[ मुरलीधराच्या मंदिरासमोरील बाग ]
तुळाजीराव -- ( हातांत पत्र घेऊन येतो ) कोणी कांहीं म्हणोत; परंतु मला या जगांत पैशासारखें सुखाला दुसरें साधनच दिसत नाहीं. द्रव्याची आशा मोठी वाईट. तिच्यामुळें मनुष्याच्या हातून प्रसंगीं मोठमोठीं पापें होतात असें कोणी म्हणतात; परंतु माझ्या मतानें तर या म्हणण्यांत कांहीं अर्थ नाहीं. कारण, मनुष्याजवळ पैशाची ऊब आहे तोंपर्यंतच तो शहाणा, तोंपर्यंत त्याला चारचौघांत मान, तोंपर्यंतच त्याला सौख्य, नाहीं तर त्याला विचारतो कोण ? त्यांतून स्वत:च्या अनुभवावरून मी तर सध्यां पैसा म्हणजे परमेश्वर मानतों. कारण, आमचें घराणें पडलें लेंकवळ्याचें, द्रव्य आहे म्हणून लोक विचारतात तरी ! इतकें असून हे आमचे खुळे दादासाहेब आम्हांला पत्र लिहितात कीं, “ बाबासाहेबांचा आतां मजविषयीं ग्रह काय आहे ? त्यांचा राग कमी झाला कीं नाहीं ? मी बंदीखान्यांतून सुटून तिकडे आलों तर कसें होईल ? कुटुंबाकडील कांहींच हकीकत आपण लिहिली नाहीं म्हणून फ़ार काळजी लागली आहे, ती पत्रोत्तरीं दूर करावी. ” ( पत्र फ़ाडीत फ़ाडीत ) करतों बरें ! सर्व काळजी एकदम दूर करतों. आतांशीं तोच चिचार रात्रंदिवस माझ्या डोक्यांत घोळत असतो. ( पत्राचा चुरा दूर फ़ेंकून देऊन ) म्हणे मी तिकडे आलों तर कसें होईल ? फ़ार खासें होईल ! आमच्या छातीवर सध्यां कोणी नाहीं, ते तुम्ही येऊन बसाल. अरे शहाण्या ! पूर्वीं तूं इथें असतांना माझी स्थिति काय होती ती अजून मी विसरलों नाहीं. मेलेल्या भावाला जिवंत करून आपला हिस्सेदार करीन इतका मी दुधखुळा नव्हे बरें ! बाबांच्या समजुतीनें मेला आहेस तो तिकडेच मर, पैशापेक्षां मला कांहीं तूं जास्त नाहींस. यदाकदाचित् तिथून सुटून आलास तर तुझ्या दुधाच्या पेल्यांत विष कालवून ठेवायच्याच मसलतींत मी आहें. आनंदरावाच्या साहाय्यानें ती मी कशी तरी पार पाडणारच - अरे, हा आनंदरावच आला वाटतें. स्वारी तिकडूनच आलीसें दिसतें.
( आनंदराव येतो. )
तुळाजी० -- एकूण तुम्ही खरे एकनिष्ठ भक्त यांत शंका नाहीं !
आनंद० -- पण त्या निष्ठेची फ़लप्राप्ति इष्ट देवता प्रसन्न होईल तेव्हां !
तुळाजी० -- अहो प्रसन्न ही झालीच पाहिजे. तिचा पिच्छा मात्र सोडूं नका म्हणजे झालें. तुम्हांला ठाऊक आहेच कीं, शिवाजीच्या हातीं सिंहगड कांहीं एका दिवसांत नाहीं आला.
आनंद० -- तें खरें. पण आज सतत सात वर्षें मी तिच्या आराधनेंत हा देह झिजवीत आहें, तरी आशेवांचून मनाला दुसरा कांहीं आधार नाहीं.
तुळाजी० -- मी म्हणतों, आशा तरी आहेना ! मग आणखी काय पाहिजे ? आशा म्हणजे कामी पुरुषांचें जीवन ! तेव्हां ती जर आहे तुम्हांला, तर ती मिळायचें कांहीं कठीण नाहीं.
आनंद० -- परंतु ती तरी माझी मींच लावून घेतलेली ! मीं आतांच सांगितलें ना कीं, माझ्या मनाला धीर येईल असें तिचें अद्यापि बिलकुल चिन्ह दिसत नाहीं. यावरून काय तें आणा ध्यानांत.
तुळाजी० -- नाहीं दिसलें त्याचें कारण मी सांगतों. अहो, ब्रह्मदेवानें स्त्री ही एक या जगांत अजब चीज पैदा केली आहे. क्षणांत हंसेल, क्षणांत रुसेल, क्षणांत मुरकेल, क्षणांत गुरकावील. एकदां हं, एकदां हं, असे हां हां म्हणतां हजारों रंग दाखवील. मोठी मानी, मोठी संशयी, मोठी भित्री, मोठ्या कोंवळ्या मनाची, अशी ही स्त्रीजात ! तेव्हां अमुकच एका मार्गानें वागलें म्हणजे तिचें मन आपल्या स्वाधीन होईल असें कांहीं कुणाला सांगतां यावयाचें नाहीं. माझ्या मतानें तर त्याला एकच उपाय आहे. तो कोणता म्हणाल तर वर्म पाहून घाव घालावा कीं, आलीच हातांत !
आनंद० -- म्हणजे ?
तुळाजी० -- म्हणजे एखाद्या अडचणीच्या प्रसंगांत गांठून लगट करावी कीं झालीच स्वाधीन म्हणून समजा. असें केल्यानें आपला कार्यभाग सहज साधून जातो. त्रास नको, अर्जव नको, कांहीं नको !
आनंद० -- ही तुमची युक्ति खरी आहे. पण यांत आपल्याकडे थोडा नामर्दपणा येतो. कारण प्रसंगांत सांपडल्यावर पुरुषासारखा पुरुषसुद्धां पाहिजे त्याला हूं म्हणेल, मग ही तर बायको ! ही कबूल होईल यांत विशेष काय ? मला खुषीचा सौदा करायचा. बरें आतां गप्पांत अर्थ नाहीं. तिची जाऊन गांठ घेतों.
तुळाजी० -- हं चला. पण माझी युक्ति तुम्हांला पसंत पडली नाहींसें दिसतें ! असो. तुमच्या म्हणण्याप्रमाणें कां होईना, कुणीकडून कार्यभाग झाल्याशीं कारण. इकडे पडलों तुमचा स्नेही, तिकडे पडलों तिचा दीर. दोघांकरितांही मला झटलेंच पाहिजे. ( इतक्यांत दुर्गा आपल्या वाड्याच्या खिडकींतून दिवस किती आला, हें पहाण्याकरितां बाहेर पहाते. )
तुळाजी० -- अहो, ती पहा वयनी खिडकींत उभी आहे. आमचे बंधु वारून आज सात वर्षें झालीं, पण बिचारीची ती दु:खित मुद्रा पाहुन नुक्ते काल वारले कीं काय असें वाटतें !
आनंद० -- प्रीति म्हणजे अशीच असली पाहिजे. बरें जातों तर. ( असें म्हणून दुर्गाच्या वाड्याकडे निघून जातो. )
तुळाजी० -- ( आपल्याशीं ) बाबा म्हणतात त्याप्रमाणें ही माझी पांढर्या पायांची भावजय खरोखरीच मूर्तिमंत साडेसाती आहे. कांहीं तरी कुभांड रचून मीं हिला आमचा वाडा तर बंद केलाच, आतां माझें पुढचें काम म्हणजे इतकेंच कीं, ही घोरपड आनंदरावाच्या गळ्यांत घालावयाची !
म्हणजे थोडक्याच दिवसांत स्वारीचें वाटोळें झालें म्हणून समजावें; आणखी त्याच्याच गळ्यांत घातली पाहिजे. कारण, त्याच्या सर्व घरच्या माणसांना श्रीमंतीची मोठी घमेंडी चढली आहे. वास्तविक पाह्तां काल भीक मागत फ़िरत होते; पण कुठें रेषा उपटली म्हणून या भाग्याला चढले. तेव्हां थोरपणाचा इतका गर्व येणें, व आम्ही म्हणजे अगदीं य:कश्चित् नादान मनुष्य आहोंत असें त्यांनीं मानणें हें कांहीं आपल्याला पसंत नाहीं. आतां आनंदरावाशी जरी मी वरवर स्नेहभावानें वागतों, तरी त्याच्या घरच्या माणसांची रिकामी ऐट मला सहन होत नाहीं. या आनंदरावाच्या बहिणीनें आपल्या स्वरूपाच्या व थोरपणाच्या तोर्यांत माझा अव्हेर केला हीही गोष्ट माझ्या मनांत जळत आहे. त्या अपमानाचें स्मरण झालें म्हणजे सर्वांगाचा भडका होऊन जातो. माझ्यांत तिनें असें कोणतें व्यंग पाहिलें होतें ? माझें घराणें अगदीं हलकट असें तिला वाटलें काय ? आणि त्या पोरीच्या बोलण्याला त्या आनंदरावाच्या थेरड्यानें आणि थेरडीनें रुकार दिला काय ? बरें आहे म्हणावें ! याचा वचपा काढीन तेव्हां सोडीन ! वयनीच्या पायगुणानेंच कां होईना, पण त्याच्या घरादाराची धूळधाण करवीन तरच नांवाचा तुळाजीराव ! आणखी मी म्हणतों त्याप्रमाणें होणार; कारण वयनीविषयीं आनंदरावाच्या मनांत आज सात वर्षें खिळून राहिलेली आशा त्याच्या देवाच्यानें सोडवत नाहीं. तो तिच्या पायां पडेल, तिचीं आर्जवें करील, काय पाहिजे तें करील, पण तिच्याशीं पाट लावील. तिलाही सध्यां कोणाचा आधार नाहीं. तेव्हां अन्नानदशा झाली पाहिजे ती सुद्धां नाहीं म्हणायची नाहीं. ( किंचित् विचार करून व इकडे तिकडे फ़िरून ) तें एक तिचें कारटें ! सापाच्या पोराप्रमाणें माझ्या मार्गांत विघ्न करणारें आहे ! तिला बाहेर घालविल्यामुळें त्याची कांहीं फ़ारशी भीति नाहीं म्हणा, परंतु न जाणो, बाबांची लहर आहे ती ! त्या कारट्याची मला लवकर कांहीं तरी व्यवस्था लावली पाहिजे. चला, आतां कुठें तरी फ़िरकी मारून परत जातांना वयनीच्या बिर्हाडावरूनच घरीं जाऊं म्हणजे झालें. ( असें म्हणून निघून जातो. )