अंक चवथा - प्रवेश २ रा

नाटक लिहिणे किंवा रंगभूमीवर सादर करणे म्हणजे अवघड कला आहे, शिवाय त्यातील अभिनय जिवंत असावा लागतो.


दुर्गाच्या माडीवरील दिवाणखाना
[ हातांत आंगठी असलेली दुर्गा. ]
दुर्गा - ( मनाशीं ) आजपर्यत जादुगिरीच्या , मणीमंत्राच्या तशाच छाछूच्या मीं पुष्कळ गोष्टी ऐकल्या आहेत. भारलेला ताईत दंडाला बांधून , नाहीं तर मेली काहीं तरी जादू करुन , हे मांत्रिक लोक पाहिजे त्याला मोहनी घालतात, आणि आपल्याला पाहिजे तें त्याच्यापासून घेतात . तसेंच, मंत्र जपून भलत्याच दिवशीं चंद्रसूर्याला ग्रहणें सुध्दां लावतात. एक का दोन. असे पुष्कळ चमत्कार घडतात म्हणून आमची आजी लहानपणीं सांगत असे . तेव्हां " असें कसें होईलग ! उगीच काही तरी सांगतेस ? " असें म्हणून मी तिला हसत होतें . पण आतां तें मेलें सगळें मला खरे वाटायला लागलें , हेच पहाना ! ही एवढीशी आंगठी पण इच्याकडे पाहिल्याबरोबर पूर्वी भोगलेले सर्व सुख कसें माझ्या डोळ्यांपुढे उभें राहिलें ! ( जरा चपापून ) अगबाई ! ( एकसारखे त्या आंगठीकडे पाहून ) ही हातात घेतल्यापासून माझ्या मनांत नाहीं नाहीं त्याच कल्पना येऊ लागल्या हें काय ? एकदां आनंद झाल्यासारखें वाटतें , लगेच भीतीही वाट्ते ! आतां नको मेला , तो विचारच नको - ( इतक्यात कोंडाऊ येते. )
कोंडाऊ - तो बुवा सदरेवर उभा राहिला आहे, त्याला काय सांगायचें ?
दुर्गा - खरें , तें मी विसरलेंच कीं ! जा त्याला वर घेऊन ये. ( कोंडाऊ जाते. दुर्गा आपल्याशीं ) देवा ! अरे ही त्यांच्या बोटांतील आंगठी इथे कशी आली ? बाळापुरच्या लढाईत त्यांचा अंत झालाना ?  (थोडा विचार करुन ) आणि म्हणूनच मीं हें दुसरें लग्न केलेंना ? छे बाई ! ही आंगठी पाहिल्यापासून मरणाची बातमी खोटी कीं काय असें वाटायला लागलें आहे.
(सुस्कारा टाकून ) देवा ! ते लढाईत पड्ले अशी मनाची कशी तरी समजूत घालून मी पुढचे दिवस काढूं कारे ! ( किंचित विचार करुन ) नाहीं , त्यांचा अंत झाला हेच खरें. अंतकाळीं कुणी स्नेही जवळ असेल वाटतें , आणि मला पोहोंचवयासाठीं ही आंगठी त्याच्यापाशी दिली असेल , तो ही घेऊन आला आहे, हेंच खरें ; पण आलेला गोसावी- ( चंद्रराव येतो. दुर्गा त्याच्याकडे न्याहाळून पाहून आपल्याशीं ) ’ मन चिंती तसें वैरी चिंतीना ’ असें म्हणतात तें कांही खोटे नाहीं . उगीच मेल्या इतका वेळ भलभलत्या शंका घेत बसलें होतें . सर्व खुणा जमतात. देवा तेच हे ! (आनंदाने ) माझे प्राणच मला मिळालाग बाई !
चंद्रराव - ( ती आपल्याशीं कांहीच बोलत नाहीं असे पाहून ) मला तूं ओळखलें नाहीस असे दिसतें !
दुर्गा - कुणाला ? आपल्याला ओळखलें नाहीं.
चंद्रराव - ( आनंदाने ) तर मग या बैराग्याच्या वेषाला निरोप देतों आतां . ( झोळी वगैरे फेंकून देतो. ) आज माझीं सर्व दु:खें संपली. एकदां कडकडून आलिंगन दे पाहूं ( असे म्हणून तिला धरावयास जातों . ती मोठ्याने ओरडते व नवर्‍याच्या हातांत सांपडताच तिचें भान जातें.) हें काय बरें ! ( वारा घालतो.) लाडके ! लाडके ! शुध्दीवर ये . हा तुला कोण हाका मारीत आहे त्याच्याकडे पहा . ओ म्हण ! लाडके ! हा तुझा चंद्रराव आला आहे पहा ! मी दृष्टीस पडताच हिला हा हर्षवायु झाला बरें ! मीच चुकलों . स्त्रियांची अंत:करणे कोमल असतात. त्यांना दु:खाचा किंवा हर्षाचा कोणताच वेग एकाएकीं सहन होत नाहीं. असो. आनंदाच्या झटक्यानें हिचें भान जरी गेलें , तरी माझ्यावर हिची किती निस्सीम प्रीती आहे , हें ह्यावरुन चांगलें कळून आलें . मनांत प्रीतीचा झरा नसतां नुसतें वर वर गोड बोलतां येतें ; पण असा उमाळा फुटायला खरीच प्रीति लागते.
दुर्गा - ( बरळत बरळत शुध्दीवर येते. ) कुठे आहे मी ? तुम्ही त्यांची आणि माझी काय म्हणून ताडातोड केलीत ? मी त्याचा स्वर ओळखला . माझा प्राण निघून जात होता, तो हा गोड स्वर ऐकून पुन: परत येत आहे. हेच ते, खास हेच. ( नवर्‍यास घट्ट मिठी मारुन ) आतां नाहीनां कधी या देहाचा अंतर पडायचा ? जर मेलें माझ्या नशिबांत दु:ख भोगायचेंच लिहिलें असेल, तर त्यापेक्षां मला इथें असेच मरणें पुरविलें.
चंद्रराव - आतां दु:खाचें आणि मरणाचें नांवच घेऊ नकोस !
दुर्गा - आपल्याला अवचित् पाहून मला जो हर्ष झाला त्यानें मी अगदीं भांबावून गेंले आहें. मी काय बोलतें त्याची देखील मला शुध्दि नाहीं. म्हणून म्हणतें कीं , एखादा वेडावाकडा शब्द बोललें असेन तर त्याची मला क्षमा करावी.
चंद्राराव - (आनंदाच्या भरानें ) अहाहा ! तुला कुठे साठवून ठेवू असे झालें आहे मला !
दुर्गा - बरें , मी विचारतें याचें अगोदर उत्तर द्यावे. आपण इथे कसे आलांत ? सांगावें लवकर सगळें. मला तर भ्रम पडल्यासारखें झाले आहे .
चंद्रराव - सर्व सांगेन बरें . पण आतां नको.
दुर्गा - आम्ही इथें समजत होतों कीं, बाळापूरच्या लढाईत -
चंद्रराव - समजलों , आणि तें कांही सर्वथा खोटें नाही. मी त्या लढाईत जखम लागून पडलों होतों . पण आयुष्याची दोरी बळकट होती म्हणून म्हण , तुझ्या सौभाग्याच्या जोरानें म्हण अथवा परमेश्वराच्या मनांत ( तिच्या हनुवटीस हात लावून ) हें अनुपम सौख्य मला चिरकाळ द्यावयाचें होतें म्हणून म्हण , शत्रुच्या शिपायांनी मला उचलून आपल्या छावणींत नेलें . पुढें सरासरी एक महिन्यानें माझ्या जखमा बर्‍या झाल्या; पण उपयोग काय ? मी बरा होताच शत्रुंनी मला कैदेत टाकलें. तेव्हा इकडे यायचा बेत माझ्या मनांत राहिला. तरी तिथून मी बाबांना दोन तीन पत्रें पाठविलीं ; परंतू कोणाचेच उत्तर नाहीं , कीं निरोप नाहीं , कांहीं नाहीं.
दुर्गा - त्यांतले एक जरी पत्र मला पोहोंचलें असतें, तरी केवढा अनर्थपात ट्ळला असतां म्हणून सांगूं !
चंद्रराव - ( तिचा बोलण्याचा खरा अर्थ न समजल्यामुळें ) तूं काही जरी केलें असतेंस तरी माझ्यावरचा अनर्थ टळला नसता बरें ? काय केलें असतेस तूं ?
दुर्गा - मी काय केले असतें तें आतां बोलून काय फळ ? मेलें व्हायचें तें होऊन गेलें. पण मी सगळीं दु:खें सोसली असतीं , कुणाची बटीक होऊन राहिलें असतें , निदान हें पोट जाळायला पोटच्या पोराला दिखील विकला असता बरें ?
चंद्रराव - पोटच्या मुलाला ?
दुर्गा - हो. आपण खुशाल आहांत हें कळायसाठी मी आपली मान सुध्दां वाहिली असती. आणखी काय ?
चंद्रराव - ( कवटाळून ) बरें , झालें तें होऊन गेलें . आतां त्याबद्दल दु:ख करुन काय फळ ! सध्याच्या आनंदात मात्र व्यत्यय येतो. पुन: आपली गांठ पडली, या सुखापुढें पुर्वी मी सोसलेली सर्व दु:खें नाहीशीं झाली. पुरे , उगीच मनाला वाईट वाटूं देऊं नकोस. भोक्तॄत्व तेवढें सगळें भोगलेच पाहिजेत. येवढा परमेश्वराचा अवतार राम ! त्याला देखील भोगाने चवदा वर्षे वनवास भोगायला लावला, मग माझी काय कथा ? चल , आतां तुला अजून पुष्कळ गोष्टी विचारायच्या आहेत.
दुर्गा - ( आपल्याशीं ) देवा ! माझे कान बहिरे होतील तर फार चांगलें होईल.
चंद्रराव - बरें , माझा बाळ्या कसा काय आहे ? चांगला बोलायला लागला असेल नाहीं ? आमच्या बाबांची प्रकृति कशी आहे ? आणि तुळाजीराव ?
दुर्गा - सगळे खुशाल आहेत. ( डोळ्यांतून पाणी काढून ) मला जरी मामंजीनी लाथेनें झुगारुन लाविलें, तरी आपल्यावर ममता करोत एवढेच माझें अंबाबाईजवळ मागणें आहे.
चंद्रराव - छे ! हें काय ? आतां कां बरें डोळ्यांतून पाणी ?
दुर्गा - आज सात वर्षे माझ्या डोळ्यांना खळ नाहीं. रात्रांदिवस कपाळीं रडणेंच लागलें आहे मेलें !
चंद्रराव - मागचें जाऊं देग, आजपासून तूं सोसलेल्या दु:खांच्या दसपट तुला सुख देईन म्हणजे झालें कीं नाहीं ? पण बाळ्या कुठे आहे? त्याला नाही का आणीत ?
दुर्गा - खोलींतच निजला आहे. ( त्याला आणायला उठते. )
चंद्रराव - नको, निजला असला तर निजूंदे. वाटेच्या श्रमामुळें मलाही आज फार झोंप येते.
दुर्गा - येत असेल खरीच. बरें तर, मी जातें आणि सर्व तयारी करतें. ( जाते. )
चंद्रराव - ( आपल्याशीं) खरोखर हें एक रत्न आहे बरें ! मी मोठा भाग्यवान माणूस म्हणून ईश्वरानें हें माझ्याच हातीं दिलें ! परमेश्वरा मला पुष्कळ आयुष्य विपुल संपत्ती दे म्हणजे याउपर मी हिला अणुमात्र देखील दु:ख होऊं द्यायचा नाहीं. केवढी हिची योग्यता ! हिच्या सद्गुणाला तर मोलच नाहीं. हिच्याकरितां मीं जरी हजारों मोहरांच्या ढिगावर लाथ मारली, तरी तेंसुध्दां कमी होणार आहे ! त्या माझ्या आंधळ्या अभागी बापाला काय म्हणावें ? प्रत्यक्ष कामधेनु आपण होऊन घरीं आलीं असून त्याला दिसलीं नाहीं - बाहेर घालविली ! जाळ म्हणावें ते सोन्याचे ढीग या साध्वीच्या पासंगालासुध्दां पुरायचे नाहीत. माझ्या लाडकीच्या समागमांचें अनुपम सौख्य कुणीकडे - आणखी तुझे ते सोन्यारुप्याचे तुकडे कुणीकडे ! माझ्या पश्वात हिचे काय काय हाल झाले असतील ! नको, पण याविषयीं विचार करुन उपयोग नाहीं . कारण , तिच्या, विपत्तीला मीच कारण झालों असें मला शेवटीं कबूल करणें भाग पड्तें. ( दुर्गा येते. )
दुर्गा - सगळी तयारी करुन आलें. जावें आतां निजायला.
चंद्रराव - आणि तूं ?
दुर्गा - मी भवानी देवीला नमस्कार करुन येतें .
चंद्रराव - बरें तर लवकरच - ( असें म्हणून जातो. )
दुर्गा - ( आपल्याशीं ) मीं देवीला नमस्कार करुन येतें म्हणून ’ म्हटले’ पण तिला मी आतां काय म्हणून नमस्कार करुं ? ती मला काय देणार ? आशा करायसारखें उरलें आहे तरी काय ? कपाळीं होतें तेवढें मीं सुख भोगले. पण आतां माझी ग्रहदशा वाईट आली आहे. यापुढें मरेपर्यत जिवाला मेले क्लेशच व्हायचे असें दिसतें. ( अंमळ विचार करुन ) तरी क्लेश न सोसायचे माझ्या स्वाधीन आहे. मीं देवीला नमस्कार करुन येतें म्हणून् त्यांना सांगितलें नाहीं का ? - पण ते म्हणजे कोण ? ते म्हणजे चंद्रराव माझे पति अं ! चंद्रराव माझे पति आणि मग आनंदराव हे कोण ? ( डोळे पुशीत ) नशीबा ! कायरे माझ्यावर हा कठिण प्रसंग आणलास ? हे जर चंद्रराव एकच दिवस अगोदर आले असते तर ! - पण आतां अशीच रडत बसले तर पुढे वाट काय ? कांही तरी मेली तोड काढली पाहिजेना ? दोघांशी लग्न केलें पण खरी बायको कोणाची नव्हे, काय मेला हा कर्माचा खेळ तरी ! नकोरे देवा ! या विचारांनी माझे कपाळ भड्कून गेलें . खरी साडेसाती ग बाई ! ( किंचित् विचार करुन ) बरें , असें केलें तर कसें होईल ? म्हणजे लोकांची ती मेलीं घालून पाडून बोलणीही सोसायला नकोत, नी चहूंकडे माझ्या नांवाचा डंकाही व्हायला नको. शिवाय मेलें सुख कोणालाच नाहीं. हो, असेंच करावें . एकदां मन घट्ट करुन खुपसला कीं सुटलें. ( विचार करुन ) मना, असें मागें घेऊ नकोस बाबा ! पण त्यांना एकदां शेवटचें डोळेभर पाहून घेतें , म्हणजे या जिवाचा अधिक कंटाळा येईल;आणि  मग  ( आकाशाकडे बोट दाखवून आवेशानें ) यमाच्या घरची वाट - ( इतक्यांत चंद्रराव येऊन - )
चंद्रराव - " जिवाचा कंटाळा ! " आणखी  " यमाच्या घरची वाट " काय शब्द हे लाडके ! तुझ्या दु:खाचे दिवस गेले, म्हणून सांगितलेंना मघाशीं ? पुन: काय बरें हें ! लवकर आली नाहींस म्हणून तुला बोलवायला आलों, तो हें भयंकर शब्द कानी पडले ! दहांदां सांगितलें. आणखी एकदां सांगतों कीं, इत:पर तुझ्या स्वप्नातसुध्दां तुला दु:ख होऊं द्यायचा नाहीं .
दुर्गा - नाहीं हो ! मी संसारातल्या दु:खांना भीत नाही. पण हीं मेली असलीं दु:खें सोसवत नाहीत. काय करुं मी ?माझी फार दैना दैना झाली बरें ! म्हणून म्हणतें कीं, यापुढें तरी माझी अशी फसवणूक व्हायला नको.
चंद्रराव - मीं कधी तुला फसविलें नाहीं व पुढेही माझ्या हातून तसे व्हायचे नाहीं . लाडकें , हें काय बरें ? वर पहा. तुझी प्रसन्न मुद्रा पाहून मला सुख होणार. नाहीं तर काय ?
दुर्गा - आपल्याला आनंद होईल , पण माझ्या कपाळीं दु:खाचा डोंगरच ना ? पुष्कळ पहातें आहें. पण मरणाशिवाय मेली दुसरी तोडच दिसत नाही.
चंद्रराव - या तुझ्या बोलण्याचा अर्थ काय ?
दुर्गा - लग्नें सुखाकरितां करायचीं , असें शास्त्रात सांगितलें आहे. मीच कां अशी कपाळकरंटी निघालें म्हणतें ?
चंद्रराव - माझ्याबरोबर लग्न केलेंस म्हणून का तुझे हाल झाले ?
दुर्गा - हाल म्हणजे किती म्हणून सांगूं ! मागें झाले ते झालेच आणखी पुढें भोगायचे ते निराळेच !
चंद्रराव - तुझ्या तोंडचे हे शब्द ऐकायलाच का मला परमेश्वरानें जिवंत ठेवलें ?
दुर्गा - पण मी असें बोलले तरी काय ?
चंद्रराव - माझ्यामुळे तुला दु:ख झालें म्हणून .
दुर्गा - भलतेंच कांही तरी ! या जगांत माझ्या सौख्याचें भांडार काय तें आपण ! आणि आपल्याला मी असें कसें म्हणेन बरें ! तसे जर खरोखरीच मीं म्हट्लें असेल तर पदर पसरतें आपल्यापुढें.
चंद्रराव - आतां असें म्हणतेस आणि मघाशीं म्हटलेंस कीं , लग्नामुळें क्लेश सोसायला लागले म्हणून !
दुर्गा - शब्द चुकून गेले असतील . पण मनांतून काय म्हणायचें होतें तें माझ्या ध्यानांत आहे. हें पहा-उपयोग नाहीं हो !तसे झालेच तें. ( कावरीबावरी होते. )
चंद्रराव - तूं खरोखर भ्रमिष्टासारखें काहीं तरी बड्बडतेस. आनंदाच्या भरांत हें प्रथमत: माझ्या लक्षात आलें नव्हतें. परंतू आतां -
दुर्गा - मी आपल्या पाया पडतें ! कुणाजवळ बोलूं नका.
चंद्रराव - तुला आज कांही तरी झालें आहे. अ
दुर्गा - होय, मला ठाऊक आहे काय झालें आहे तें ; पण मेलें औषध कुठे आहे .
चंद्रराव - औषध कसलें ? थोडी झोप घेतलीस म्हणजे हुशार होशील. चल , मी तुझ्या मनांतले दु:ख दूर करतो.
दुर्गा - अगोदर मूळ नाहीसें केल्याशिवाय दु:ख कसे दूर होईल ?
चंद्रराव - सांग तर दु:खाचें मूळ काय तें . म्हणजे दूर केलेंच म्हणून समज.
दुर्गा - आपणच माझ्या दु:खाचे मूळ !
चंद्रराव - ( आश्चर्यानें ) काय मी ! मी तुझ्या दु:खाला कारण झालों !
दुर्गा - आपण मला जाणूनबुजून दु:ख दिलें असे मी म्हणत नाहीं, पण आपल्यामुळें मला -
चंद्रराव - हें असेंच तूं मला सौख्य देणार काय ? केवळ तुझ्या आशेवर इतकीं संकटें भोगलीं, इतके कष्ट सोसले, उपाशी राहून दिवस काढले, फक्त तुझ्यासाठीं तुरुंगाची भिंत उड्ण्याचें साहस केलें , आणखी त्याची फेड तूं अशी करतेस काय ?इतकी तुझ्यावर जिवापलीकडे प्रीती करीत असून तूं मला आपल्या दु:खाचें मूळ म्हणतेस तेव्हा आतां काय म्हणावें !
दुर्गा - उगीच कां मनाला त्रास करुन घेतां ? लवकरच होईल याचा उलगडा. ( असें म्हणून जाऊं लागते, चंद्रराव तिला अड्वून म्हणतो. )
चंद्रराव - हें काय ! मला सोडून चाललीस कुठें ?
दुर्गा - जाऊं द्या मला . दोघांचेंही हित आहे त्यांत . खरेंच हात जोडतें मी. सोडा मला .
चंद्रराव -असें भलतें भलतें बोलून गोंधळात पाडूं नकोस मला. मघाशी म्हट्लेस तसें करायचें नाहीना तुझ्या मनांत ? ( आपल्याशीं ) नाही पण हिच्या मनांत आज काही तरी वेड शिरलें आहे खास . त्याशिवाय ही अशी भकायची नाही. ( तिला ) लाड्के, जरा विचार कर . तो झटका गेला निघून . चल नीज आतां . नाहीं तर जाग्रणानें पित्त भडकेल्ज. चल -
दुर्गा - आतां कुठें चल ! आपली आणि माझी संगत सरली.
चंद्रराव - पण तुझी माझी संगत सोडविणार असा कोण ?
दुर्गा - माझें हें फुटकें नशीब ! दुसरें कोण ! आपल्याला ती भयंकर हकीकत कळायची आहे अजून. पण त्या नादीं आपण लागूं नये हे बरें . कारण , ( डोळ्यास पदर लावून ) आपल्या सुखांत माती पडल्यावर आपण आपल्या भोळसर - प्रेमळ मनाला दोष द्याल, मला अंत:करणातून हुसकून लावाल, माझी छी थू कराल ! हें मी आतांच सांगतें . काहीं का असेना ! त्याचा मेला शेवट हा व्हायचाच. पण मी मेल्यावर माझे अपराध पोटांत साठ्वून माझ्यावर दया करा , हे माझे या पायापाशीं शेवटचे मागणे आहे. ( असें म्हणून चंद्रराव ’ हां हां ’ म्हणत असता ती झटकन् त्याला न सांपदतां निघून जाते. )
चंद्रराव - ( चकित होऊन ) याचा अर्थ काय ? काय तिनें मनात आणलें आहें ईश्वराला ठाऊक. माझ्या मनांत तर चमत्कारिकच कल्पना येऊं लागल्या आहेत. छे ! मला खास वेड लागणार . यातं काहीं तरी घोटाळा आहे आणि तो लवकरच बाहेर फुट्णार ! आतां नाहीं माझ्याने धीर धरवत . मला तें सर्ब कळलेच पाहिजे. पण कळणार कसें ? तिच्या शिवाय दुसरा मार्ग नाहीं ; आणि केव्हा तरी ती गोष्ट जर बाहेर फुटायचीच तर तिनें ती मला सांगितलीच पाहिजे. कारण माझ्या नशिबाचा हवाला काय तो तिच्यावरच . तीच तारो किंवा मारो. ( तिच्या शोधात जातो. )
( अंक चवथा समाप्त. )

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP