मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसाईसच्चरित|
अध्याय ९ वा

साईसच्चरित - अध्याय ९ वा

श्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.


॥ श्रीगणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो  नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
आतां पूर्वकथानुसंधान । न होतां वाबांचें अनुज्ञान । भक्त निजठाया जातां परतोन । कैसे ते शीण पावत ॥१॥
तैसीच बाबांची भैक्ष्यवृत्ति । आनिर्वाणान्त जी सेविली होती । ती पंचसूनादि पापनिवृत्ति । कल्याणार्थीं भक्तांच्या ॥२॥
तैसेंचि आब्रह्मस्थावरान्त । साईचि सर्वत्र अनुस्यूत । साईचि होऊनि कृपावंत । भूतीं भगवंत हें ठसवी ॥३॥
म्हणवूनि सकळ श्रोतेजन । प्रार्थितों मी श्रवणावधान । सादर परिसतां या कथा पावन ॥ कृतकल्याण पावाल ॥४॥
शिरडीच्या यात्रेचें हें एक लक्षण । बाबांची अनुज्ञा झाल्याविण । यात्रेकरू षरततां जाण । करी तो आमंत्रण विन्घांतें ॥५॥
तीच एकदां आज्ञा होतां । शिरडींत येईना क्षण एक वसतां वसतां चढलेंचि विन्घ माथां । अनुभव समसतां आहेच ॥६॥
आज्ञेबाहेर जे जे वागले । तयांचे वाटेंत हाल झाले । कितीएकांस चोरांनीं लुटिलें । स्मरण राहिलें जन्माचें ॥७॥
भाकर तुकडा खाऊनि जा म्हणतां । कोणी उपाशीच घाईनें निघतां । गाडी न मिळतां उपाशीं रखडतां । अनेक भक्तांहीं पाहिलें ॥८॥
एकदां पाटील तात्या कोते । कोपरगांवास चालले होते । आठवडयाचा बाजार तेथें । जाहले येते मशीदीं ॥९॥
तांगा ठेविला उभा करून । घेतलें बाबांचें दर्शन । चरण वंदिले येतों म्हणून । हें आज्ञापन - मिष केलें ॥१०॥
भक्त करोत टाळाटाळ । बावा जाणत वेळ अवेळ । पाहोनि तात्या उतावीळ । म्हणती अंमळ थांबावें ॥११॥
राहूं दे होईल बाजार । जाऊं नको गांवाबाहेर । परी पाहूनि तात्यांचा आग्रह फार । म्हणाले बरोबर शामा ने ॥१२॥
काय शाम्याचें आहे कारण । केलें तया आज्ञेचें अवगणन । बैसले तात्या तांग्यांत जाऊन । बाजारालागून चालले ॥१३॥
दोहों घोडयांत एक चपळ । रुपये तीनशेंचें पाठवळ । साऊळ विहीर येतां जवळ । अति उच्छृंखल चालले ॥१४॥
कधीं न खाणारा चाबूक फटका । बाजारा जाणारा न भरतां घटका । घोडा पडला कंबरेंत लटका । भरला टचका एकाएकीं ॥१५॥
कैंचा बाजार कैंचें काय । तात्यांस आठवली साईमाय । वेळीं ऐकतों टळता अपाय । नाहीं उपाय गत गोष्टी ॥१६॥
ऐसेंच आणिक एकदां घडलें । तात्या कोल्हार गांवा निघाले । तांगा जोडून पुसाया आले । वंदिलीं पाउलें बाबांचीं ॥१७॥
आतां जाऊन येतों म्हणाले । पूर्णानुमोदन नव्हतें मिळालें । तथापि तात्या तैसेच निघाले । परिसा वर्तलें काय पुढें ॥१८॥
तांगा आधींच तो भिरक्याचा । बेफाम भरर्धांव उधळला साचा । पाही न वाट खळगे खाचा । जिवावरचा प्रसंग ॥१९॥
असो तो साईकृपेनें टळला । तांगा बाभुळीवर आदळला । बरें झालें तेथेंच मोडला । दगा वटावला पुढील ॥२०॥
ऐसाचि एक मुंबापुरस्थ । आंग्लभौम थोर गृहस्थ । मनीं धनोनि कांहीं हेत । आला दर्शनार्थ साईंच्या ॥२१॥
होता चांदोरकरांचा वशिला । पत्र लाविलें माधवरावाला । तंबू एक मागून घेतला । निवास लाधला सुखाचा ॥२२॥
वाबांचिया इच्छेविरुद्ध । म्हणेल कोणी चढेन मशीद । परतेन दर्शन घेऊनि स्वच्छंद । अशक्य हें प्रसिद्ध सर्वत्र ॥२३॥
यत्न केला तीन वेळां । मशिदीसी चढावयाला । परी तो सर्व निर्फळ गेला । पाहुणा हिरमुसला मनांत ॥२४॥
इच्छा होती तयाचे मनीं । मशिदींत वरती जाऊनी । वंदावें बाबांस गुडघे टेकुनी । हस्त चुंबूनि बैसावें ॥२५॥
इच्छा तयाची ऐसी । बाबा न येऊं देत तयासी । मशिदींत बैसावयासी । आपुलेपाशीं तेधवां ॥२६॥
खालींच सभामंडपीं असावें । तेथेंचि पाहिजे तरी बैसावें । दर्शन घेणें तेथूनि घ्यावें । परी न यावें वर तेणें ॥२७॥
असो पुढें तो निघे जावया । अंगणीं आला निरोप घ्यावया । जाशील उदयीक म्हणती तया । घाई कासया ही इतुकी ॥२८॥
लोकांहीं बहुत कथिलें । नानापरी तया विनविलें । परवानगी न होतां जो गेले । बहु पस्तावले म्हणवूनि ॥२९॥
होणारापुढें कांहीं न चले । नाहीं तयाच्या मना तें पटलें । परवानगीविरहित निघाले । हाल जाहले मार्गांत ॥३०॥
गाडी आरंभीं नीट चालली । पुढें घोडयांनीं वाट सोडीली । साऊळ विहीर मात्र ओलांडिली । तों पुढें आली बायसिकल ॥३१॥
गृहस्थ होता मागें बैसला । पुढें तांगा एकाकीं चमकला । तोल जाऊनि तैसाच कलथला । मागें उलंडला मार्गांत ॥३२॥
महत्प्रयत्नें तांगा थांबविला । गृहस्थ घसरत घसरत गेला । मग उचलूनि तांग्यांत बैसविला । तांगा हांकिला पुढारा ॥३३॥
शिरडी राहिली एकीकडे । मुंबई राहिली दुसरीकडे । कोपरगांवीं आस्पीटल जिकडे । तांगा मग तिकडे घेतला ॥३४॥
असो कांहीं दिवस तेथ । गृहस्थ  पश्चात्तापव्यथित । होते अवज्ञा - प्रायश्चित्त । भोक्तृत्व भोगीत पडले ते ॥३५॥
ऐसे असंख्य अनुभव आले । लोक सहजीं शंकूं लागले । बाबांची आज्ञा पाळूं सरले । करूं न धजले अव्हेर ॥३६॥
कोण्या गाडीचें चक्र निसटलें । कोणाचें तें घोडें थकलें । गाडया चुलले उपाशी राहिले । चुरमुरे फांकिले कितीएकीं ॥३७॥
तीच आज्ञा जयांनीं वंदिली । अवेळींही गाडी साधिली । मुशाफरीही सुखाची झाली । आठव राहिली जन्माची ॥३८॥
वर्षानुवर्षें भैक्ष्यवृत्ति । रुचावी कां बाबांप्रती । ऐसें आलिया कोणाचे चित्तीं । शंकानिवृत्ती अवधारा ॥३९॥
पाहूं जातां बाबांचें आचरित । भिक्षाचि मागणें तयांतें उचित । आनंद देई साधी निजहित । साधी गृहस्थकर्तव्य ॥४०॥
काय - वाचा - चित्त - वित्त । साईपदीं जो समर्पीत । ऐसा जो साईंचा अनन्यभक्त । आवडे अत्यंत साईस ॥४१॥
जें जें अन्न पाके आश्रमीं । स्वामी तयाचा गृहस्थाश्रमीं । यती आणि ब्रम्हाचर्याश्रमी । यांसी होमी प्रथमता ॥४२॥
न देतां आधीं तयां अवदान । स्वयें गृहस्थ जैं करी सेवन । आचरूं लागे चांद्रायण । शास्त्रनिर्बधन त्रिशुद्धी ॥४३॥
यती ब्रम्हाचारी यांप्रती । निषेधिलीसे पाकनिष्पत्ति । ते करूं जातां चांद्रायण माथीं । आदळे निश्चितीं तयांच्या ॥४४॥
म्हणवूनि तयांची उदरपूर्ति । शास्त्रें निरविली गृहस्थांवरती । यती कधींही न उद्यम करिती । कराया भरती पोटाची ॥४५॥
बाबा नव्हेत गृहस्थ । किंवा नव्हेत वानप्रस्थ । केवळ ब्रम्हाचारी बाळ संन्यस्त । भिक्षाचि प्रशस्त प्रशस्त तयांसी ॥४६॥
अखिल विश्व माझें घर । मीच वासुदेव विश्वंभर । मीच परब्रम्हा अक्षर । हा द्दढबोध निर्धार जयाचा ॥४७॥
भिक्षान्नाचा पूर्ण अधिकार । तया विश्वकुटुंबियासचि साचार । इतरांचे विडंबनप्रकार । चव्हाटयावर पहावे ॥४८॥
आधीं त्यजावी पुत्रेषणा । मग वित्तेषणा लोकेषणा । जो एषणात्रय - निर्मुक्त जाणा । तेणेंचि भिक्षाशना इच्छावें ॥४९॥
नातरी ‘भिक्षापात्र अवलंबणें । जळो जिणें लाजिरवाणें’ । महाराज तुकोबाचें गाणें । अर्थाविणें हें नि:सार ॥५०॥
साई समर्थ महान्‌ सिद्ध । लहान थोरां हें तों प्रसिद्ध । परी आम्हीचि सदा आशाबद्ध । असन्नद्ध सत्पदीं ॥५१॥
पंचमहायज्ञावीण । गृहस्थास जें निंद्य जेवण । तें शिरडींत रोज पवित्र भोजन । स्वयें करवून घे साई ॥५२॥
प्रत्यहीं पांच घरें जाई । अतिथियज्ञाचें स्मरण देई । भग्यवान हा लाभ घेई । आपुलें गेहीं बैसून ॥५३॥
सारूनियां जे पंचमहायज्ञ । अवशिष्टान्न करिती सेवन । अज्ञात ‘पंचसूना’ पापगहन । तयांचें निर्दहन तेणेनि ॥५४॥
कंडणी चुल्ली पेषणी । उदकुंभी आणि मार्जनी । हीं पंचसूना या नांवांनीं । आहेत जनीं प्रसिद्ध ॥५५॥
उखळीं धान्यदाणा घालूनी । वरी मुसळाचे घाव हाणुनी । तूस कोंडा टाकिती काढुनी । होते न जाणुनी जीवहिंसा ॥५६॥
पडेना तें धान्य पचनीं । प्रयोग इतुका जाहल्यावांचुनी । म्हणोनि हें पंचसूनाग्रणी । पाप ‘कंडणी’ या नांव ॥५७॥
चुलीस सर्पण लांकडें लाविलीं । तेणें पाकनिष्पत्ति झाली । तेथेंही नकळत जीवहत्या घडली । त्या नांव ‘चुल्ली’ पाप दुजें ॥५८॥
घेऊनि जातें वा जातणी । पिष्ट करितां धान्याचें कोणी । न कळत असंख्य जीवांची हानी । होते त्या ‘पेषणी’ हें नांव ॥५९॥
वापी कूप तडागामधुनी । कुंभ घेऊनि आणिती पाणी । किंवा नरनारी धुतां धुणीं । असंख्या प्राणी मरतात ॥६०॥
साधावया कुंभस्वच्छते । घांसितां वा उटितां हातें । अनिच्छा जी हत्या घडते । पाप चौथें ‘उदकुंभी’ ॥६१॥
तैसेंचि शीतोष्ण उदकें स्नान । करूं जातां सडा - संमार्जन । जीवहत्या घडे जी दारुण । ‘मार्जनी’ जण त्या नांव ॥६२॥
या पंच पापनिर्मुक्तीस । पंचमहायज्ञ गृहस्थास । होतां पंचसूनानिरास । चित्तशुद्धीस लाधे तो ॥६३॥
चित्तशुद्धीचें हेंचि बळ । शुद्धज्ञान उपजे सोज्ज्वळ । ज्ञानानंतर मोक्ष अढळ । पावती सफळ भाग्याचे ॥६४॥
असो हें साईंचें भैक्ष्यव्रत । लिहितां लिहितां वाढला ग्रंथ । परिसा एक कथा अन्वर्थ । अध्याय समाप्त करूं मग ॥६५॥
प्रेम असावें मात्र चित्ता । कोणाही सवें कांहींही धाडितां । जाहली जरी तया विस्मरणता । बाबा न विसरतां मागत ॥६६॥
असो भाजी भाकर पेढा । भक्तिभाव असावा गाढा । भेटतां ऐसा भक्त निधडा । साईस उभडा प्रेमाचा ॥६७॥
ती एक प्रेमळ भक्ताची कथा । ऐकतां आनंद होईल चित्ता । कोणीही स्वीकृतकार्यीं चुकतां । बाबाचि रस्ता लाविती ॥६८॥
ऐशी ही गोड शिक्षणपद्धति । योग्यवेळीं देती जागृति । धन्य भाग्याचे जे हे अनुभविती । आनंदस्थिति अवर्ण्य ॥६९॥
भक्तश्रेष्ठ रामचंद्र नाम । वडील जयांचे आत्माराम । तर्खड जयांसी उपनास । विश्रामधाम साई जयां ॥७०॥
परी जेणें नित्य संबोधन । तेबाबासाहेब तर्खड जाण । तेणेंचि ही पोथी चालवूं आपण । नाहीं कारण यापरतें ॥७१॥
साईप्रेमें उचंबळून । तर्खड जैं जात ओथंबून । करूं लागती अनुभवकथन । काय तें श्रवण सुखकर ॥७२॥
काय तयांचें भक्तिविभव । पदोपदीं साईंचे अनुभव । एकामागूनि एक अभिनव । सरसाविर्गाव जैं कथिती ॥७३॥
बाबासाहेब अतुल प्रेमी । साईंची आलेख्य प्रतिमा धामीं । भव्य चंदनी देव्हारा नामी । पूजनकामी त्रिकाळ ॥७४॥
तर्खड मोठे पुण्यवान । पुत्रही पोटीं भक्तिमान । साईस नैवेद्य समर्पिल्यावीण । करीना अन्नग्रहण तो ॥७५॥
करूनियां प्रात:स्नान । कायावाचामनेंकरून । करी नित्य छवीचें पूजन । नैवेद्य समर्पण भक्तीनें ॥७६॥
हा तयाचा नित्य क्रम । असतां चालला अविश्रम । जाहला सफल परिश्रम । अनुभव अनुत्तम लाधला ॥७७॥
माताही साईंची परम भक्त । शिरडीस जाऊं झाली उत्सुक । मुलानें मार्गांत तिच्या समवेत । असावें हा हेत वडिलांचा ॥७८॥
इच्छा तियेसी शिरडीस जावें । समर्थ श्रींचें दर्शन घ्यावें । तेथेंचि कांहीं दिवस क्रमावे । चरण सेवावे प्रत्यक्ष ॥७९॥
ऐसा जरी वडिलांचा हेत । जाणें नव्हतें मुलाचे मनांत । कोणी मागें पूजा घरांत । करील नियमित ही चिंता ॥८०॥
वडील प्रार्थनासमाजिष्ट । तयांस मूर्तिपूजेचे कष्ट । देणें कैसें होईल इष्ट । कोडें हें प्रकृष्ट मुलाला ॥८१॥
तरी जाणोनि तयांचें मनोगत । चिरंजीव प्रयाणीं उद्यत । प्रेमपुर:सर वडिलांस विनवीत । काय ती मात परिसावी ॥८२॥
साईंस नैवेद्य केल्याविणें । घरीं कोणींही अन्न न सेवणें । हें इतुकें मान्य केलियाविणें । घडेना जाणें निश्चिंत ॥८३॥
हें मुलाचें नित्यव्रत । वडिलांस होतें आधींत अवगत । ‘जा मी करीन नैवेद्य नित । राहीं तूं निश्चिंत’ वदती ते ॥८४॥
‘आधीं न करितां साईसमर्पण । न करूं कोणीही अन्नग्रहण । हें माझें वचन मानीं प्रमाण । न करीं अनमान जा स्वस्थ’ ॥८५॥
प्राप्त होतां हेझं आश्वासन । मुलगा शिरडीस करी प्रयाण । पुढें उगवतां दुसरा दिन । करिती पूजन तर्खड स्वयें ॥८६॥
वाबासाहेब तर्खडांनीं । पूजनारंभींच दुसरे दिनीं । आलेख्यप्रतिमेसन्मुख येऊनी । लोटांगणीं प्रार्थियेलें ॥८७॥
मुलगा जैसी पूजा करी । तैसीच बाबा माझी चाकरी । असावी कवाईत न घडावी मजकरीं । प्रेम अंतरीं द्या मातें ॥८८॥
ब्राम्हामुहूर्तीं स्नान करून । ऐसें प्रार्थनापूर्वक पूजन । तर्खड करूं लागले प्रतिदिन । नैवेद्यसमर्पणसमवेत ॥८९॥
नैवेद्यार्थ शर्कराखंड । बाबासाहेब अर्पीत अखंड । ऐसा नियम चालला उदंड । पडला त्या खंड एकदिनीं ॥९०॥
व्यवहारव्यापृत अंत:करण । तर्खडांस नाहीं राहिलें स्मरण । होऊनि गेलें सर्वांचें भोजन । नैवेद्यावीण एक दिनीं ॥९१॥
एका मोठया गिरणीवरी । तर्खडसाहेब मुख्याधिकारी । तदर्थ प्रात:काळचे प्रहरीं । जाणें बाहेरी नित्य त्यां ॥९२॥
पुढें मग दुपार भरतां । बाहेरून परत येतां । पूर्वनिवेदित शर्करा प्रसादता । भोजनीं बैसतां पावत ते ॥९३॥
ऐसा नियम चालतां । पडलें एकदां विस्मरण चित्ता । राहिली शर्कराखंडनिवेदनता । प्रसादग्रहणता अंतरली ॥९४॥
करावया बैसतां भोजन । शर्कराशेष स्वैंपाकीण । पात्रीं वाढी अनुदिन । तीच कीं जाण अन्नशुद्धि ॥९५॥
परी ते दिवशीं पूजासमयीं । होऊनि कांहींतरी घाई । शर्करा नैवेद्य राहूनि जाई । प्रसाद ठायीं पडेना ॥९६॥
त्याच वेळीं पात्रावरून । तर्खड अनुतापयुक्त होऊन । साईप्रतिमा अभिवंदून । साश्रुनयन बोलत ॥९७॥
बाबा ही काय माया दाविली । कैसी मजला भूल पाडिली । कवाईतचि मजकरीं घडविली । क्षमा वहिली मज करा ॥९८॥
नव्हे भूल हें महापाप । पावलों मी महदनुताप । चुकलों चुकलों मी निस्त्रप । व्हावें मज सकृप महाराजा ॥९९॥
लोटांगण घातलें छबीचे चरणा । सखेद गहिंवरले अंत:करणा । म्हणती महाराज दयाधना । करीं गा करुणा मजवरी ॥१००॥
ऐसें वदत मुलास पत्र । धाडिलें होऊनि अति लाचार । ‘घडला मजकडूनि प्रमाद थोर । क्षमा कर गा’ प्रार्थावें ॥१०१॥
‘दया करा या अनन्यशरणा’ । ऐसी साईंसी भाकावी करुणा । अभयकर आणि अभयवचना । मागावें दीना दासातें ॥१०२॥
वांद्रें ग्रामीं हा प्रकार । शिरडी शंभर कोस दूर । तात्काळ तेथें पावली खबर । परिसा तैं उद्नार बाबांचे ॥१०३॥
भूत - भविष्यवर्तमान । देशकालाद्यनवच्छिन्न । महाराजांसी त्रिकालज्ञान । पहा तें प्रमाण प्रत्यक्ष ॥१०४॥
इकडे मुलगा शिरडीस असतां । तेच दिनीं ते समयीं जी वार्ता । घडली साईस वंदूं जातां । श्रोतां सावधानता परिसावी ॥१०५॥
मुलगा येऊनि अति उल्हासता । आईसमवेत चरण वंदितां । साई जें आईस वदले तें परिसतां । पावला विस्मितता अत्यंत ॥१०६॥
“काय करावें आई आज । गेलों मी वांद्यास जैसा रोज । नाहीं खावया प्यावया पेज । उपाशी मज यावें लागलें ॥१०७॥
कैसा पहा ऋणानुबंध । कवाड होतें जरी बंद । तरी मी प्रवेशलों स्वच्छंद । कोण प्रतिबंध मज करी ॥१०८॥
मालक नाहीं मिळाला घरीं । आंतडीं माझीं कलळलीं भारी । तैसाचि मी अन्नावीण माघारी । भर दुपारीं परतलों” ॥१०९॥
ऐसे हे बोल जेव्हां परिसिले । चिरंजीवांनीं तात्काळ ताडिलें । आपुले वडील वहुधा विसरले । दावाया चुकले नैवेद्य ॥११०॥
मुलगा बाबांसी करी विनंती । मजला जाऊं द्या घराप्रती । बाबा तयास जाऊं न देती । तेथेंचि घेती ते पूजा  ॥१११॥
त्याच दिवशीं शिरडीहून । धाडिलें सविस्तर पत्र लिहून । वितळलें वडिलांचें अंत:करण । पत्र तें वाचून पाहतां ॥११२॥
इकडील पत्र तिकडे पावलें । मुलालाही आश्चर्य वाटलें । तयाच्याही नयनीं दाटले । अश्रु लागले वहावया ॥११३॥
पहा कैसा हा साईंचा खेळ  । कैसें न प्रेम उचंबळेल । ऐसा कोण पाषाण असेल । जो न द्रवेल येणेनी ॥११४॥
याच मुलाची प्रेमळ आई । शिरडीस असतां एके समयीं । करीत अनुग्रह बाबा साई । ती नवलाई परिसिजे ॥११५॥
असतां तेथें भोजनागारीं । पात्रें वाढूनि झाली तयारी । इतुक्यांत एक श्वान द्वारीं । भुकेलें दुपारीं पातलें ॥११६॥
भाकर होती जी पात्रावर । श्वानास बाई जों घाली चतकुर । तोंएक चिखलांत माखला सूकर । तेथेंचि क्षुधातुर पातला ॥११७॥
वार्ता घड्ली स्वाभाविकपणीं । नाहीं बाईच्या ध्यानीं मनीं । परी दुपारीं आपण होऊनी तीच साईंनीं काढिली ॥११८॥
दुपारीं भोजन जाहल्यानंतर । मशिदींत नित्यक्रमानुसार । बाई येऊनि बैसतां दूर । साई सादर पूसती ॥११९॥
“आई त्वां आज मज जेवूं घातलें । तेणें हें आकंठ पोट भरलें । होते हे प्राण व्याकुळ झाले । ते तृप्त केले गे तुवां ॥१२०॥
ऐसेंच करीत जावें नित्य । हेंच कामीं येईल सत्य । मशिदींत बैसून मी असत्य । बोलेन हें त्रिसत्य घडेना ॥१२१॥
ऐशीच माझी दया जाणावी । भुकेल्या भाकर आधीं द्यावी । आपुल्या पोटा नंतर खावी । धरावें जीवीं हें नीट” ॥१२२॥
काय वदले हें साईसमर्थ । बाईस कांहींच कळेना अर्थ । काय असावा कीं भावार्थ । वाणी निरर्थक नव्हे कदा ॥१२३॥
म्हणे मी तुम्हांस वाढीन ऐसें । घडावें तरी मजकरीं कैसें । मीच परतंत्र देऊनि पैसे । मिळेल तैसें खातसें ॥१२४॥
“सेवूनियां ती प्रेमाची भाकर । जाहलों मी तृप्त निर्भर । अजून मजला येती ढेकर” । बाबा प्रत्युत्तर करितात ॥१२५॥
“तूं जेवूं बैसतां द्वारीं येतां । पोटीं क्षुधेची जया व्याकुलता । त्वां देखिलें ज्या श्वाना अवचिता । मज एकात्मता तयासवें ॥१२६॥
तैसें सर्वांगीं माखिला चिखलासी । देखिलें त्वां जया सूकरासी । भुकेनें व्याकुळ झालेलियासी । माझी तयासीं एकात्मतां” ॥१२७॥
ऐकोनि बाबांची वचनोक्ति । बाई पावली विस्मय चित्तीं । श्वानें सूकरें मांजरें वावरती । बाबाचि काय तीं समस्त ॥१२८॥
“कधीं मी श्वान कधीं सूकर । कधीं मी गाई कधीं मांजर । कधीं मुंगी माशी जलचर । ऐसिया विचरत रूपें मीं ॥१२९॥
पाही भूतमात्रीं जो मज । तोचि माझिया प्रीतीचा समज । तरी तूं भेदबुद्धीतें त्यज । ऐसीच भज मजलागीं” ॥१३०॥
वचन नव्हे तें परमामृत । सेवूनि बाई सद्नदित । नेत्र आनंदाश्रुभरित । कंठ दाटत बाष्पांही ॥१३१॥
ऐसीच आणीक या बाईची । कथा सुंदर प्रेमरसाची । समर्थ साईंच्या भक्तैक्यतेची । एकात्मतेची निजखूण ॥१३२॥
घेऊनि कुटुंब मुलें बाळें । एकदां पुरंदरे शिरडीस निघाले । देई ती वृंताकपळें । प्रेमसमेळें तयांसवें ॥१३३॥
विनवी तयांचे कुटुंबास । भरीत एकाचें करीं बाबांस । दुजयाच्या तळून काचर्‍या खरपूस । वाढीं बहुवस तयांतें ॥१३४॥
बरें म्हणोनि तीं वांगीं घेतलीं । बाई जेव्हां शिरडीस पातली । आरतीपाठीं भोजनवेळीं । घेऊन गेली भरीत ॥१३५॥
नित्याप्रमाणें नैवेद्य दावुनी । बाई गेली ताट ठेवुनी । सर्वांचे नैवेद्य गोळा करूनी । बाबा भोजनीं बैसले ॥१३६॥
भरिताची चवी चाखितां । लागलें रुचकर वाटिलें समस्तां । काचर्‍या खाव्यासें वाटलें चित्ता । वदती आतां आणा त्या ॥१३७॥
निरोप गेला राधाकृष्णीस । बाबा खोळंबले जेवावयास । काचर्‍यांवरी गेलें मानस । करावें काय समजेना ॥१३८॥
हंगम नाहीं हा वांग्यांचा । आतां हा पदार्थ होणार कैंचा । शोध पुरंदर्‍यांचे कुटुंबाचा । आणीक भरिताचा चालला ॥१३९॥
तिणें आणिलें जें ताट । भरीत हें तों होतें तयांत । असतील तिचिया सामुग्रींत । वांगीं कदाचित वाटलें ॥१४०॥
म्हणूनि तिचेपासीं पुसतां । कळली काचर्‍यांची अन्वर्थता । एवढें बाबांचें प्रेम कां त्यांकरितां । चुकलें समस्तां कळून ॥१४१॥
बाई म्हणे भरीत झालें । एकाचें दुपारीं अर्पण झालें । काचर्‍या नेईन मागाहून म्हटलें । दुसरें तें चिरिलें तदर्थ ॥१४२॥
पुढें ही वांग्यांची समूळ वार्ता । हळू हळू जैं कळली समस्तां । जो तो आश्चर्य करी चित्ता । पाहूनि व्यापकता साईंची ॥१४३॥
आणीक एकदां डिसेंवर मासीं । सन एकूणीसशें पंधराचे वर्षीं । याच बाईनें अति प्रेमेंसीं । पेढा बाबांसी पाठविला ॥१४४॥
बाळाराम परलोकवासी । क्रियाकर्मांतर करावयासी । मुलास त्याच्या जाणें शिरडीसी । पुसावयासी पातला ॥१४५॥
जातों म्हणूनि सांगावयासी । आला मुलगा तर्खडांपाशीं । तयांसवें कांहीं बाबांसी । द्यावें मनासी कुटुंबाच्या ॥१४६॥
पेढयावांचून दुसरें कांहीं । पाहूं जातां घरांत नाहीं । आधींच निवेदित पेढा तोही । मुलास घाई जाण्याची ॥१४७॥
शिवाय तो मुलगा सुतकी । पेढाही एक उच्छिष्ट शिलकी । तोचि पाठवी तयासवेंचि कीं । साईमुखीं अर्पावया ॥१४८॥
म्हणे दुसरें कांहीं नाहीं । हाचि आतां घेऊनि जाईं । प्रेमपुर:सर हाचि देईं । खातील साई आवडीनें ॥१४९॥
पेढा गोविंदजीनें नेला । परी तो जेव्हां दर्शनार्थ गेला । पेढा बिर्‍हाडीं विसरूनि राहिला । धीर तैं धरिला बाबांनीं ॥१५०॥
पुढें जेव्हां तिसरे प्रहरीं । मुलगा पुनश्च आला दरबारीं । तेव्हां विसरला पूर्वीच्या परी । आला रिक्तकरीं मशिदीस ॥१५१॥
“त्वां मजसाठीं काय आणिलें” । बाबांनीं त्यास पुसून पाहिलें । “कांहीं नाहीं” म्हणतां पुसिलें । स्मरण दिधलें लवमात्र ॥१५२॥
“तुला कोणीं कांहीं वस्त । दिधली नाहीं का मजप्रीत्यर्थ” “नाहीं” म्हणतां साई समर्थ । प्रश्न स्पष्टार्थ पूसिती ॥१५३॥
“अरे घराहून निघतेवेळीं । नाहीं का दिधला तुझियाजवळी । खाऊ आईनें प्रेमसमेळीं” । तेव्हां मग झाली आठवण ॥१५४॥
जाहला अति लज्जायमान । कैसें तरी पडलें विस्मरण । अधोवदन क्षमा मागून । चरण वंदून निघाला ॥१५५॥
धांवत धांवत विर्‍हाडीं गेला । पेढा आणूनि बाबांस दिधला । हातीं पडतांच मुखीं समर्पिला । भाव संतर्पिला आईचा ॥१५६॥
ऐसा हा साई महानुभाव । जया मनीं जैसा भाव । तया तैसा देऊनि अनुभव । भक्तगौरव वाढवी ॥१५७॥
आणिक या कथांचें इंगीत । भूतीं सदैव पहावा भगवंत । हेंचि सकलशास्त्रसंमत । हाचि सिद्धांत येथील ॥१५८॥
आतां पुढील अध्याय श्रवणीं । कळोनि येईल बाबांची राहाणी । कोठें ते निजत कवण्या ठिकाणीं । सावचित्तपणीं आकर्णिजे ॥१५९॥
हेमाड साईपदीं शरण । श्रोतीं आदरें करिजे मनन । झांलिया कथेचें निदिध्यासन । कृतकल्याण पावाल ॥१६०॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । नवमोऽध्याय: संपूर्ण: ॥

॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 20, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP