अंक पहिला - प्रवेश पाचवा

संशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणें मुक्कामीं केला.


( फाल्गुनराव आणि भादव्या )

फाल्गुन - भादव्या, तूं खरं बोलणारा आणि इमानी नोकर आहेस, म्हणून माझ्या मनांत या दसर्‍याला तुझ्या हातांत एक चांगलंसं रुप्याच कडं ठोकून घालायचं आहे. कडं चालेल कीं एक अशा मोठ्या पदरांच पागोट बांधूं ? बोल दोन्ही आवडत नसली तर छान त्रिधारी रेशीम कांठांच धोतर देतों हवं तर. कीं तूर्त काहींच नको ? कांही हरकत नाही. पुढ पाहूं केव्हा तरी. बरं, हे बघ. हळूच जा आणि ती खोलींत काय करते आहे, तें पाहून ये बरं.
भादव्या - ( आपल्याशीं ) धनीसाहेब खूष झाले आणि पहिल्यानं कडं ठोकलं हातात. कड्याचं झालं पागोटं, पागोट्याच केल धोतर आणि माझ नाहीं नाहीं, होय नाहीं, ते धोतरावरुन निसटले ते आले ’ पुढे पाहूं वर ! तरी मेहेरबानी म्हणतो, आहे हें काढून घेतलं नाही !
फाल्गुन - काय रे भादव्या, विचार कसला करतोस ? हें पाहिजे कां, तें पाहिजे का, म्हणून विचारलं तेव्हां हें - मी कशाला - असं केलंस आणि आतां करतोस विचार ! जा, पाहून ये जा !
भादव्या - छे धनीसाहेब, त्याचा नव्हतों मी विचार करीत. आपण असतांना मला बक्षीस कशाला पाहिजे ? बिनकाट भरपूर पगार मिळाला कीं बस्स ! पण बाईसाहेबांचं कपाळ दुखतं आहे म्हणून -
फाल्गुन - त्यासाठींच मी समाचार घ्यायला जाणार आहे. जा, पाहून ये. मी येणार आहें म्हणून सांगूं नकोस बरं का !
भादव्या - मी कशाला सांगू धनीसाहेब ? ( जातो )
फाल्गुन - आतां सकाळी कुठं गेली होतीस, कोणाला भेटलीस, काय बोलण झालं, बरोबर कोण होतं, जायचं केव्हा ठरलं, कोणाकोणाचं ठरलं होत, प्रश्नावर प्रश्न ! अशी सारखी बारगोळी सुरु करतो. माझ्या सरबत्तीपुढे ती काय टिकणार ? उत्तर देतांना कुठं तरी घोटाळेल, गांगरेल, अडखळेल, चुकेल ! मग काय, जरा खिंड पडली कीं, चाललों सर करीत ! अखेर तिच्या तोंडानं तिची लुच्चेगिरी वदवीन तरच शहामत फाल्गुनरावाची !  ( भादव्या येतो. ) काय रे, काय करते आहे ?
भादव्या - कांही नाही. कोचावर टेकून पडल्या आहेत. जवळ रोहिणी उभी आहे. आणि कण्हत कायसं बोलत आहेत.
फाल्गुन - बरं, जा तूं आपल्या कामाला. ( दोघेहि जातात. )
( मागे सांगितल्याप्रमाणें कृत्तिका व रोहिणी प्रवेश करतात. )
कृत्तिका - अग, कसलीं धर्मार्थ औषध आणि कुठल्या बायाबापड्या ? म्हणे आईसाहेबांनी मरतांना शपथ घातली आहे ! ही सगळीं सोंगढोंग मला कळतात म्हणावं ! बायकांचे रोग बायकांनी पहावेत; पुरुषांनी काय म्हणून ? ही सावजं पकडण्याची जाळी तुला आंधोळीला दिसत नाहीत. मीसुध्दा तशीच होते, पण आज माझे चांगलेच डोळे उघडले ! उगीच नाही माझ्या जीवाचा जळफळाट होत. ( पदर डोळ्यांस लावून ) मी का गुणांनी वाईट आहे, कां रुपानं वेडीविद्री आहें, कां रंगानं राखुडी आहे, कां वयांन झालें , म्हणून माझ्यादेखत असे थेर करतात. मेली आम्हा बायकांना देवाला जायचीसुध्दा चोरी ! आप्तमाणसांना भेटायला बंदी आणि यांनी मात्र जनामनाची लाजलज्जा गुंडाळून ठेवून, दिवसाढवळ्या भर रस्त्यावर हवा तसा चावटपणा करावा ! पुन्हां आपले संभावितच ! काय मेला जुलूम, सोसावा तरी किती ?
रोहिणी - आपण प्रत्यक्षच पाहिलं म्हणता, मग काय बोलू ? पण त्याचही करण एका अर्थी बरोबर दिसतं. कारण दुबळ्या बिचार्‍या बायकांवर जर गाजवू नये तर आमच्या पुरुषांनी आपला शूरपणा, आपला स्वतंत्रपणा, आपली अरेरावी, गाजवावी तरी कुठे ?
कृत्तिका - खरोखर सांगते, अशा जिण्यापेक्षा एखाद्या वेळेला असं वाटत कीं, हिरकणी खाऊं, कां अफू खाऊं, कां विष पिऊं, का तळ्या विहिरींत जाऊण जीव देऊं ? कायशी म्हण आहे ना मेली, " नवी नवी नवलाची आणि वापरली कीं कवडी मोलाची, " तशी गत ! लग्न झाल्यावर कांही दिवस मला उराशीं बाळगूं कीं खांद्यावर वाहूं, कीं कडेवर घेऊं असं करीत होते ! ज्यांनी त्यांनी म्हणावं कीं , ही बाई भाग्याची म्हणून असा बिजवर पण हौशी नवरा मिळाला ! पण अलीकडे बघतें तों आपलं सदा घुसफुसणं ! सदा कपाळावर आंठ्या ! सुधा एक शब्द बोलतील तर शपथ ! दागिनेच कां घालतेस, शालूच कां नेसतेस, देवालाच कां जातेस, एक ना दोन !
रोहिणी - पण करायचं काय बाईसाहेब ? ज्यांची सत्ता त्यांची लत्ता खाल्लीच पाहिजे !
कृत्तिका - हो लत्ता खातात ! सांगतात ना कुठल्याशा देशात म्हणे बायका नवर्‍यांना गुलामाप्रमाणे राबवतात. तस्सं झालं पाहिजे इथं, म्हणजे ’ आमच्या चुलीपुढं शिपाई आणि दाराबाहेर भागुबाई ’ अशा नवरोबांचे डोळे उघडतील ! अंजन मिळेल चांगलं !
रोहिणी - पण हे तरी चांगल का ?
कृत्तिका - मी कुठं चांगल म्हणतें ? मी आपली फटकळ तोंडाची, निर्मळ मनाची नि सरळ चालीची बायको आहे. निदान लग्नातल्या शपथेप्रमाणं तरी त्यांनी वागावं, म्हणजे आम्हालां अधिक कांही नको. जाऊं दे ही कर्मकटकट -- पण सकाळी तुझ्याकडे कोण आली होती तें सांगत नाहीस का ? ( फाल्गुनराव हळूच येतो. )
रोहिणी - बाईसाहेब, मीं सांगितलं यांत अक्षरसुध्दां खोट नाहीं; ती खरोखर त्यांच्या घरीं राहाते.
फाल्गुन - ( आडून ) काय सांगितलन् ? एथून नाही चांगलं ऐकू येत. पण ती आहे कुणी तरी. ही कोण ? ( जरासा पुढें सरकतो. )
कृत्तिका - अग दगडे, मागचे उपकार स्मरुन तरी खरं सांग ! नाहींतर नागीण पोसली आणि पोसणारालाच डसली, असं करुं नकोस !
रोहिणी - आपण असं म्हटल्यावर मग काय ?
फाल्गुन - ( आडून ) हें सगळं मोघम चाललं आहे, अजून चांगलासा धागा नाही सांपडत.
कृत्तिका - बरं जा, नको सांगूंस ! आतां येईल माझ्या पत्राचं उत्तर बरं ! " कोंबड झांकलं म्हणून तांबडं फुटायचं रहात नाही. " समजलीस ! मीच त्याचा शोध काढतें, चल चालती हो इथून !
फाल्गुन - ( आडून ) त्याचा सर्व शोध काढतें ! " ती " चा " तो " झाला का इतक्यांत ? ती " ती " कोण ? आणि हा " तो " कोण !
कृत्तिका - जा म्हणते ना. माझ्या डोळ्यासमोर उभी राहूं नकोस ! थोडसं गुलाबपाणी घेऊण ये जा ! ( ती गेल्यावर तसबीर हातात घेऊन तिच्याकडे पाहात ) आमच्या खाशा स्वारीची गांठ पडली म्हणून त्या सटवीनं तुला असं झुगारुन दिलं ना !
फाल्गुन - ( आडून ) हें काय, कुणाची तरी तसबीर दिसते. शंका कशाला ! मघाशीं जी देवाला म्हणून बाहेर पडली होती, ती ही आपल्या जिवलगाची तसबीर घेऊन आली घरीं ! पण नीट पाहूं आधीं.
कृत्तिका - ( हातानें दाखवीत ) रुप किती गोड आहे ! तिनं अशा हिर्‍याला फेंकून देऊन आमच्या नवरोजीत अधिक काय पाहिलं कोण जाणे !
फाल्गुन - ( आडून ) त्याच्या स्वरुपाची तारीफ आणि मला उद्देशून वाईट तोंड करतेस का ! बरं आहे, पाहून घेईन !
कृत्तिका - या तसबिरीवर लावलेल्या अत्तराचा वास तरी किती मधुर आहे ! ( वास घेते. )
फाल्गुन - ( आडून रागानें ) काय बेशरम आहे पहा ! त्या तसबिरींतल्या चोराचं चुंबन घेते आहे. देऊं का एकदम फडकावून श्रीमुखांत ? पण नको, आपल्याला आडाण्यासारखा हात टाकायाचा नाही. युक्तीयुक्तीनचं पाऊल टाकायचं !
कृत्तिका - अग चांडाळणी, नशीबानं असा मिळाला होता म्हणून तूं हिला रात्रंदिवस मोठ्या प्रीतीनं अस्सं अस्सं ( उराशी लावते ) उराशी बाळगावंस, पण पारख पाहिजे ना ?
फाल्गुन - ( आडून अतिरागानें ) आतां तर बेशरमपणाचा कळस झाला ! त्याला अगदी उराशीं आंवळून धरते ! या वेळी जर - छे: छे: रानटी विचार नाही, कामाचा. आमचं शस्त्र विचार ! विचारानंच काय होईल तें होईल.
कृत्तिका - ( तसबिरींतल्या चित्रास उद्देशून ) तुझ्यासारखा नवरा मिळायला तपश्चर्याच केली पाहिजे नि त्यांत आमचे हे जंगली महाराजांना ( इतक्यांत फाल्गुनराव तिच्या हातांतील तसबीर हिसकावून घेतो. ) अग बाई ! हें कोण ?
फाल्गुन - मी जंगली महाराज, तुझ्या या गुलछबू महाराजांना भेटायला आलों. सांग आतां, सांपडलीस का नाही ?
कृत्तिका - मी कुठं पळून गेलें होतें ? जन्माचीच सांपडलेली आहें तुमच्या तावडींत ! पण आपल्याला फावलं वाटतं घरीं यायला ?
फाल्गुन - तुझ्याबद्दल जबाब दे आधीं !
कृत्तिका - माझ्याबद्दल कसला जबाब ?
फाल्गुन - ( हातांतल्या तसबिरीस उद्देशून ) हें काय हें ?
कृत्तिका - ही आपल्याच निर्लज्जपणाची साक्ष !
फाल्गुन - माझ्या निर्लज्जपणाची साक्ष ? बरोबर आहे तुझं म्हणणं, माझाच निर्लज्जपणा ! कबूल आहे ?
कृत्तिका - आणखी कबूल करायला लाज नाही वाटत ?
फाल्गुन - खर्‍या गोष्टीला लाज कसली ! आपल्या मनमोहनाची तसबीर घेऊन तिचे मुके घेतांना आणि तिला उराशीं कवटाळून धरतांना मी तुला प्रत्यक्ष पाहातों, तरी तुला लाथ मारुन घराबाहेर हांकून द्यायचं माझ्या मनांत येत नाही, तेव्हां हा माझाच निर्लज्जपणा नव्हें का ?
कृत्तिका - काय आत्तां काय म्हटलंत आपण ? मेल्यांनो ! काय न्याय बघा, ’ आपण शेण खायचं आणि दुसर्‍याचं तोंड हुंगायचं.’ खासा न्याय !!
फाल्गुन - खबरदार जास्ती बोलशील तर ! ही तुझ्या दिल्लगाची तसबीर तुझ्या हातांत धरली आहे.
कृत्तिका - ठीक आहे. नाहीं बोलत, चालूं द्या आपलंच ! आपण अगदी निष्पाप हो ! अगदी कासोट्याचं पाणी घ्यावं ! आपल्याला परस्त्री म्हणजे मातेसमान ! परस्त्रीकडे आपण वांकड्या नजरेनं कसं तें पाहिलंदेखील नाही आजपर्यंत ! निदान मला तरी कांहीं दिसल नाहीं हो ! छे--छे, अगदी दिसलं नाहीं !
फाल्गुन - काय म्हणतेस ?
कृत्तिका - म्हणायचं काय ? खरं तेंच म्हणतें. एक ताससुध्दां झाला नसेल, भर रस्त्यांत - माझ्या खिडकीसमोर आपण कुणाला मांडीवर घेऊन बसला होतां तें ? मीं कांहीं पाहिलं नाहीं ! अगदीं डोळे मिटून उभी होतें ! !
फाल्गुन - काय, काय ? पुन्हां बोल !
कृत्तिका - पदर अस्ताव्यस्त पडलेला, तिचा गोंडस हात आपल्या खांद्यावर आपला हात तिच्या गालावर ! केव्हां ? छे, छे, मला अगदी दिसलं नाहीं. आपण एकपत्नी ! साक्षात रामाचे अवतार !! आपल्या हातून असं कसं होईल ?
फाल्गुन - ( मनाशीं ) हं, असं काय ? आतां समजलों, तो प्रकार हिनं पाहिलान् वाटतं. ज्यांना खरी हकीकत माहित नाहीं त्यांना तो गैर दिसण्यासारखाच झाला. ( उडत ) पण माझ्या मनांत कांहीं पाप नव्हत !
कृत्तिका - कां घोटाळ्यांत पडली स्वारी ? आपण धुतलेल्या तांदलासारखे निर्मळ ! आपल्या मनांत त्या वेळीं कांहीं पाप नव्हत ! मग कां असं तोंड उतरलं ? म्हणे, ’ घरांत येतेस का जराशी ?’ आणायची तर होती त्या सटवीला घरांत, मग दाखविली असती गम्मत !
फाल्गुन - ती जर बिचारी एकाएकीं घेरी येऊन रस्त्यांत पडली -
कृत्तिका - समजलं ! आपण फार कोवळ्या मनाचे तेव्हां आपल्या अन्त: करणाला दयेचा पाझर फुटून आपण तिला पोटाशी धरली होती वाटत ? तिला घेरी आलेली पाहून आपलं मन कळवळलं म्हणून तिच्या गालावरुन हवा तसा हात फिरवीत होता नाही का ? खरचं, आपलं कीं नाहीं लोण्यापेक्षा कोवळं मन म्हणून आपण नाजूक ओठांनी तिच्या गालावरचा घाम पुशीत होतां, असंच ना ?
फाल्गुन - ( आपल्याशी ) हिनं तर माझंच बोट माझ्याच डोळ्यांत घालून तोंड बंद केल्यासारखं केलन् ! आतां असं करुन नाही उपयोग ! ( उघड ) ठीक आहे. चालू दे तुझी वटवट ! या तसबिरीच्या साह्यानं तुझा प्यारा कोण आहे, हें शोधून काढतों आणि मग सांगतो काय सांगायचं तें ! हा निघालोच त्या उद्योगाला. काय समजली आहेस तूं ! ( रागाने जातो. )
कृत्तिका - चला, हें सोंग नेहमीचंच आहे तुमचं. असं काहींतरी कारण काढून बाहेर पडायचं आणि मग हवी तशी चैन उडवायची! काय मेला चमत्कार पहा ! देवा, नको रे नको, हें बायकांच जिणं ! एका गाण्यांत म्हटलं आहे ना, " सत्ताविस जन्मींचीं पापे प्राणी आचरती । फळे तयांची भोगाया ही घडली स्त्री जाती ? " ते अगदी खरं ग बाई खरं ! ( जाते )
फाल्गुन -  ( प्रवेश करुन ) काय ग ए - गेली वाटतं. बरं आहे; जाऊं दे ! काय जगातला  उलटा न्याय आहे पहा ! मी करायला गेलो काय आणि हिनं त्याचा अर्थ काय घेतलान् ! खरोखर -

पद - ( तिमिर भय होय )
नष्ट कलिकाल हा । दुष्ट शनि राहु बळि पूर्व संचित छळी ।
काय न कळे मला ॥धृ०॥
पोर मूर्च्छित पडे । सांवरलि हें घडे । पुण्य
परि बापुडे पाप वाटे तिला ॥१॥
प्रियचित्र चुंबिलें । ह्रदयिंही कवळिलें ।
नेत्रिं या पाहिलें । तरि म्हणें निर्मला ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP