दासोपंत चरित्र - पदे ५१ ते ७५

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


ज्याचे स्मरणे भवभय उडे । ज्याचे स्मरणमात्रे कैवल्य जोडे । ज्याचे स्मरणे सहजानंद घडे । हे काय बापुडें यालागी ? ॥५१॥ आपण न करिता अनमान । प्रयाण करावें देशालागून । द्रव्यही देईल तोचि जाण । भेटही सत्वर घडेल ॥५२॥ ऐशी ऐकोनि पुत्रवचनोक्ति । निघता झाला सत्वरगती । ह्रदयीं आठवूनि अवधूतमूर्ति । येऊन पोंहचला स्वदेशा ॥५३॥ त्यांनी देशास गेल्यानंतर । काय वर्तला समाचार । तेंही ऐकावें अत्यादर । श्रोते तुम्ही दयाळू ॥५४॥ बेदरसमीप असतां नृसिंहक्षेत्र । झरणीनृसिंह हें नाम निर्धार । तेथे येत असावें साचार । बाळ स्नानासि प्रतिदिनी ॥५५॥ तेथिंचा एक रुपया रोज । याचे भोजनाचे काज । पादशा नेमिलासे सहज । परी याचेनि मते काय ? ॥५६॥ नित्य स्नानमात्र करुन । तो रुपया द्यावा ब्राह्मणांकारणे । आपण करावें उपोषण । ह्र्दयीं ध्यातां दत्तमूर्ति ॥५७॥ तें ध्यानच अमृतपान । त्यांनी करीत होते अनुदिन । तेणेयोगे दैदीप्यमान । बाल दिसतसे सर्वासि ॥५८॥ तेथील संपूर्ण नारी, नर । पाहूनि बाल सुकुमार । बोलताति नाना प्रकार । कळवळेसी त्या काळीं. ॥५९॥ कोणी म्हणती, ` हा लक्षणसंपन्न; ' । कोणी म्हणती, ` मदनमोहन; ' । कोणी म्हणती, ` धन्य याची जननी जाण ! । ऐसा पुत्र प्रसवली. ' ॥६०॥ ब्राह्मण म्हणती, ` हा नव्हे बाळ; । हें बाळाचे लक्षण नव्हे केवळ; । हा योगभ्रष्ट असे अचळ । आम्हां काही कळेना. ॥६१॥ जें द्रव्य मिळतें आपणा । तें देतसे ब्राह्मणां । आपणा जेवितो किंवा उपोषणा । राहतों कांही कळेना ॥६२॥ बाप गेलासे सोडून यासि । त्याची चिंता नसेच मानसी । हा तो केवळ तेजोराशी । यासि रक्षो श्रीहरि ॥६३॥ येथील यवनास नसे संतान । तो पुत्र करु इच्छितो निजअंत:करण । तरि रक्षो यास उमामरण । कलासपति श्रीशंकर ॥६४॥ कोणी म्हणती आराध्यदैवत । या बाळास रक्षेल निश्चित । तेणेयोगें हा मुक्त । होईल सत्य जाणावा ॥६५॥ यापरी त्रिविध लोक । बोलती एकमेक । परि त्याचे मनीं देख । कांहीच चिंता नसेचि ॥६६॥ परि तो पादशा मोजीतसे दिन । केव्हां मास होईल पुर्ण ? । केव्हा स्थापूं राजसिंहासन । या बाळासे स्वानंदे ? ॥६७॥ त्याचे इकडे मातापिता । पुत्रास्तव करिती चिंता । द्रव्याची खटपट न होतां । उद्विग्न फार राहतसे ॥६८॥ असो यापरी लोटत लोटत । मासास आले दिवस भरत । बापाकडील द्रव्य न येतां निश्चित । बाळ काय करी तेधवा ? ॥६९॥ मनी म्हणतसे माझे जन्म । ब्रह्मकुळी झाले सुगम । यायोगें परम संभ्रम । मानीत फार होतों कीं ॥७०॥ चौर्‍यांयशी लक्ष जाण । दुर्लभ कां नरदेह पूर्ण । त्याहीमाजी कुळी ब्राह्मण । येणे दुर्लभ असे कीं ॥७१॥ आतां पुढे माझी गति । काय होते निश्चिती ? । शरण जाऊं कोणप्रती ? । ब्रह्मत्व कोण राखेल ? ॥७२॥ मास तो चालिला भरत भरत । आम्हांस कैचे द्रव्य प्राप्त ? । कैसा होईन मी मुक्त ? । कर्ता भेटेल कोण ? ॥७३॥ यापरी चिंता करितां चित्ती । मासाची झाली समाप्ति । ते दिवशी प्रात:काळी बाळप्रति । बोले काय तो यवन ? ॥७४॥ आज संध्याकाळपर्यंत । वाट पाहणे निश्चित; । द्रव्य आलिय तूते । पाठवीन सत्य पित्याकडे ॥७५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP