अंक तिसरा - प्रवेश १ ला

नाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.


( मैत्रेय निजलेला असून जवळ समई जळत आहे ; इतक्यांत शर्विलक नांवाचा चोर , हातांत पहारा , सुरी , कीटक इत्यादि साहित्य घेऊन प्रवेश करतो. )
शर्वि० : चोरगुरु जो भगवान् कार्तिकेय त्याच्या वचनाप्रमाणे या पक्क्या विटांच्या भिंतीला पूर्णकुंभ नावाचे छिद्र पाडून आंत तर आलो. ( पाहून ) अरे , येथे कोणी निजले आहे ? काय येथे मृदंग , पखवाज, वीणा , सतार इत्यादि नुसतीं वाद्येच दिसत आहेत ! तर मग हा नाटकी रे नाटकी ! बडा घर आणि पोकळ वासा ! येथे काही लाभ्यांश दिसत नाही. असो. आतां जावें .
मैत्रे० : ( झोपेत बरळतो. ) अरे मित्रा, भिंतीला भोके पाडल्यासारखं दिसतें
चोर आला आहे वाटतें . तर हे दागिने तूं आपल्या जवळ घे.
शर्वि० : अरें , हा जागा आहे काय ? मारु का याला ठार ? पण नको बरें . पण हे ह्या फाटक्या पंच्यात काही झळकतें आहे. हे बहूतकरुन सोन्याचे दागिने असावेत. घेऊ का हे ?
मैत्रे० : अरे मित्रा, तुला गाईब्राह्मणाचीं शपथ आहे. घे हे लौकर.
शर्वि० : ( मनांत ) गाईब्राह्मणाची शपथ कोणी मोडू नयें . ( घेऊं लागतो. )
अरें, पण हा दिवा जळत आहे. ( स्मरल्यासारखे करुन ) मज जवळ हा अग्निकीटक आहे,याला सोडून देतो. ( तसें करितो. ) वा याने दिवा
मालविला. ( गाठोडी घ्यावयास हात पुढे करतो. )
मैत्रे० : मित्रां, तुझ्या हातांची बोटें गार का लागतात ?
शर्वि० : ( चपापून ) कवाडावर पाणी शिंपडल्यामुळे माझी बोटे गार झाली आहेत ; असो. काखेंत घालून ऊब आणतों. ( असे करुन गांठोडी घेतो. )
मैत्रे० : घेतलीस ना ?
शर्वि० : ( हळूच ) ब्राह्मणाची प्रार्थना कशी मोडावी  , म्हणून घेतली बर.
मैत्रे० : आतां मी निश्चिंत झालो ; आतां सुखाने निद्रा येईल.
शर्वि० : महाब्राह्मणा, आतां शंभर वर्षे निजून रहा !  ( जातो. )
( घाबर्‍या घाबर्‍या रदनिका प्रवेश करिते. )
रद० : वर्धमानका , अरे वर्धमानका , मैत्रेया , अहो मैत्रेयाभटजी , उठा धांवा लवकर . हा पहा, घरांत चोर शिरला होता. तो भिंतीला भोंक पाडून पळून चालला आहे. धांवा , धांवा लवकर !
मैत्रे० : अं , काय म्हणतेस ? चोर ? आमच्या घरांत चोर यायला तो
खुळाच असेल !
रद० : आतां काय करावें ? हा पहा पळून गेला.
मैत्रे० : ( उठून पाहून ) खरें ग खरें . अबबब ! बटकीचें पोरी, केवढें भोकें हें ! दुसरे दारच उघडले आहे कीं काय असे वाटते ! अरे मित्रा चारुदत्ता, निजलास काय उठ. आपल्या घरांत चोर शिरला होता , तो भिंतीला भोंक पाडून पळून गेला.
चारु० : बरें जाऊं दे गेला तर ; थट्टा करतोस वाटते माझी ?
मैत्रे० : अरे थट्टा नव्हें , हें पहा प्रत्यक्ष .
चारु० : कोणत्या ठिकाणी रे भोकें पाडिलें  आहे.
मैत्रे० : हे पहा आपल्या उशागतच्या भिंतीला.
चारु० : ( पाहून ) वाहवा ! हा भोसका तरी किती डौलदार पाडला आहे ! अशा कामांतसुध्दां इतकी कुशलता असते तर ! मोठेच आश्चर्य हें !
मैत्रे० : मित्रा, मला असे वाटतें की , हा भोसका कोणी तरी परगावच्या चोराने पाडला असावा अथवा नव्या चोराने तरी पाडला असावा ; कारण आमच्या घरांत वैभव किती आहे हें या उज्जयिनी नगरांतल्या प्रत्येकाला माहित आहे.
चारु० : तूं म्हणतोस तें खरें ; हा कोणी तरी नवशिक्या असावा. परंतू मित्रा -
साकी
धनलोभानें शिरला पाहूनि भव्य सदन थोराचें ॥
परि फसला तों दैवचि खोटें वाटे त्या चोराचें ॥
माझी अपकिर्ति ॥ लोकीं होईल आतां ती ॥१॥
मैत्रे० : अरे , त्या दुष्ट चोराकरितांदेखील इतका हळहळतोस ना ? हयानें  तर मनांत आणलें असेल कीं , हें थोरामोठयांचे घर आहे, यांत शिरुन सोन्याचे , जडावाचे दागिने चोरुन न्यावे -- ( चपापून ) अरे, माझ्यापाशीं वसंतसेनेचे दागिने होते ते कोठे आहेत ? ( स्मरण करुन ) का मित्रा , तूं जेव्हां तेव्हा म्हणत असतोस ना कीं , मैत्रेय अज्ञान , मैत्रेय अजागळ , पण या वेळेस कशी केली ! ती दागिन्यांची गांठोडी तुझ्या स्वाधीन केली म्हणून बरें झाले ; नाहीतर त्या रांडलेकानें नेली असती ना !
चारु० : मित्रा, पुरे आतां थट्टा ; नीट ठेवली आहेस ना ?
मैत्रे० : तूं मला मूर्खच ठरविलें आहेस ; तेव्हां थट्टा कोठे करावी आणि कशी
करावी हे मला काय माहीत ?
चारु० : मित्रा , खरेंच का माझ्या स्वाधीन केलीस ?
मैत्रे० : नाही नाही , खोटें सांगतो !
चारु० : केव्हां बरें माझ्या स्वाधीन केलीस ?
मैत्रे० : मी जेव्हां तुला म्हटलें , तुझ्या हातांची बोटें गार कां लागतात. तेव्हां
चारु० : असेल कदाचित् , तसेहि झाले असेल . ( इकडे तिकडे चाचपून व दागिने नाहित असे पाहून ) मित्रा, तुला एक मोठी आनंदाची गोष्ट सांगतो.
मैत्रे० : काय , आहेत ना दागिने ?
चारु० : अरे दागिने तर चोराने नेलेच --
मैत्रे० : मग आनंदाची गोष्ट ती कोणती ?
चारु० : हीच कीं , तो चोर आमच्या घरांतून कृतार्थ होऊन गेला .
मैत्रे० : अरे, पण ती दुसर्‍याची ठेव होती ना !
चारु० : अरे हो -- ती दुसर्‍याची ठेव नव्हे काय ? हर हर !
मैत्रे० : मित्रा , तूं घाबरुं नकोस . अरे , ती दुसर्‍याची ठेव तिसर्‍या चोराने
नेली , त्याला आम्हीं काय करावें ?
चारु० : छे - छे ! असे कसे होईल ? कारण -
पद -- ( चाल - राग तोडी , त्रिताल )
जन सारे मजला म्हणतिल कीं ॥धृ॥
दारिद्रयानें बहुतचि छळिलें ॥
धन त्याजवळी कांहि न उरलें ॥
म्हणूनि कर्म हें अनुचित केलें ॥
ऐसें दुषण देतिल कीं ॥१॥
मैत्रे० : असे म्हणतील तर लोक बेटे मूर्ख आहेत . आतां मी सांगतो असें कर. वसंतसेना दागिने मागायला आली , म्हणजे तिला बेलाशक सांग कीं तूं मजजवळ दागिने ठेविले नाहीस, मीं ठेऊन घेतले नाहीत , दिले कोणी , घेतले कोणी ,साक्ष कोण , आहे काय , समजलास का ?
चारु० : शिव शिव ! काय सांगतोस हें ? --
साकी
भिक्षा मागुनि दारोदारीं फेडिन ऋण गणिकेचें ॥
परि कीर्तीला कलंक येई ऐसें भाषण वाचे ॥
नच हा उच्चारीं ॥ भलता आग्रह तूं न करीं ॥१॥
रद० : ( प्रवेश करुन ) मैत्रेया , तुम्हांला धूताबाईनीं बोलाविले आहे ; चला लवकर . ( मैत्रेया जातो. )
चारु० : ( " जन सारे मजला " इ० पूर्वेक्त म्हणतो व काहीं वेळ थांबून ) मैत्रेयाला यायला उशीर कां लागला बरें ? हें चोरीचें वर्तमान धूतेला कळून तिनें काहीं भलतेसलतें तर केले नसेलना ? ( हांक मारतो. )
मैत्रे० : ( गडबडीनें ) आलों , आलों . ही घे बरें . ( रत्नमाला देतो. )
चारु० : मित्रा, हें काय ?
मैत्रे० : तू आपल्या स्वभावाला अनुरुप अशी स्त्री केलीस , त्याचें फळ हें !
चारु० : ( मला घेऊन दु:खानें ) मित्रा , माझ्या स्त्रीनें मला साह्य करावें असा
प्रसंग यावा ना !
पद -- ( चाल - कवणें तुज गांजियले. )
शिव शिव शिव निर्धनता आज ये खरी ॥
स्त्रीसम मी होय खचित नाहिं धन करीं ॥धृ०॥
- अथवा मी निर्धन नव्हें हेंच खरें ; कारण -
भार्या कुलशीलवती साह्य ती असे ॥
तुज ऐसा मित्र सदा सदनिं मम वसे ॥
असतें हें सौख्य काय निर्धना घरीं ? ॥१॥
-- तर मित्रा , माझ्या स्त्रीनें दिलेली ही रत्नमाला घेऊन असाच वसंतसेनेकडे जा आणि तिला माझा निरोप सांग कीं , तूं जे सुवर्णालंकार माझ्यापाशीं दिले होतेस ते माझेच असे समजून मीं द्युतात हरविले ; म्हणून त्यांच्या मोबदला ही रत्नमाला तुझ्याकडे पाठविली आहे. तर कृपा करुन हिचा स्वीकार कर.
मैत्रे० : मित्रा, हें काय भलतेंच करतोस ? अरे , तिचे अलंकार ते किती
मोलाचे आणि ही रत्नमाला कुणीकडे ! शिवाय या दागिन्यांचा तूं उपभोग घेतला नाहीस, काही नाही. त्याकरितां पृथ्वीच्या मोलाची रत्नमाला देतोस हें काय ?
चारु० : छे ! असें म्हणूं नकोस ; तिच्या अलंकारांकरितां मी ही रत्नमाला तिला देतों असें नाही तर तिनें जो माझ्यावर विश्वास ठेवला त्याची किंमत म्हणून देतों. तर एवढी घेऊन जा आणि तिच्याकडून ही घेवविल्याशिवाय आलास तर माझ्या गळ्याची शपथ आहे. तोपर्यत लोक दोष ठेवतील म्हणून वर्धमानकाकडून हें भोंक बुजवितों .
मैत्रे० : शपथ घातलीस म्हणून जातो ; पण - -
चारु० : पणबिण नको , जाच ; आणि तिच्याजवळ भाषण करितांना आपलें दैन्य मात्र दाखवूं नकोस .
मैत्रे० : बोलण्यांत नाहीं दाखवित. मी माझा मित्र चारुदत्त किती दरिद्री आहे , हें प्रत्यक्षच दाखवितों .
चारु० : भलतेंच --
साकी
भार्या वश मज मिळे मित्र सुखदु:खीं सम तुज ऐसा ॥
सत्याचा कधिं घडला नाहीं भंग मम करीं तैसा ॥
कैसा निर्धन मी ॥ मानितसें हें त्रय लक्ष्मी ॥१॥
( सर्व जातात. )

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP