अध्याय २८ वा - श्लोक ६ ते १०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
नमस्तुभ्यं भगवते ब्रह्मणे परमात्मने । न यत्र श्रूयते माया लोकसृष्टिविकल्पना ॥६॥
म्यां जें केलें दंडवत । तो अभिप्राय इत्थंभूत । कायावाचामनेंसहित । अर्पिलों निवांत तव चरणीं ॥९०॥
अचिंत्यैशर्य अनंत । निरतिशयें सामर्थ्यवंत । तो तूं परिपूर्ण भगवंत । भावें दंडवत तुज माझें ॥९१॥
यालागीं भावें करूनि नमन । केलें आत्मनिवेदन । सबाह्य व्यापक तूं सर्वज्ञ । अंतर जाणोन तुष्टसी ॥९२॥
भगवत्पदाचा उच्चार । पृथगैश्वर्यपरिहार । करूनि नमिला कमलावर । स्वगतोद्गार अवधारा ॥९३॥
ब्रह्मणे म्हणोनि केलें नमन । कीं ब्रह्म बृहत्वें परिपूर्ण । अखिलांडात्मकाधिष्ठान । तैं मी अभिन्न सहजेंची ॥९४॥
जरी तूं पूर्वींच अभिन्न मजशीं । तरी कायसा नमन करिसी । ऐसें न म्हणावें हृषीकेशी । प्रार्थनेशीं अवधारीं ॥९५॥
मळिनसत्त्वाचें आवरण । तद्गतदेवतात्मा मी वरुण । तूं परमात्मा परिपूर्ण । मायावरणवर्जित ॥९६॥
जया स्वरूपाचे ठायीं । गुणत्रयाची वार्ता कांहीं । उपनिषदर्थें ऐकिली नाहीं । मा कैंची गुणमयी भवभ्रांति ॥९७॥
सृजनाप्ययादि घडामोडी । प्रणवाकारें दावी प्रौढी । ते मूळमायाही बापुडी । न लभे सवडी तुजमाजीं ॥९८॥
म्हणोनि कायावाचामनें । वित्तें जीवितें अर्थें प्राणें । छेदूनि पृथग्विकल्पने । अंगीकरणें निजशरणा ॥९९॥
इत्यादि करूनि अभिवंदना । यावरी कथी स्वदौर्जन्या । विश्वव्यापका जगज्जीवना । भाकी करुणा क्षमापनीं ॥१००॥
अजानता मामकेन मूढेनाकार्यवेदिना । आनीतोऽयं तव पिता तद्भवान् क्षंतुमर्हति ॥७॥
न जाणोनि माझिया भृत्यें । तुझा जनक आणिला येथें । एवढा ममापराध समर्थें । क्षमा सर्वार्थें करावा ॥१॥
काय न जाणोनि जरी हें पुससी । तरी ऐकावें इयेविशीं । ब्रह्मयाची आज्ञा जैशी । ते तुजपाशीं कथीतसें ॥२॥
यक्ष राक्षस सृजितो दृहिण । तिहीं प्रार्थिलें क्षुधापहरणा । तो आज्ञापी जळरक्षणा । आत्मपोषणा तद्योगें ॥३॥
मज दिधलें जलाधिपत्य । म्हणोनि केले माझे भृत्य । येरवीं आसुरी प्रकृतिमंत । जात्या दैत्य महाक्रूर ॥४॥
पूर्वरात्रीचा प्रहर एक । अपरनाडिकापंचक । या वेगळी निशी सम्यक । मरुद्गण निष्टंक रक्षिती ॥१०५॥
ऐसी नियत जाणोनि रजनी । जळीं प्रवेशों नये कोण्ही । प्रवेशती त्यां महाविघ्नीं । आसुरीं मद्गणीं त्रासिजे ॥६॥
ऐसी सर्वत्र सामान्याज्ञा । विशेष कथिलें विधिविधाना । तें तूं ऐकें जनार्दना । शंभुशासना व्रतनियमीं ॥७॥
( व्रतं विधानोक्तम् ) ‘ कलार्धां द्वदशीं दृष्ट्वा निशीथादूर्ध्वमेव हि ।
आमध्याह्नाः क्रियाः सर्वां कर्तव्याः शंभुशासनात् ॥ ’
शंभु सप्रेम वैष्णव व्रती । अनुल्लंघ्य तच्छासन त्रिजगतीं । अस्मादादिकां सर्वांप्रति । मान्य निश्चिती शिवाज्ञा ॥८॥
सोळावा जो तिथीचा अंश । कळा ऐसें बोलिजे त्यास । तदर्धही द्वादशीस्पर्श । व्रतविशेष तो काळ ॥९॥
ऐशिये संधी पारणा पडे । तेव्हां नित्याह्निक कैसें घडे । ऐसें जाणोनि सांकडें । चंद्रचूडें नियमिलें ॥११०॥
मध्यरात्रीं नाम निशीथ । ते टाकूनि निशी उर्वरित । मध्याह्नावधि क्रिया ज्या नित्य । त्या ते रात्रीं साराव्या ॥११॥
तेथींचें काळ आकर्षण । संक्षेपतः कर्माचरण । ते सांगतासिद्धि पूर्ण । करिती तपोधन तपोलोकीं ॥१२॥
ऐसें असतां द्वादशी लंघी । तो आतुडे अघनिदाघीं । म्हणोनि नंद यमुनावोघीं । यथोक्तकाळीं प्रवेशला ॥१३॥
हें नेणोनि मम किंकरें । आसुरें नंद आणिला निकरें । आसुरी वेळा या संस्कारें । शास्त्रविचारें नुमजोनी ॥१४॥
न विचारितां आसुरगणें । अपराध केला मूढपणें । त्या अपराधें मजकारणें । करुणापूर्णें नुबागिजे ॥११५॥
तूं तव करुणेचा सागर । आम्हां जाणोनि स्वकिंकर । क्षमा कर्णें हा विचार । योग्य साचार तुजलागीं ॥१६॥
गोविंद नीयतामेष पिता ते पितृवत्सल । ममाप्यनुग्रहं कृष्ण कर्तुमर्हस्यशेषदृक् ॥८॥
नव्हां म्हणस्सी मम किंकर । तरी तूं जैं झालासि गवेंद्र । तैचि अस्मदादि सर्व अमर । झालों अनुचर गोविंद ॥१७॥
गोविंद ऐसिया नामोच्चारें । इतुकें सूचिलें सर्वेश्वरें । जें अभिषेककाळीं स्थापिलें शक्रें । संबोधूनि त्या नामें ॥१८॥
मग काढूनि वारुणीमाया । पाशमोचन करूनियां । नंद अर्पिला जनकप्रिया । परम सदया कृष्णातें ॥१९॥
पितृवत्सल तूं अनंता । तरी या नेइजे आपुल्या ताता । विश्वद्रष्टा विश्वगोप्ता । तूं तत्वता अशेषदृक् ॥१२०॥
ममापराधकारण । जाणसी सर्वद्रष्टा म्हणोन । यालागीं नुपेक्षीम स्वपादशरण । सनाथ वरुण तव दास्यें ॥२१॥
पश्चिमदिशेचा अधिकार । देऊनि केलें यादसेश्वर । किंकराचा नीच किंकर । वरुण साचार मानावा ॥२२॥
ऐसा प्रार्थूनि बहुतां परी । वारंवार नमस्कारी । नंद अर्पूनि उत्साहगजरीं । श्रीमुरारि बोळविला ॥२३॥
श्रीशुक उवाच - एवं प्रसादितः कृष्णो भगवानीश्वरेश्वरः ।
आदायागात्स्वपितरं बंधूनां चावहन् मुदम् ॥९॥
परीक्षितीसी शुक भगवान । म्हणे ऐसा वरुणें कृष्ण । केला होत्साता प्रसन्न । नंद घेवोन पैं आला ॥२४॥
अगाधैश्वर्यें भगवान । ईश्वराचा जो परम इन । तेणें निजजनक आणून । बंधु स्वजन तोषविले ॥१२५॥
गोप गोपिकां लहानें थोरें । नंदा भेटलीं आनंदगजरें । होतीं सशोकक्षुधातुरें । नेत्रचकोरें टवटविलीं ॥२६॥
सर्वीं सारोनि पारणा । मग बैसवूनि गोपगणा । वरुणें जैसें पूजिलें कृष्णा । करी कथना त्यापाशीं ॥२७॥
नंदस्त्वतींद्रियं दृष्ट्वा लोकपालं महोदयम् । कृष्णे च सन्नतिं तेषां ज्ञातिभ्यो विस्मितोऽब्रवीत् ॥१०॥
कदापि मानुषीं इंद्रियां । गोचर नव्हे जे सपर्या । वरुणें केली माझिया तनया । वाङ्मनःकाया अर्पूनी ॥२८॥
त्या वरुणाचा महोदय । भाग्यवैभव सांगों काय । तोही श्रीकृष्णाचे पाय । वंदी विनयपूर्वक ॥२९॥
जैसे उगवले कोटितरणि । श्वेतपीतादि विचित्र किरणीं । भित्तिप्रदेशीं पटांगणीं । शोभती मणिप्रभाढ्य ॥१३०॥
रत्नें भूषणें अलंकार । पदार्थश्रेणी नारी नर । विस्तीर्ण सभेचा शृंगार । पर्यायोत्तर सुचेना ॥३१॥
गव्य षड्रस सर्वां विदित । उपमा वदतां बोधे चित्त । तैसें न बोधे परमामृत । कीं तें अविदित म्हणोनियां ॥३२॥
आमुचीं प्राकृत मानुषी करणें । मर्त्यविभवीं विचक्षणें । लोकपाळश्रीकरणगणें । केंवि उमाणे प्राकृतां ॥३३॥
वरुणलोकींचा महोदय । आम्हां मानवां अतींद्रिय । म्यां देखिलें परमाश्चर्य । लागतां सोय कृष्णाची ॥३४॥
वरुणलोकीं कृष्णागमन । होतांचि जाले दिव्य नयन । ऐश्वर्येंशीं वरुणभुवन । जालों देखोन विस्मितात्मा ॥१३५॥
तेथ वरुन सिंहासनीं । शक्र जैसा निर्जरगणीं । तो हा श्रीकृष्णाचे चरणीं । विनीत होऊनि लागला ॥३६॥
तेणें केलें कृष्णार्चन । दिव्योपचारसमर्पण । तें सांगतां वाचेसि मौन । उपमाविहीन म्हणोनी ॥३७॥
एवं कृष्ण नव्हे बाळ । अथवा न म्हणवे गोपाळ । स्वसामर्थ्यें महाप्रबळ । त्रैलोक्यपाळ गमतसे ॥३८॥
हें ऐकोनि सकळ गोप । म्हणती कृष्ण वैकुंठदीप । पूर्णब्रह्म अरूपरूप । म्हणवी पशुपसुत आपणा ॥३९॥
N/A
References : N/A
Last Updated : May 02, 2017
TOP