अतिशयोक्ती अलंकार - लक्षण ३
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
पण प्राचीनांचें (या बाबतीत) म्हणणें असें :---
“रूपकाप्रमाणें ह्या अतिशयोक्तींतही विषयीचा विषयाशीं अभेद भासतोच; पण तो (शब्दोपात्त विषयाशीं नसून) निगीर्ण विषयाशीं; हाच काय तो रूपकांत व अतिशयोक्तींत फरक. आतां अतिशसयोक्तींतील तादात्म्यनिश्चय (अध्यवसाय) सिद्ध असतो, (अतएव) अप्रधान असतो. (कारण तो विधेय नसतो, अनुवाद्य असतो.) व तो (अध्यवसाय) निश्चयस्वरूप असतो म्हणूनच, जिच्यातील अध्यवसाय (सिद्धरूप नसून) साध्य असतो अशी जी संभावनारूप उत्प्रेक्षा तिच्याहून अतिसयोक्तीचा निराळेपणा (स्पष्ट) आहे.”
ह्यावर (या प्राचीनांच्या मतावर) शंका अशी :---
“तुमचें जर असें म्हणणें आहे तर :---
‘कमलमिदमनम्बुजातं जयतितमां कनकलतिकायाम् ।’ (पाण्यांत न जन्मलेलें हें कमल सोन्याच्या लतेवर फारच शोभत आहे.) या वाक्यांत ‘इदं’ (हें) ह्याचा विषय अससेल्या मुखाचा अवच्छेदक धर्म म्हणून उल्लेख केला असल्यानें, येथें (विषयाचें) निगरण कुठें आहे ? (आणि निगरण नसेल तर ह्या वाक्यांत अतिशयोक्ति आहे असें तरी कसें म्हणता येईल ?) ह्या शंकेचें उत्तर असें :--- ‘इदं’ हें या वाक्यांत कमलत्वविशिष्टाचें (म्ह० कमळाचें) विशेषण असेल तरच येथें अतिशयोक्ति होईल. पण उद्देश्य जें मुख त्याचा अवच्छेदक धर्म म्हणून येथें इदं आहे. असें मनालें तर, हें रूपकच होईल. अशाच रीतीनें, ‘गौरयम्’ ‘आयुरेवेदम्’ इत्यादि वाक्यांतही असजावें, अशी वस्तुस्थिति असल्यानें, “ अतिशयोक्तींत अभेद हा अनुवाद्यच असतो (म्ह० उद्देश्यकोटींतच जातो०, तो विधेयकोटींत जात नाहीं.” हें प्राचीनांचे म्हणणें जुळतें. अशारीतीनें, अतिशयोक्तीचा हा पहिला प्रकार सांगितला. ह्या प्रकारांत, (विषय व विषयी या दोहोंत) भेद असूनही ‘अभेद आहे (असें म्हट्लें जातें).
आतां अतिशयोक्तीचा दुसरा प्रकार (सांगतों) :---
ह्या प्रकारांत, प्रस्तुत विषय तोच असूनही (म्ह० स्वतःशीं त्याचा अभेद असूनही,) तो निराळाच आहे (तो दुसराच कोणतातरी पदार्थ आहे) असें सांगितलें जातें; कारण तसें सांगण्यांत त्या प्रस्तुताचें लोकोत्तरत्व सूचित करण्याचा उद्देश असतो, या प्रकारालाच, ‘प्रस्तुताचें निराळेपण’, असे (काव्यप्रकाशकारांनीं) नांव दिलें आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP