‘स्वत:चा गुण (पहिल्या वस्तूनें) टाकून देऊन (नंतर) स्वत:च्या शेजारीं असलेल्या दुसर्या वस्तूचा गुण ग्रहण करणे, याला तदगुण अलंकार म्हणावें.’
उदा० :--- “एका कृशांगीनें (स्त्रीनें) मालतीच्या फुलांचा झुबका आपल्या नाकाजवळ नेला असतां, तो तिच्या खालच्या ओठावरच्या लाल रंगामुळें दुपारीच्या (लाल) फुलांच्या झुबक्यासारखा दिसू लागला.”
किंवा हें उदाहरण :----
“खालच्या ओठाच्या लाल रंगानें, त्या ओठाच्या जवळ त राहत असल्यामुळें, दातांचा शुभ्रपणा झाकून गेला; तरीपण त्या सुंदर स्त्रीच्या (शब्दाश:, सुंदर पापणीच्या डोळ्यांनी युक्त) शुभ्र हास्यानें तो (दातांचा शुभ्रपणा) पुन्हां परिपुष्ट होऊन झळकूं लागला.”
या दोन उदाहरणांपैकीं पहिल्यांत, मालतीच्या (पांढर्या) फुलांचा झुभका खालच्या ओठाच्या लाल रंगानें रंगानें रंगून गेल्यामुळें, दुपारीच्या फुलांच्या झुबक्यासारखा (लाल) झाला, म्हणून तदगुण अलंकार. दुसर्या उदाहरणांतल्या पूर्वार्धांत तदगुण अलंकार स्पष्ट आहे; पण उत्तरार्धांतील, बाधकाचें बाधक जें हास्य, त्या हास्यानें, त्या तदगुणाचा बाध केल्यानें, तो (शेवटपर्यंत) टिकला नाहीं. आतां जर त्या हास्यानें लाल ओठाला शुभ्र करून टाकून त्याच्या (म्ह० खालच्या ओठाच्या) त्या पांढर्या रंगाच्या द्वारा नंतर दातांच्याही (नव्या) लाल रंगाचा बाध केला, (असें मानिलें) तर उत्तरार्धांतही आणखी एक तदगुण अलंकार (मानतां येईल.)
ह्या उत्तरार्धांतील प्रकाराला कुणी ‘पूर्वरूप अलंकार’ असें नांव देतात.
‘उल्लास’ अलंकारांतही एकाच्या गुणानें दुसर्यांत गुण उत्पन्न होणें ही गोष्ट तद्नुणासारखी असली तरी (त्यामुळें त्याला तदगुण म्हणता येणार नाहीं; कारण) ‘उल्लास’ अलंकारांत पहिल्याच्या गुणामुळें दुसर्यांत, पहिल्याचाच गुण उत्पन्न होतो असें नसून, पहिल्याच्या गुणाचा, दुसर्याच्या गुणाशीं संबंध झाल्यानें, दुसर्यांत एक दुसराच गुण उत्पन्न होतो, (हें ध्यानांत ठेवण्यासारखें आहे). जसें चुना वगैरे क्षार द्रव्यामुळें हळद वगैरेंत तांबडेपणा उत्पन्न होतो, त्याप्रमाणें तेथेंही समजावें. पण जास्वंदीच्या फुलांचा लालपणा जसा स्फटिकांत उतरतो, तसा या तदगुण अलंकारांत पहिल्या वस्तूचा गुणच दुसर्या वस्तूंत उतरत असल्यामुळें उल्लासाहून हा तदगुण निराळा पडतो.
अर्थात एका गुणाचा दुसर्या गुणांशीं संबंध आपापल्या वस्तूच्या संबंधद्वाराच येतो हें शास्त्रीय मत खरें असलें तरी, स्फटिकाच्या द्दष्टांतांत मात्र जास्वंदी ह्या वस्तुद्वारा लाल रंग स्फटिकांत उतरतो असें नसून, स्वतंत्रपणें लाल रंग स्फटिकांत उतरतो; या द्दष्टीनेंच, या ठिकाणीं एकाचा गुण दुसर्यांत उतरतो असें म्हटलें आहे.
येथें रसगंगाधरांतील तदगुण प्रकरण समाप्त झालें.