याचप्रमाणें :---
‘ज्याला पाहून, (मद ह्या कर्त्यानें) ऐरावताच्या मुखाच्या ठिकाणीं वास करण्याची जी प्रीति (म्ह० आवड) ती, आणि मानानें (म्ह० मान या कर्त्यानें) इंद्राच्या ह्रदयांत वास करण्याची जी फारा दिवसांची प्रीति ती, सोडून दिली.”
ह्या प्राचीनांनीं केलेल्या श्लोकांत इंद्र व ऐरावत हे दोघे (अनुक्रमें) मान व मद यांनीं रहित झाले’ हें व्यंग्य असूनही, ‘मान व मद नाहींसा झाला’ एवढयाच व्यंग्यांत त्याचा शेवट होतो. वरील व्यंग्यांत मान व मद या धर्माचे धर्मी इंद्र व ऐरावत हे व्यंग्य होऊच शकत नाहींत; कारण हे दोन्ही धर्मी प्रत्यक्ष शब्दांनीं श्लोकांत सांगितले गेले आहेत. अशारीतीनें जो व्यंग्यांश असेल तो दुसर्या वाच्य या रूपानें कधींही सांगता येत नाहीं; व जो सांगितला गेला आहे, तो धर्मी, शब्दानें सांगितला असल्यानें, व्यंजनाव्यापाराचा आश्रय होऊ शकत नाहीं. एवंच, व्यंग्य दुसर्या प्रकारानें सांगणें ही गोष्ट असंगतच आहे; म्हणून असें व्यंग्य कार्या वगैरेच्या द्वारा सांगितलें गेल्यास, त्याला पर्यायोक्त म्हणावें. कार्यादिकांच्या द्वारानें सांगितलें जाणें याचा अर्थ, कार्य द्वारानें आक्षिप्त (म्ह० अनुमित) होणे असाच घ्यायचा. प्राचीनांनीं येथें धर्मीलासुद्धा जें व्यंग्य म्हटलें तें या अभिप्रायानें कीं, व्यंजनानें होणार्या बोधाला विषय सगळा वाक्यार्थच (म्ह० धर्मींसकट) होतो. याचेंही जास्त विवेचन केलें असतां असा अर्थ होतो कीं, वाक्यांत, कांहीं पदार्थ केवळ अभिधेचे विषय असतात, तर कांहीं केवळ व्यंजनेचे विषय असतात.
आतां पर्यायोक्ताच्या बाबतींत अभिनवगुप्तपादाचार्यांचें मत :---
पर्यायाने, म्हणजे वाच्याहून निराळ्या प्रकारानें (म्ह० व्यंग्यानें) युक्त जो अर्थ तो (अभिधेनें) सांगितला जाणें असा पर्यायोक्त या शब्दाचा योगार्थकरून त्यांनीं लक्षण सांगितलें आहे. त्यांच्या म्हणण्याचा आशय असा :--- जर पर्याय शब्दाचा निराळा प्रकार (म्ह० धर्म, म्ह० विवक्षितार्थाच्या धर्माहून निराळा धर्म) असा अर्थ घेत असाल तर, ‘विवक्षित अर्थाच्या विशिष्ट धर्माहून निराळ्या धर्माचा पुरस्कार करून तोच अर्थ ज्यांत सांतितला जातो,’ असा पर्यायोक्ताचा योगार्थ होईल. आणि मग,
“दशवदननिधनकारी दाशरथि: पुंडरीकक्ष:” । (रावणाचा वध करणारा राम साक्षाम् भगवान् विष्णु आहे). या ठिकाणीं रामत्व या रामाच्या विशिष्ट धर्माहून म्ह० विवक्षितार्थाहून निराळ्या धर्माचा निर्देश करून रामाचेंच कथन झालें असल्यानें, या ठिकाणीं पर्यायोक्त म्हणण्याचा प्रसंग येईल. (पण वास्तविक येथें रूपकालंकार आहे.) तुम्ही म्हणाला, ‘ज्या ठिकाणीं व्यंग्य, धर्मीच्या विशिष्ट धर्माहून धर्माहून निराल्या प्रकारानें (म्ह० वाच्य धर्माच्या रूपानें) सांगितलें जातें, त्याला पर्यायोक्त म्हणावें.’ पण असेंही म्हणतां येत नाहीं. कारण वरील पर्याय शब्दाच्या योगार्थांत, व्यंग्याचा समावेश होत नाहीं. ‘पण योगार्थांत समावेश होत नसला तरी लक्षणांत व्यंग्यार्थाचा समावेश होतोच’ असेंही तुम्हांला म्हणतां येणार नाहीं. कारण असें असेल तर (म्हणजे व्यंग्याला लक्षणांत घालणें आवश्यकच असेल तर) पर्याय या शब्दानें व्यंग्य हा अर्थ घेणेंच जास्त बरें, पयोयोक्तांत, व्यंग्यानें उपलक्षित झालेला अर्थच निराळ्या प्रकारानें सांगितलेला असतो; तेव्हां निराळ्या प्रकारानें असें म्हणण्याची फारशी आवश्यकता राहणार नाहीं हें उघडच आहे.” (येथें अभिनवगुप्तांचेंमत संपलें.) म्हणूनच आम्ही (म्ह० जगन्नाथांनीं) (कथनाच्या ऐवजीं) आक्षेप करणेंही चालेल (म्ह० अर्थ आक्षेपानेंही सांगितलेला चालेला) असा दुसरा पक्षही (आम्ही केलेल्या दुसर्या लक्षणांत घेतला आहे.