निदर्शन अलंकार - लक्षण १
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
“वाक्यांत शब्दांनीं सांगितलेल्या दोन अर्थांच्या आर्थ (शब्दानें सांगितलेला नसून सूचित झालेल्या) अभेदाचा औपम्यांत शेवट होत असेल तर निदर्शना.”
अतिशयोक्ति वगैरेचे व ध्वन्यमान (व्यंग्य) रूपकाचें निवारण करन्याकरतां प्रकृत व अप्रकृत असे दोन्हीही अर्थ शब्दांनीं सांगितलेले पाहिजेत, असें लक्षणांत म्हटलें आहे. वाच्य रूपकाचें निवारण करण्याकरतां, ‘आर्थ अभेद’ असें म्हटलें आहे. आर्थत्व म्हणजे वाक्यांतील पदार्थाचा जो परस्पराशीं प्रथम अन्वय (म्ह० शाब्दबोध) होतो त्याला विषय न होणें. ‘वरील अलंकाराचें निवारण झालें तरी, विशिष्टोपमेंत, (या निदर्शनेच्या लक्षणाची) अतिव्याप्ति होणारच; कारण विशिष्टोपमेंत दोन विशेषणांचा (उदा० :--- कोमलातप व कुंकुमालेपन या दोहोंचा अथवा शोणाभ्र व काषायवसन ह्या दोहोंचा) अभ्देद प्रतीत होतो;’ (असें म्हणत असाल तर) मुख्य विशेष्याला येथें निदर्शनेंत, बिंबप्रतिबिंबभावानें युक्त नसणें हें विशेषण लावा (म्हणजे झालें.) अर्थात् निदर्शनेंतील उपमेय व उपमान यांच्या विशेषणांत बिंबप्रतिबिंबभाव असला तरी हरकत नाहीं. हें वरील लक्षण श्रौती निदर्शनेचें आहे. आर्थी निदर्शनेचें लक्षण आम्ही पुढें ललितालंकार प्रकरणांत सांगणार आहों. श्रौती निदर्शनेचें उदा० "---
हें शंकरा ! अंत:करणांत विलसत असणार्या तुला, तीर्थांत शोधणारे अज्ञ लोक, धडधघीत गळ्याच्या मधोमध लोंबणार्या (रुळणार्या) चिंतामणीला विसरून त्याला धुळींत शोधूं लागतात.”
येथें, तुला दुसरीकडे शोधणें, व गळ्यांतल्या चिंतामणीला धुळींत शोधणें हीं दोन्हीं सारखींच असल्यामुळें एकच आहेत असा साद्दश्यमूलक शाब्दबोध झाला आहे.
अथवा (हें दुसरें उदाहरण) :---
‘जगाच्या अंतर्यामी हे शंकरा ! तुला जे अडाणी लोक दुसर्या देवांच्या बरोबरीनें लेखतात, ते (बेटे) अनंत आकाशाला, खिडक्यांच्या आंतल्या भोकांतील पोकळीच्या बरोबरीनें नाहीं कां समजत ? (आकाशाची, खिडकीच्या पोकळीशीं तुलना नाहीं कां करीत ?)”
पहिल्या श्लोकांत, अभेद एक वाक्यांत आलेला आहे. या श्लोकांत अभेद दोन निराळ्या वाक्यांत सूचित केलेला आहे. पूर्वींच्या श्लोकांत अभेद दोन वस्तूंमधील (क्रियांमधील) औपम्यावर आधारलेला आहे; या श्लोकांत दोन औपम्यांचा म्ह० औपम्यज्ञानांचा (तूं इतर देवांसारखा आहेस, व आकाश जाळ्यांच्या पोकळीसारखें आहे या दोन साद्दश्यज्ञानांचा) अभेद आहे, हा या दोहोंतील अभेदांत फरक.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP