यावर कुणी असें म्हणतील कीं, “तुम्ही वर म्हटल्याप्रमाणें रूपकस्थलीं विरोध मानणें इष्ट नसल्यानें, त्या ठिकानीं भले विरोध अलंकार न होवो. पण ‘कुसुमानि शरा: ।’ इ० विरोध अलंकाराच्या उदाहरणांत, विरोधाचा उठाव करण्याकरतां अभेद सांगणें अत्यंत आवश्यक असल्यामुळें, त्या ठिकाणीं रूपक मानण्याचा प्रसंग येईल.” पण हेंही म्हणणें बरोबर नाहीं; कारण रूपक अलंकाराच्या लक्षणांत, ‘विरोधाचा स्पर्श नसलेला जो अभेद तोच रूपक अलंकार’ अशी पुस्ती जोडावी म्हणजे झालें. अथवा ह्या ठिकाणीं (म्ह० कुसुमानि शरा: । इत्यादि स्थळीं) विरोधाच्या उठावाकरतां घेतलेला अभेद विशेष चमत्कारिक नसल्यामुळें, अशा ठिकाणीं रूपक अलंकार मानणें योग्य नाहीं. त्या त्या विशिष्ट अलंकाराच्या लक्षणांत अथवा अलंकाराच्या सामान्य लक्षणांत ‘चमत्कार उत्पन्न करणारा असेल तो अलंकार’ असें आम्ही ठिकठिकाणीं सांगितलें आहे. (तेव्हां) कुसुमानि शरा: इत्यादि उदाहरणांत विरहिणीच्या अवस्थेचा अत्यंत अदभुत प्रकार आम्हाला सांगायचा नाहीं; व अपि या शब्दाचा अर्थ पण या वाक्याचा पोटांत नाहीं; तर विरहाच्या अवस्थेंत वरील कुसुम वगैरे पदार्थ हिला अत्यंत पीडा करीत आहेत, व ही त्यामुळें अत्यंत काळवंडून गेली आहे, असेंच आम्हाला सांगायचें आहे, असा तुमचा आग्रह असेल तर, या ठिकाणीं रूपकाच माना, अथवा एखाद्या विशिष्ट नगराची स्थिति अत्यंत अद्भुत आहे असें सांगायचें असेल व त्या ठिकाणीं स्त्रियांचीम तोंडें चंद्र आहेत, असें म्हणायचें असेल तर त्या ठिकाणीं विरोधाभासच आहे, असें समजा.
(पुन्हां) एक शंका :--
‘सुप्तोपि प्रबुद्ध:’ इत्यादि ठिकाणीं ज्याप्रमाणें एका म्हणजे पहिल्या अर्थानें विरोधाचा उठाव होतो व दुसर्या अर्थानें विरोधाची निवृत्ति होते, त्याप्रमाणें ‘गङ्गायां घोष: ।’ (गंगेवर गौळवाडा आहे) ‘मञ्चा: क्रोशन्ति ।’ (पलंग रडत आहेत;) ‘कुन्ता: प्रविशन्ति ।’ (भाले प्रवेश करीत आहेत) इत्यादि ठिकाणीं पण, शक्यानें म्हणजे मुख्यार्थानें विरोधाचा उठाच, व लक्ष्यार्थानें विरोधाचा परिहार असाच प्रकार असल्यानें या वाक्यांतही, विरोधाभास मानण्याचा प्रसंग येईल. तुम्ही म्हणाल कीं, ‘विरोधालंकारांतील जीं वाक्यें (‘सुप्तोपि प्रबुद्ध:’ इत्यादि) (गड्गायां घोष: इत्यादि वाक्याकरतां) द्दष्टांत म्हणून तुम्ही सांगितली आहेत, त्यांत विरोधाचा उठाव व परिहार करणार्या दोन्हीही अर्थांची उपस्थिति अभिधेनेंच होते; पण ‘गङ्गायां घोष: ।’ इत्यादि प्रस्तुत वाक्यांत (म्ह० दार्ष्टान्तिक वाक्यांत) त्या दोन्ही अर्थांची उपस्थिति निरनिराळ्या वृत्तींनीं होते [म्हणजे पहिला अर्थ अभिधेनें कळतो व दुसरा अर्थ लक्षणेनें हातीं येतो, हा या दोहोंत (म्हणजे वरील सुप्तोपि प्रबुद्ध: या विरोध अलंकाराच्या वाक्यांत, व गङ्गायां घोष: या लक्षणेच्या वाक्यांत) फरक आहे.]” पण असेंही म्हणतां येणार नाहीं; कारण तुम्ही ह्या दोहोंत सांगिततेला फरक येथें असला तरी, वरील ‘गङ्गायां घोष: ।’ इत्यादि वाक्यांत, तुम्ही वर असांगितलेल्या विरोधाभासाच्या लक्षणाची होत असलेली अंतिव्याप्ति तुम्हाला टाळतां येणार नाहीं; कारण वरील विरोधाच्या लक्षणांत विरोधाचा उठाव व परिहार करणारे असे दोन अर्थ एकाच वृत्तीनें (म्ह० कां तर अभिधेनें अथवा लक्षणेनें अथवा व्यंजनावृत्तीनें) समजले असले पाहिजेत; अथवा एका जातीच्या वृत्तीनेंच समजले असले पाहिजेत, असें कांहीं तुम्हांला सांगावयाचें नव्हतें. तसें सांगायचें असतें तर, “कुसुमानि शरा: ।” इत्यादि उदाहरणांतही प्राचीनांच्या पद्धतीप्रमाणें अव्याप्तीचा प्रसंग आला असता.