आतां, अप्पय्य दीक्षितांनीं भिन्न विभक्तींमध्यें आलेल्या परिणामालंकाराचे खालीलप्रमाणें उदाहरण दिलें आहे :---
“चंद्र ज्याच्या मस्तकावरील माळा आहे. ज जगाचा आधार आहे, ज्याचा गळ अकृष्ण मेघाची कांति धारण करणारा आहे, पार्वतीच्या अध देहाशीं संगम झाल्यामुळें जो अत्यंत शृंगारयुक्त (आभूषणयुक्त) आहे; गंगानदीच्या योगानें जो माळा धारण करणारा दिसतो; (कपाळावरील तृतीय) नेत्राच्या योगाने, जो टिळा लावलेला दिसतो. आणि भगवान् श्रीविष्णूच्या योगानें जो अस्त्रयुक्त आहे; सर्पामुळें, ज्यानें कंकण धारण केलें आहे असा जो वाटतो; व कैलास पर्वतामुळें जो गृहस्थ असलेला वाटतो, त्या भगवान् शंकराला हा माझा नमस्कार.”
अथवा (भिन्नविभक्तिक) परिणामालंकारचे त्यांनीं दिलेलें दुसरें उदाहरण :---
“मदनाची दुसरी आवृत्ति; कल्पतरूची पुनरुक्ति; चिंतामणी रत्नाच्या तोडीचा; सूर्यपुत्र कर्णाची पुनरावृत्ति (दुसरा अवतार); आणि दुसरा इंद्रच; दैत्येंद्राचे निकंदन करण्याच्या कलेची क्रीडा करणार्या भगवान् विष्णूचा जोडीदार: आणि पंडितांना आनंद देणारा, असा राजा श्रीनृसिंह या जगांत विजयी आहे.”
आतां ह्यावर विचार करूं. ह्या दोन श्लोकांपैकीं “तारानायक०” इत्यादि (प्रथम) पद्यामध्यें ‘पार्वतीच्या अर्ध्या शरीराच्या सांगमुळें अत्यंत आभूषणयुक्त असलेल्या शंकराला कवीनें केलेला नमस्कार.’ हा प्रस्तुत विषय आहे. आतां शृंगार म्हणजे शरीराला विभूषित करणें ह्या क्रियेला माळा वगैरे आभूषणांची अपेक्षा आहे. आणि म्हणूनच गंगानदीचा, विषयी जी माला तद्रूप होऊनच, ह्या ठिकाणीं उपयोग होतो. स्वत: गंगानदीचा आभूषण म्हणून उपयोग होत नाहीं. अशाच रीतीनें, (कपाळावरील तृतीय) नेत्राचा, टिळा या रूपानेंच उपयोग होतो. आणि त्यामुळें येथें शुद्ध रूपकच होणें योग्य आहे. तुम्ही म्हणाल कीं, “परिमाणालंकारांत विषयाशीं अभिन्न होऊन विषयी राहातो. असें आम्ही पूर्वींच म्हणटलें आहे; आणि प्रस्तुत श्लोकांत विषयाचे वाचक जे नदी वगैरे शब्द, त्या शब्दांच्या पुढें आलेली जी तृतीया विभक्ति तिचा अभेद हा अर्थ होत असल्यामुळें व शेखर वगैरेंचा त्या तृतीया विभक्तीच्या अर्थाशीं अन्वय होत असल्यामुळें. येथें परिणामालंकार कां बरें होणार नाहीं ?” पण हें तुमचें म्हणणें बरोबर नाहीं. कारण ह्या ठिकाणीं विषयीं हा विषयाशीं अभिन्न असलेला भासत असला तरी, विषयाच्या रूपानें त्या विषयीचा उपयोग होत नाहीं. तसेंच ‘मदनाची दुसरी आवृत्ति’ इत्यादि दुसर्या श्लोकांतही पंडितांना आनंद देणें व जगाचा उत्कर्ष करणें या रूपानें श्री नृसिंह राजाचा निर्देश केला आहे. ह्या ठिकाणीं, पंडितांना आनंद देणें हें, राजाच्या बाबातींत, त्याच्यावर आरोपित जो दुसरा मदन, त्याच्याशीं ताद्रूप्य झाल्यामुळेंच ज्याप्रमाणें संभवतें, त्याप्रमाणें तें केवळ राजाच्या रूपानें संभवत नाहीं. कसें तें पहा :---
‘अहो, आमच्या डोळ्यांचें केवढें हें सार्थक कीं, हा दुसरा मदन आम्हांला पाहावयाला मिळत आहे.’ असें मानणार्या त्या पंडितांच्या डोळ्यांना आनंद होणें हें मदनाच्या योगानेंच जुळतें. राजाच्या होगानें तो आनंद होणें जुळत नाहीं. याचप्रमाणें, हा दुसरा कल्पवृक्षा आहे, हा दुसरा चिंतामणि आहे, हा दुसरा कर्ण आहे, पृथ्वीवर आलेला हा दुसरा इंद्रच आमच्या दारिद्याला दूर करील, खरोखरी, (दुसरा) श्रीहरी असलेला हा, आमच्या ससाराचें हरण करील, अशा विश्वासानें त्या पंडितांना होणारा आनंद, आरोपित म्हणजे विषयी जे कल्पवृक्ष वगैरे, त्यांच्या योगानेंच झालेला आहे. विषयीचा, विषयरूप होऊन, उपयोग झालेला नाहीं. पण स्वत:च्या विषयीरूपानेंच उपयोग झाला आहे. अशा स्थितींत, ह्या ठिकाणीं परिणामालंकार कुठून होणार ?
पण अलंकारसर्वस्वकार, “आरोप्यमाण (म्हणजे विषयी) प्रकृताला (म्हणजे विषयाला) उपयोगी पडत असेल तर (च) तो परिणामालंकार,” अशी परिणामलंकाराची सूत्रबद्ध व्याख्या करतात; व “रूपक अलंकारात, विषयी (प्रस्तुत) प्रकरणाला उपयोगी पडत नसल्यामुळें, तो (विषयी) प्रकृताचा उपरंजक होऊनच केवळ, प्रकृताशी अन्वय पावतो; प्ण परिणामालंकारामध्यें, (आरोप्यमाण) विषयीचा (प्रकृत म्हणजे) विषयरूप होऊनच (प्रस्तुत कार्यांत) उपयोग होतो; म्हणूनच, (परिणामालंकारांत) (प्रकृत० विषय हा, विषयीरूप होऊन राहतो.” अशी त्या सूत्राची व्याख्या करतात. याचाही येथें विचार करूं या.