मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १९ वा| श्लोक १ ते ५ अध्याय १९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ५ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ अध्याय १९ वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर क्रीडासक्तेषु गोपेषु तद्गावो दूरचारिणीः । स्वैरं चरंत्यो विविशुस्तृणलोभेन गह्वरम् ॥१॥शुक म्हणे गा उत्तरातनया । रामें प्रलंब मारिलिया । व्रजीं अद्भुत ऐकोनियां । परमाश्चर्य मानिती ॥२६॥पुन्हा कोणे एके दिवशीं । गोधनें गोपाळ रामकृष्णाशीं । जाते झाले काननासी । उत्साहेंशीं क्रीडत ॥२७॥कोणी म्हणती प्रलंबहनना । उपरी तेचि दिवशीं गोधना । चारितां वरपडलीं अडराना । त्या कारणा अवधारीं ॥२८॥अलौकिक कृष्णखेळ । देखोनि गुंतले गोपबाळ । न करितां धेनूंचा सांभाळ । झाले केवळ क्रीडासक्त ॥२९॥त्यांच्या मोकाट गाई रानीं । दुरी संचरल्या आडरानीं । कोमळ तृणातें भुलोनी । गह्वरवनीं प्रवेशल्या ॥३०॥अजा गावो महिष्यश्च निर्विशंत्यो वनाद्वनम् । ईशीकाटवीं निर्विविशुः क्रंदंत्यो दावतर्षिताः ॥२॥शेळ्या मेंढ्या गाई महिषी । सांडूनि भांडीरकाननासी । वनांतरीं प्रवेशासी । करित्या झाल्या सैराट ॥३१॥ईषीका म्हणिजे दर्भ विशेष । जेथ सजळ भूप्रदेश । तेथ पावोनि अभिवृद्धीस । अग्रीं सरस लसलसिती ॥३२॥उष्णें वाळोनि गेलें तळीं । कणसें उधळती व्योमां धवळीं । मुंजावनें ग्रीष्मकाळीं । विरसें मोकळीं कडकडित ॥३३॥श्वापदाकुळ महाघोर । नाहीं पश्वादिसंचार । ईषीका वाढली अपार । तेथ धेनु सत्वर रिघाल्या ॥३४॥द्विगुणी त्रिगुणी धेनूहून । सरळ वाढलें लंबायमान । मुंजाटवीं ईषीकातृण । धेनु मग्न त्यामाजीं ॥३५॥सरळ वाढली सर्व ईषीका । कोमळ आडव्या फुटल्या शाका । त्यांच्या स्वादें धेन्वादिकां । हांव अधिका प्रवेशीं ॥३६॥स्वादा भुलोनि ईषीकारण्यीं । भरतां ग्रीष्मीं तापल्या किरणीं । मार्ग नुमजे न मिळे पाणी । आक्रंदोनि तळमळिती ॥३७॥तंव ते वनीं दावानळ । शुष्कतृणें पेटला प्रबळ । तयावरील तीव्रानिळ । झोंबतां तळमळ धेनूंसी ॥३८॥वायुवेगें वणवा धांवे । धेनूपर्यंत पावे न पवे । तंव येरीकडे गोप आघवे । पाहती थवे धेनूंचे ॥३९॥तेऽपश्यंतः पशून् गोपाः कृष्णरामादयस्तदा । जातानुतापा न विदुर्विचिन्वंतो गवां गतिम् ॥३॥दचकोनि म्हणती एक गडी । खेळां गुंतलीं पोरें वेडीं । गाई भरल्या अरडी दरडी । धांवा तांतडीं हुडकारे ॥४०॥हें ऐकोनि समस्त । झाले पश्चात्तापवंत । म्हणती खेळीं गुंतलों भ्रांत । धेनु वनांत विखुरल्या ॥४१॥धेनु पाहती भंवतें रान । त्याचि सरिसे रामकृष्ण । स्वयें असोनि सर्वज्ञ । नेण होऊन वर्तती ॥४२॥एक चढती टेंकावरी । एक वळघले उच्च शिखरीं । एक वेंधूनि तरूवरी । धेनु दुरी न्याहाळिती ॥४३॥एक धांवती गिरिकंदरीं । एक पाहती पूर्व अखरीं । एक धांवले गांवखरीं । यमुनातीरीं जलाशयीं ॥४४॥तंव रामकृष्णादि बुद्धिमंत । विचाराची कथिती मात । धेनु चरल्या फिरल्या जेथ । ते पदवी घेत चलारे ॥४५॥मग ते धेनूंचे मागोवे । घेत चालिले गोप आघवे । कुकारे घालिती घेऊनि नांवें । दीर्घरवेप्लुतमानें ॥४६॥तृणैत्सत्खुरदच्छिनैर्गोष्पदैरंकितैर्गवाम् । मार्गमन्वगमन् सर्वे नष्टाजीव्या विचेतसः ॥४॥धेनुकळपाच्या दळवाढें । खुरीं तुडविलिया चेंपडें । दातीं तृणें केलीं खुरटें । पाहोनि वाटे धांवती ॥४७॥कोणें वितृण भूमिभाग । तेथ उमटले पाहती माग । तेणें पंथें करूनि लाग । अतिसवेग धांवती ॥४८॥म्हणती जित्रबें गोधनें गेलीं । तेव्हां जीविकाचि राहिली । मरणावांचूनि कुटुंबें मेलीं । हे चिंता जाकळी गोपाळां ॥४९॥मुंजाटव्यां भ्रष्टमार्गं क्रंदमानं स्वगोधनम् । संप्रपय तृषिताः श्रांतास्ततस्ते संन्यवर्तयन् ॥५॥ऐसे सचिंत गोपाळ । धेनुमार्गें उतावीळ । हुडकितां कडतर ग्रीष्मकाळ । तेणें सकळ संतप्त ॥५०॥हृदयीं चिंतेची आहळणी । बाह्य तापले भवार्ककिरणीं । धांवत श्रांत सर्वां करणीं । इच्छिती पाणी सुखाचें ॥५१॥तंव तें नाडळे विषयवनीं । मनें गुंतलीं गोगोधनीं । कृष्ण त्यांमाजीं असोनी । कूटस्थपणीं त्यांसरिसा ॥५२॥आत्मप्राप्तीचा भ्रष्ट मार्ग । साधन गोधनाचा वर्ग । मुंजारण्यामाजीं साङ्ग । क्रंदतां दीर्घ परिसती ॥५३॥भ्रष्टमारें महा अडचणी । गोधनें शिरकलीं मुंजारण्यीं । आक्रंदतां दीर्घ ध्वनीं । ऐकतीं कर्णीं गोपाळ ॥५४॥ऐकोनि गाईंचा करुणास्वव्र । समीप धांवले सत्वर । परंतु मुरडावया नव्हे धीर । उष्णें तीव्र पोळले ॥५५॥तृषें जाऊं पाहती प्राण । गोधनें वळावयालागून । नोहे गडियां आंगवण । जाणूनि कृष्ण कळवळिला ॥५६॥ N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP