श्रीरामाचीं पदें

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

पद ३ रें.
रामा रघुनाथा । असो हा तव चरणीं माथा ॥ धृ० ॥
वाम जानुवरी वामलोचना, शोभतसे सीता ॥ रामा० ॥१॥
भवभय वारुनि आत्मकृपेनें, भक्तांवरदाता ॥ रामा० ॥२॥
करुणासागर या जगताचा, तूंचि पिता माता ॥ रामा० ॥३॥
तुज वांचुनि मज कोणि नसे या, संसारीं त्राता ॥ रामा० ॥४॥
मामा काका कोणि न पावति, येइं प्रभो आतां ॥ रामा० ॥५॥
सुख झालें बहु कृष्णसुताला, नाम तुझें गातां ॥ रामा० ॥६॥
पद ४ थें.
रक्षाया दासाला रे । रघुपती दयाघन आला रे ॥ धृ० ॥
वामांकावरि जानकि सुंदरि । जनक नृपाची बाला रे ॥ रघु० ॥१॥
कुंदरदन आनंद सदन प्रभु । पावे निज भजकाला रे ॥ रघु० ॥२॥
विजय पताका लाउनि संगें । घेउनि हनुमंताला रे ॥ रघु० ॥३॥
रत्न जडित सिंहासनिं शोभे, सुखकारी जगताला रे ॥ रघु० ॥४॥
इंदुवदन अति सुंदर कंठीं । नवरत्नांची माला रे ॥ रघु० ॥५॥
स्मरतां वाचें नाम जयाचें । कंप सुटे कलिकाळारे ॥ रघु० ॥६॥
भव भय हारक नत जन तारक । स्फुरवित आत्मसुखाला रे ॥ रघु० ॥७॥
पीतांबरधर जननि जनकवर करित शत्रु दमनाला  रे ॥ रघु० ॥८॥
अचलि अयोध्या नगरि करुनी । सुख दे कृष्णसुताला रे ॥ रघु० ॥९॥
पद ५. वें.
येइं रघुराया आतां नमन चरणा ॥ धृ० ॥
कृपा करुनियां वारीं जनन मरणा । गोड नाम तुझें भव सागर तरणा ॥ चाला ॥
पावसि भक्तां संकटिं तूं हा, निश्चय अंतरीं मला । भक्ति तुझी मज अखंड देईं हेंचि मागतों तुला । संत समागम । प्रीति व्हावि निज भेटि पुरविं हेतुला ॥ पूर्वचाला ॥
कृष्ण जगन्नाथात्मजा तारीं तूं शरणा ॥ येइं रघुराया० ॥१॥
पद ६ वें.
रघुराज सदय तारक मज तुजविण कोणि नाहीं ॥ तुजविण को० ॥ धृ० ॥
धन सुतदारा मोहपसारा । चंचल असुरवद वाटत सारा । दशरथ नंदन वंदन प्रभुमति मंद मी पाहिं ॥ प्र० म० ॥ रघु० ॥१॥
सीता रमणा संकट हरणा । करितों निशिदिनिं नामस्मरणा । निजपदपंकज रंक दयाळा भेट लवलाहिं ॥ द० ॥ रघु० ॥२॥
संत कृपाळा नतजन पळा । तव दर्शन भयदायक काळा । नित्यनिरंजन मुनिमनरंजन रंगलों पायीं ॥ द० ॥ रघु० ॥३॥
येइं उदारा जगदोद्धारा । भवभय वारुनि दे पदिं थारा । षड्रिपुकंदन रविकुलमंडन तूंचि सुखदायी ॥ द० ॥ रघु० ॥४॥
स्मरहर शरणा भक्ताभरणा । कृष्णतनय रत अविरत चरणा । प्रीति अहैतुक देइं कौतुक पाहसी कायी ॥ द० ॥ रघु० ॥५॥
पद ७. वें.
जाउं चला पाहुं रघुराया या या या तुम्ही ॥ धृ० ॥
प्रीति धरा नामीं । साधन हें नामीं । त्रिजगाचा जो स्वामी ॥ या या या तुम्ही ॥ जा० ॥१॥
गुंतुं नका कामीं । प्रभु नेइल सुखधामीं । अर्पित या देहा मी ॥ या या या तुम्ही ॥ जा० ॥२॥
ठेविल आरामी । ब्रीदचि हे रामी । कृष्णसुतांतर्यामि ॥ या या या तुम्ही ॥ जा० ॥३॥
पद ८. वें.
मुनिजन हितकारी निरंतर पाहुंया चला । श्रीराम दयाघन चिन्मय अवतारी ॥ धृ० ॥
जय राम कृष्ण हरि विठ्ठल विठ्ठल म्हणा । नाशिवंत हा जडभार अंतरीं गणा । हे कोणि न पावति अंतकाळिं आपणा । गृहधन सुत नारी ॥ निरंतर पाहुं या चला ॥ मुनि० ॥१॥
प्रभु तारक शेवटिं निश्चय हा मनिं खरा । धरुनियां तयाचे वंद्य चरण तुम्हिं वरा । भवसागर दुस्तर नाम तरीनें तरा । चाप बाण धारी ॥ निरंतर० ॥ मुनि० ॥२॥
आनंद रूप जो कृष्णात्मज मनिं वसे । हें विश्व तयाला तद्रूपचि दिसतसे । हे खूण विषयीजन ओळखती तरि कसे ॥ सुखमय व्यवहारीं ॥ निरंतर पाहुं या चला ॥ मुनि० ॥३॥
पद ९. वें.
भवताप हरुनि निष्पाप करित भजकांला । शरचापधारीं श्रीरामदयाघन आला ॥ धृ० ॥
शिरिं मुकुट कुंडलें कंठिं बिराजत माळा । वामांकि बैसली जनक नृपाची बाळा ॥ चाल ॥
जन सर्व अयोध्यावासी पातले । जे चिन्मय परमानंदें मातले । श्री राघव ह्रदयप्रेमा आंतले ॥ पूर्वचाल ॥
जय राम राम हा नाम घोष बहु झाला । स्त्री बाळ युवाचा स्वर चुंबित गगनाला ॥ भव० ॥१॥
लखलखित प्रकाशे, पुष्पक यानमाजी । निजपद रत दासां स्वरुप सुखामृत पाजी । बहु जन्म भाग्य चित्कळा उघडली आजी । भवभीति निमाली वृत्ति विराली माझी ॥ चाला ॥
मज कोण सोडविल ‘रामा’ वांचुनि । फळ काय सेवुनी; कामा वांचुनी । बोलेन कृष्ण हरि नामां नाचुनि ॥ पूर्वचाला ॥
यद्दर्शन पुण्यें सत्य कृष्णसुत धाला । अवलोकिन सहजानंदरूप जगताला ॥ भव० ॥२॥
पद १०. वें.
 चला पाहुंया कोटि मदन सुंदर दशवदनारी ॥ धृ० ॥
सव्यभागीं सौमित्र जानकी वामजानुवरि नारि ॥ जानकी ॥
कपि पति सुग्रिव नीळ नळादिक चालति वानर हरि ॥ मागुनी ॥
मंदस्मित शिबिकासनिं सन्मुख चिन्मय-ह्रदयं विहारि ॥ राघव ॥
सच्चित्सुखमय निर्विकार परि भक्तांस्तव अवतारि ॥ जाहला ॥
चरणिं शरण रत दास जनाचा दुस्तर हा भव तारि ॥ भयंकर ॥
नाम जपत जयराम म्हणुनियां रात्रदिवस कामारि ॥ जयाचें ॥
चापबाणधर सन्मन सज्जन त्रासदायकां मारी ॥ निरंतर ॥
कृष्णजगन्नाथात्मज केवळ असंग या संसारीं ॥ फिरतसे ॥
पाप्त विषय भोगुनि निजरूपीं सकळ वासनासारि ॥ उठतिज्या ॥ चला० ॥१॥
पद ११. वें.
करुनी विचार व्हा भवपार सदय राघव चरण अंतरीं धरा ॥ धृ० ॥
निजभजकांचें, करि हित साचें जो ॥ व्यर्थ हे प्रयास, कां तयास वरुनि जानकीजीवन नाम हें स्मरा ॥ क० ॥१॥
सदन सुखाचें, आत्मजनाचें जो ॥ हरुनि  अपाय, जो बापमाय । रक्षित स्वपद निरत पाहुं त्या जरा ॥ क० ॥२॥
जिवन जिवाचें ध्यान शिवाचें जो ॥ दावुनि उपाय, चिन्मय काय । मिळवि निज स्वरुपिं कृष्ण सुत खरा ॥ क० ॥३॥
पद १२. वें.
स्मरुनि श्रीराम तो सुखधाम नाम गाउं तयाचें जाऊंया चला मिळुनि जा० ॥ धृ० ॥
धन सुत जाया, करिति अपाया रे । दंडि यमराय, करिसि हाय । सार्थक करुनि घे नर जन्म लाधला ॥ स्म० ॥१॥
द्दश्य पसारा, दबडुनि सारा । निवडुनि एक, आपण साक्षि व्यापक, धरुनि रबूण साधुं चित्कला ॥ स्म० ॥२॥
सुखमय काया, भज रघुराया रे । करुनि उपासना, निर्वासनामय कृष्णसुतासि लाभ जाहला ॥ स्म० ॥३॥
पद १३. वें.
रघुराज दयाघन हो कैवारी दासांचा । पुरवि मनोरथ साचा ॥ धृ० ॥
छलक असुर जन वधुनि ह्रदयिं करि उदय निजस्वरुपाचा ॥ रघु० ॥१॥
निर्विकार स्वरूप मुळिंचा । परि निज भक्तांला रक्षाया जो आला । रघुकुळिं जन्मा करुनि गुणाश्रय आईबाप जगाचा ॥ रघु० ॥२॥
तोडिं पाश जो संसृतिचा प्रेमें ज्यासी घ्यातां । नाम मुखानें गातां झाला भोळा शंकर शीतळ गेला दाह विषाचा ॥ रघु० ॥३॥
स्वामि कृष्णात्मजयाचा दाविं सुखधामा । परवुनि सर्वहि कामा । स्फुरवुनि स्वरुपानंद सदोदित हेतु नुरवि विषयांचा ॥ रघुराज० ॥४॥
पद १४. वें.
राघव जानकिसह प्रभु पाहुंया । जाऊंयारे जाऊंया, जाऊंयारे, जाऊंया, अखंड तेथें सहूंया ॥ जा० ॥ धृ० ॥
दशवदनारी । दासांहितकारी । त्याचेंच दर्शन आम्हीं घेऊंया ॥ जा० ॥ ३ दा, अ० रा० जा० ॥१॥
नारद तुंबर । असंख्य ऋषीवर । बैसले तो थाट आजि लाहूंया ॥ जा० ॥ ३ दा, अ० रा० जा० ॥२॥
जो भवभंजन । करी मन रंजन । अहर्निशीं नाम मुखें गाऊंया ॥ जा० ॥ ३ दा, अ० रा० जा० ॥३॥
कृष्ण तनय धणी । एक वचनपणी । तयाच्या चरणीं चित्त वाहूंया ॥ जा० ॥ ३ दा, अ० रा० जा० ॥४॥
पद १५. वें.
जानकिजीवना येउनि तारीं । भारीं श्रमलों या संसारीं झडकरिं ॥ धृ० ॥
दिनयामिनि कामिनि चिंतुनि । गेलों गृहदारीं या गुंतुनि । कष्टविला मज सर्वहि तंतुनि । अंत नको पाहूं तूं माझा ॥ सदया दशवदनारी ॥ जान० ॥१॥
ब्रम्हादिक येउनि तुज स्तविति । वारंवार पदासी नमिति । गाती नाम तुझें त्यां नमिति । पावें या दीनांच्या काजा ॥ हें संकट प्रभु वारीं ॥ जान० ॥२॥
वामांकिं तुझ्या वैदेही । शोभत वैजयंति ती देहीं । सत्संगति बा मजला देईं । तूं एकचि कैवारि माझा ॥ निजदासां हितकारी ॥ जान० ॥३॥
तूं तारक निज भजकांचा । त्रिजगाचा पालक साचा । हा निश्चय जाण मनाचा । दाखविं तव सद्भक्त समाजा ॥ कृष्णसुता उद्धारीं ॥ जन० ॥४॥
पद १६. वें.
दशवदनारी सिंहासनावरि दासांचा कैवारी । शोभतसे भारी ॥ धृ० ॥
वाम भागिं जनकजा सीतानारी । ज्यासि घ्यात दिनरात मदनारी । निज भजकांसाठिं जो अवतारी । ज्याचें अहर्निशी नाम । गातां विपद विराम । होय अखंड आराम । पारक जो या संसारीं ॥ दश० ॥१॥
नाचति सन्मुख वानरांच्या हारी । नित्य पदीं रत त्यांचा हितकारी । दिन रजनिं त्यां स्वस्वरुपीं सारी । हरुनिसा रिपुकाम । पुरवुनि सर्व काम । दावूनिया सुखधाम । करुणेनें प्रभु उद्धारी ॥ दश० ॥२॥
सदा कृष्ण तनयासि सुखकारी । जया व्यसन कैकयिसुत वारी । जोडुनियां कर पुढें अखयारी । कंठीं वैजयंती दाम । तनु कमनीय श्याम । मुनि गणांचा विश्राम ॥  राजीव लोचन भवहारी ॥ दश० ॥३॥
पद १७. वें.
आजी सर्व आम्हीं अयोध्येसी जाऊं । सिंहासनिं रघु राजाराम सितापति पाहूं ॥ धृ० ॥
ध्यान तयाचें ह्रदयीं साचें, धरुनियां नाम मुखीं गाऊं ॥ सिंहा० ॥१॥
जो  सुखकारक भवभय हारक । अखंड तेथेंचि राहूं ॥ सिंहा० ॥२॥
सोडूनियां आपपर । जोडुनि उभयकर । प्रार्थुनि तत्पद लाहूं ॥ सिंहा० ॥३॥
नष्ट हा संसार खोटा । व्यर्थ आयुष्याचा तोटा । होती कष्ट होइल ते साहूं ॥ सिंहा० ॥४॥
वदत कृष्ण तनय । आजी भाग्याचा उदय । आमुचा यास्तव देह वाहूं ॥ सिंहा० ॥५॥
पद १८. वें.
रत्नजडित आसनि रविकुलमणि राम्‌ । मुनी जनांचा विश्राम दासांचा पुरवी काम ॥ धृ०॥
कंठीं विजयंति शोभें, अति कमनीय दाम । गातां अहर्निशीं नाम ॥ करी विपद विराम ॥ रत्न० ॥१॥
ज्याची तनू लखलखित, प्रकाशमान श्याम । देतो भजकां आराम । दावूनियां सुखधाम ॥ रत्न० ॥२॥
दास कृष्णात्मज याचे हरी, षडिपु काम । प्रभु आनंदाचें धाम । पाहूं चला पूर्ण काम ॥ रत्न० ॥३॥
पद १९. वें.
राम सिंहासनिं पाहिला नयनिं वामभागीं जानकि आईबाप जगताचा ॥ धृ० ॥
सुग्रिवादि वानर जोडुनियां कर उभे । तैसाच विभीषण तो आदर्श घेउनियां जेथ तेथ भजन जय रामकृष्ण हरी जन सर्व वरिति पथ निज स्वहिताचा ॥ राम० ॥१॥
लक्ष्मणादि तिष्टति पाठी आनंदाचे गाभे । पुढें अंजनीचा सुत नाचत गाउनिया । स्वर्गींहुनी सुपुष्पवृष्टी होत सर्वांवरी । कायवर्णूं मंटप सौवर्प लतांचा ॥ राम० ॥२॥
वसिष्ठादि ऋषीवर बैसले ते सभे तनु मन धन पूजा करिती वाहुनियां । दर्सनासि येति नित्य बहुत नर नारी । भवहरी राघव भ्रम हरित नतांचा ॥ रम० ॥३॥
नव रत्नहार कंठीं राघवाचा शोभे । लाहे दिनमणी बा तो प्रकाश पाहुनियां । कौसल्येचा नंदन धनुर्बाण ज्याच्या करीं । मोक्षदानि आणिक अभिमानी संतांचा ॥ राम० ॥४॥
ऐसा लाभ अनंत कोटिपुण्येंच हा लाभे । घोंटूं दिन यामिनी हा येथेंचि राहुनियां । विनवि कृष्णात्मज हस्त जोडुनियां परी । करी देह अर्पण राघवासि स्वताचा  ॥ राम० ॥५॥
पद २०. वें.
सिंहासनि रघुराज बैसला जानकि अंकीं घेउनियां । आनंद बहू झाल मातें ऐशा प्रभुला पाहुनियां ॥ धृ० ॥
भक्तराज श्रीनारद तुंबर नाचति नामा गाउनियां । पार्वतीश ब्रम्हादिक निर्जर सेवा करिती राहुनियां ॥ सिंहा० ॥१॥
संन्मुख तिष्टत अंजनिचा सुत भक्ति रसामृत सेवुनियां । नाम गाती प्रेमें त्यांचें संकट वारी धांवुनियां ॥ सिंहा० ॥२॥
आनंदित सनकादिक योगी असती यत्पद लाहुनियां । जोडुनिकर कृष्णात्मज नमितो निजदेहाला वाहुनियां ॥ सिंहा० ॥३॥
पद २१. वें.  
आनंदघन हा सदय प्रभु ॥ धृ० ॥
आनंद भवा बंध हरुनियां । पुरवि मनोरथ दशरथ नंदन ॥ आ० ॥१॥
स्वपद निरत जन नंदवि निशिदिनि । प्रेमें कर जोडुनि करुं वंदन ॥ आ० ॥२॥
विषयवासना गंध नुरवि जो । चिन्मय मूर्ति दशमुखकंदन ॥ आ० ॥३॥
मंदसित मुख कृष्णतनय सुखदायक जो ॥ चर्चित तनु चंदन ॥ आ० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 13, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP