विकल्प अलंकार - लक्षण २

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


आतां :--- “भक्तीनें नम्र अशा भक्तांना पाहण्याची आवड असणारीं (तुन, आणि आवड असणारे दोन डोळे असें दोहोंकडेही हें विशेषण लागू पडतें व पुढील सर्व विशेषणें हीं अशींच तनु व नेत्रें यांना लागू पडतात.) नील कमलाशीं स्पर्धा करणारी (तनु व डोळे); इष्ट प्राप्तीकरतां सामाधिरत योग्यांनीं ध्यानाचा विषय केलेलीं (तनु व डोळे); लावण्ण्याच मोठा खजिना (तनु व डोळे); लक्ष्मीच्या डोळ्यांना रसिक करणारीं (तनु व करणारे डोळे); अशीं, भगवान् विष्णूची तनु - देह व डोळे हीं तुमच्या संसारदु:खाचा नाश करोत.”
ह्या ठिकाणीं विकल्प अलंकार आहे;  विष्णूची तनु व डोळे दोघेही उत्तम असल्यानें दोहोंमध्यें (विकल्पकारणतारूपी) तुल्यबलता सारखीच आहे.” असें अलंकारसर्वस्वकारांनीं म्हटलें आहे, तें चूक आहे; कारण संसारदु:खाचा नाश करण्यामध्यें तनु व डोळे दोघेही एकाच वेळीं कर्ते झाले, (म्ह० नाश करणारे झाले.) तरी त्यांत विरोध कांहींच नसल्यानें विकल्प (अलंकार) उभा राहूच शकत नाहीं. (विकल्पालंकारांत तुल्यबल अशा दोन धर्मीत परस्पर विरोढ असल्यानें, एकाच वेळीं एकत्र राहणें अशक्य असतें; म्हणून त्यांच्यांत विकल्प मानावा लागतो, तसें येथें नाहीं.). विरोध (दोन तुल्यबल पदार्थांत विरोध) असेल तरच विकल्प होतो, असें त्यांनींच (सर्वस्वकारांनींच) म्हटलें आहे. (त्यांच्या वतीनें) कुणी म्हणतील कीं, ‘देहामध्यें डोळ्यांचा समावेश होत असल्यानें, त्या डोळ्यांचा देहाहून निराळा उल्लेख करणें योग्य नसलें तरी, त्यांचा जो येथें उल्लेख केला आहे तो, वक्त्याच्या मनांत, तनु व दोन डोळे यांच्यांत विरोध आहे, असा अभिप्राय असल्याचें सुचवितो.” पण असेंही म्हणतां येणार नाहीं; कारण खराखुरा विरोध असेल तरच तो विकल्पाला उठवू शकतो, (काल्पनिक विरोध विकल्पाला उठवून शकत नाहीं.) वक्त्याच्या केवळ इच्छेवर अवलंबून असणारा (काल्पनिक) विरोध कांहीं कामाचा नाहीं; आणि (समजा, काल्पनिक विरोध, विकल्पाला उठवू शकत असला तरी,) असला विकल्प सुंदर नसतो. (अर्थात अलंकार होण्याच्या योग्यतेचा असला विकल्पा सुंदर नसतो. (अर्थात अलंकार होण्याच्या योग्यतेचा नसतो.) खरें म्हणजे, ‘सकलकलं पुरमेतज्जातं संप्रति सुधांशुबिम्बमिव ।’ [ हे नगार चंद्रबिंबाप्रमाणें सकलकल (१ कलकलाटानें युक्त नगर, व २ सकल कलांनीं युक्त, चंद्रबिंब) झालें आहे.] या ठिकाणीं ज्याप्रमाणें श्लेषमूलक उपमा आहे, त्याप्रमाणें येथेंही श्लेषमूलक आहे. तनुर्वा ह्याचा अर्थ देहाप्रमाणें (वा शब्द उपमावाचक समजावा); ‘वास्याद्विकल्पोपमयो;’ ह्यांत, वा ह्या शब्दाचा, ‘इवार्थ’ :--- म्हणजे ‘प्रमाणें’ अर्थ असल्याचें सांगितलें आहे. तुम्ही म्हणाल (तनु: व नेत्रे ह्यांच्या विशेषणांत तनूची विशेषणें एकवचनी व नेत्रें ह्यांचीं विशेषणें द्विवचनीं असा) वचनाच्या बाबतींतला हा फरक उपमेंतला दोष आहे’ पण असें म्हणणेंही योग्य नाहीं; कारण एखादा साधारण धर्म उपमेयाशीं सामानाधिकरण्यानें विशेषण म्हणून अन्वित होत असतां त्याचें एका रूप; आणि उपमानाशीं अन्वित होत असतां दुसरें रूप; असा त्याच्या रूपांत फरक (वैरूप्य) होत असेल तरच त्या ठिकाणीं लिंग अथवा वचन यांच्या भेदामुळें दोष (उपमेंत) उत्पन्न होतो, असें (शास्त्रकारांनीं) हंसीप्रमाणें पांढरा चंद्र व तळ्याप्रमाणें स्वच्छ आकाश) ह्या उपमा वाक्यांत, हंसीकडे (धवल हें विशेषण लावतांना) धवला (रूप होतें, व चंद्राकडे लावतांना धवल: (हें रूप० होतें. तसेंच ‘सरांसि’ कडे (अमल हें विशेषण लावतांना) अमलानि असें (बहुवचनी) रूप होतें, अशा ‘नभ:’ कडे लावतांना ‘अमलम्’ असें (एकवचनी) रूप होतें. अशा रीतीनें, साधारण धर्म (धवल व अमल हे) उपमानाकडे लावतांना निराळे व उपमेयाकडे लावतांना निराळे असे निराळे होत असल्याचें प्रतीत होतें; त्यामुळें उपमा चपखळ बसत नाहीं (उत्पन्न होत नाहीं.) यावर कुणी विचारतील, “तर मग सरांसीव नभ: या लुप्तोपमेंत वचनदोष होतो असें कसें म्हणतां येईल ?(वचनभेद हा दोष कसा होईल ?)” यावर उत्तर हें कीं, अशा लुप्तोपमेंतही गम्य असणारा साधारण धर्म (उपमानाकडे व उपमेयाकडे लावतांना) निराळा होत असल्यास, त्यामुळें वचनभेद (अथवा लिंगभेद) दोष होतोच, असें (शास्त्रकार) मान्य करतात. कुणी म्हणतील, “(अशा लुप्तोपमेंत) गम्य साधारण धर्म स्वत:च्या वाचक अशा शब्दानें, सांगितला जात नसल्यामुळें तो (साधारण धर्म) अमुक एका लिंगानें (अथवा वचनानें) विशिष्ट असा अर्थातच नसतो (कारण साधारणधर्मवाचक शब्दच येथें नाहीं, तेथें त्याच्या लिंगाची किंवा वचनाची गोष्टच कशाला ?); त्यामुळें (अशा ठिकाणीं साधारणधर्माच्या निराळ्या स्वरूपाची (वैरूप्याची) शक्यताच नसतें.” पण ही शंका योग्य नाहीं. कारण (विशिष्ट) शब्दानें उक्त असाच अर्थ प्रतीत होतो, असें मानणेंच (शास्त्रकारांना) इष्ट आहे. म्हटलेंच आहे :--- ‘न सोऽस्ति प्रत्ययो लोके य: शब्दानुगमद्दते’ [म्ह० जगांत असा कोणताही (पदार्थाचा) अनुभव नाहीं कीं, जो शब्दावांचून होऊन शकतो.]. किंवा अशा गम्य साधारणधर्माच्या वाक्यांत श्रुतार्थापत्ति मानली तर शब्दाचीच कल्पना करावी लागते; व मागाहून त्या शब्दानें, अर्थ सांगितला जातो. तेव्हां (अशा ठिकाणीं, शब्दाचीच कल्पना केली जात असल्यानें) निराळेपणा येणारच (म्ह० साधारणधर्मवाचक शब्द निराळे होण्याचा संभव खरा). अशी वस्तुस्थिति असल्यानें, राजते भासते इत्यादि क्रियापदांनीं दर्शविलेला (क्रियापदरूपी) साधारणधर्म असतांना ज्याप्रमाणें लिंगभेद अथवा वचनभेद (रूपी) हा दोष संभवत नाहीं, त्याप्रमाणें प्रस्तुत ‘भक्तिप्रहवे०’ या श्लोकांतही लिंगवचनभेदरूपी दोष संभवत नाहीं. (करण तनु: व नेत्रे यांचीं विशेषणें, बदल न करतां, आपापल्या विशेष्याकडे सरळ लागतात); आणि म्हणूनच, ‘यस्मिन्नतिसरसो जनो जपदाश्च’ [ज्या राज्यांत लोक अत्यंत रसिक होते; व देशही अतिसरस: (म्ह० ज्यांत सरोवरें अत्यंत भरपूर होतीं असे) होते]. या वाक्यांतली श्लेषमूलक तुल्ययोगिता जुळते. (म्ह० तिच्यांतही वचनभेदरूपी दोष नाहीं). असें न मानलें तर, तुल्ययोगितेच्या पोटांत उपमा असल्यानें अशा ठिकाणीं उपमेचा वचनभेद दोष मानल्यास तुल्ययोगिताही वचनभेदरूपी दोषानें युक्त होण्याची वेळ येईल शिवाय, श्लेषस्थलीं (साधारण धर्माच्या) लिंग, संख्या (वचन) यांच्यांतील भेद वगैरेंना दोष मानू नये असा अपवादाला अपवाद (प्रतिप्रसव) आहे. (म्ह० श्लेषाला सर्व दोष माफ आहेत असा अपवादाला अपवाद सांगितला आहे; अलंकारांत लिंगभेद वगैरे नसावेत हा अपवाद व श्लेषांत लिंगादिभेद चालेला हा प्रतिप्रसव). असें थोडक्यांत सांगता येईल.


येथें रसगंगाधरांतील विकल्प प्रकरण संपलें.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP