अध्याय ३५ वा - श्लोक १६ ते २०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
निजपदाब्जदैर्लध्वजवज्रनीरजांकुशविचित्रललामैः ।
व्रजभुवः शमयन्खुरतोदं वर्ष्मधुर्यगतिरीडितवेणुः ॥१६॥
तया मोहासि कारण । यशोदे तुझा हा नंदन । ऐकें तयाचें लक्षण । मोहकचिह्न वर्णिती ॥३९॥
श्रीपदकमलदलामल । जेथ सुचिह्नें रत्नमेळ । ध्वनवज्रांकुशाब्द्ज सकळ । गंगादि सोज्वळ ऊर्ध्वरेखा ॥१४०॥
ऐसिया पदीं फिरतां विपिन । करी पृथ्वीचें वेदनाशमन । खुरक्षतें जें बहुकालीन । तें संपूर्ण विसरवी ॥४१॥
खुरक्षताच्या विषम तिडका । खुरतोद त्यां म्हणिजे देखा । स्वपदस्पर्शें व्रजजनसखा । निरसी फिरतां भूपृष्ठीं ॥४२॥
अश्वक्रान्ता रथक्रान्ता । गजपदातिनृपक्रान्ता । एवं बोलिजे विष्णुक्रान्ता । भूपति तत्त्वता हरिअंश ॥४३॥
तया नृपातें करितां समराम । कठोर झगटतां गजरथखुरां । व्यथा न मनी वसुंधरा । जेंवी सुरतीं सुंदरा नखक्षतीं ॥४४॥
त्रिजग मोजितां त्रिविक्रमें । कीं हिरण्याक्ष वधितां पराक्रमें । तिखट वराहखुरसंक्रमें । भू सप्रेमें आह्लादे ॥१४५॥
हरि चारितां वनीं गोधनां । गोखुरीं भ्रू न पवे वेदना । परमाह्लादें प्रफुल्लमना । समाधाना पावतसे ॥४६॥
कित्येक म्हणती धेनुखुर । पृथ्वीलागीं वेदनाकर । हें व्याख्यान अविवेकपर । नातिचतुर निरूपिती ॥४७॥
तरी ते खुरवेदना कवण । परिसा आतां सावधान । ब्रह्म्यापाशीं करी रुदन । पृथिवी जाऊन ज्या दुःखें ॥४८॥
अविधि दस्यु तस्कर जार । अधर्म करी उत्पथाचार । करितां अन्यायें संचार । ते वज्रप्रहार भू मानी ॥४९॥
विश्वासघातिया दुर्जना । परस्त्रीअप्रद्रव्यापहरणा । निरपराधसाधुच्छलना । करिती विचरणा जैं दुष्ट ॥१५०॥
व्यतन भक्षूनि जन्मवरी । स्वामी सांडूनि पळती समरीं । सयान त्यांच्या तिखटां खुरीं । दुःखी धरित्री बहुसाल ॥५१॥
सांडूनियां स्वभर्तारां । जाया जाऊनि भजती जारां । लागतां त्यांचिया पदप्रहारां । दह्रा थरथरां कांपतसे ॥५२॥
शिष्यामुखें गुरूची निंदा । सादर ऐकती त्यांचिया पदां । लागतां भूमि पावे खेदा । कांपे गदगदां तद्योगें ॥५३॥
पितृद्रोही मातृद्रोही । सुरापानी स्वर्णस्तेयी । यांच्या स्पर्शें दुखवे मही । वज्रघायीं ना तैसी ॥५४॥
वेदनिंदक वेदद्रोही । ब्रह्मघ्न कृतघ्न आततायी । मातृगामी कन्याविक्रयी । त्यांच्या पायीं भू दुखवे ॥१५५॥
वेदबाह्यपाषंडी रत । यथेष्टाचरणमार्ग मुक्त । वर्णसंकर विषयासक्त । वामी कामी कौलिक ॥५६॥
आयतन आगार नगरसीमा । भंगिती लंघिती शपथनियमा । वृत्त्युच्छेदकांच्या विक्रमा । लागतां श्रमा भू मानी ॥५७॥
ऐसे धरेचे खुरतोद । शमवी स्पर्शोनि सुमंगल पद । जे पदीं सामुद्रललामवृन्द । तिहीं मुकुंद विचरतां ॥५८॥
तनुगौरवें धुरंधर । वर्ष्मधुर्य तो कुंजर । एवं जगतीं संचार । करीं श्रीधर वेणु वाहत ॥५९॥
तें कृष्णाचें गजगतिगमन । विचित्र वेणूचें बादन । सविलास अपांगवीक्षण । वेधी तनुमन तें ऐका ॥१६०॥
व्रजति तेन वयं सविलासवीक्षणार्पितमनोभववेगाः ।
कुजगतिं गमिता न विदामः कश्मलेन कबरं वसनं वा ॥१७॥
वेणुवादनें श्रवणद्वारा । वेधूनि आकर्षी अंतरा । सविलास वीक्षणें वेधीं नेत्रां । बुद्धिविचारा विसरवी ॥६१॥
देखोनि वेणुवादनपर । श्रवणें नयनें होतां सादर । इतुक्या निमित्त मन्मथज्वर । उपजे तीव्र सर्वांगीं ॥६२॥
ऐसिया आम्ही स्मरजर्जरा । विस्मृता प्रवृत्तिव्यापारा । नेणों गळाल्या वस्त्रां कंबराम । वृक्षाकारा ताटस्थ्यें ॥६३॥
नेणों फिटोनि गेलीं वसनें । केश सुटोनि गळालीं सुमनें । न स्मरतीच शरीरें नग्नें । वेणुगायनें भुललिया ॥६४॥
आमुचें नवल काय साजणी । आम्हीच ऐशा हरिणी वनीं । भुलोनि कृष्णाच्या वेणुगायनीं । प्रवृत्तिभानीं विमुक्ता ॥१६५॥
मणिधरः क्कचिदागणयन्गामालया दयितगंधतुलस्याः ।
प्रणयिनोऽनुचरस्य कदांऽसे प्रक्षिपन्भुजमगायत यत्र ॥१८॥
ऐकें यशोदे सुंदरी । तुझा तनय श्रीमुरारि । अमूल्यमणिमाला ग्रथित धरी । धेनुगणनार्थ निजकंठीं ॥६६॥
क्कचित् म्हणिजे कोणे समयीं । वर्णविभागें निवडी गायी । गणना करिती एके ठायीं । ग्रथितमणिस्रज घेउनी ॥६७॥
अथवा बंधु रामकृष्ण । धेनु वळिती विभागून । तैं पाडोवाडीं करिती गणन । ग्रथित मणिगण घेउनी ॥६८॥
अथवा चालतां धेनुहारी । धेनु चिंतूनि एकी पांढरी । एकीबेकी क्रीडेवारी । मणिमयहारीं उमाणिती ॥६९॥
अथवा प्रसूता पारठिया । दोहनकाळीं निवडावया । घेऊनि ग्रथिता मणिमया वलया । करी कानया परिगणना ॥१७०॥
एवं गोगणनाव्यापार । तदर्थ ग्रथित मणिगणहार । कंठीं मिरवी मुरलीधर । तुझा कुमर यशोदे ॥७१॥
तो मणिहार उत्तम । आणि प्रियतम तुळसीदाम । बहु सुगंधाढ्य जें कां परम । मेघश्याम तद्युक्त ॥७२॥
सवंगडी अनुचर प्रियतम बहु । त्यांचे स्कंधीं घालूनि बाहु । वेणु वाजवी मुहुर्मुहु । जे जे ठायीं जे समयीं ॥७३॥
क्कणितवेणुरववंचितचित्ताः कृष्णमन्वसत कृष्णगृहिण्यः ।
गुणगणार्णमनुगत्य हरिण्यो गोपिका इव विमुक्तगृहाशाः ॥१९॥
तैं तो वेणुक्कणितध्वनि । मानसा वेधीं पडतां श्रवणीं । तेणें अपहृतचित्ता हरिणी । येती धांवोनि हरिमागें ॥७४॥
वल्लभा कृष्णसार मृगां - । सहित तत्पत्न्या सानुरागा । फिरती कृष्णामागोमागां । पुन्हां तत्संगा न त्यजिती ॥१७५॥
गृहाशा जे फिरवी मागें । मुत्क जाली तत्प्रसंगें । म्हणोनि कृष्णा मागोमागें । फिरती कुरंगें अनुरक्तें ॥७६॥
जैशा गोपिका मुरलीरवें । वंचितचित्ता घेती धांवें । पुन्हा गृहाशा नाठवे । कीं सुटलें दावें भवपाश ॥७७॥
कृष्णगृहिणी गोपवनिता । हरिसुख भोगूनि वियोगतप्ता । यालागीं भवपाशनिवृत्ता । ज्या सानुरक्ता श्रीकृष्णीं ॥७८॥
ऐसें कौतुक एकी वदती । तंव आणिका यशोदेप्रति । कृष्णलीला अनुवर्णिती । ते भूपती शुक सांगे ॥७९॥
मध्याह्नपर्यंत वृंदावनीं । क्रीडा करूनि चक्रपाणि । धेनु आणी परतोनि । यमुनापुलिनीं जीवनार्थ ॥१८०॥
ते समयींची ललितलीला । कृष्णसौभाग्यकलाकुशला । वदती यशोदेप्रति व्रजबाळा । कुरुनृपाळा तें ऐक ॥८१॥
कुंददामकृतकौतुकवेशो गोपगोधनवृतो यमुनायाम् ।
नंदसूनुरनघे तव वत्सो नर्मदः प्रणयिनां विजहार ॥२०॥
अवो निष्पापे यशोदे सती । तुझा तनय हा श्रीपति । यशोदानंदनही म्हणती । अपरा वदती नंदात्मज ॥८२॥
तो हा गोपी भुलवावया । विचित्रवेशें नटवी काया । कुंदमाळा घालोनियां । धातुमया कृततिलकां ॥८३॥
गोपीनयनांसि उत्सहकर । करूनि विचित्र अलंकार । वेश मिरवी अतिसुंदर । मोहनपर त्रिजगातें ॥८४॥
ठाकत ठमकत आणि मुरडत । गोपगोधनीं परिवेष्टित । यमुनापुलिनीं क्रीडा करित । संतोषवीत जगत्रया ॥१८५॥
वेणुनादें वेधी देवां खेचरां भूचरां जलचरा जीवां । स्थावरां वनचरां सर्वां । भुलवी जेव्हां तनुनाट्यें ॥८६॥
N/A
References : N/A
Last Updated : May 04, 2017
TOP