अध्याय ४२ वा - श्लोक ६ ते १०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
प्रसन्नो भगवान्कुब्जां त्रिवक्रां रुचिराननाम् । ऋज्वीं कर्तुं मनश्चक्रे दर्शयन्दर्शने फलम् ॥६॥
ऐश्वर्य अचिंत्य संपन्न । सत्तामात्रें विश्वसृजन । कुब्जांग सरळ करूं आपण । इच्छी श्रीकृष्ण हृत्कंमळीं ॥४९॥
तिनें सुंदर विलेपन । अर्पूनि केलें तनुरंजन । यालागीं सरळतनुलावण्य । स्वयें भगवान करूं इच्छी ॥५०॥
किंवा भुलोनि भगवद्रूपा । तियेचे अंतरीं उदेली त्रपा । म्हणे विधातया निष्कृपा । त्रिवक्रा कां पां मज केलें ॥५१॥
माझी असती लावण्यतनु । तरी मी भोगितें मधुसूदनु । आतांख त्रिवक्रा लावण्यहीनु । लज्जेकरून न बोलवे ॥५२॥
हें जाणोनि अंतरवेत्ता । प्रसन्न पूर्णत्वें होत्साता । तियेची मोडूनि त्रिवक्रता । सुंदर वनिता करूं इच्छी ॥५३॥
वदनपंकज परम रुचिर । कटिवक्षस्थळग्रीवा वक्र । ऐसें विपरीत जें शरीर । लावण्यप्रचुर करावया ॥५४॥
प्रवर्तला कमलाकांत । दर्शवी दर्शनाचा सफलार्थ । कोणे परी तें श्लोकोक्त । परिसा समस्त निरूपण ॥५५॥
पद्भ्यामाक्रम्य प्रपदे द्व्यंगुल्युत्तानपाणिना । प्रगृह्य चिबुकेऽध्यात्ममुदनीनमदच्युतः ॥७॥
कृष्णें कुब्जा स्वसंमुख । उभी करूनियां सम्यक । तिचें पदाग्र नावेक । स्वपदीं निष्टंक दडपिलें ॥५६॥
दक्षिणहस्तीचीं अंगुलें दोन्ही । तर्जनीमध्यमा या अभिधानीं । हनुवटीये तळीं घालूनी । ऊर्ध्व उचलूनि निटविली ॥५७॥
उत्तान द्व्यंगुळें धरूनि चिबुका । ऊर्ध्व उचलितां वर्ष्मशळाका । सरळावयवी शोभली देखा । जैसी नायिका सुराप्सरा ॥५८॥
ज्याचा संकल्प अविच्युत । यालागीं नामें तो अच्युत । तेणें कुब्जा लावण्यभरित । केली त्वरित निजहस्तें ॥५९॥
अहल्या चरणस्पर्शमात्रें । करपदयोगें कुब्जागात्रें । सुंदर केलीं जगन्मित्रें । ऐसीं चरित्रें अघहंतीं ॥६०॥
सा तदर्जुसमानांगी बृहच्छ्रोणिपयोधरा । मुकुन्दस्पर्शनात्सद्यो बभूव प्रमदोत्तमा ॥८॥
श्रीकृष्णाच्या स्पर्शेंकरून । कुब्जा सरळसमानतनु । पृथुळ पयोधर नितंब पीन । मघ्य सान तन्वंगी ॥६१॥
मुकुंदयतीति मुकुंद । आनंदवर्धक अर्थ विशद । त्याच्या स्पर्शें प्रमदा सद्य । झाली आनंदमय अवघी ॥६२॥
परमानंद उचंबळोन । तिनें प्रार्थिला आनंदघन । तेंही ऐका निरूपण । कुरुमंदनसदस्य हो ॥६३॥
ततो रूपगुणैदार्यसंपन्ना प्राह केशवम् । उत्तरीयान्तमाकृष्य स्मयंती जातहृच्छया ॥९॥
कृष्णप्रसाद लाहोनि पूर्ण । औदार्यरूपगुणलावण्य । झाली सकळकळासंपन्न । श्रीसमान श्रीभाग्यें ॥६४॥
ऐसी लाहोनि योग्यता । बोलती झाली श्रीभगवन्ता । उत्तरीयवसन त्वरिता । ओढी हस्तें स्मितवदना ॥६५॥
डोळे मोडूनि हास्य करी । भ्रूसंकेतें पदरीं धरी । भगवत्काम अभ्यंतरीं । तेणें गात्रीं विह्वळता ॥६६॥
साधनसंपत्ति होती पहिली । तेणें कृष्णकृपा लाधली । स्पर्शें सद्गुणसंपन्न झाली । अभिलाषिली कृष्णरति ॥६७॥
दुर्लभकेजा भाजी घेणें । मुक्तामौल्य तो काय जाणे । धनसंपन्न झालिया तेणें । रत्नभूषणें अपेक्षिजे ॥६८॥
तेंवि विषयासक्त नर । बाह्यलौकिक भजनादर । त्यांसि दुर्लभ जगदीश्वर । भवसागर अनुल्लंघ्य ॥६९॥
दैवें जोडतां साधनधन । भगवद्गुरुकृपासंपन्न । उभयभोगीं विरक्त पूर्ण । निजात्मरमण कामिती ॥७०॥
ऐसिया कामातुरांप्रति । भयलज्जेची होय निवृत्ति । कुब्जा न स्मरे कंसभीति । न धरी चित्तीं जनलज्जा ॥७१॥
कृष्णाप्रति काय म्हणे । तें ऐकावें कुरुभूषणें । मुमुक्षु सच्छ्रोते शहाणे । अंतःकरणें पडकती तें ॥७२॥
एहि वीर गृहं यामो न त्वां त्यक्तुमिहोत्सहे । त्वयोन्मथितचित्तायाः प्रसीद पुरुषर्षभ ॥१०॥
भगवंतासी स्ववश करणें । ऐसें भाग्य केलें कोणें । कुब्जेचिया अगाध पुण्यें । झालें बोलणें सविलास ॥७३॥
भो भो वीर विलासचतुरा । चाल ये जाऊं माझिया घरा । तुज टाकूनि दुःखसागरा - । माजि माझेनि न पडवे ॥७४॥
तुज त्यागितां अनुत्साह । दुःखसागर तो महामोह । तेथ तळमळी माझा देह । परमोत्साह तव संगें ॥७५॥
तुवां स्ववश केलें चित्ता । तुझेनि झाले चित्तोन्मथिता । एवं करोनि स्मरमोहिता । न वचें परता रति देईं ॥७६॥
भो भो स्वामी पुरुषश्रेष्ठा । पूर्ण साधूनि ममाभीष्टा । स्मरविरहाच्या निरसीं कष्टा । रक्षीं अरिष्टापासाव ॥७७॥
तुझिये अधरामृतें तृषा । निरसीं माझी परमपुरुषा । वियोगदुःखाचिया क्लेशा । पात्र न करीं प्रसीद ॥७८॥
तव तनूच्या आलिंगना । तव करकंजीं कुचमर्दना । चटुलचाटुस्मितभाषणा । स्पृहायमाणा स्मरतप्ता ॥७९॥
माझा मनोरथ पूर्ण करीं । म्हणोनि ओढी धरूनि पदरीं । तेणें विस्मित श्रीमुरारि । पाहे नेत्रीं सखयांतें ॥८०॥
N/A
References : N/A
Last Updated : May 07, 2017
TOP