श्रीसूक्तविधानम - प्रास्तविक
ग्रंथ वाचण्याआधी हे प्रास्तविक वाचणे जरूरीचे आहे.
ग्रंथांत साधारणपणें २० प्रकरणें आहेत. १ प्रथम प्रकरणात श्रीसूक्ताचे ऋषि, देवता, छंद यांचा विचार केला आहे. २ न्यास प्रकरणांत न्यासाची आवश्यकता, फ़ल व भेद स्पष्ट केले आहेत, न्यास व मुद्रा कोणत्याही सप्तशतीसारख्या अनुष्ठानांत उपयुक्त असलेल्या सांगितल्या आहेत. ३ तंत्रानुष्ठानांतून मानसपूजा येत असते, तिचें स्वरूप व प्रयोजन दिलें आहे. ४ नंतर श्रीसूक्तानुष्ठानोपयोगी असणारे न्यासाचे भेद मूलवचनासह दिले आहेत. त्यांतिल कोणताही एक भेद आचर्ण केला तरी सिद्धि होते. अनुष्ठानांत ऋषिन्यास, करन्यास, हृदयादिषडंग व पंचदशांग न्यास घ्यावे. हृदयदि षडंग व पंचदशांग न्यासानेंही कर्मपूर्ति होते. ५ - ६ यांत पुरश्चरण म्हणजे काय ? तें कां करावें ? याचा वचनासह विचार करून श्रीसूक्त्पुरश्चरणाचे मुख्य भेद दिले आहेत. त्यांत पुरश्चरणसंख्येचे दिलेले चार प्रकार हे समस्त आवृत्तिपक्षीं युक्त होतात असें आमचें मत आहे. पं. वैद्यनाथ पायगुंडे यांनीं समस्तसूक्तावृत्तिपक्षाला मान्यता दिली नाहीं. द्वादशसहस्त्रादि संख्या ऋक्पक्षीं घ्यावी असें त्यांचें मत आहे. शांतिरत्नादि प्राचीन पंडितांनीं द्वादशसहस्त्रादि संख्या समस्तसूक्तावृत्तिपक्षीं मानली आहे. म्हणजे बारा हजार, बाराशें, पंधराशें किंवा सहस्त्र आवृत्ति श्रीसूक्ताच्या कराव्या मह्णजे पुरश्चरण होतें असें प्राचेनांचें मत आहे. म्हणून आमचे ग्रंथांत दोन्ही पक्ष सप्रमाण दिले असून तदनुसार अनुष्ठानोपयुक्त सविस्तर स्वतंत्र प्रयोग दिले आहेत. येथें एक गोष्ट लक्षांत घ्यावी कीं, आश्विन शुद्ध प्रतिपदा अथवा पूर्वोक्त कोणत्याही शुभमासीं शुक्ल प्रतिपदा ते एकादशी हा जो पुरश्चरणाचा काल दिला आहे तो ऋक्पक्षींच संभवतो. त्याकरितांच घ्यावा. समस्तसूक्तावृत्तिपक्षीं तो असंभवनीय आहे. बारा हजार सूक्तावृत्ति अकरा दिवसांत स्वत: करावयाच्य तर रोज एक सहस्त्रापेक्षां अधिक कराव्या लागतील; त्या होणें कठीण आहे; अर्थात् यापक्षीं वरील कालाचा निर्बंध नाहीं. शुभमासीं शुभदिवशीं आरंभ करून समातिदिनानुरोधानें नियमित आवृत्ति ठरवून यमनियमांचे परिपालन करून कराव्या इत्यादि विचार या पुरश्चरणप्रकरणांत आम्हीं केला आहे. ७ देशकालविचार यांतील देशकालनिर्देश केवळ श्रीसूक्तानुष्ठानाकरितांच नसून कोणत्याही मंत्रानुष्ठानाला घ्यावा. ८ कोणत्याही मंत्रपुरश्चरणापूर्वी साधकानें कोणकोणत्या गोष्टी आचाराव्या हें सांगितलें आहे. ९ जपसंख्येला उपयुक्त असें मालाविचारप्रकरण दिलें आहे. १० यांत यमनियम व वर्ज्यावर्ज्य गोष्टे दिल्या आहेत. ११ पूजाविधिप्रकरण हें अत्यंत महत्त्वाचें असल्यानें प्रत्येकानें अवश्य वाचावें. नित्याची घरांतील सामान्य देवांची पूजा कशी करावी ? कोणता उपचार कसा समर्पण करावा ? संकल्प कां व कसा करावा ? इत्यादि सप्रमाण दिलें याचा मराठी अर्थ आहेच. १२ -१३ यांत पुरश्चरणानुष्ठानप्रयोग, नित्यजपविधि, वगैरे विषय आहेत. १४ - १५ पुरश्चरणांग होम - तर्पण मार्जनप्रयोग दिला आहे. १६ भविष्यपुराणोक्त सबीजश्रीसूक्तपुरश्चरणप्रयोग आहे. या प्रयोगाचीं कांहीं जीर्ण पृष्ठें आमचे संग्रहीं होतीं व तोच संपूर्णपणें प्रयोग कोल्हापुर येथील पं. वे. शा. सं बंडोपंत धर्माधिकारी यांचे संग्रहांत होता तसाच आहे. आणखी सबीजानुष्ठानाचे अनेक प्रयोग आहेत ते येथें दिले नाहींत. १७ श्रीयंत्र व श्रीसूक्तयंत्र दोन्ही भिन्न असून श्रीसूक्तानुष्ठानाकरितां श्रीसूक्तयंत्र घ्यावयाचें आहे. त्याचे प्रकार व उद्धार प्रत्यक्ष सप्रमाण दिले आहेत. १८ विविधानुष्ठानप्रयोग या प्रकरणांत श्रीसूक्ताचा नित्यजप, नित्यहोम, नित्यतर्पण हें कसें करावें याची माहिती कोठें मिळत नाहीं. ती या ठिकाणी प्रयत्नानें मिळवून पंडितांशीं विचारविनिमय करून प्रयोगबद्ध दिली आहे. साधकांना याचा फ़ार उपयोग होईल. विविधकामनेकरितां प्रयोग करणें झाल्यास कसें करावें, त्याचा संकल्प कसा, वगैरे विषय आहे. १९ श्रीसूक्तमंत्रविचार हें प्रकरण अवश्य वाचावें. यांत पाठभेदांची उद्भेदक चर्चा केली असून भाष्यानुसार पाठभेदांची निश्चिति केली आहे. २० शेवटीं श्रीसूक्तपदार्थबोधिनी संस्कृतटीका व अर्थप्रकाशिका नांवाची मराठी टीका यांसह दिलें आहे.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP