सद्दश असणार्या धर्मींच्या (म्हणजे विषयाच्या) ठिकाणीं, तादात्म्याचा रूपानें, दुसर्या धर्मीच्या (म्ह० विषयीच्या) (दोहोंतील) साद्दश्यामुळें होणारा व चमत्काराला उत्पन्न करणारा जो अनाहार्य (म्ह० कल्पित नव्हे तर खरा) निश्चय, ती भ्रांति; व पशुपक्षी वगैरेंच्या ठिकाणीं होणारी ती भ्रांति ज्या वाक्यामध्यें (जशीच्या तशी) वर्णिली जातें, त्याला भ्रांतिमान् अलंकार म्हणावें.
खरें म्हणजे (विषयाच्या ठिकाणीं, तो विषयी आहे अशा तर्हेची जी) केवळ भ्रांति हाच अलंकार; पण भ्रांतिमान् अलंकार असा जो व्यवहार केला जातो तो केवळ लक्षणेनें (म्ह० गौण अर्थानें) केला जातो. शास्त्रकारांचें म्हणणें असेंच आहे :---
“दुसर्या प्रमात्याला (कोणत्याही ज्ञानवान् प्राण्याला) भ्रांतिरूप होणारें ज्ञन ज्या वाक्यांत जसेंच्या तसें वर्णिलें जातें. तें वाक्य भ्रांतिमान् म्हणून प्रसिद्ध आहे. पण अलंकार या अर्थी हा भ्रांतिमान् शब्द लाक्षणिकच आहे.”
वरील लक्षणांत मीलित, सामान्य व तद्गुण या (तीन) अलंकारांचें निवारण करण्याकरतां दोनदा धर्मीं हा शब्द घातला आहे; व रूपकाचें ज्ञान होऊ नये म्हणून अनाहार्य हा शब्द योजिला आहे. अथवा (अनाहार्याच्या ऐवजीं) ‘कवीहून इतराला होणार्या भ्रांतीचा निश्चय’ असेही शब्द वापरतां येतील.
वरील लक्षणांत संदेहाचें निवारण करण्याकरतां निश्चय असें म्हटलें आहे. हें रूपें आहें असें कथलाविषयी होणारें जें (भ्रांति) ज्ञान त्याचें निवारण करण्याकरतां लक्षणांत चमत्कारी हा शब्द घातला आहे; व त्याचा अर्थ कविप्रतिभेनें निर्माण केलेली भ्रांति व त्यामुळें होणारा चमत्कार, असा करावा. जस्ताच्या ठिकाणीं रूप्याची भ्रांति होणें हें ज्ञान नित्याच्या व्यवहारांतील असल्यामुळें तें भ्रांतिज्ञान कविप्रतिभेनें निर्माण केलेलें नाहीं.
“ ‘हे कठोर ह्रदयाच्या प्रियतमा, मी तुला ह्यापुढें सोडणार नाहीं.’ अशा रीतीनें विरहव्याकुळ झालेली ती, आपल्या सखीजनांचा कोमल हात आपल्या हातांत घेऊन, बडबडत आहे.”
ह्या श्लोकांत, नायिकेचा निरोप घेऊन आलेल्या दूतीची उक्ति आहे; व त्या उक्तींत, उन्माद या व्यभिचारी भावाचें सूचन झालें आहे. या उन्मादाचे वरील लक्षणांतून निवारण करण्याकरतीं, साद्दश्यामुळें उत्पन्न झालेली (भ्रांति), हे शब्द लक्षणांत घातले आहेत. कुणी म्हणेल कीं, ‘येथील उन्माद ह्या व्यभिचारी भावाचें श्लोकांत प्राधान्य असल्यामुळें, त्याचें निवारण सर्व अलंकारांना साधारण असलेल्या उपस्कारक ह्या विशेषणानें होऊं शकेल.’ पण हें म्हणणें (ही) बरोबर नाहीं. कारण कीं, येथील उन्माद हा व्यभिचारी भाव, ह्या श्लोकांत, शेवटीं सूचित होणारा जो विप्रलम्भ शृंगार त्यालल, उपस्कारक झाला असल्यानें, त्या उन्मादाला अलंकार म्हणणें शक्य आहे. किंवा हें वाक्य, नायिकेकडून आलेला निरोप ऐकणारा नायक आपल्या मित्राला (उद्देशून) बोलत आहे, असा संदर्भ मानला तर व ह्याच श्लोकांत असलेल्या ‘सा’ या शब्दानें स्मृति व्यंग्य झाली आहे व त्याला हा उन्माद उपस्कारक आहे असें जर मानलें, तर मात्र, लक्षणांतील भ्रांतीशीं या उन्मादाची अतिव्याप्ति होण्याची आपत्ति येईल; म्हणून ‘साद्दश्यानें उत्पन्न होणारी भ्रांति’ हे शब्द लक्षणामध्यें घालणें आवश्यक आहे. ह्या लक्षणांत सांगितलेली भ्रांति (केवळ) एकच आहे, असा सांगण्याचा येथें अभिप्राय आहे. ह्यांतील भ्रांति अनेक आहेत असें मानले तर, पुढें येणार्या, अनेक ग्रहीत्यांना अनेक प्रकारांनीं होणारे एकाच पदार्थाविषयीचे अनेक प्रकारचे भ्रम ज्यांत वर्णिले जातात अशा, उल्लेखालंकारांत ह्या भ्रांतिमानाची अतिव्याप्ति होण्याचा प्रसंग येईल. म्हणून भ्रांति या शब्दाचें एकवचनही या लक्षणांत सहेतुक योजिलें आहे.