श्रीविद्याबळमत्त प्रभु शुंभनिशुंभ जाहले होते,
शक्रादिलोकपाळकरविचंद्रपदासि लाहले हो ! ते. १
काळातेंहि न भीती जे, ते भीतील दैत्य कां पवितें ?
तद्बळ सुरांसि कांपवि, जेंवि दरिद्रासि शैत्य कांपवितें. २
तीतें शक्रादिसुर स्तविती, जवुनि तदा हिमनगातें,
जीच्या वात्सल्यातें सर्व सुकविचें सदाहि मन गातें. ३
सुरजन करीत होता केवळ दीना जनासम स्तवन,
तद्रचितस्तवनादें नादमयचि होय तें समस्त वन. ४
तों त्या स्थानीं गौरी ये गंगातोयमज्जन कराया,
जी त्या हिमालयातें म्हणत्ये, ‘ हा होय मज्जनक; ’ राया ! ’ ५
जी म्हणत्ये, ‘ निजदासाहूनि सुरभिचा न वत्स भासुर हो. ’
ती त्यांसि पुसे, ‘ करिती कोणाचा स्तव भवत्सभा ? सुर हो ! ’ ६
तों तछरीरकोशापासुनि सहसा निघे शिवा, मग ती,
स्तविति ‘ मज, ’ म्हणे ‘ केलें शुंभनिशुंभादिशत्रुनीं अगती. ’ ७
झाली शरीरकोशापासुनि यास्तवचि कौशिकी नामें,
तद्दर्शनींच आलीं, जीं नव्हतीं, तीं सुरव्रजीं धामें. ८
निघतांचि शिवा, झाली कृष्णा, जी तप्तकांचनछवि, ती;
गौरीस ‘ काळिका ’ हें ठेउनि अभिधान यास्तव स्तविती. ९
होती हिमाचळीं श्रीजगदंबा परमसुंदरी तीतें,
खळ चंडमुंड देखति, जे वश सुंदोपसुंद - रीतीतें. १०
ते दुष्ट भृत्य तेथुनि जावूनि, कुशीलमद्यकुंभातें
स्वस्वामीतें भेटुनि, ऐसें प्रार्थूनि म्हणति शुंभातें: - ११
" सुमनोहराकृति, महाराजा ! आम्हीं विलोकिली महिला.
शोभविती निरुपमनिजदेहद्युतिनें हिमाद्रिच्या महिला, १२
उत्तम रूप तसें तों कोणीं कोठें न देखिलें होतें,
जाणों, न करें, विधिनें चतुरें चित्तेंचि रेखिलें हो ! तें. १३
ती कोण स्त्री ? प्रभुनें शीघ्र निपुण, शोध करुनि, जाणावी,
देखावी स्वामीनें, घ्यावी, निजमंदिरासि आणावी. १४
देवा ! देहद्युतिनें ती युवति दिशा दहाहि शोभवित्ये,
जसि चंद्रिका चकोरा , तसि जो प्रेक्षक, तयसि लोभवित्ये. १५
रत्नें, मणि, गज, वाजी जे जे उत्तम पदार्थ लोकांत,
ते ते सर्वहि सांप्रत शोभति शुंभा ! तुज्याचि ओकांत. १६
ऐरावत गजरत्न, दुमरत्नहि पारिजात, हयरत्न
उचै:श्रवाहि, शक्रापासुनि त्वां आणिला, करुनि यत्न. १७
जें अत्यद्भुत, दिव्य, ब्रह्मयाचें, हंसयुक्त अजि ! राया !
तुझिया विमानरत्नहि सेवितसे सर्वकाल अजिरा या. १८
निधिमुख्य महापद्महि धनदापासूनि आणिला आहे;
तुजला दिली समुद्रें माला अम्लानपंकजा बा ! हे. १९
वारुण कनकस्त्रावि छत्र तुझ्या मंदिरीं असे स्वामी !
पूर्वीं प्रजापतीचा जो रथवर, तोहि या वसे धामीं. २०
त्वां मृत्युशक्ति हरिली, जीचें उत्क्रांतिदा असें नाम,
कोणा अर्थाविषयीं सफ़ळ न झाला प्रभो ! तुझा काम ? २१
पाश सलिलराज्याचा तव अनुज्याच्या परिग्रहीं, धन्या !
ज्या ज्या समुद्रजाता, त्या त्या सद्रत्नजातिही अन्या; २२
तैसींच अग्निशौचें दहनेंही तुज दिलीं प्रभो ! वस्त्रें,
यापरि सकळें रत्नें, त्वां प्रभुनें स्पष्ट जोडिलीं शस्त्रें. २३
मग रनभुग्वरें त्वां ऐसें स्त्रीरत्न कां न जोडावें ?
या लाभाकरितां तों कुशळें सर्वस्व तुछ सोडावें. " २४
खळभृत्यकथित कुमत श्रवण करुनि, दुष्टमतिसुराकुंभ
न करुनि विचार कांहीं निज दूतातें असें म्हणे शुंभ - २५
" सुग्रीवा ! शीघ्र करीं; जेणें वश होय रत्नभूता, तें, "
सांगे मदांध जैसा वेताळ सुधाप्तियत्न भूतातें. २६
‘ कासार असे समुचित, तो तव संगम सुरापगे ! लाहो, ’
ऐसें म्हणावया त्या परम शिवेप्रति सुराप गेला हो ! २७
दूत म्हणे, " देवि ! जसा जलनिधिपानें प्रसिद्ध कुंभज या
त्रैलोक्यांत, तसाचि प्रख्यात असे करूनि शुंभ जया. २८
जो अहताज्ञ सुरांत, स्वजना बहु देतसे मद हतारी,
असुरां प्रताप ज्याचा व्यसनीं, म्हणउनि परा ‘ अहह ! ’,तारी. २९
दैत्येश्वर, परमेश्वर, माझ्या वदनेंकरूनि आपण तो,
श्रवण करावें त्वां तें, देवि ! त्वदनुग्रहार्थ जें म्हणतो - ३०
‘ त्रैलोक्य सकळ माजें, मजला झाले समस्त सुर वश, तें
यश ऐकिलें जगें, जें विश्रुत गंधर्वराजसुरवशतें. ३१
इंद्रादिदेवता मीं, सेवितसें सर्वयज्ञभागांतें,
माझा प्रताप दु:खह अहितांतें, गरुड जेंवि नगांतें. ३२
लोकत्रयांत रत्नें जीं जीं ऐरावतादि गजरत्नें
होतीं ज्यांचीं, त्यांहीं आणुनि मज तीं समर्पिलीं यत्नें. ३३
क्षीरधिमथनोद्भव जो नामें उच्चै:श्रवा यशें सजला,
हरिवाहन, हरिरत्न, प्रणतसुराहीं समर्पिला मजला. ३४
जीं रत्नें देवांचीं, गंधर्वांचीं, तसींच नागांचीं,
तीं झालीं प्राप्त मला, व्हावींच फ़ळें जसीं स्वयागांचीं. ३५
स्त्रीरत्न मानितों तुज, लोकीं मीं रत्नमात्र सेवितसें,
ये मजकडेचि, आलें रत्नांतर निजयशोर्थ देवि ! तसें. ३६
स्त्रीरत्न म्हणुनि भज तूं मज, करित्या शत्रुहानि शुंभातें,
कीं गुरुपराक्रमा या मत्तुल्या मदनुजा निशुंभातें. ३७
तूं मत्परिग्रहास्तव परमैश्वर्यासि पात्र होशील.
व्हायासि मत्परिग्रह, तुजवरिच तुझें प्रसन्न हो शील. ’ " ३८
दुर्जनदूतोक्त असें ऐके, ऐको नये कधीं, परि तें,
गंभीर अंतरीं स्मित करुनि, भगवती स्वयें वदे अरितें. ३९
" दूता ! किमपि न मिथ्या, तूं वदलासि स्ववृत्तिहित साच,
त्रैलोक्याचा अधिपति शुंभ जसा, तो निशुंभहि तसाच. ४०
‘ तरि कां ‘ अवश्य ’ न म्हणसि ? ’ ऐसें वदसील, सांगत्यें, परिस,
सोडूं नये प्रतिज्ञा, धर्म नसे सत्यभाषणापरिस. ४१
अल्पमतित्वें आपण हा पण दूता ! मनांत म्यां पहिला
केला आहे; ‘ अनृता भ्यावें, तितुकें भिवूं नये अहिला. ४२
‘ जो मज जिंकील रणीं, मम गर्वातें करील जो दूर,
तो मज समबळ, माझा भर्ता होइल, जनांत तो शूर. ’ ४३
ऐसा मत्पण, यास्तव करुनि रणीं गर्वहानि, शुंभानें,
किंवा शीघ्र धरावा, जिंकुनि मज, पाणि हा निशुंभानें. " ४४
दूत म्हणे, " गर्विष्ठे ! न वद असें, मजपुढें कसें वदसी ?
शुंभ - निशुंभ सुदुर्जय, कंपद पविपाणिलाहि कीं तदसी. ४५
त्रिजगीं कोण पुरुष, जो शुंभनिशुंभांसमोर राहेल ?
पाहेल घूक रविला ? काय शश हरिप्रहार साहेल ? ४६
अन्यां दैत्यांहिपुढें सर्व सुरांचेहि कांपती काय,
मग शुंभादिसमक्ष, स्त्री जी, न धरील कांप ती काय ? ४७
जासील एकली स्त्री तूं कैसी त्यांसमोर उत्साहें ?
स्पष्ट तुझें तुज दिइल जोडुनि अविचार शील कुत्सा हें. ४८
अभिमान मनीं धरिला, तो द्याया दु:खरौरवा जागे,
देवि ! न होउनि केशाकर्षणनिर्धूतगौरवा जा, गे ! " ४९
देवी दूतासि म्हणे, " वदलासि जसें, तसेंचि हें आहे,
शुंभ, तसाचि निशुंभ प्रभु, पणही, न स्वलंघना साहे. ५०
काय करूं मीं ? केली न विचार करुनि असि प्रतिज्ञा, त्यां
जा सांग, असें कृतपणरक्षार्थ धरुनि असिप्रति, ज्ञात्या ! ५१
भ्यावें स्वपनापूर्वीं म्यां, आतां भिवुनि काय गा ! होतें ?
माझा निरोप सर्व्हि सांग तया, योग्य जें करो तो तें. " ५२