श्रीशुक उवाच - नन्दस्त्वात्मज उत्पन्ने जाताह्लादो महामनाः ।
आहूय विप्रान्दैवज्ञान् स्नातः शुचिरलंकृतः ॥१॥

प्रसूति यशोदेची सुखकर । नंदें ऐकोनि जन्मला पुत्र । श्रवणीं पडतां हें उत्तर । आल्हाद थोर पावला ॥४३॥
सुप्रसन्न अंतःकरण । यालागीं म्हणिजे महामन । हृदयीं कोंदला श्रीकृष्ण । हें कारण तयाचें ॥४४॥
झाला असतां पुत्रजन्म । काय तेथींचें विहित कर्म । तदुद्देशें द्विजोत्तम । ससंभ्रम पाचारी ॥४५॥
ज्योतिर्वेदविदांप्रति । पाचारूनि शीघ्रगतीं । तैशाच तपोधनांच्या पंक्ति । सप्रेमभक्ति आणिल्या ॥४६॥
त्यांचिये आज्ञे प्रमाण । वैश्यविधानें केलें स्नान । शुचिष्मंत सुप्रसन्न । अलंकरणमंडित ॥४७॥

वाचयित्वा स्वस्त्ययनं जातकर्मात्मजस्य वै । कारयामास विधिवत्पितृदेवार्चनं तथा ॥२॥

सन्निध बैसवूनि द्विजगण । करविलें पुण्याहवाचन । नांदीश्राद्ध मातृकापूजन । यथाविधि संपादी ॥४८॥
स्वस्तिवाचन झालें पूर्ण । हिरण्यश्राद्ध नांदीविधान । रत्नपात्रीं मधु घेऊन । सुवर्ण घर्षून त्यामाजीं ॥४९॥
घर्षितसुवर्णमिश्रित मधु । सुवर्नशलाका घेऊनि नंदु । बाळका वानीं घालूनि बिंदु । परमानंदु पावला ॥५०॥
आत्मा पुत्रनाम तूं एथ । त्वं जीव शरदः शत । कर्णीं सांगोन हा मंत्रार्थ । मस्तक हुंगित त्रिवर ॥५१॥
तेव्हां धात्री छेदूनिया नाळ । यशोदेपाशीं ओपी बाळ । तिनें क्षालूनि स्तनमंडळ । लावी गोपाळ ते स्तनीं ॥५२॥
नांदीश्राद्धींच्या युग्माप्रति । वस्त्राभरणें शुद्धभक्ति । धेनुदक्षिणा सालंकृति । अर्पी व्रजपति सप्रेमें ॥५३॥
आत्मजाचें जातकर्म । नंद करवी अत्युत्तम । तेथील महोत्सव परम । अनुपम त्रिलोकीं ॥५४॥
जगज्जन्माचा जन्मकाळ । त्रिजगीं स्वानंदसुकाळ । जठरीं अवतरला गोपाळ । दैवें व्रजपाळ आथिला ॥५५॥

धेनूनां नियुते प्रादाद्विप्रेभ्यः समलंकृते । तिलाद्रीन्सप्त रत्नौषशातकौम्भाम्बरावृतान् ॥३॥

डिवरी लाथरी खोडकर । बुजट ओढाळ वृद्धतर । फुलली डोल कीं व्यंग आतुर । अनावर बावरी ॥५६॥
आपुल्या आपण दुग्धपाना । करिती धरिती चोरपान्हा । ऐशा धेनु अयोग्य दाना । वत्सहीना अप्रसूता ॥५७॥
ऐशियांचें दान देतां । क्लेश पावे प्रतिग्रहकर्त्ता । दाता पावे अधःपाता । हें सुकृता नाशक ॥५८॥
चौघां विप्रां एक धेनु । दिधल्या ते घेती वांटून । दान किंवा धेनुहनन । श्रोते सर्वज्ञ हें विवरा ॥५९॥
असो ऐशीं दानी दूषणें । त्यागार्थ आधीं निरूपणें । आतां ऐका पुण्यवर्धन । नंद गोदान जें करी ॥६०॥
शुद्धसत्वें देहाकृति सर्वी एकचि रूप । तैसा परमात्मा सकृप । व्रजीं कुलदीप अवतरला ॥६१॥
शुद्धसत्त्वें देहाकृति । धरिल्या गोकुळींच्या सर्व व्यक्ति । प्रकट होतांची श्रीपति । सद्गुणपंक्ति बिंबल्या ॥६२॥
वृद्धा गायी झालिया तरुणा । कामधेनूसमान पान्हा । डिवर्‍या लाथर्‍या दुर्गुणा । झाल्या सगुणा सुरसुरभि ॥६३॥
ऐशा सवत्सा दोन लक्ष । धेनु आणोनि प्रत्यक्ष । पुत्रकल्याणसापेक्ष । परमदक्ष व्रजपति ॥६४॥
पृष्ठी झांकूनि क्षौमांबरीं । सुवर्णशृंगी रौप्यखुरी । कांसदोहा सालंकारी । हेमपात्रीं नैवेद्य ॥६५॥
कंथाभरणी घंटायुक्त । गंधपुष्पाक्षतार्चित । धूपदीपीं धेनु समस्त । यथोचित पूजिल्या ॥६६॥
तैसेचि सालंकृत ब्राह्मण । यथाविधि अभ्यर्चून । नामगोत्रोच्चारीं दान । करी सर्वज्ञ व्रजपति ॥६७॥
आणि तिळांचे सप्त पर्वत । कनकांबरीं वेष्टित । रत्नराशिगर्भित । द्विजां देत व्रजपाळ ॥६८॥

कालेन स्नानशौचाभ्यां संस्कारैस्तपसेज्यया । शुध्यन्ति दानैः संतुष्ठ्या द्रव्याण्यात्मात्मविद्यया ॥४॥

शुक म्हणे गा अभिमन्युतनया । विचित्रसंस्कारप्रक्रिया । गोभूहेमादिद्रव्या ययां । शोधनक्रिया परियेसीं ॥६९॥
भूम्यादिकां काळें शुद्धि । स्नानें देहादिकां विशुद्धि । अमेध्यलिप्तां शोधनविधि । शौचें त्रिशुद्धि बोलिली ॥७०॥
तपें शुद्ध इंद्रियगण । यज्ञानुष्ठानें ब्राह्मण । द्रव्यें शुद्धें दानेंकरून । विशुद्ध मन संतोषें ॥७१॥
जीवदशेचें शोधन । अध्यात्मविद्यापरिशीलन । जहदजहल्लाक्षणेंकरून । शुद्धचैतन्य समरसे ॥७२॥
जातकर्मादि संस्कार । गर्भादिकां शुद्धिकर । इत्यादि दृष्टांतांचें सार । तो ऐक साचार दार्ष्टांत ॥७३॥
दानपूर्वक जातकर्म । नंद संपादी अत्युत्तम । पुत्रकल्याणश्रेयस्काम । गर्भ प्रथम संस्कारी ॥७४॥
उदारमानस उदारकीर्त्ति । हर्षोत्कर्ष भरला चित्तीं । तया वदान्यदानाप्रति । पात्रसंपत्ति अवधारा ॥७५॥

सौमङ्गल्यगिरो विप्राः सूतमागधबन्दिनः । गायकाश्च जगुनेंदुर्भेर्य्यो दुन्दुभयो मुहुः ॥५॥

विप्रवर्य दानपात्र । अन्य विद्योपजीवी मात्र । सूत मागध वादित्र । बंदी सर्वत्र गायक ॥७६॥
सुमंगल विप्रवाणी । स्वस्तिवाचनीं कल्याणीं । आशीर्वादाचिया श्रेणी । सूक्तपठणीं वर्षती ॥७७॥
सूत म्हणजे पौराणिक । मागध वंशावलिशंसक । बंदी म्हणजे स्तोत्रपाठक । सद्विवेक शुद्धमति ॥७८॥
पुराणोक्त आशीर्वाद । सूत ओपिती अमळ विशद । वंश प्रशंसिती मागध । पदप्रबंधगद्यपद्यें ॥७९॥
बंदीजन प्रस्तावक । अमळ प्रज्ञावादविवेक । तत्प्रसंगोचित अनेक । पद्यें श्लोक पढताती ॥८०॥
गायक गाती पंचमस्वरीं । शक्रसभे जेंवि अप्सरी । तैशा नर्त्तती नृत्यकारी । कुशल चतुरी चपलांगीं ॥८१॥
सप्त स्वरांचे आलप । सप्ततालें करांघ्रिक्षेप । तांडवलास्यें आणिती रूप । नट नाट्यादि संगीता ॥८२॥
हावभाव कला मूर्च्छना । गतिगमकें कौतुकें नाना । तौर्यत्रिक दाविती खुणा । नेत्रसूचना भ्रूभंगें ॥८३॥
भेरी गर्जती दीर्घस्वनीं । घाव घातला निशाणीं । दुंदुभिघोषें निर्जरभुवनीं । हरिजन्मकहाणी कथियेली ॥८४॥
वेदध्वनींच्या अवसानीं । मध्यें मध्यें वाद्यध्वनि । मंगलदीप सुवासिनी । ते ते क्षणीं उजळिती ॥८५॥
पुत्रोत्सवाचा मंगलध्वनि । गर्जतां नंदाचिये भुवनीं । गोकुलामाजीं अलंकरणीं । सर्वां सदनीं उत्साह ॥८६॥
हर्ष कोंदाटे मानसीं । तेणें प्रफुल्लता इंद्रियांसी । तेवीं नंदात्मज कैवल्यराशि । होतां व्रजासि आल्हाद ॥८७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP