ततः पर्वण्युपावृत्ते प्रचण्डः पांसुवर्षणः । भीमो वायुरभूद्राजन्पूयगंधस्तु सर्वशः ॥१॥

त्या नंतरें संकर्षण । राहिला निवान्त होऊन । पर्वणि प्राप्त होतां जाण । आला दुर्जन पूर्ववत् ॥७॥
प्रळयकाळींचा प्रचंड वात । त्याहूनि भयंकर सुटला तेथ । धुळीनें शशिसूर्यांतें आच्छादित । निबिड व्याप्त नभोगर्भीं ॥८॥
जैसा गोकुळीं तृणावर्त । अपर तैसाचि हाही दृप्त । शर्करापांसुवृष्टि कीरत । दुःखावर्त तत्रस्थां ॥९॥
कदकडां मोडती वृक्षशाखा । उटजें गगनीं भ्रमती देखा । कुत्सित दुर्गंधि पूयपंका । आणि नरका सम सुटली ॥१०॥
पांसु शर्करा भरल्या नयनीं । कुत्सित दुर्गंध कोंदला घ्राणीं । मुखें भडभडां वमिती प्राणी । प्राणहानी ओढवली ॥११॥
पाहों न शकती उघडूनि डोळे । मुखें आच्छादिती करतळें । तंव वरी पडती विष्टागोळे । मेघमाळे समसाम्य ॥१२॥

ततोऽमेध्यमयं वर्षं बल्वलेन विनिर्मितम् । अभवद्यशालायां सोऽन्वदृश्यत शूलधृक् ॥२॥

बल्वलें निर्मिली अमेघ्यवृष्टि । अमेघ्यवृष्टि होतसे सृष्टी । तेणें मुनिजन होती कष्टी । आकान्त उठी सर्वत्र ॥१३॥
ढाळ घेतल्या खचती मळ । तैसे विष्टेचे पनळ । क्रिमिदुर्गंध अतिकुश्चळ । केल्या अमंगळ मखशाळा ॥१४॥
पडे रक्ताचा पाऊस । त्या माजि पूयपंक बहुवस । सडलें कुजलें दुर्गंधि मांस । पडतां चिळसीप्रद होय ॥१५॥
नाना विचित्र उठती ध्वनी । दुर्गंध वर्षतां गर्जे गगनीं । रोहिणीतनय आश्चर्य मानी । अद्भुत करणी लक्षूनियां ॥१६॥
गगनीं निबिड अमेध्यपटळें । कोठूनि वोळलीं ऐसें नकळे । मुनिआज्ञेचिया सांभाळें । राम न ढळे तेथूनियां ॥१७॥
चिळसी दुर्गंधि अमंगळ । मुनिकार्यास्तव साहूनि सकळ । लक्षितां अवचट देखिला खळ । कज्जळाचळ शूलधर ॥१८॥
रामें राक्षस भीषणगात्री । जैसा साङ्ग लक्षिला नेत्रीं । तैसाचि सादर परिसिजे श्रोत्रीं । सुकृतपात्रीं श्रोतृगणीं ॥१९॥

तं विलोक्य बृहत्कायं भिन्नाञ्जनचयोपमम् । तप्तताम्रशिखाश्मश्रुं दंष्ट्रोग्रभ्रुकुटीमुखम् ॥३॥

विदीर्ण अंजनाचळ काळा । तैसा विशाळ खळ देखिला । तप्ततम्राची उपमा वाळा । सतैल ज्वाळां सम गमती ॥२०॥
कूर्च श्मश्रु शिरोरुह । तप्तताम्रज्वाळासमूह । भयंकर उग्रदंष्ट्रानिचय । विकराळ देह बळ देखे ॥२१॥
सक्रोध भृकुटि कटाक्ष विकट । प्रचंड शूळ परजिला तिखट । गगना माज तळपतां निकट । रामें अवचट लक्षूनी ॥२२॥
मग चितिलें मुसळ हळ । परसैन्या जें प्रळयकाळ । स्मरणा सरिसें तें तत्काळ । आलें केवळ रिपुदमना ॥२३॥

सस्मार मुसलं रामः परसिअन्यविदारणम् । हलं च दैत्यदमनं ते तूर्णमुपतस्थतुः ॥४॥

संवर्तसौनंद देखूनि नयनीं । परम आवेश रामा मनीं । प्रवर्तला मग बल्वलहननीं । सादर श्रवणीं तें ऐका ॥२४॥

तमाकृष्य हलाग्रेण बल्वलं गगनेचरम् । मुसलेनाहनत्क्रुद्धो मूर्घ्नि ब्रह्मद्रुहं बलः ॥५॥

गगनीं तळपतां बल्वल कपटी । रामें सादर लक्षूनि दृष्टी । नांगर घालूनियां पेंकटीं । वोढूनि भूतटीं पाडियला ॥२५॥
लाङ्गलें गोंविलें असतां कडवे । बल्वला तेथूनि गगनीं नुडवे । म्हणे हें दुर्घट आलें आडवें । बळें न कढवें कढ्वाचें ॥२६॥
निष्टावया करी चळवळ । ब्रह्मद्रोही दुर्जन खळ । तंव सक्रोध रामें वोपिलें मुसळ । फोडिले मौळ तद्घातें ॥२७॥
रामहस्तींचा सौनंदप्रहार । जैसा विद्युत्पात कठोर । ललाट फुटोनि वाहे रुधिर । तें सविस्तर अवधारा ॥२८॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP