सामान्यरीतीनें (म्ह० सर्व ठिकाणीं) प्राप्त होणार्या पदार्थाची, त्यांतील अमुक एका विशेषापासून (म्ह० विशिष्ट ठिकाणापासून) हकालपट्टी करणें, दूर करणें (व्यावृत्ति), (म्ह० त्या पदार्थाचें अमुक एका ठिकाणींच नियमन करणें,) याला परिसंख्या म्हणतात.
(आतां परिसंख्येंत ज्याप्रमाणें सर्वत्र पाप्त असलेल्या वस्तूचें एकच ठिकाणीं नियमन केलें जातें त्याप्रमाणें, नियमांतही दोन ठिकाणीं प्राप्त असलेल्या पदार्थांचें, त्या दोहोंपैकीं एका ठिकाणीं, नियमन केलें जातें. मग परिसंख्या अलंकाराप्रमाणें, नियमालंकारही येथें कां सांगितला नाहीं ? या शंकेला उत्तर :---) (आमच्या) या साहित्यशास्त्रांत (दर्शने) निया हा, आम्ही वर सांगितलेल्या परिसंख्येच्या लक्षणाच्या पोटांत येत असल्यानें (म्ह० परिसंख्येचें लक्षण नियमाला लगूं पडत असल्यानें,) नियमाला आम्ही परिसंख्याच समजतों. (नियम म्हणजे परिसंख्याच). नियम व परिसंख्या या दोहोंमधील अवांतर भेद [म्ह० नियमांत एखाद्या वस्तूची दोन ठिकाणीं (येथें तरी प्राप्ति अथवा तेथें तरी प्राप्ति म्ह०) पाक्षिक प्राप्ति आली असतां, एकाच ठिकाणीं त्या वस्तूचें नियमन करणें; व परिसंख्येंत एखाद्या वस्तूची, अनेक ठिकाणीं (अथवा सर्वसामान्य ठिकणीं) एकाच वेळीं प्राप्ति होत असतां, त्या सर्व ठिकाणांपैकीं एकाच ठिकाणीं त्या वस्तूचें नियमन करणें, असा अवांतर भेद असला तरी तो] आम्हांला येथें सांगायचा नाहीं. म्हणूना (म्ह० हा अवांतर भेद वैय्याकरणांनाही विशेष महत्त्वाचा वाटत नसल्यानें) वैय्याकरण परिसंख्येलाही नियम म्हणतात. उदा० “कृत्तद्धितसमासाद्ध” (पा. १।२।४६) ह्या सूत्रांत समास हा शब्द प्रातिपदिक संज्ञेचें नियमन करण्याकरतां घातला आहे, असा त्याचा सिद्धांत आहे. वरील सूत्रांत, वाक्याच्या ठिकाणीं प्रातिपदिक संज्ञेची, पाक्षिकप्राप्ति नसल्यानें (सार्वत्रिक म्ह० सामान्य प्रातिपदिकाच्या व्याख्येप्रमाणें ज्यांना ज्यांना म्हणून प्रातिपदिक म्हणतां येईल त्या सर्वांचे ठिकाणीं प्रातिपदिक संज्ञेची प्राप्ति असल्यानें) दुसर्या म्ह० मीमांसाशास्त्राला इष्ट असा नियम (हा प्रकार) येथें कसा जुळेल ? (उलट) समास व समासाहून इतर, पदें व पदसंघांत या सर्वांना एकाच वेळीं अर्थवदधातु० हें सूत्र प्राप्त होत असल्यानें म्ह० प्रातिपदिक संज्ञा प्राप्त होत असल्यानें, येथें परिसंख्या होणेंच योग्य आहे. पण प्राचीन मीमांसाशास्त्रांत, नियम व परिसंख्या हीं दोन्हीं निराळीं आहेत असें, या उभयतांचीं शास्त्रीय लक्षणें सांगून म्हटलें आहे. (परिभाषणम् ) उदा० (कुमारिलभट्त श्लोकवार्तिकांत) असें म्हणतात :---
“जेथें एखादी वस्तु (दुसर्या कोणत्याही प्रमाणानें) पूर्वीं कधींही प्राप्त झाली नसेल, त्या ठिकाणीं, तिची प्राप्ति सांगणें, हा (अपूर्व) विधि; एखाद्या ठिकाणीं, दोन वस्तूंची (कां तर ही अथवा ही, अशा स्वरूपाची) पाक्षिक प्राप्ति होत असतां, त्या दोहोंपैकीं एकाच वस्तूची प्राप्ति सांगणे हा नियम (विधि); व एखाद्या वस्तूची, एकाच वेळीं, अनेक ठिकाणीं प्राप्ति होत असतां, त्यापैकीं एकाच ठिकाणीं त्या वस्तूचें नियमन करणें, याला परिसंख्या, म्हणतात.” यापैकीं (अपूर्व) विधीचें उदाहरण,” स्वर्गाची इच्छा असणारानें (ज्योतिष्टोम) याग करावा” इत्यादि (ह्या वेदवाक्यांत). वेदाखेरीज इतर कोणत्याही प्रकारानें, म्ह० प्रमाणानें, यागाची प्राप्ति नसतांही यागाची प्राप्ति सांगितली आहे. (म्ह० याग करावा असें सांगितलें आहे म्हणुन हा अपूर्व विधि). नियमाचीं उदाहरणें :--- ‘ब्रीहि म्ह० भात कांडतो’ ‘सपाट प्रदेशावर यज्ञा करावा’ इत्यादि. (या दून वाक्यांपैकीं) पहिल्या वाक्यांत (व्रीहीचा) पुरोडाश (तांदुळाच्या) पिठाचा भाजलेला गोळा) तयार करण्याकरतां ब्रीहीचीं फोलकटें काढणें ही गोष्ट साधन म्हणून गणल्या गेलेल्या पदार्थांच्या यादींत येते; आणि पुन्हां हीं फोलकटें काढण्याचे उपाय म्हणून नखांनीं फोलकटें काढणे व भात कांडून फोलकटें काढणें ह्या दोहोंची आळीपाळीनें म्ह० पाक्षिक प्राप्ति झाली असतां, व्रीहीनवहन्ति’ ह्या वाक्यानें, ‘भात कांडूनच फोलकटें काढावीं, असें सांगितलें, हा नियम. या उदाहरणांत अवहननाची (कांडण्याची) प्राप्ति, नखांनीं फोलकटें काढण्याच्या वेळीं कधींही होत नसल्यानें, (म्ह० अवहनन व नखविदलन ह्या दोन्ही क्रिया एकाच वेळीं संभवत नसल्यानें) पाक्षिक म्हटली जातें. याग, सपाट किंवा उंचसखल या दोहोपैकीं कोणत्याही प्रदेशावर होऊं शकतो. पण त्या दोहोंपैकीं सम (म्ह० सपाट) प्रदेशाची प्राप्ति, विषम प्रदेशाच्या प्राप्तीच्या वेळीं होत नसल्यानें, पाक्षिक समजली जाते. आतां परिसंख्येची उदाहरणें :---
“ह्या ऋताच्या लगामाला त्यांनीं हातांत घेतलें,’ हा मंत्र म्हणून तो (यजमान) घोडयाचा लगाम हातांत धरतो.” “पांचनखें असणार्या पांच प्राण्यांना (म्ह० त्यांचें मांस) खावें,” इत्यादि. [(यांपैकी पहिल्या उदाहरणांत) लगाम हातांत घेणें या लिंगावरून (खुणेवरून ) घोडयाचा लगाम आणि गाढवाचा लगाम या दोहोंनाही हातांत घेणें एकाच वेळीं, प्राप्त होत असल्यानें, (त्यांपैकीं घोडयाचा लगामच हातांत घ्यायला सांगितला, म्हणून) परिसंक्या.]
[आतां ह्या परिसंख्याविधीच्या दुसर्या उदाहरणांत, प्रथम, मांस खाणार्या मनुष्याला कोणत्याही प्राण्याचें मांस चालत असल्यानें, सर्व प्राण्यांची (म्ह० त्यांच्या मांसाची) एकाच वेळीं प्राप्ति असतां, इत प्राण्यांची व्यावृत्ति करून, म्हणजे भक्ष्य प्राण्यांच्या यादींतून त्यांना काढून टाकून पांच प्राण्यांपुरतें मांसभक्षण नियंत्रित केलें गेलें. आणि या पांच प्राण्यांपुरतें मांसभक्षण नियंत्रित केलें गेलें. आणि या पांच प्राण्यांखेरीज इतर प्राण्यांच्या मांसभक्षणाचा निषेध केला.]
[याच परिसंख्येच्या पहिल्या उदाहरणांतील प्रसंग असा :--- यज्ञाकरतां सोमलता आणण्यासाठीं एक घोडा व एक गाढव जोडलेला गाडा घेऊन एक ऋत्विज जातो; व ती सोमलता यज्ञमंडपांत आणतांना, तो ‘इमाममृभ्णन०’ हा मंत्र म्हणून घोडयाचा लागम (अभिधानी) हातांत घेऊन चालतो. ह्या ठिकाणीं घोडयाच्या लगामाची व गाढवाच्या लगामाची लगामच हातांत धरावा असें सांगितलें; म्हणजे येथें गाढवाचा लगाम धरण्याचा निषेध करुन, ‘अश्वाच्या अभिधानीं’ च्या ठिकाणीं त्या धरण्याचें (म्ह० ग्रहणाचें, आदानाचें) नियंत्रण केलें आहे.]
ह्या मंत्रांतील गमकावरून (लिंगावरून) (लगाम शब्द मोघम असल्यानें) घोडयाचा लगाम (अभिधानी) आणि गाढवाचा लगाम यापैकीं कोणताही घ्यावा अशी एकाच वेळीं दोन लगामांची प्राप्ति झाल्यानें, व त्यांपैकीं (घोडयाच्या लगामाला हातांत घेतो असें) घोडयाच्या लगामाच्या ठिकाणीं नियमन केल्यानें, परिसंक्या झाली आहे. (परिसंख्येचें दुसरें उदारहण :--- ‘पञ्च पञ्चनखा भक्ष्या: ।’ अप्रस्तुत गोष्टींचा हा विचार आतां बस्स झाला.