प्रवेश पहिला

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


[ स्थळ : रेल्वे स्टेशन. आवार पुष्कळ मोठे आहे. वेळ रात्रीची असून दिवे बेताचेच लावलेले आहेत. वेटिंगरुममधून अस्पष्टच का होईना पण माणसांचा गोंगाट ऐकू येत आहे. इंजिनमध्ये अडकून बसलेल्या वाफेचे कर्कश ओरडणे, किंकाळ्या व मधूनमधून हातपाय आपटणे चाललेच आहे. प्लॅटफॉर्मवर काही माणसे इकडून तिकडे फिरत आहेत. तेथेच एका बाकावर शंकरराव व दुसरे एक गृहस्थ बोलत बसले आहेत. ]

शंकरराव : कोठून आलो ?
गृहस्थ : हो, आपण कोठून आला आहात ?
शंकरराव : कोठून बरे ? - आता इतक्यात आलो, पण -
गृहस्थ : काय आठवत नाही ? चमत्कारच आहे !
शंकरराव : कोठून तरी आलो हे खास ! पण - मला वाटते मी गावातूनच - हो, गावातूनच म्हणायचा.
गृहस्थ : अस्से !
शंकरराव : पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर गाडी आली वाटते ?
गृहस्थ : हो, पण ती काही आपली नाही.
शंकरराव : आपली कशाची आता येते !
गृहस्थ : म्हणजे ?
शंकरराव : अहो, गाडी यायची असेल ! पण आपल्याला जायचे आहे ! यांच्यासारखे आपण काही यायचे - म्हणजे आलो नाहीत !
गृहस्थ : वा ! पण आपण कोठे तरी यायचे आहोतच की नाही ? अहो, येथले जाणे म्हणजे दुसरीकडे कोठेतरी ....
शंकरराव : हं ! हं ! अहो दुसरीकडे असेल, पण पुन्हा येथे तर नाही !
गृहस्थ : का ? लागेल तितके पुन्हा परत येतात !
शंकरराव : अरे वा ! तुम्ही तर अगदी... पण रोजचे चालले आहे ! कधी म्हणून खळ नाही ! जाणार्‍या आणि येणार्‍या दोन्ही आपल्या नेहमी भरलेल्या असतात. काय गर्दी ही !
गृहस्थ : हे चालायचेच. अरे ! ही काय आपली गाडी आली की काय ?
शंकरराव : छे ! छे ! ही तरी मालगाडी आहे !
गृहस्थ : का ? तिचा इतका तिरस्कार !
शंकरराव : नाही ! तसं नाही !
गृहस्थ : अहो, जशा माणसांच्या गाड्या तशाच त्यांच्या मालगाड्याही ! त्याही जायलायायला पाहिजेतच ! त्याशिवाय कसे होईल.
शंकरराव : अबब ! किती तरी लांब ही ! आपल्या गाडीच्या मानाने ही चौपट आहे की !
गृहस्थ : साहजिकच आहे. माणूस येवढासा असतो, पण त्याला लागणारे जग आणि त्यांनी केलेले काम, ही केवढी ... हं, घंटा झाली... उठा गाडी आली !
शंकरराव : काय आली गाडी ? चला, चला !
( धावत धावत पुढे जातो )
अरे, पण मी येथे रुळावर कसा ? काय गाडी माझ्या अंगावरच ! केवढे हे इंजिन ! ... अरे वा - !
( अंधार )

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP