अध्याय ४९ वा - श्लोक १६ ते २०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
यास्यन्राजानमभ्येत्य विषमं पुत्रलालनम् ।
अवदत्सुहृदां मध्ये बंधुभिः सौहृदोदितम् ॥१६॥
राजा धृतराष्ट्र सभास्थानीं । भीष्मप्रमुख कौरवश्रेणी । त्यांप्रति अक्रूरें जाऊनी । निष्ठुरवचनीं अनुवादे ॥९२॥
कित्तेक मासवरी अक्रूर । हस्तिनापुरीं होता स्थिर । कौरवांचें अभ्यंतर । शोधनपर समविषम ॥९३॥
आसनीं शयनीं भोजनीं पानीं । सभास्थानीं मृगयायानीं । वनीं उपवनीं जलक्रीडनीं । सभास्थानीं परस्परें ॥९४॥
पक्षपातें आविष्करती । पण प्रतिज्ञा द्यूत दीव्यती । कुंतीसुतांच्या घातपातीं । यत्न करिती गांधार ॥१९५॥
प्रजा अकुकूळ पांडवां चतुरां । हृदयशल्य तें धार्तराष्ट्रा । धृतराष्ट्र निषेध न करी कुमरां । अन्यायकरां कुटिळातें ॥९६॥
ऐसें विवरोनि अंतःकरणीं । अक्रूर उद्युक्त मथुरायानीं । सन्नरहयगजपरिवारगणीं । आज्ञाग्रहणीं पातला ॥९७॥
सभास्थानीं कुरुवरिष्ठ । सपुत्र द्रोण गौतमश्रेष्ठ । भीष्म बाल्हीक भगवन्निष्ठ । सोमदत्त भूरिश्रवा ॥९८॥
शल्य जयद्रथ शकुनि कर्ण । दुर्योधनादि नृपनंदन । स्वस्त्तिश्रियेचे ब्राह्मण । राष्ट्रिकजन नृपवर्ग्य ॥९९॥
ऐसी घनवट कौरवसभा । तेथ प्रयाणोन्मुख अक्रूर उभा । कौरवीं दर्शवूनि स्नेहलोभा । अतिवालभें बैसविला ॥२००॥
ऐसिये भीष्मादिसभासदीं । न्यायनिष्ठुर विशाळ बुद्धि । धृतराष्ट्रातें अक्रूर बोधी । सुहृदां आप्तां देखतां ॥१॥
रामकृष्णादि वृष्णिप्रवर । उग्रसेनप्रमुख अपर्र । तिहीं सुहृद्भावें मंत्र । कथिला हितकर सर्वांसी ॥२॥
पांडव मानूनियां सपत्न । विषम स्वपुत्रस्नेहलालन । वदता झाला परिछिन्न । संबोधूनि धृतराष्ट्रा ॥३॥
अक्रूर उवाच - भो भो वैचित्रवीर्य त्वं कुरूणां कीर्तवर्धन ।
भ्रातर्युपरते पांडावधुनाऽऽसनमास्थितः ॥१७॥
विचित्रवीर्याचा नंदन । भो शब्दें त्या पुरस्करून । अक्रूर म्हणे तूं कीर्तिवर्धन । कुरुसंतानमुकुटमणि ॥४॥
विचित्रवीर्याचा आत्मज । कुरुवंशीं तूं कीर्तिध्वज । अन्याय वर्तता न वटे लाज । हांसती पूर्वज तव कर्मा ॥२०५॥
शंतनुसहोदर बाहूलीक बळि । धनुर्विद्येचा चंद्रमौळी । पुत्रपौत्रेंसीं तुम्हांजवळी । कुरुमहीतळी नापेक्षी ॥६॥
नेच्छी छत्र सिंहासन । मुद्रापत्रादि अनुशासन । तुमचें देखोनियां न्यून । धांवे प्राण घ्यावया ॥७॥
कौरववंशाच्या कैवारें । समरीं कृतांता दंडीन करें । परंतु राज्यासनाचें वारें । अभ्यंतरें स्पर्शेना ॥८॥
तैसाचि पाहें शंतनुतनुज । पूर्वप्रतापी तेजःपुंज । ब्रह्मचर्याची घालूनि पैज । नेच्छी राज्य वमनवत् ॥९॥
क्षात्रधर्मीं परम निपुण । राज्याभिलाषीं विरक्त पूर्ण । इहीं पांडूसी नृपासन । देऊनि शासन चालविलें ॥२१०॥
पांडु पंचत्व पावलियासाठीं । धर्म स्थापिजे भद्रपीठीं । त्वां ते मोडूनि वृद्धराहटी । धरिला पोटीं राज्यलोभ ॥११॥
वृद्ध असतां बाह्लीक भीष्म । पांडवांमाजि गुणाढ्य धर्म । तुम्हांसि राज्यलोभ हा अधम । गर्हित कर्म हे तुमचें ॥१२॥
पांडव लेंकुरें नेणतीं । पांडुवियोगें सखेद कुंती । म्हणऊनि झालासि जरी तूं नृपति । तरी न्यायें क्षिति प्रतिपाळीं ॥१३॥
धर्मेण पालयन्नुर्वी प्रजाः शीलेन रंजयन् । वर्तमानः समः स्वेषु श्रेयः कीर्तिमवाप्स्यसि ॥१८॥
घेऊनि करभार षष्ठांश । प्रजा रक्षाव्या विगतक्लेश । आप्त स्वजन सुहृदां तोष । दीजे विशेष विनयत्वें ॥१४॥
सामंत मांडलिक नृपवर । त्यांचा रक्षिजे शिष्टाचार । प्रजापीडक दस्यु चोर । अन्यायकर दंडावे ॥२१५॥
पांडव आणि निजनंदन । समत्वें शिक्षीं या सद्गुण । किंबहुना हे पांडुनंदन । स्वसुतांहून सम्मानीं ॥१६॥
सद्गुणांचा वाढवीं मान । दुर्गुणवंता करीं न्यून । ऐसें देखोनि अनुशासन । प्रजा संपूर्ण तुज भजती ॥१७॥
स्वधर्मशासनें पाळीं उर्वी । शीळसद्गुणीं प्रजा निववी । वर्ततां इत्यादि समत्वभावीं । लाहसी आघवी कीर्ति श्री ॥१८॥
कुरुवंशींच्या यशोधना । माजी मंडन तूं त्रिभुवना । युगानुयुगीं निववीं जना । कीर्तिअंगना पर्णूनी ॥१९॥
म्यां जो कथिला हा सत्पथ । लंघूनि वर्ते जो उत्पथ । धिग् धिग् त्याचा जन्म व्यर्थ । भोगी अनर्थ पदोपदीं ॥२२०॥
अन्यथा स्वाचरँल्लोके गर्हितो यास्यते तमः । तस्मात्समत्वे वर्तस्व पांडवेष्वात्मजेषु च ॥१९॥
म्यां जो कथिला धर्मन्याय । लंघूनि वर्ते जो अन्याय । त्यासि पुढें नरकभय । पावे अपाय पदोपदीं ॥२१॥
यास्तव समत्वें वर्तें राया । पांडवां आणि आत्मतनयां । विषमभाव न धरूनियां । भोगीं ऐश्वर्या न्यायपथें ॥२२॥
दोघां समान संपदा वोपीं । दोघां स्वपुत्रभावें जोपीं । विषमभावाची काळिमा लोपीं । रहस्य गोपीं हृत्कमळीं ॥२३॥
प्रज्ञाचक्षु राजेश्वरा । म्हणसी ममता स्वलेंकुरा । कवळी तैसी अपरां इतरां । सुरनरपितिरांसम न दिसे ॥२४॥
श्वापद पक्षी पश्वादि योनि । सुस्निग्ध निज औरससंतानीं । तैसी ममता इतर स्थानीं । समताचरणीं केंवि घडे ॥२२५॥
यदर्थीं ऐकें वैचित्रवीर्या । रामकृष्णें मज याचि कार्या । धाडिलें येथ ज्या अभिप्राया । तो निजहृदयामाजि धरीं ॥२६॥
नेह चात्यंतसंवासः कर्हिचित्केनचित्सह । राजन्स्वेनापि देहेन किमु जायात्मजादिभिः ॥२०॥
मी जें वदतों सभास्थानीं । रामकृष्णांहीं कथिल्या वाणी । यथार्थ विवरूनि अंतःकरणीं । समवर्तनीं दृढ होईं ॥२७॥
सम्यक म्हणिजे बरव्या परी । इह म्हणिजे ये संसारीं । एकत्र वास निरंतरीं । न घडे निर्धारीं कैं कोण्हा ॥२८॥
स्नेहभावें कथितां मित्री । बिघडुनि जाय काळसूत्रीं । प्राणी निबद्ध स्वकर्मतंत्रीं । मायायंत्रीं परिभ्रमती ॥२९॥
आपुलें शरीर बळ प्रचुर । धृष्टपुष्ट तरुणतर । अभ्यासशील चपळ चतुर । गौर सुंदर गुणवंत ॥२३०॥
राया नाहीं तनुभरंवसा । इतरां आप्तांचा कायसा । त्यांच्या लोभें पात्र क्लेशा । होऊनि अपयशा कां वरिजे ॥३१॥
म्हणोनि धरितां शरीरलोभ । विषयभोगांचा समारंभ । करितां अनावर काळक्षोभ । क्षोभे स्वयंभ - मदभंगा ॥३२॥
कालक्षोभें पडती दांत । खुळे होती पाय हात । गात्र विपत्तिपात्रभूत । मा इतर आप्त ते कोण ॥३३॥
स्वदेहींच वास ऐसा । एकरू वयसेसरिसा । न घडे कळतां हें मानसा । मूर्ख भरंवसा मानिती ॥३४॥
तेथ जाया आणि पुत्र । वसती चिरकाळ एकत्र । म्हणोनि धरिता स्नेहसूत्र । पापा पात्र होईजे ॥२३५॥
तरुणी तारुण्यें लावण्य । देखतां कामीं क्षोभे मन । वाटे तनु मन कुरवंडून । वनितेवरून टाकावें ॥३६॥
कुलीन गुणाढ्य रूपाथिली । दैवें अवचट मज लाधली । तिचेनि अवघी अन्वयवल्ली । त्रिजगीं शोभली विधिहूनही ॥३७॥
प्रपितामही प्रमातामही । पर्यंत पाहतां ईसम नाहीं । माझें दैव विचित्र कांहीं । जें मद्गेहीं हें रत्न ॥३८॥
धनगरा हातीं माणिक्यमणि । तैसी मज हे कुटुंबिनी । सलज्ज ईच्या लावण्यगुणीं । अंतःकरणीं जाणतसें ॥३९॥
रूप लावण्य गुण अपाडें । अळंकरण माझेन घडे । भर्ता म्हणविजे कोण्या तोंडें । म्हणवूनि कुढें हृदयीं मी ॥२४०॥
रत्नजडित अळंकार । परिधानार्थ तगटी चीर । कंचुकीवरी हंसमयूर । शिल्पविकार हेमसूत्रीं ॥४१॥
अशनें वसनें भूषणें विविधा । गुणलावण्यसमान कदा । न करविती मज भाग्यमंदा । लाजे प्रमदा म्हणावया ॥४२॥
ऐसें जयाचें मानस । चित्तीं ललनेचें लालस । कामें भुलोनि लावण्यास । धरी हव्यास तद्भरणीं ॥४३॥
तिचिया भरणपोषणासाठीं । आचरे अनेक अन्याय कोटी । सुकृताची नायके गोठी । न धरी पोटीं नरकभय ॥४४॥
रत्नजडित अळंकार । देशोदेशींचे विविधाकार । प्रतिवासरीं नव श्रृंगार । करवी सादर सप्रेमें ॥२४५॥
भ्रमर वेधे अरविंदीं । कीं वृष्टिभरें तुंबळे नदी । तेंवि मानस प्रमदावेधीं । आठव नेदी स्वहिताची ॥४६॥
ऐसिये ठायीं प्रजाजनन । होतां मोहें झळंबे मन । जेंवि जीमूतें जोपितां लवण । पूर्वकाठिन्य नाठवी ॥४७॥
मातापित्याची हेलना । आदर न करी स्वधर्माचरणा । न मनी देवा पितृगणा । अतिथिब्राह्मणावरी कोपे ॥४८॥
जनकासि जो न म्हणे पिता । तो कें पितृव्य म्हणे उपस्थिता । तेंवि जायापुत्रीं जडल्या ममता । स्वधर्मआस्था मग कैंची ॥४९॥
न करी नित्यनैमित्तिक । पंचमहाक्रतु सम्यक । याचकालागीं न घाली भीक । स्त्रीबळक रंजवितां ॥२५०॥
अपत्याचें करी कोड । मनीं संकल्प धरी वाड । करें कुरवाळी म्हणे रोड । पुरवी लाड परोपरी ॥५१॥
क्षण क्षणा उतरवी लोणें । दृष्टि काढूनि बळि सांडणें । भूर्जपत्रें यंत्रें करणें । मंत्ररक्षणें मणिवल्ली ॥५२॥
देवदेव्हारें नागबळी । निंब नेसने नाचे गोंदळीं । भिक्षा मागे अंत्यजआळी । गदावारी जोगवा ॥५३॥
अपत्यलोभें होय वेडा । रानोमाळीं पूजी दगडा । न शिणे आचार करितां कुडा । घुमत्या झाडा भांबावे ॥५४॥
मुंजे वेताळ यक्षिणी । अर्ची बाळांच्या रक्षणीं । अर्पी पशूंच्या दावणी । रुधिरार्पणीं चिळसेना ॥२५५॥
मैळी मुकी रानषष्ठी । झणें बाळासि करिती कष्टी । प्रजाकल्याणीं देऊनि दृष्टि । करी त्यांतुष्टि पशुघातें ॥५६॥
मारको मेसको महिषासुर । तदर्थ यजी मांग महार । न करी वर्णाश्रमविचार । दुराचार प्रिय मानी ॥५७॥
केरा पुंजा सटवा राणा । ऐसी निंद्य नांवें नाना । ठेवूनि संबोधी संताना । म्हणवी शहाणा संसारीं ॥५८॥
स्वाभाविक ऐसे दोष । भरणपोषणीं विशेष । अलंकाराचा हव्यास । सोयरीकांस आरंभी ॥५९॥
ज्यांचे गांठी बहुत धन । उत्पथ दुष्ट अन्यायनिपुण । ते ते सभाग्य सोयरे महान । करी प्रयत्नपूर्वक ॥२६०॥
उपाधिवर्धक ज्या अविद्या । त्या त्या पढवी मानूनि विद्या । पोटार्थ करी कर्मा निंद्या । न मनी कदा नरकभय ॥६१॥
चिंती स्वपुत्रा कल्याण । बंधुवर्गाचें अकल्याण । बंधुसंतति होतां क्षीण । म्हणे नांदेन सुतपौत्रीं ॥६२॥
ऐसी मोहममताभरीं । विषम बुद्धि धरी अंतरीं । तंव काळाची नवलपरी । करी बोहरी सर्वांची ॥६३॥
पारक्रीयांचें चिंती कुडें । तेंचि परते आपणाकडे । काळसत्तेचें बळ हें गाढें । मोहें मूढें नागवती ॥६४॥
पुत्र पित्यासन्निध राहे । ऐसा निश्चय तर्ही आहे । कोठें जन्मोनि कोठें जाये । न दिसे काय प्रत्यक्ष ॥२६५॥
इच्छिल्या ऐशा मनोरथा । घडों नेदी काळसत्ता । दोषसंग्रह होय माथां । मग ते कर्ता अघ भोगीं ॥६६॥
शकुनि जन्मला सुवळाजठरीं । आमात्य चालवी कौरवांघरीं । कर्ण राधेय झाला क्षेत्रीं । त्या मातापितरीं कैं योग ॥६७॥
सम्यक् म्हणिजे बरव्यापरी । अत्यंत एकरूपता शरीरीं । नवसे तेथें जायाकुमरी । नैरंतरीं कें वसती ॥६८॥
मायामोहभ्रमाचे भरीं । कुटुंबलोभें पातकें करी । पुढें भोगाचे अवसरीं । पचे अघोरीं एकाकीं ॥६९॥
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP