श्रीशुक उवाच - गोवर्धने धृते शैले आसाराद्रक्षिते व्रजे । गोलोकादाव्रजत्कृष्णं सुरभिः शक एव च ॥१॥

शुक म्हणे गा कुरुपुंगवा । प्रथमभक्तीचिया गौरवा । जाणोनियां वासुदेवा । सप्रेम खेवा कवळिलें ॥२६॥
हरिगुणपरमामृताचें पीक । सेवूं जाणसी तूंचि एक । नित्यनूतन अधिकाधिक । वक्तृत्वसुख मज तेणें ॥२७॥
इंद्र आणि कामधेनु । येऊनि एकांतीं नमिती कृष्ण । त्यांची आगमनकारणें भिन्न । ऐके श्रवणसौभाग्यें ॥२८॥
कृष्नें धरूनि गोवर्धन । वारिलें स्वकृत दुर्मेघविघ्न । तेणें इंद्र लज्जायमान । भय पावोन पातला ॥२९॥
कृष्णैश्वर्य अगाध । जाणोनि स्वकृत अपराध । क्षमापनीं होऊनि सिद्ध । आला विबुध चक्रप ॥३०॥
आणि कोपल्याही निर्जरपति । कृष्णें रक्षिली निजसंतति । यास्तव कामदुधा क्षिती । आली श्रीपतितोषार्थ ॥३१॥
एवं इंद्र स्वभयहरणा । सुरभि संतोषाभिवर्धना । कथिलें दोहींच्या आगमना । कुरुभूषणा पृथक्त्वें ॥३२॥
एकसमयीं दोन्ही आलीं । पर्म्तु पृथक् स्तवितीं जालीं । दोंमाजि विज्ञापना पहिली । इंद्रें केली ते ऐका ॥३३॥

विविक्त उपसंगम्य व्रीडितः कृतहेलनः । पस्पर्श पादयोरेनं किरीटेनार्कवर्चसा ॥२॥

इंद्र एकांतीं येऊन चुकवून प्राकृतजनांचे नयन । वंदिता झाला श्रीभगवान । लज्जायमान मानसें ॥३४॥
पात्रावरूनि उठविलें । तेंवि मख वर्जूनि अपमानिलें । स्वकृतशासन कांहीं न चले । विदर्प केलें गिरिधरें ॥३५॥
उभय प्रकारें लज्जायमान । पावला होत्साता हेलन । भास्करभासुरमुकुटें करून । वंदिले चरण कृष्णाचे ॥३६॥

दृष्टश्रुतानुभावोऽस्य कृष्णस्यामिततेजसः । नष्टत्रिलोकेशमद इंद्र आह कृतांजलिः ॥३॥

श्रुतिस्मृतिपुराणमाळा । कथितां महर्षींचा मेळा । कृष्णप्रताप विदित झाला । तो बोलिला श्रुतानुभव ॥३७॥
ब्रह्मादिप्रार्थनेपासून । यावद्गोवर्धनोद्धरण । अगाध हरिमहिमा देखोन । तो दृष्टमहिम्न म्हणिजेत ॥३८॥
जैसा महिमा ऐकिला होता । तैसा जेणें प्रत्यक्षता । देखिला तो त्रिलोकीभर्ता । झाला स्तविता कृतांजलि ॥३९॥
श्रीकृष्णाचा ऊर्जितोदय । ऐकिला तैसाचि देखिला होय । जेणें तो हा अमरवर्य । वांछी अभय कृष्णाचें ॥४०॥
त्रैलोक्याचें प्रभुत्वहर्ता । यज्ञ वारूनि अपमानिता । त्या कृष्णातें निर्जरभर्ता । झाला विनविता कृतांजलि ॥४१॥
ते श्लोकदशकें इंद्रस्तुति । ऐके शुकमुखें परीक्षिति । तिच्या श्रवणीं सावध श्रोतीं । अपत्योक्ति हे माझी ॥४२॥

इंद्र उवाच - विशुद्धसत्त्वं तव धाम शांतं तपोमयं ध्वस्तरजस्तमस्कम् ।
मायामयोऽयं गुणसंप्रवाहो न विद्यते तेऽग्रहणानुबंधः ॥४॥

प्रथम अपराधअंगीकरण । परमकारुणिक श्रीभगवान । त्यासि शब्द न ठेवून । करी स्तवन चौं श्लोकीं ॥४३॥
निजौद्धत्य तयावरी । एक्या श्लोकें निवेदन करी । तें क्षमावया सोढव्य थोरी । वदे वैखरी श्लोकैकें ॥४४॥
त्यावरी दोश्लोकीं नमनोक्ति । स्तवी संबोधनीं श्रीपती । स्वापराधोपसंहारार्थी । करी विनंति श्लोकैकें ॥४५॥
भगवदनुग्रहोपसंहरण । एका श्लोकें केलें कथन । एवं दहा श्लेकीं स्तवन । संक्रदन जें वदना ॥४६॥
त्यामाजि हा प्रथम श्लोक । म्हणे अपराधी मी रंक । तूं परमात्मा उत्तम श्लोक । अपराधकलंक तुज नाहीं ॥४७॥
तूं सर्वांचा अंतरात्मा । नातळोनि भावा विषमा । कर्मानुरूप दंडिसी अधमा । हे तव गरिमा वास्तव ॥४८॥
दंड नव्हे हा अनुग्रह । मजवरी केला जी स्वयमेव । तुझे ठायीं भेदभाव । म्हणणें माव अवघी हे ॥४९॥
कल्पनेचें अभ्र विरे । अव्याकृत अज्ञान मरे । त्यावरी विशुद्ध सत्त्व जें उरे । तें निर्धारें तव धाम ॥५०॥
ऐसिया विशुद्ध स्वरूपांत । न वसे भेदत्रयाची मात । निमाले विजातिजातिस्वगत । म्हणोनि शांत बोलिजे ॥५१॥
जेंवि गगनाच्या अगाध डोहीं । ओघ तरंग लहरी नाहीं । तेथ प्रतिबिंब कैंचें काई । कोणे प्रवाहीं कांपेल ॥५२॥
ऐसें अखंडैकरस । शांत शाश्वत सावकाश । तपोमय स्वप्रकाश । निर्विशेष सर्वज्ञ ॥५३॥
सर्व नाहींच जयेठायीं । तेथ सर्वज्ञ म्हणणें काई । यालागिं रजस्तमांची कांहीं । वार्ता तेही नुपलभे ॥५४॥
घटमठांचें आवरण । भंगोनि गेलिया नुसतें गगन । तेंवि रजतमविध्वंसन । प्रकाशमान तव धाम ॥५५॥
ऐसिया त्व रूपाच्या ठाईं । शत्रु मित्र कैंचा काई । क्षोभकाक्षोभकतानवाई । कैंची कहीं अद्वैतीं ॥५६॥
तरी हें अवघेंचि आम्हांकडे । मायाभ्रमाचें गडद पडे । स्वयंभ अद्वैत असतां उघडें । भ्रमें नातुडे कल्पांतीं ॥५७॥
आवरणरूप पडली भ्रांति । विक्षेपरूपें विश्वस्फूर्ति । दृश्य प्रपंच आणिला व्यक्ति । गुणप्रवृत्तिप्रवाहें ॥५८॥
तमें गडद पडलें मुळीं । विपरीतज्ञाना सत्त्व उज्ळी । तेणें विश्वाभिमान स्थूळीं । विषयकवळीं नाथिलें ॥५९॥
इष्टानिष्टामिश्रविषय । हें त्रैगुण्यलोकत्रय । एवं भेदाचें प्राचुर्य । पदाभिमानें समविषम ॥६०॥
आपण असे जिये पदीं । तेथील महत्त्वा संपादी । उच्चाभिलाषें आस्पदीं । नीच खेदीं अवंचत्वें ॥६१॥
ऐसा गुणांचा प्रवाह । तो हा संसार अनादि मोह । तुझ्या रूपीं नित्या रोह । हा निर्वाह निगमान्तीं ॥६२॥
ऐसा अज्ञानानुबंध । जेणें बांधिले विबुधबुध । तो तुज न वधी म्हणोनि विशुद्ध । रजतमध्वस्त तव धाम ॥६३॥
आम्ही अज्ञानमोहग्रस्त । यास्तव वास्तवबोधा अस्त । पदाभिमानें अव्यवस्थ । जालों भ्रांत जगदीशा ॥६४॥
जाणत जाणत तुझा महिमा । करूनि विषादें अविवेकअमा । अवगणूनि तव पदपद्मा । व्रजीं दुरात्मा क्षोभलों ॥६५॥
जो तूं परमात्मा चिन्मात्र । त्या तुज मानूनि मानवीगात्र । निंद्य दुरुक्तीचें पात्र । केलें स्ववक्त्र म्यां दुष्टें ॥६६॥
विश्वोत्पत्ति अवन प्रळय । ज्या तव कटाक्षमात्रें होय । त्या तुजसहित व्रजाचा क्षय । करूं निर्दय प्रवर्तलों ॥६७॥
इत्यादि अनेक अपराधकोटी । कृपासमुद्रें घालिजे पोटीं । प्रथम श्लोकीं हे प्रार्थूनि गोठीं । पुन्हा वाक्पटी स्तवीतसे ॥६८॥

कुतो नु तद्धेतव ईश तत्कृता लोभादयो येऽबुधलिंगभावाः ।
तथाऽपि दंडं भगवान्बिभर्ति धर्मस्य गुप्त्यै खलनिग्रहाय ॥५॥

इंद्र म्हणे जी प्रणवप्रसवा । विनति ऐकें वासुदेवा । अबुधचिह्नाचिया भावा । कैचा रिगावा तुजमाजि ॥६९॥
मुळीं अज्ञानचि जरी नाहीं । तत्कार्य देहसंबंध तो काई । दोहीं वाचूनि तद्भाव पाहीं । कोण्हे ठायीं उमटती ॥७०॥
कोण्या कारणास्तव हें म्हणसी । स्वामी ऐकें तरी येविशीं । अज्ञान कार्यकारणेंशीं । करी जयांसी निबद्ध ॥७१॥
मूळ अज्ञान तें कारण । तत्कार्य देहादि प्रपंच जाण । तदभिमानें आविष्करण । संबंध जाण या नांवें ॥७२॥
पुनःपुनः देहप्रभव । त्याचे हेतु लोभादि सर्व । तद्वर्जित तूं वासुदेव । परम तत्त्व परमात्मा ॥७३॥
तरी तूं म्हणसी ज्ञानियांपाशीं । स्थिति देखिजे लोभादिकांसी । तरी हें न घडे जी हृषीकेशी । मूर्खापाशीं ते वसती ॥७४॥
अबुध म्हणिजे ज्ञानेतर । आत्मविषयीं जे अचतुर । ज्यांसि प्रियतम हा संसार । दुःखागार सुख भासे ॥७५॥
तयांचिपाशीं हेतुत्रय । कामक्रोधलोभमय । अबुधलिंगसमुच्चय । नांदती विषयरोचक ॥७६॥
हें नांदतां अभ्यंतरीं । स्वहितवार्ता कवण करी । मोक्षलक्ष्मीपासूनि दुरी । बळें संसारीं बुडविती ॥७७॥
क्रोध म्हणिजे अपूर्ण काम । कामु पुरतां उपजे प्रेम । लोभ ऐसें त्याचेंच नाम । अभिलाष अधम त्रिविध हा ॥७८॥
मुख्य एकचि अभिलाष । पूर्णापूर्ण रागद्वेष । होऊनि उपजविती आवेश । जन्म अशेष मग देती ॥७९॥
रजःसत्त्वांची जे प्रचुरता । स्वर्गकामना उपजवी चित्ता । ते संपादवी मखसुकृता । निष्कामता विसरवी ॥८०॥
मग ते मीमांसक ज्ञानी । स्वर्गैश्वर्य संपादूनी । योग्य होती अधःपतनीं । अबुध म्हणोनि हे दशा ॥८१॥
रजस्तमांची जे प्रचुरता । दीर्घद्वेष उपजवी चित्ता । नेऊनि घाली अधःपाता । दुःखावर्तामाजिवडें ॥८२॥
स्वर्गीं नरकीं मृत्युलोकीं । एवं भ्रमिजे सकामुकीं । ऐसे अबुध जे अविवेकी । आत्मवोळखी अंतरती ॥८३॥
वेदत्रयीचे पाठक । जे विध्युक्त कृतविवेक । रागद्वेषसकामुक । ऐसे मूर्ख विचंबती ॥८४॥
ऐसी वेदज्ञांची गति । तेथ इतर प्राकृत अल्पमति । वृथा चातुर्य मिरविती । कामें ठकिजती सर्वत्र ॥८५॥
म्हणोनि अबुधलिंगभाव । लोभादि जे संकल्पप्रभव । ज्यांचे अंतरीं यांसि ठाव । त्यांए वाव ज्ञातृत्व ॥८६॥
यालागीं रागद्वेषरहीत । निष्काम जे अभेदभक्त । तयांसि सुलभ तव एकांत । वृथा परमार्थ अबुधांचा ॥८७॥
जन्ममरणांचीं कारणें । तीं हीं कथिलीं अबुधचिन्हें । येथ शंका नारायणें । सहसा मनें न करावी ॥८८॥
मजमाजि नसता लोभासि ठाव । तरी कां भंगितों तुझा गर्व । तो येथींचा अभिप्राव । परिसें अपूर्ण परेशा ॥८९॥
रागद्वेषादिअभिलाषशुन्य । जर्‍ही तूं परेश श्रीभगवान । तथापि करिसी दंडधारण । साधुअवन खलदमना ॥९०॥
म्हणसी मी जरी गोपसंतति । दंडधारणीं कैंची शक्ति । कोण दंड कवणाप्रति । माझ्या हातीं किमर्थ ॥९१॥
काय दंडासि कारण । म्यां दंडिले केव्हां कोण । ऐसें स्वामी सहसा न म्हण । तूं सर्वज्ञ कृपाळु ॥९२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP