विशेषोक्ति अलंकार - लक्षण ४
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
लोकांत जवळ वस्तू नसणें हें तृष्णेचें कारण असतें; पण येथें त्याचा (असंनिकर्षाचा) अभाव म्ह० संनिकर्ष (जवळ असणें) असूनही तृष्णा वाढत असल्याचें वर्णिलें आहे. या द्दषीनें या ठिकाणीं विभावना अलंकार होतो. त्याचप्रमाणें (या श्लोकाकडे निराळ्या द्दष्टीनें पाहिलें असतां) जवळ असणें हें तृप्तीचें कारण; तें कारण असताहीं तृप्तीचा अभाव या ठिकाणीं सांगितला आहे. (अर्थात या द्दष्टीनें कारण असतांही कार्य उत्पन्न न होणें हा, या ठिकाणीं, विशेषोक्ति अलंकार होऊ शकतो.) परंतु वरील श्लोकांत कारणाचा अभाव अथवा कार्याचा अभाव या दोहोंनाही वर सांगितलेल्या प्रकारानें म्हणजे स्पष्ट शब्दानें सांगितलें नाहीं; म्हणून या ठिकाणीं हे दोन्हीही अलंकार शाब्द नसून आर्थ आहेत; अर्थात, त्यांचा या ठिकाणीं होणारा संदेहसंकरही आर्थच आहे. हाच अभिप्राय मनांत घेऊन मम्मटभट्टांनीं (काव्यप्रकाशांत ): ‘य: कौमारहर:’ इ० पद्याचें उदाहरण देऊन म्हटलें आहे कीं, या ठिकाणीं (विभावना अथवा विशेषोक्ति) यापैकीं कोणताही अलंकार स्पष्ट नाहीं.
वामनानें, ‘एक गुण कमी आहे अशी कल्पना केल्यानें होणार्या गुणांच्या साम्याचा द्दढपण म्ह० पक्केपणा जेथें होतो ती विशेषोक्ति असें म्हटलें आहे, व त्याचें उदाहरण म्हणून हें वाक्य दिलें आहे :---
‘खरोखरी द्यूत हें पुरुषाचें सिंहासनावांचूनचें राज्य आहे’ (मृच्छकटिक अंक २).
या ठिकाणीं, द्यूतावर राज्याचा तादात्म्यानें आरोप केला गेला आहे. येथें, सिहासनावांचूनचें द्यूत व सिंहासनयुक्त राज्य यांच्यांत तादात्म्य कसें असू शकेल ? अर्थात् तादात्म्याच्या आरोपाला उखडून टाकणार्या कारणाचा निरास करण्याकरतां आरोपित जें राज्य, त्याचे ठिकाणींही सिंहासनरहितत्व असल्याची कल्पना केली आहे. त्यामुळें याला द्दढारोपरूपकच म्हणावें, विशेषोक्ति म्हणूं नये. (असें आमचें मत.) याचप्रमाणें ‘भगवान बादरायण (व्यास) हे चारतोंडावांचूनचे ब्रम्हादेव, दोन हातांचे दुसरे विष्णु, व कपाळावर डोळा नसणारे शंकर आहेत.’ या पुराणांतल्या श्लोकांतही रूपकच आहे. आतां ज्याप्रमाणें एक गुण कमी असल्याचें कल्पिलें असतां द्दढारोपरूपक आमच्या मतें होतें, त्याप्रमाणें गुण अधिक असल्याची कल्पना केली असतांही (आमच्या मतें) द्दढारोपरूपकच होतें.
उदाहरण :---
“कार्तवीर्य हा पृथ्वीवर शरीर धारण करणारा साक्षात धर्मच होऊन गेला” (इत्यादि ठिकाणीं रूपकच म्हणावें.)
वरील विवेचनावरून एक गुण कमी अथवा जास्त असल्याची कल्पना केल्यानें, जें दोन वस्तूंत द्दढ साम्य दाखविलें जातें, त्याला विशेषण अलंकार म्हणावें, असें विशेष अलंकाराचें लक्षण करणार्या लोकांच्या म्हणण्याचें खंडन झालें.
येथें रसगंगाधरांतील विशेषोक्ति प्रकरण संपलें.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP