शृंखलामूलक अलंकार - लक्षण १
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
त्यापैकी (प्रथम) :---
एका रांगेंत योजिलेल्या पदार्थांमध्यें पूर्वीं पूर्वींच्या पदार्थांचा पुढच्या पुढच्याशीं अथवा पुढच्या पुढच्यांचा पूर्वीं पूर्वींच्या पदार्थाशीं संबंध असणें म्हणजे शृंखला.
(आतां) तो संबंध कार्यकारणभाव विशेषणविशेष्यभाव वगैरे नाना प्रकारचा असू शकेल.
“ही (शृंखला) स्वतंत्र अलंकार नाहीं; कारण (हिचे) पुढें आम्ही जे प्रकार सांगणार आहों, त्यांनीं हिचें काम भागतें; हिचा त्या प्रकारांहून निराळा स्वतंत्र असा विषयच नाहीं. ज्याप्रमाणें रूपक वगैरे अलंकारांत, (अनुप्राणक) साहाय्यक म्हणून असलेला, अभेदांश अथवा समान धर्माचा जो अंश त्याला निराळा अलंकार मानतां येत नाहीं, त्याचप्रमाणें प्रस्तुत प्रकरणीं समजावें.” असें (कांहीं) म्हणतात; पण हें म्हणणें दुसर्या कांहींना पटत नाहीं. (त्यांचें म्हणणें असें कीं) “(तुम्हाला शृंखलेला स्वतंत्र अलंकार मानता येणार नाहीं; जसें) सावयव वगैरे प्रकारांनीं रूपक, आणि पूर्णालुप्ता वगैरे प्रकारांनीं उपमा, गतार्थ होत असल्यानें त्या (दोन्ही) अलंकारांना स्वतंत्र अलंकार मानतां येत नाहीं तसें, कारण विशेषाला सोडून सामान्य (इतर कोठेंही) राहत नाहीं; राहत असतें तर, त्याचा स्वतंत्र (निराळा) विषय झाला असता. म्हणून (सामान्य) शृंखलेचेंच कारणमाला वगैरे (अलंकार) प्रकार (पोतप्रकार) समजावें, (व शृंखला या नांवाचा एक मुख्य अलंकार सामान्य स्वरूपाचा मानून कारणमाला वगैरे त्याचे विशेष प्रकार मानावें.)” या दोन्हीही मतांचें वैशिष्टय काय याचें आम्ही पुढें विवेचन करणार आहोंत.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP