अर्थापत्ती अलंकार - लक्षण १

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


“कोणत्या तरी अर्थाशीं तुल्य (सारख्या) असणार्‍या न्यायामुळें (कारणामुळें) दुसर्‍या अर्थाचा प्रसंग (म्हणजे स्वीकारण्याचा प्रसंग) येणें याला अर्थापत्ति म्हणावें.”
न्याय म्हणजे कारण. ही अर्थापति प्रथम चार प्रकारची :--- (१) प्रकृत अर्थानें प्रकृत अर्थाची आपत्ति (२) अप्रकृत अर्थानें अप्रकृतार्थाची आपत्ति (३) प्रकृत अर्थानें अप्रकृत अर्थाची आपत्ति (४) अप्रकृत अर्थानें प्रकृतार्थाची आपत्ति, ह्या वरील चार प्रकारांचे प्रत्येकीं पुन्हां (येथील आपन्न म्ह० गळ्यांत पडणारा) दुसरा अर्थ (१) सम म्ह० सारख्या दर्जाचा (२) न्यून (कमी प्रकारचा) व (३) श्रेष्ठ प्रकारचा असा तीन प्रकारचा होऊन एकंदर बारा प्रकारची अर्थापत्ति होते; व नंतर त्या बारांचे प्रत्येकीं भावत्व व अभावत्व (भावरूप आपन्न अर्थ व अभावरूप आपन्न अर्थ म्ह० दुसरा अर्थ) यामुळें दोन प्रकार होऊन, एकंदर चोवीस प्रकारची अर्थापत्ति होते. ह्यांचीं नमुना म्हणून कांहीं उदाहरणें देतों. :---
“लीलेनें (सहज) शारदेच्या (वाग्देवीच्या) नगराला लुटून नेणारी ज्यांची बुद्धि आहे अशा आमच्यासारख्यांच्या पुढें, विद्येच्या घरांतून बाहेर गळून पडणारे (विद्येचे) कण चोरणारे पोरकत लोक (सामान्य कवि) जर बडबड करूम लागतील तर, (मात्र) उद्यां, पक्ष्यांचीं पिलें नागाच्या डोक्यांवर, ससे ह्त्तींच्या डोक्यावर, व कुत्रीं सिंहाच्या डोक्यावर, खुशाल पाय देऊ लागतील. (म्हणजे त्या पिल्लें वगैरेंचें कृत्य जितकें अविचाराचें ठरेल. तितकेंच आमच्यापुढें इतर कवींनीं बडबड करणें अविचाराचें ठरेल.)”
ह्या ठिकाणीं (कवींची बडबड ह्या) प्रकृत अर्थाशी गळ्यांत पडणार्‍या अप्रकृत अर्थाचे साम्य असून, तो साम्ययुक्त अर्थ मालारूप आहे. (म्ह० येथें माला अर्थापत्ति अलंकार आहे.)
“(हे भगवंता !) तुझे चरणकमल ह्रदयांत वागविणार्‍या माझ्या विपत्तींचा समूह जर नाहींसा होत नसेल तर, सूर्यानें मंडित असलेल्या दिवसाच्या मध्यभागीही अंध:काराच्या पटलांनी जिंकलेंच (म्हणायचें)”.
ह्या ठिकाणी, “न हत:” (ठार मारला नाहीं म्ह०च शाबूत राहिला,) या भावरूप (विद्यमानरूप) म्ह० नुसता ‘आहे’ या रूपानें असणार्‍या प्रकृत अर्थावरून, ‘जितम’ या शब्दानें गळ्यांत येऊन पडणार्‍या दुसर्‍या (अप्रकृत) अर्थाचा प्रतीत होणारा जो सर्वोत्कर्ष, त्या रूपानें (तो दुसरा अर्थ) आला असल्यानें, त्या दुसर्‍या अर्थाचें येथें आधिक्य (श्रेष्ठपणा) आहे. “खरें म्हणजे, येथें विपत्तींचा गण जसा नुसता आहे, तसेच अंधकाराचे समूहही नुसते आहेत, असें म्हणायला पाहिजे होतें; (जितम्) सर्वोत्कर्षानें राहतात असें म्हणायला नको होतें; कारण नुसतें ‘असणें’ व ‘सर्वोत्कर्षानें राहणें’ ह्या दोन गोष्टी परस्परांना अनुरूप नाहींत (एकमेकांशीं जुळण्यासारख्या नाहींत),” अशी शंका घेऊ नये. कारण भगवंताच्या पायाजवळ एक विपत्तींचा गण जर स्वस्थपणानें राहूं शकत असेल, तर अनेक अंधकारगणांचा सूर्याजवळ जय होणें, ह्यांतही दोष नाहीं.
“गरीब लोकांविषयीं सदा स्नेहाने द्रवणार्‍या भागीरथी ! तूं सुरभि गाय जशी आपल्या वासरावर, तशी बालक जो मी त्याच्यावर कृपा करणार नसशील तर, चिंतामणी, कृल्पवृक्ष (देवेश्वर इंद्राचा वृक्ष) वगैरे अचतेन (जड) पदार्थ, याचकांना एक कणाचीही भिक्षा कशाला घालतील ? (घालणर नाहींत.)” येथें (‘करणार नसशील या’० अभावरूप अर्थावरून (घालणार नाहींत या) दुसर्‍या अभावरूप अर्थाची आपत्ति आहे. स्नेहार्द्र भागीरथीरूप प्रकृत अर्थापेक्षां चिंतामणि वगैरे पदार्थांच्या ठिकाणीं ते अचतेन असल्यानें कमीपणा (न्यूनत्व आहे) व तें न्य़ूनत्व या पदार्थांचे ठिकाणी येत असल्यानें, अप्रकृत आहे.
“हे पुरुषसिंहा प्रेम करणार्‍या मला सोडून तूं गेला असशील तर, वनलक्ष्मीला सोडून वन निघून जाईल तर त्यांत आश्चर्य तें काय ?”
नलराजानें अरण्यांत सोडून दिलेल्या दमयंतीची, ध्यानांत स्वत:पुढें आणलेल्या नळाला उद्देशून, ही उक्ति आहे. ह्या ठिकाणीं येऊन पडलेला दुसरा अर्थ जो वनवृत्तांतरूप, तोहि जवळ असल्यामुळें, प्रकृतच आहे. तेव्हां (प्रथम अर्थ व दुसरा अर्थ) दोन्ही प्रकृतच आहेत; (पण) पुरुषसिंहापेक्षां वनाचें, तें वन नपुंसक असल्यानें, न्य़ूनत्व आहे. म्हणूनच याम्त काय आश्चर्य असें म्हटलें आहे.
“सर्वांचा गर्व हरण करणारा काल (ब्रम्हांडेंच्या) ब्रम्हांडें उंबराच्या फळांप्रमाणें गट्ट करून टाकतो; त्याला आम्हा चिलटांची काय पर्वा ? (काय किंमत ?)”
ह्या ठिकाणीं ब्रम्हांडें गट्ट करणें ह्या अप्रकृत अर्थानें, कैमुतिकन्यायानें सर्व प्राणिमात्राचें अनित्यत्व हा प्रकृत अर्थ प्रतिपादन केला आहे.
“सार्‍या क्षत्रिय जातीचें (वर्णाचें) निर्दलन करणार्‍या माझें तूं लक्ष्यच नाहींस (म्ह० तूं माझ्या शरसंधानाचा विषयच नाहींस); हे रामा ! कुलपर्वतांचा चुराडा करणार्‍या वज्राला झाडांची काय किंमत ?”
रामाला उद्देशून परशुरमाची ही उक्ति आहे. येथें श्लोकांतील दोन्ही वाक्यें मिळून होणारें जें महावाक्य त्यांत, प्रतिवस्तूपमा अलंकार आहे; व त्या महावाक्याचे अंश जीं, पहिल्या व दुसर्‍या अर्धांतील दोन वाक्यें, त्यापैकीं पहिला वाक्यार्थ (त्या प्रतिवस्तूपमेंतील) उपमेयवाक्यार्थ; व दुसर्‍या अर्धांतील वाक्यार्थ, उपमानवाक्यार्थ आहे. पैकीं उपमेयवाक्यार्थांत असलेल्या अर्थापत्ति अलंकारांत आपाद्यमान असा दुसरा अर्थ व त्याला (अर्थाला) कारण होणारा पहिला अर्थ असें असें दोन्हीही अर्थ प्रकृत आहेत; पण उपमानवाक्यार्थांत असलेल्या अर्थापत्तींतील आपाद्यमान व पहिला अर्थ असे दोन्हीही अर्थ अप्रकृत आहेत. अशाच तर्‍हेनें दुसरींही उदहारणें शोधून काढावी.
ह्या ठिकाणीं असा विचार मनांत येतो कीं, वाक्यज्ञ जे मीमांसक त्यांना मान्य असलेल्या अर्थापत्तींत आमच्या ह्या प्रस्तुत अलंकारांतील अर्थापत्तीचा समावेश होत नाहीं; कारण त्या (शास्त्रीय) अर्थांपत्तींत, आपादक अर्थाची (म्ह० प्रथम निमित्तभूत अर्थाची) आपतित (म्ह० गळ्यांत पडणार्‍या दुसर्‍या) अर्थावांचून जशी संगतीच लागत नाहीं. तसें कांहीं या अलंकारभूत अर्थापत्तींत नसतें. (अत्राभावात म्ह० या अलंकारभूत अर्थापत्तींत पहिला अर्थ, दुसर्‍या अर्थाला विचारांत घेतल्यावांचून जुळतच नाहीं, असें कांहीं नाहीं.
प्रस्तुत अर्थापत्तीचा शास्त्रीय अनुमानांतही समावेशा करतां येत नाहीं; कारण आपादक जो प्रथम हेतुभूत अर्थ, त्याच्या बरोबरीनें (एकाच ठिकाणीं) आपतित  (साध्यरूप) अर्थ म्ह० दुसरा अर्थ राहत नसल्यानें, [उदा० :--- (ह्यांतील पहिल्या श्लोकांत) आमच्यापुढें कवींनीं बडबड करणें, हा प्रथम अर्थ, वक्त्यावर राहतो; तर उत्तरार्धांतील पक्षांच्या पिल्लांनीं नागाच्या डोक्यावर पाय ठेवणें हा अर्थ, दुसरीकडेच राहतो; म्हणून] शस्त्रीय अनुमानांतील, ‘हेतूचें साध्यव्याप्यत्व (म्ह० उदा० :--- धूम हा हेतु, वहनि या साध्याचा व्याप्य असणें.) व हेतु हा पक्षाचा धर्म असणें (म्ह० उदा० :--- धूम हा हेतु, पर्वत या पक्षावर धर्म म्हणून राहणें) ह्या (दोन महत्त्वाच्या) गोष्टी प्रस्तु अर्थापत्तींत कुठेंच दिसत नाहींत. (दूरापास्त = दूर निघून गेल्या.)
आतां कुणी म्हणीतल, “(येथें अनुमान नाहीं कसें ?) ज्या कारणानें एका (म्ह० पहिल्या) अर्थाची सिद्धि केली जाते, त्याच कारणानें (म्ह० लिंगानें किंवा हेतूनें) दुसर्‍या अर्थाची सिद्धि होणें हे जे अपरार्थानुमान (दुसर्‍या अर्थाचें अनुमान) तें या अर्थापत्तीतही आहे.” पण असेंही म्हणतां येत नाहीं; कारण (केवळ) दुसर्‍या अर्थाची सिद्धि होणें, ह्याला अनुमिति म्हणतांच येत नाहीं. (शिवाय) ह्या अर्थापत्तींत, दुसर्‍या अर्थाची सिद्धि होण्य़ाया वेळीं, “हा अर्थ सुद्धां होणें शक्य आहे.” असा ज्ञानाचा आकार (स्वरूप) असतो, पण अनुमानांत, हा अर्थ आहेच असा ज्ञानाचा आकार असतो. (उदा० :--- पर्वतावर अग्नि आहेच, असा अनुमितिज्ञानाचा आकार असतो, तसा येथे अर्थापत्तींत नसतो; म्हणून अर्थापत्ति व अनुमिति एकच असें म्हणतां येणार नाहीं.) याचप्रमाणें, यद्यर्थातिशयोक्ति या (मम्मटानें सांगितलेल्या अतिशयोक्तीच्या) प्रकारांतह या अर्थापत्तीचा समावेश होऊ शकत नाहीं; कारण यद्यर्थातिसयोक्तीत, वाच्यार्थाच्या (म्ह० जर - तरनीं होणार्‍या दोन वाक्यार्थांच्य) अगदीं उलट असे दोन अर्थ शेवटीं प्रतीत होतात; पण अर्थापत्तींत मात्र तसें नसतें. कारण (अर्थापत्तींत) आपादक (पहिला निमित्तभूत) अर्थ सिद्ध असतो; (जर असें असतें, असा संकेतार्थी नसतो.) व आपाद्यमान (दुसरा) अर्थ संभाव्यमान असल्यामुळें (म्ह० असें झालें असतें, तर असें झालें असतें, अशा अर्थाच्या) वाच्यार्थावरच विश्रांत असतो. [वाच्यार्थ टाकून दुसर्‍या अर्थावार शेवट करावा लागत नाहीं. म्हणून ज्या कारणानें एका अर्थाची सिद्धि होते; त्याच कारणानें दुसर्‍या अर्थाची सिद्धि होऊ शकते, अशा स्वरूपाची ही अर्थापत्ति असते. (म्हणून तिला निराळा अलंकारच मानणें भाग आहे.] ह्या अर्थापत्तींत (आपाद्यमान) दुसरा अर्थ, (तो) लोकांत सिद्ध नसून कवीनें केवळ आपल्या प्रतिभेनें कल्पून आपाद्यमान केला असेल तरच, अलंकार होतो. उदा० :--- “फणिनां शकुन्तशिशव:” इत्यादि ठिकाणीं. कविप्रतिभाकल्पित नसून अर्थ लोकसिद्ध असेल तर त्याला केवळ कैमुतिकन्याय (न्यायाचें एक उदाहरण म्हणून) म्हणतां येईल. उदा) :--- ‘उदुम्बरफलानीव’ इत्यादि ठिकाणीं. (अर्थापत्ति अलंकार नसून केवळ कैमुतिकन्याय आहे.) पण प्राचीनांच्या पद्धतीप्रमाणें आम्ही हीं केवळ कैमुतिकन्यायानेम झालेली अर्थापत्ति आहे, असें आम्ही म्हटलें होतें. या द्दष्टीनें पाहतां, ‘कमपरमवशं न विप्रकुर्युर्विभुपति तं यदमी स्पृशन्ति भावा: ।’ हें व ‘अवस्थेयं स्थाणोरपि भवित सर्वामरगुरो; विधौ वक्रे मूर्घ्नि स्थितवति वयं के पुनरमी ॥’ हें - ही दोन्हीं अलंकारसर्वस्वकारांनीं अर्थापत्तीचीं म्हणून दिलेलीं उदाहरणें फारशीं रमणीय नाहींत. (म्ह० तीं अर्थापत्तीचीं खरीं उदाहरणें मानतांच येत नाहींत.)
आतां, “कैमुतिकन्यायानें (दुसर्‍या) अर्थाची सिद्धि होत असेल तर, तिला काव्यार्थापत्ति म्हणणें इष्ट आहे” असें जें अर्थापत्तीचें लक्षण कुवलयानंदकारांनीं केलें आहे, तेंही बरोबर नाहीं; करण कैमुतिकन्याय हा न्य़ूनविषयक असल्यानें अधिकार्थापत्तींत या लक्षणाची अव्याप्ति होईल. उदा० :---
“हे राजा ! तुझ्या समोर (म्ह० तुझ्या समक्ष) ब्राम्हाणाचें दारिद्य कायम रहात असेल तर, सूर्यापुढेंही अंधकार हलके, हलके, खात्रीनें उभा राहील.”
या ठिकाणीं, पुढें (समक्ष) ब्राम्हाणाचें दारिद्य राहणें ह्यापेक्षां सूर्यापुढें अंधकार उभा राहणें जास्त कठीण आहे, असा अर्थ, शनै: या (मुळांतील) शब्दाच्या बळावर प्रतीत होत असला तरी, तो (आम्ही दिलेल्या लक्षणाप्रमाणें) कारणसाम्यामुळें गळ्यांत पडला आहे, कैमुतिकन्यायामुळें प्रतीत होत नाहीं. (म्हणून हें अर्थापत्तीचें खरें उदहारण).


येथें रसगंगाधरांतील अर्थापत्ति प्रकरण संपलें.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP