी असल्यास तिला निवृत्‍ असें विशेष नांव मिळतें. जास्ती असल्यास भुरिक्‍ असें नांव मिळतें. ह्याप्रमाणेंच एकेक अक्षर कमी किंवा जास्त असल्यास उष्णिक्‍ वगैरे इतर छन्दांसही अनुक्रमानें ह्याच संज्ञा मिळतात. जसें, निवृदुष्णिक्‍, भुरिगुष्णिक्‍ वगैरे निवृत्‍च्या जागीं दाक्षिणात्य प्रतींत निचृत्‍ असें आहे.

द्वाभ्यां विराट्‍ स्वराजौ ॥६०॥
ह्या सूत्रांत वरुन ‘ऊनाधिकेन’ हें पद येतें व त्याचा येथील विशेष्यवाचक द्विवचनी पदास जुळेल असा ‘ऊनाधिकाभ्याम्‍’ हा विभक्ति विपरिणाम केला जातो (विभक्तीचा बदल). सूत्रार्थ - सामान्य शास्त्रोक्तीपेक्षां दोन अक्षरें कमी असल्यास ती गायत्री वगैरे विराट्‍संज्ञक होते, व दोन अक्षरें एकंदर शास्त्रोक्तसंख्येपेक्षां जास्त असल्यास ती गायत्री वगैरे जाति, स्वराट्‍संज्ञक  होते.

आदित: संदिग्धे ॥६१॥
जेथें छन्दाच्या नामाविषयीं संशय उत्पन्न होईल तेथें शास्त्रानुसारानें पहिला पाद (आदित:) ज्या छन्दाचा असेल तें छन्द मानावें. उदाहरणार्थ, एखाद्या मन्त्रांत सव्वीस अक्षरें आहेत, तर हीं दोन अक्षरें जास्ती वाढल्यामुळें स्वराड्गायत्री मानावी किंवा उष्णिक्‍च्या अठ्ठावीस अक्षरांपेक्षां दोन अक्षरें कमी असल्याकारणानें ही विराडुष्णिक्‍ समजावी अशी शंका आली असतां तिचें उत्तर हें सूत्र सांगतें कीं, त्या मन्त्राचा पहिला चरण ज्या छन्दाचा असेल तेंच छन्द समजावें. वेदांच्या सर्वानुक्रमणींत ह्याच सूत्राच्या आधारानें छन्दोनामाचा निर्णय केलेला दिसून येईल.

देवतादितश्च ॥६२॥
मन्त्रच्छन्दाविषयींचा संदेह दूर करण्याकरितां हें दुसरें प्रमाण सूत्रकार सांगतो. आद्यपादाप्रमाणेंच मन्त्रप्रतिपाद्य देवता, स्वर वगैरे वरुनही हा अमकाच छन्द हें निश्चित करावें. देवता वगैरेंचीं निर्णायक सूत्रें आतांच खालीं येतील.

अग्नि: सविता सोमो बृहस्पतिर्वरुण इन्द्रो विश्वेदेवा: ॥६३॥
आतां वर सुचविलेल्या निर्णायक प्रमाणांच्या ज्ञानाकरितां प्रथम गायत्र्यादि वैदिक सात छन्दांच्या देवता ह्या सूत्रांत देतात. गायत्री, उष्णिक्‍, अनुष्टुप्‍, बृहती, पड्क्ति, त्रिष्टुप्‍ व जगती ह्या सात छन्दांच्या देवता अनुक्रमानें, अग्नि, सविता, सोम, बृहस्पति, वरुण, इन्द्र व विश्वेदेव ह्या आहेत. जसें गायत्रीची देवता अग्नि, उष्णिक्‍ची सविता वगैरे देवता समजाव्या. ह्या सूत्रामुळें विराट्‍ स्वराट्‍ वगैरे स्थलीं, अर्थविचारानें अग्निदेवतेचा प्रतिपादक मन्त्र असल्यास तें छन्द गायत्री, सवितृदेवताक असल्यास तें छन्द उष्णिक्‍ वगैरे निर्णय समजावा.

स्वरा: षड्‍जादय: ॥६४॥
गायत्र्यादि सात छन्दांचें, अनुक्रमानें सा,रि,ग,म,प,ध,नी म्हणजे षड्‍ज, ऋषभ, गांधार, मध्यम, पञ्चम, धैवत, व निषाद हे सात स्वर आहेत. ‘उदात्ते निषादगान्धारौ’ वगैरे शिक्षासूत्रावरील आमच्या व्याख्यानानें व परंपरागत वैदिकांच्या पठनानें हे सात स्वर, अर्थज्ञान नसणारालाही समजून येईल. पुढचीं दोन सूत्रें इतिहासज्ञान व पुण्यविशेषाची प्राप्ति ह्याकरितां आहेत. त्यांना शास्त्रीयनिर्णयरुपी दृष्टफळ दिसत नाहीं.

सित-सारड्ग-पिशड्ग-कृष्ण-नील-लोहित-गौरा: ॥६५॥
गायत्र्यादि सात छन्दांचे वर्ण अनुक्रमानें पांढरा, चित्रविचित्र (सारंग) पिवळा, काळा, निळा, तांबडा व गोरा असे आहेत.

आग्निवेश्य-काश्यप-गौतमाड्गिरस-भार्गव-कौशिक-वासिष्ठानि गोत्राणि इति ॥६६॥
गायत्री वगैरे सात छन्दांचीं गोत्रें अनुक्रमानें आग्निवेश्य, काश्यप, गौतम, आड्गिरस, भार्गव, कौशिक, व वासिष्ठ हीं आहेत. येथें ‘श्यामान्यतिच्छन्दांसि, रोचनाभा: कृतय:’ अशीं दोन अधिक सूत्रें कांहीं छन्द:सूत्राच्या पुस्तकांत आढळतात. त्यांचा अर्थ: - पुढें चौथ्या अध्यायांत येणारी अतिजगती वगैरे अतिशब्द पूर्वी असलेलीं छन्दें काळसर रंगाची व कृतिशब्दान्त छन्दें झळकणार्‍या रंगाचीं किंवा गोरोचनेच्या रंगाचीं आहेत असें समजावें. अधिक श्रद्धाळु असणारे वैदिक पाठक ह्या दोन सूत्रांचेही येथें पठन करीत असतात. परंतु अतिछन्द व कृति ह्यांच्या विराट्‍ व स्वराट्‍ वेदांत आढळत नसून वैदिक छन्दांत त्यांचा स्वतंत्र उद्देशही नाहीं, म्हणून व वरच्या ६६ व्या सूत्राच्या शेवटींच समाप्तिदर्शक इतिपद असल्यामुळें हीं दोन सूत्रें प्रक्षिप्तच ठरतात. तथापि अतिच्छन्द व कृति ह्यांच्याहि स्वरवर्ण वगैरेंच्या ज्ञानांत दृष्टफळ नसलें तरीहि अदृष्ट पुण्यरुपी फळ संभवतें म्हणून त्यांचेंही पठन योग्य आहे असा त्या श्रद्धाळु पाठकांचा अभिप्राय आहे. ह्याकरितां ज्यांच्या छन्द:सूत्राच्या पाठांत अशीं अधिकसूत्रें असतील त्यांनीं त्यांचें पठन करण्यास कांहीं प्रत्यवाय नाहीं. ह्या पक्षीं इतिकार ह्या दोन सूत्रांपुढें मानावा. कदाचित्‍ तीं सूत्रेंही आचार्योक्त असल्यास इतर सूत्रांप्रमाणें त्यांच्या पाठांतही लाभच होईल. असो. ‘आग्निवेश्य काश्यप’ वगैरे वर दिलेल्या सूत्रांतल्या इतिपदानें येथें तिसरा अध्याय संपला हें बोधित केलें आहे.

N/A

References : N/A
Last Updated : September 24, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP