मंगलप्राप्तीकरितां आणि विघ्रशांतीकरितां, शिव, हरी, ब्रह्मदेव, त्यांच्या ( पार्वत्यादि ) पत्न्या, त्यांचे ( गजाननादि ) पुत्र, आणि गुरु यांना नमस्कार करुन (मी “योगरत्नाकर” नांवाचा ग्रंथ रचितों.) ॥१॥
वैद्यप्रशंसा - हे भारता, अन्नदाता, जलदाता, आणि रोग्यास औषध देणारा ( वैद्य ) हे तिघे यज्ञ केल्यावांचून स्वर्गास जातात. ॥२॥
समुद्रासारख्या अपार रोगरुप चिखलामध्यें बुडालेल्या मनुष्याला जो त्यांतून सोडवितो, त्याच्या हातून कोणचा धर्म घडत नाहीं ? आणि तो कोणच्या पूजेला ( संभावनेला किंवा मानाला ) पात्र होत नाहीं ? ( सारांश, तो सर्व प्रकारच्या पूजेला संभावनेला, किंवा मानाला पात्र आहे. ॥३॥
आपलें कल्याण व्हावें अशी इच्छा करणारानें वैद्य, उपाध्याक्ष, राजप्रधान व चवथा ज्योतिषी ह्यांचें नित्य प्रात:काळीं दर्शन घ्यावें. ॥४॥
हे भारता, ज्याची संपत्ति नष्ट झाली आहे असा मनुष्य ज्योतिष्यांचा व्देष करितो व ज्याचें आयुष्य नष्ट झालें आहे असा मनुष्य वैद्यांचा द्वेष करितो; आणि ज्याची संपत्ति आणि आयुष्य ही दोन्ही नष्ट झाली आहेत असा मनुष्य ब्राह्मणांचा द्वेष करितो. ॥५॥
ज्योतिष ( ज्योतिषशास्त्रासंबंधी माहिती ), व्यवहार  ( न्याय ) प्रायश्चित ( एखाद्या निंद्य कर्माबद्दल धर्मशास्त्रांत सांगितलेला दानव्रतादि परिहार ), व चिकित्सा ( औषधी उपचार ) या गोष्टी शास्त्राध्ययनावांचून जो सांगतो त्याला ब्रह्मघातकी असें म्हणतात. ( म्हणजे त्याला ब्रह्महत्येचें पातक लागतें ). ॥६॥
रोग्याची चिकित्सा करण्यामध्यें केव्हां धर्म घडतो, केव्हां उत्तम मैत्रीचा लाभ होतो केव्हां धनप्राप्ति होते, केव्हां केवळ यश ( कीर्ति ) मिळतें, सारांश, रोग्याची चिकित्सा करणें केव्हांही निष्फळ होत नाही. ॥७॥
जन्मांतरीं ( पूर्वजन्मीं ) केलेलीं पापें व्याधीच्या रुपानें पीडा करितात. म्हणून औषधोपचार, दानधर्म, जपजाप्य, होमहवन, आणि इष्ट देवतेची पूजाअर्चा इत्यादिकांनीं त्याचें शमन करावें. ॥८॥
रोग उत्पन्न होण्याचें कारण नीट लक्षांत आणून त्यापासून होणारी पीडा दूर करणें एवढेंच वैद्याचें कर्तव्य आहे. वैद्य कांही आयुष्य देऊं शकत नाही. ॥९॥
मनुष्याचें बळ जठराग्नीवर अवलंबून आहे, आणि त्याचें जीवित त्याच्या शुक्रधातुवर अवलंबून आहे. म्हणून वैद्यानें मोठया प्रयत्नानें रोग्याचा जठराग्रि व शुक्रषातु ह्यांचें रक्षण करावें. ॥१०॥
औषधोपचारानें बरा होणारा ( साध्य ) असा कोणताही रोग झाल्याबरोबर तो लहान आहे म्हणून त्याची हयगय करुं नये. कारण त्याची हयगय केली असतां तो अग्नि, विष किंवा शस्त्र ह्यांच्याप्रमाणें अपाय करितो. ॥११॥
ज्याप्रमाणें विस्तवाची लहानशी फुणगी ज्वलनसाहित्य मिळतांच वाढून तिचा मोठा अग्नि तयार होतो, त्याप्रमाणे नुकताच बरा झालेला व्याधि दोषांची अनुकूलता मिळतांच स्वल्प कारणानें देखील वाढून पूर्व स्थितीला येतो. ॥१२॥
जोंपर्यंत कंठामध्यें प्राण आहे ह्मणजे श्वासोच्छास चालतो आहे, तोंपर्यंत औषधोपचार करीत असावें. कारण मृत्युचिन्हें दिसत असून देखील एखादे वेळीं दैवयोगानें रोगी वांचतो. ॥१३॥
शास्त्ररीत्या यथाविधि निदान व चिकित्सा ( औषधोपचार ) करुन देखील जो व्याधि बरा होत नाहीं, तो व्याधि कर्मज ( पूर्वजन्मार्जित कर्मदोषानें झालेला ) आहे म्हणून समजावें. ॥१४॥
पुण्यकर्मानें व औषधोपचारानें जे रोग बरे होतात, ते कर्म व दोष ( प्रकृतिस्थ दोष ) ह्या दोहोंपासून झालेले असतात असें समजावें. याखेरीज इतर रोग केवल - दोषजन्य किंवा मिश्र समजावे. ॥१५॥
औषधें, पुण्यकर्में, मंत्रतंत्रादि अन्य क्रिया ज्या रोग्याचें आयुष्य बळकट आहे त्यालाच फलप्रद होतात; ज्याचें आयुष्य संपलें आहे त्याला त्यांचा उपयोग होत नाहीं. ॥१६॥
एखाद्या विकाराचें नांव समजलें नाहीं म्हणून वैद्यानें लज्जित होण्याचें किंवा घोटाळयांत पडण्याचे कारण नाहीं; कारण सर्वच रोगांचा नामनिर्देश शास्त्रांत केलेला असतो असें नाहीं. ॥१७॥
ज्या अर्थी वातादि दोषांवांचून रोगच होत नाहीं, त्या अर्थी शास्त्रांत ज्याचें नांव अगर वर्णन नाही अशा रोगाची चिकित्सा दोषांच्या लक्षणांच्या अनुरोधानें वैद्यानें करावी. ॥१८॥
वैद्यानें आधीं रोगाची चांगली परीक्षा करुन नंतर औषधाची योजना करावी. त्यानंतर जी क्रिया करावयाची ती विचारपूर्वक करावी. ॥१९॥
मूर्ख, चोर, म्लेंच्छ ( क्रूर मनुष्य ), ब्रह्मघातकी, मासे मारणारा, सर्व लोक ज्याचा व्देष करितात असा, गांवकुटाळ, ठग, मांसविक्रय करणारा, ह्यांना रोग झाला असतां तो बरा होण्याकरितां उपचार करुं नये. ॥२०॥
कारण त्यांना रोगमुक्त करुन जीवदान देणारा वैद्य पापी ( पापाचा भागीदार ) होतो. ॥२१॥
रोग्याला प्रत्यक्ष पाहणें, स्पर्श करणें व त्याला होणार्‍या लक्षणांविषयीं प्रश्न करुन खुलासा करुन घेणें, अशा तीन प्रकारांनी रोग्याची परीक्षा करावी. आणि १ निदान, २ पूर्वरुप, ३ प्रत्यक्ष होणारी लक्षणें, ४ उपशय व ५ संप्राप्ति अशा पांच प्रकारांनी रोगाची परीक्षा करावी. ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : June 14, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP