वरील श्लोकांतील, ‘आक्रोश करणें’ व ‘आवाज काढणें’ ह्या अर्थाच्या दोन क्रियारूप धर्मामधील अभेद बिंबप्रतिबिंब - भावाच्या बळावर केला गेला आहे. अशारीतीने येथें होणारी जी मुख्य उत्प्रेक्षा (धर्मोत्प्रेक्षा) तिचा शाब्दबोध खालीलप्रमाणे :---
“यमुनेच्या पाण्यांत अर्धें बुडलेले व अतिशय आवाज करणारे असे जे बगळे ते, अंध:कारानें गिळलीं जीं चंद्राचीं पिल्लें त्यांच्याशीं अभिन्न असें, जणु कांहीं आक्रोश करण्याच्या क्रियेला अनुकूल असलेला व्यापार करीत आहेत कीं काय ?”
परंतु ज्यांच्या मतें, भाव (म्ह० व्यापार) ज्यांत प्रधान आहे तें आख्यात वाक्यांत मुख्य समजलें जातें, त्यांच्या द्दष्टीनें, तो शाब्दबोध, वरील मुख्य धर्मोत्प्रेक्षेंत, ‘शब्दनक्रियाभिना क्रोशनक्रिया, अशी संभावना’ असा होतो. या वैयाकरणांच्या मताप्रमाणें होणार्या क्रियास्वरूपोत्प्रेक्षेंत, ‘आवाज करणें’ ही क्रिया बगळ्यांचें विशेषण म्हणून प्रतीत होत असली तरी (तिचा बगळ्यावर लक्षणेंनें अभेदारोप करून, त्याच्या जोरावर,) ती या उत्प्रेक्षेंत विषय होऊन राहते; व नंतर त्या क्रोशनक्रियेचीं, यमुनेच्या पाण्थांत बुडलेले बगळे हें विशेषण होतें. व मग तशा बगळ्यांचीं स्वत:च्या विशेषणांनीं युक्त अशीं चंद्राचीं पिल्लें अभेदसंबंधानें विशेषणें होतात. पण ह्या ठिकाणीं, चंद्राचीं पिल्लें ह्यांचा, क्रोसन क्रियेशीं साक्षात विशेषणविशेष्यभाव - संबंध करू नये. तसा जर केला तर बगळ्यांना, क्रोशनक्रियेशीं त्यांचा अन्वय न झाल्यानें, लटकत राहण्याचा प्रसंग येईल. पूर्वी आम्ही दाखवून दिल्याप्रमाणें, या उत्प्रेक्षेंत विषय व विषयी यांचीं जीं विशेषणें, त्यांचा बिंबप्रतिबिंबभावानें अभेदसंबंध होतो.
क्रियास्वरुपोत्प्रेक्षेचें दुसरें उदाहरण :---
“मदनाचा राज्याभिषेक (लौकरच होणार) आहे असें कळल्यावर, चंद्र, सर्व जगाला जणु अमृताच्या योगानें लिंपून टाकीत आहे. (जगावर अमृताचा जणु लेप करीत आहे.)”
ह्या श्लोकांत चंद्रा हा विषय; व त्यावर अमृताचा लेप करणें ह्या विषयीची कर्तृत्व - धर्म - रूप उत्प्रेक्षा म्ह० धर्मोत्प्रेक्षा केली आहे, हें ह्याबाबतींत पहिलें नैयाय्कांचेंमत, व किरणांनीं व्यापून टाकणें हा विषय, आणि चंद्रानें अमृताच्या योगानें केलेलें लेपन हा विषयी, व त्याचें विषयावर येथें तादात्म्यानें उत्प्रेक्षण केलें आहे (म्ह० ही क्रियास्वरूपोत्प्रेक्षा,) हें दुसरें, वैयाकरणांचें मत, ह्या दोहोंपैकीं पहिल्या मतानें होणार्या उत्प्रेक्षेंत सगळीकडे पांढरें करून टाकणें हें निमित्त, पण हें निमित्त श्लोकांत शब्दानें सांगितलें नसल्यानें ही अनुपात्तनिमित्ता उत्प्रेक्षा; आणि यांतील विषय चंद्र. श्लोकांत शब्दानें सांगितला असल्यानें, हिला उपात्त - विषया उत्प्रेक्षा म्हणावें. आतां दुसर्या मतानें होणार्या उत्प्रेक्षेंत, ‘पाढंरें करून टाकणें’ हेंच निमित्त आहे. पण हें निमित्ता उत्प्रेक्षा म्हणावें. त्याचप्रमाणें ह्या दुसर्या उत्प्रेक्षेतील, ‘किरणांनीं व्यापून टाकणें’ हा विषय, अमृताचा लेप करणें ह्या विषयीनें गिळून टाकला असल्यामुळें, (म्हणजे श्लोकांत तो विषय शब्दानें सांगितला नसल्यामुळें) हिला अनुपात्त - विषया उत्प्रेक्षा म्हणावी. वरील दोन मतांनीं होणार्या दोन उत्प्रेक्षांमध्यें असा फरक आहे.