अध्याय १५ वा - श्लोक १८ ते २३
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
अन्ये तदनुरूपाणी मनोज्ञानि महात्मनः । गायंति स्म महाराज स्नेहक्लिन्नधियः शनैः ॥१८॥
एक नारदतुंबरां परी । गायन करिती सप्तस्वरीं । जेणें कृष्णाचें अंतरीं । आनंदलहरी हेलावे ॥६२॥
श्रीकृष्णासि मनोरमें । तैसीं पद्यें गाती प्रेमें । जेंवि सनकादिक बृहत्सामें । परम रम्यें पढताती ॥६३॥
चंगमोहरीवेणुस्वर । धरूनि एक होती सादर । एक सुमनांचे संभार । जैसे सुरवर वर्षती ॥६४॥
एक अर्पिती शीतळ जळें । एक अर्पिती सुपक्क फळें । चित्तें कृष्णस्नेहाकुलें । प्रेमसोफाळे भोगिती ॥१६५॥
एवं निगूढात्मगतिः स्वमायया गोपात्मजत्वं चरितैर्विडंबयन् ।
रेमे रमालालितपादपल्लवो ग्राम्यैः समं ग्राम्यवदीशचेष्टितः ॥१९॥
ऐसें स्वमायें करून । आपुलें ऐश्वर्य लोपवून । संपादी जरी गोवळपण । तरी श्रीचिन्ह न झांके ॥६६॥
ईश्वरपदवीची संपत्ति । गूढ करूनि गोपाकृति । संपादितां श्रीपति । प्रकट दिसती ऐश्वर्यें ॥६७॥
कुमुदगर्भाहूनि मृदुल । कमळेचें उरोजयुगळ । तेणें मर्दितां चरणकमळ । मन व्याकुळ क्षतभयें ॥६८॥
ऐशिया सुकुमारपदीं रान । फिरे घेऊनि गोवळपण । गोवळचेष्टांचें अनुकरण । दावी श्रीकृष्ण क्रीडोनी ॥६९॥
ग्राम्य जैसे विषयी जन । क्रीडे होऊनि त्यां समान । तरी प्रकटे ईश्वरपण । गुणपरिपूर्णप्रतापें ॥१७०॥
तेचि हे ऐश्वर्याची लीला । ऐकें परीक्षिति नृपाळा । श्रवणमात्रें जें कलिमला । जाळी अनळा समसाम्य ॥७१॥
श्रीदामा नाम गोपालो रामकेशवयोः सखा । सुबलस्तोककृष्णाद्या गोपाः प्रेम्णेदमब्रुवन् ॥२०॥
ऐसें क्रीडतां वृंदावनीं । गोप सुबळ चक्रपाणि । तंव श्रीदामा नाम गोपाग्रणी । सांगे येऊनि रहस्य ॥७२॥
रामकृष्णांचा प्राणसखा । सुबळस्तोक कृष्णप्रमुखां । बोलतां झाला संमत वाक्या । नरनायक कां तें ऐकें ॥७३॥
राम राम महाबाहो कृष्ण दुष्टनिबर्हण । इतोऽविदूरे सुमहद्वनं तालालिसंकुलम् ॥२१॥
महादेर्घपराक्रमा । महाबाहो श्रीबळरामा । दुष्टदैत्यदर्पोपशमा । पुरुषोत्तमा श्रीकृष्णा ॥७४॥
एथूनि दूर स्वल्प कांहीं । रम्य तालवन असे पाहीं । तालपंक्तींकरूनि मही । व्याप्त सर्वही वनगर्भी ॥१७५॥
वज्रसदामस्तांची थाटी । वनाभोंवतीं एकी दाटी । तालांवीण वनापोटीं । दुजी गोठी असेना ॥७६॥
फलानि तत्र भूरीणि पतंति पतितानि च । संति किंत्ववरुद्धानि धेनुकेन दुरात्मना ॥२२॥
तये वनीं तालफळें । पक्कें मघमघिती परिमळें । अपार पडतीं मंदानिळें । पडलीं भूतळीं पसरलीं ॥७७॥
नर वानर कां अन्य प्राणी । धेनुकासुरा भेणें कोणी । प्रवेशों न शकती तये वनीं । सुगंध घ्रानीं भरतांही ॥७८॥
दुष्ट दुरात्मा धेनुक । तेणें स्वजातीचें कटक । मिळवूनियां केलें अटक । वन निष्टंक दुर्गम ॥७९॥
सोऽतिवीर्योऽसुरो राम हे कृष्ण स्वररूपधृक् । आत्मतुल्यबलैरन्यैर्ज्ञातिभिर्बहुभिर्वृतः ॥२३॥
श्रीदामा म्हणे जी रामकृष्णा । अतिवीर्य तो असुरराणा । रामभरूपें वसवी वना । न धरी गणना कोणाची ॥१८०॥
बलवीर्य कां विक्रमशक्ति । आपणा तुल्य अपार ज्ञाति । मांदी मिळवूनियां भंवतीं । वनीं वसति करीतसे ॥८१॥
N/A
References : N/A
Last Updated : April 29, 2017
TOP