अंक दुसरा - प्रवेश दुसरा

संशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणें मुक्कामीं केला.


स्थळ - रस्ता.

( अश्विनशेट व त्याचे मित्र वैशाखशेट येतात. )

वैशाख - हें तर सगळं तुमच्या मनाप्रमाणं झालं. मग चेहरा कां असा पडलेला ? छानदार वल्ली मिळाली आहे ! आतां तर असा खुलला पाहिजे कीं, ज्याचं नांव तें !
अश्विन - ( मनाशीं ) वल्ली मिळाली आहे, पण ती विषारी निघेलसा रंग दिसतो !
वैशाख - कां ? बोलत कां नाही ? कां मनातल्या मनांत आनंदाचे घुटके चालले आहेत आणि मला मात्र वरुन हें सोंग दाखवायचं. पण खरा आनंद मित्रापासून चोरुन ठेवण्यांत मौज नाहीं !
अश्विन - तुझ्यापासून आनंदाची गोष्ट चोरुन ठेवली, असं कधी झालं आहे ?
वैशाख - नाहीं. पण मग चेहरा कां असा, तें सांग !
अश्विन - काल रात्री सबंध जाग्रण झालं म्हणून असा दिसत असेल कदाचित् ; काल सत्यनारायण होता.
वैशाख - सत्यनारयण ? कुठं ? तिथं ? त्यांच्या घरीं ? द्या टाळी तर ! हा कशाबद्दल समजलास का ? मनोरथ पूर्ण झाले म्हणून ?
अश्विन - कुणाचे मनोरथ पूर्ण झाले असतील ते असोत.
वैशाख - कुणाचे म्हणजे दोघांचे, तुमचे आणि तिचे ! कां ?
आश्विन - आपले तर नाहींत बुवा; मग तिचे झाले असतील तर कुणाला ठाऊक !
वैशाख - ( मनाशीं ) हें काहीं निराळचं प्रकरण दिसतं आहे. ( उघड ) आश्विनशेट, थट्टा राहिली; खरं सांगा, काल काय झालं ?
आश्विन - सांगतो, पण ऐकल्यावर विनाकारण थट्टा नाहीं करायची. ऐक तर. काल सत्यनारायणाला रेवतीच्या घरी गेलों होतो, पण नेहमींचा आदरसत्कार किंवा अगत्य म्हणा, तेंसुध्दा दिसलं नाही. चारचौघे आले होते त्यांतलाच मी ! ते बसले होते त्यांतच मी बसलो होतो. ते उठून गेले, त्यांच्याबरोबर मी उठून घरीं आलों !
वैशाख - आणखी ?
आश्विन - अरे, प्रेमाची पट्टी नाहीं आणखी काय ? सरसकट बारा टक्के ! बाकींच्या पट्ट्या दिल्या त्यांतलीच मला एक, आणखीं ती देखील सुकलेली !
वैशाख - कालचा गडबडीचा दिवस होता, म्हणून जरा दुर्लक्ष झालं असेल इतकंच ? बरं, सत्यनारायण झाल्यानंतर गाणंबिणं होतं कीं काय कुणाचं ?
आश्विन - तेंच, नाहीं म्हणायला एकदां प्रसाद देतांना हळूच सांगितलंन् कीं, आज रात्रभर जलसा चालायचाय्. मर्जीप्रमाणं करायचं ! बस्स, याच्यापेक्षां दुसरा शब्द नाहीं तिच्या तोंडातून !
वैशाख - मग तिच्याकडे काय बरं चूक आहे ? तुमच्या मनांतून इतक्या मंडळींच्या देखत तिनं -
आश्विन - बस् - बस् , पुढें बोलूं नकोस ! तूं माझ्यावर घसरशील हें मी भविष्य केलंच होतं. बरं, जरा इथें उभा रहा. त्या सोनाराकडे आंगठी दिली आहे, ती घेऊन येतो. ( जातो. )
वैशाख - या गृहस्थाचा स्वभाव मोठा संशयी; नाहींतर किती उत्तम आहे स्नेहाला ! प्राणाला प्राण देईल. पण चंचल बुध्दीचा ! आतां याला मी चांगला वाटतों आहे पण घटकेनं वाटेनच याचा नेम नाही ! नसती कारणं काढून नेहमी संशयाच्या पाशांत अडकलेला असायचा ! ही एक तर्‍हा म्हणावी झालं; पण हे कोण येताहेत इकडे ? ( फाल्गुनराव तसबीर घेऊन येतो. )
फाल्गुन - खून करुन फरारी झालेला अनोळखी मनुष्यदेखील खुणेवांचून इतक्या अवधींत पकडून आणला असता, पण माझ्या हातांत या गृहस्थाची तसबीर असून हा मला सांपडत नाही, आश्वर्य आहे ! ही कोण आमच्या बंगल्याच्या आसपास घिरट्या घालणारा ? पाहूं कदाचित् चेहरा जमला तर ! ( पुढें येत येत ) पण काय बोलावं ह्यांच्याशीं ? ( उघड ) अहो ! मेहेरबानी करुन ( आंगठी काढून ) हा खडा काय किंमतीला घ्यावा, सांगा पाहूं ? ( आंगठी त्याच्या हातांत देतो. ) अजमासानं पण होईल तितकी नक्की किंमत सांगा !
वैशाख - ( आंगठी घेऊन ) मला कांहीं खड्यांची चागलीशी पारख नाहीं, पण पाहातों. या - खड्याची किं-म-त-
फाल्गुन - ( तसबिरीकडे व त्याच्याकडे पहात ) नाकं सारखीं दिसतात, पण भिवया - ( पाहूं लागतो. )
वैशाख - ही सराफ्यांतच घेतली काय ?
फाल्गुन - हो, सराफ्यांतच घेतली. काय किंमत करतां ?
वैशाख - तीच पहातों आहे. किंमत - ( पाहूं लागतो. )
फाल्गुन - डोळेसुध्दां जुळत नाहींत. नाहीत म्हणावं - तर असं इथून पाहूं. ( पाहूं लागतो. )
वैशाख - सरासरी अजमासानं सांगतो हं. सरासरी पांचशेपर्यंत जाईल. पांच - पन्नास अलीकडे पलीकडे ! ( पुन्हा पाहतो. )
फाल्गुन - ( मनाशीं ) छे:, काहींच नाही जुळत. याच्या चेहर्‍याचा घाट अगदींच निराळा !
वैशाख - हो तितकीच-- पांचशेपर्यंत.
फाल्गुन - आहे, जवळच आहे म्हणायची. मी हा खडा अडीचशेंला घेतला.
वैशाख - अडीचशेंला ? चांगला मिळाला ! ( आंगठी परत देतो. )
आश्विन - ( आंतून ) वैशाख, झालं माझ काम. चल, या आंबराईच्या बंगल्यावरुन जाऊ.
फाल्गुन - ( आपल्याशीं ) आंबराईच्या बंगल्यावरुन जाऊं ! हा कोण आमच्या बंगल्यावरुन जाणारा ? या आठपंधरा दिवसांत आमच्या बंगल्याचा रस्ता म्हणजे रहदारीचा रस्ताच झाला आहे. पाहिजे त्यानं उठावं आणि बंगल्यावरुन जावं, म्हणजे आहे काय हे ?
आश्विन - ( प्रवेश करुन ) वैशाख, येतोस ना ? चल, कदाचित् देवाला गेली असेल तर, तिचीहि गांठ पडेल. ( दोघे कुजबुजू लागतात. )
फाल्गुन - तिची गांठ पडेल ! काय पहा, पाहिजे त्यानें देवाला जातांना तिची गांठ घ्यावी ह्यापेक्षां माझी बेअब्रू अधिक ती कोणती ? पण ह्याचा चेहरा एकदां रोखून ठेवूं.
वैशाख - हं शाबास ! तुम्ही तर पुरतेच नादी दिसतां ! अहो, मघाशीं काय बोललां होतां आणि आतां काय बोलतां ? कांहीं - तरी मेळ ?
आश्विन - ( पुढे येत येत ) नाही. त्यांतलं कारण असं कीं - ( त्याच्या कानांत कुजबूजूं लागतो. )
फाल्गुन - ( मनाशीं ) याचीच दिसते आहे तसबीर. पण एके ठिकाणीं उभं राहून चांगलं नाही दिसत. अशी युक्ति करुं, " पर नार विषाचा प्याला, तूं लागुं नको त्या नादाला. " ( असें गुणगुणत त्या तसबिरीकडे पहात इकडे तिकडे फिरतो ) हे डोळे तर जुळले. " पर नार विषाचा प्याला, " हें नाकहि त्याच्यासारखचं आहे. " तूं लागुं नको त्या नादाला. "
वैशाख - ( आश्विनशेटास ) अहो, हें तर मी मघाशींच मनांत आणलं होतं. कारण बुध्दि शाश्वत असती तर काय झालं नसतं ?
आश्विन - तें खरं असेल तुझ्या मतानं, पण मला विचारशील तर तिची नजरच तशी आहे ! हें पहा -- ( कानांत कुजबूजूं लागतो. )
फाल्गुन - वर्ण जुळला, भिंवया जुळल्या, चेहरा जुळला, जुळलंच सगळं ! तों तोच हा. " पर नार विषाचा प्याला. "
आश्विन - वैशाख, हा कोण रे आमच्याकडे बघतो, गुणगुणतो, पुन्हां पाहातो, पुन्हां गुणगुणतो. आहे कोण ?
वैशाख - आहे कुणी तरी वेडगळ झालं. राहिला उभा मजेंत !
फाल्गुन - " पर नार विषाचा प्याला " असं म्हणतांना ह्याची मुद्रा फिरली रे फिरली !
वैशाख - अशा वेडेपीरांना खुलें हिंडूं देतात, हें चांगलें नव्हे ! कदाचित् अशानं यांच वेड जास्त होत असेल. तो पाहिलास कसा बघतो आहे ? तो दिसण्यांत चांगला दिसतो.
फाल्गुन - तोच, तोच, तोच ! तोच पहा गालावरचा तीळ आणि हा तीळ डाव्या डोळयाखाली, - डाव्या डोळ्याखाली गालाच्या जरा वर - गालाच्या जरा वर " पर नार विषाचा प्याला . "
आश्विन - वैशाख, ऐक. याला परनारीचं वेड लागलं आहे.
फाल्गुन - ( मनाशीं ) हें दुरुन झालं. आतां बोलायचं कांहीं तरी निमित्त काढून एकदां जवळ जाऊन ताडून पहावं. ( जवळ जाऊन दोघांकडे पाहत ) अहो महाराज, अहो ! यंदा कांहीं बंड होण्याचा संभव आहे म्हणतात, खरं कां हो ?
आश्विन - ( हंसत ) बंड, कुठलं ? आपल्याला नाही माहित ! वैशाख, हे कुणी बंडखोर दिसतात !
वैशाख - अरे, मला मघाशीं खड्याचीच किंमत विचारीत होता.
फाल्गुन - अगदीं रेषान् रेषा -- तीळन् तीळ -- अगदीं बरोबर आहे. " पर नार विषाचा प्याला. " ( गुणगुणतो )
आश्विन - या वेड्याच्या काय नादी लागतोस ? चल आपण जाऊं !
वैशाख - चल तर - तरी दगडी वेड नाहीं, मौजेचंच आहे. ( चालू लागतात. )
फाल्गुन - ( मनाशीं ) हा चालला पहा. निसटून जायला पाहातो ! हाच तो हरामखोर ! माझ्या बायकोला तसबीर देणारा हाच ! पण ह्याचं नांव, गांव कसं कळावं ? ( उघड ) अहो, जरा थांबा, आणखी मी विचारतों तेवढें मेहरबानी करुन सांगा. म्हणजे - आपल नांव मार्गशीर्षशेटजी का हो ?
आश्विन - ( हंसत ) मार्गशीर्षशेट? नव्हें, माझं नांव आश्विनशेट; कां बरं ?
फाल्गुन - नाहीं आपलं - बरं. आपल्या बंधूंच नांव तरी - मी म्हणतो तें नांव आहे का ?
आश्विन - बंधूंचं नाहीं - पुतण्याचं नाहीं आणि चुलत्याचंहि नाहीं ! आमच्या घरांत तें कुणाचंच नाहीं !
फाल्गुन - मला वाटलं असावं म्हणून ! कारण हे गृहस्थ माझे फार मोठे स्नेही आहेत, त्यांचा तुमचा तोंडावळा बराच जमतो, म्हणून विचारल. माझ्याजवळ त्यांची एक तसबीर आहे. आपण मेहरबानीनं जर तसदी घ्याल तर थोडी ताडून पाहातों.
आश्विन - वैशाख, अरे, ही एक साडेसातीच भेटली आहे आपल्याला ! बरं पहा ताडून. ( फाल्गुनराव पाहूं लागतो. ) कां कांही जुळतं कां ?
फाल्गुन - जरासा चेहरा वळवाल तर बरं होईल.
वैशाख - ( हंसत ) अहो, सरदारसाहेब, शेटसाहेब, सावकारसाहेब, पुरे कर हा त्रास, जाऊं द्या आम्हांला ! चला हो, या माथेफिरु मनुष्याच्या नादीं लागून काय उपयोग ? चला, खासे वेडेपीर आहेत ! ( हंसत ) अहो एखाद्या मशिदींत जाऊन बसा !
फाल्गुन - ( मनाशीं ) दोघेहि माझ्याकडे पाहून हंसताहेत. हंसा. तुम्हीच काय सर्व शहर हंसणार आतां ! आतां असं केलं तर ? ( उघड ) अहो, ही पहा तसबीर ( मनाशीं ) पण नको ! ( लपवितो. )
आश्विन - अरे, हें काय ? मी रेवतीला दिलेल्या तसबिरीसारखी ही दिसते ! हें कसं झालं ? झाला घोंटाळा ! तीच जर ही असली - ( जरा पुढे सरकतो. )
फाल्गुन - ( मनाशीं ) गोळी लागली रे लागली ! म्हणून स्वारी जवळजवळ सरकायला लागली. बहुतकरुन माझ्या हातून हिसकावून घ्यायचा स्वारीचा बेत दिसतो ! घ्या म्हणावं. ही मी खिशांतच ठेवतो म्हणजे झालं. चल जा, बस तेथें ! ( खिशांत तसबीर घालतो. )
आश्विन - यान तर खिशांत घातली ! वेडा म्हणतां म्हणतां वैशाख, हा आम्हालाच पेढे चारणार !
वैशाख - ( हळूच ) तुम्ही जरा साखर पसरा. म्हणजे झालं !
फाल्गुन - मघाशीं दोघांचं मिळून कांहीं तरी खलबत झालें आहे. आतां तर इथून पळच काढला पाहिजे.
आश्विन - अहो, कृपा करुन एकदां --
फाल्गुन - ( गडबडीने ) जयगोपाळ, जयगोपाळ !
आश्विन - एकदां  पाहूंन देतों -
फाल्गुन - काय पाहून देतों ?
आश्विन - ती तसबीर तुमच्याच हातांतून पहातों.
फाल्गुन - तसबीर, छे, भिकार आहे. उगीच चितार्‍याच्या पोरानं कागदाच्या चिठोर्‍यावर रंग फासला आहे झालं ?
आश्विन - पण बाहेर तरी काढा. पाहूं कशी आहे ती.
फाल्गुन - ( धांदलीन पळत ) छे: हो, आपल्यासारख्यांनी तसदी घेण्यासारखी मुळींच नाहीं; कांहीं तरीच आहे झालं !
वैशाख - ( जरा रागाने ) अहो, पण जरा दाखवानात कां ! आम्ही काहीं खात नाही, पाहून देतों परत. हं दाखवा पाहूं !
फाल्गुन - ( मनाशीं ) हे आले  आतां कजेलीला. आतां केलाच पाहिजे पोबारा. नाहींतर हे आहेस दोघे आणि मी सांपडलों एकटा ! ( उघड ) अगदींच गचाळ आहे हो - जातों आतां. जयगोपाळ, जयगोपाळ, -- छे, छे, मला फुरसत नाही. आणखीन दाखवीन केव्हां तरी, जयगोपाळ ! ( पळत जातो. )
आश्विन - वैशाख, मी रेवतीला दिलेली तसबीर ती हीच !
वैशाख - भलतंच कांही तरी. कशावरुन म्हणतां तीच म्हणून ?
आश्विन - अरे, मी पाहिली म्हणून ! तशी नकशीची चौकट माझ्या तसबिरीलाच होती !
वैशाख - अरे चौकटीसारख्या चौकटी पुष्कळ असतात. कांही तरी तकं काढीत बसायचं --
आश्विन - अरे - तर्क नव्हे - प्रत्यक्ष मी पाहिली. तिनं ती तसबीर त्या भामट्याला दिली यात संशय नाही.
वैशाख - हं तर्क रचीत चाललांत, संभाळा !
अश्विन - आतां काय संभाळा ? झाला घोटाळा - आंणि मी म्हणतो याचा प्रत्यय पाहिजे असेल, तर काल रात्रीचं तिचं माझ्याशी वर्तन मीं तुला सांगितलचं मघाशीं.
वैशाख - ( मनाशीं ) आतां ह्याच्या स्वभावाला काय करावं ? नुसती चौकटीसारखी चौकट पाहून याचं डोक बिघडलं ! आता कमाल झालीं ! ( उघड ) ती तसबीर तुमची नव्हे, खास नव्हे ? रेवती नायकिणीची मुलगी झाली म्हणून इतकी कांहीं बेमान नाहीं !
आश्विन - छे: रे ! तीच, तीच. पैज तुझी माझी; रेवती आपल्या जातीच्या गुणावर गेली, आणि जायचीच, कारण -

पद ( कोयलियाकोकु )
ही बहु चपल वारांगना ॥
साहस, दंभ, लोभ, कपटानृत भाषण टाकिल कशि या स्वगुणा ॥धृ०॥
प्रेमचित्रिका दिधली तीतें ॥
अर्पी परि ती प्रिय पुरुषातें ॥
कुललीला या तिच्या देति संताप मना ॥१॥

चल तर, तिच्याकडे जाऊं, त्याशिवाय नाहीं उलगडा व्हायचा !
वैशाख - अहो, पण घाई काय अशी ? जेवण झाल्यावर जाऊं.
आश्विन - आधीं उलगडा आणखी मग जेवण ! हा मंगळ - मंगळ - मंगळ बघतो आहे मला ! ( दोघे जातात. )
फाल्गुन - ( बाहेर येतो. ) हा चालला पहा. अरे चोरा, माझ्या संसारात बिब्बा घातलास !

पद ( तनयमूढा )
अधमा केली रक्षा मम सौख्याची सारी ॥धृ०॥
शोध तुझा लाविन धुंडोनी ॥
पाप तिचें मापोनी ॥ दडविन बाहेरीं ॥१॥
( जातो )

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP