‘अनेक वस्तूंचा एकाच वेळीं परस्परांशीं संबंध येणें हा समुच्चय अलंकार.’
‘युगपत’ (एकाच वेळीं) हा शब्द, ‘अगदीं एकाच क्षणीं’ असें सांगण्याकरतां योजलेला नसून, (ह्या अलंकारांत) वस्तूंच्या एकत्र येण्यांत कसलाही क्रम नसतो, हें दाखविण्याकरितांच योजिला आहे; म्हणून (ह्यांतील वस्तूंच्या एकत्र येण्य़ांत,) थोडेसे वेळेचें अंतर असलें तरी, त्यामुळें समुच्चय अलंकाराला बाध येत नाहीं.
समुच्चय, प्रथम, दोन प्रकारचा (१) धर्मीचा भेद असलेला व (२) धर्मीचें ऐक्य असलेला म्ह० धर्मीं एक असलेला. या दुसर्या (धर्म्यैय या) प्रकाराचे पुन्हां दोन प्रकार :--- (१) कारणता या संबंधांहून इतर संबंधानें, एक धर्मींचा संबंध असणें. (२) व कारणता या संबंधानें, एक धर्मीचा संबंध असणें. अशा रीतीनें झालेल्या या तीन प्रकारापैकीं पहिल्या दोन प्रकारांत, गुणांचा, क्रियांचा व गुणक्रियांचा परस्पर संबंध येणें, असें (प्रत्येकीं तीन तीन) पोटप्रकार संभवातात. व शेवटच्या तिसर्या प्रकारांत रमणीय, अरमणीय व रमणीयारमणीय अशा पदार्थांचा संबंध होणें, असे तीन पोटप्रकार संभवतात.
‘पुढें सांगितलेल्या समाधि अलंकाराचा व याचा (समुच्चयाचा) घोटाळा होईल,’ अशी शंका घेऊं नये. कारण एखाद्या कारणानें कार्यसिद्धि होत असतांही दुसर्या एखाद्या कारणानें, अचानक येऊन, त्या कार्यांत सुळभता वगैरेपैकीं एखादा विशेष गुण उत्पन्न करणें, हा समाधि अलंकाराचा विषय. पण या (वर सांगितलेल्या) समुच्चयाच्या) सर्व प्रकारांचा, “एकच कार्य करण्याकरतां एकाच वेळीं अनेक कारणें, एकाच वेळीं खळ्यावर अनेक पारवे यावेत तशीं, चढाओढीनें येतात, पण इतकेंही असून कार्यांत कसलाही विशेष उत्पन्न होत नाहीं.” हा विषय.