अंतर्भाव - समास १
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
॥ श्रीराम समर्थ ॥
जय जय सद्रुरु समर्था । जय जय पूर्ण मनोरथा । चरणीं ठेवोनि माथा । प्रार्थीतसें ॥१॥
मी ये संसारीं गुंतला । स्वामीपदीं वियोग झाला । तेणें गुणें आळा आला । जीवपणाचा ॥२॥
इच्छाबंधनीं गुंतलें । तेणें गुणें अंतरलों । आतां येथूनि सुटलों । पाहिजे दातारा ॥३॥
प्रपंचीं संसारउद्वेगें । क्षणोक्षणा मन भंगे । कुळाभिमानें डगे । समाधानासी ॥४॥
जेणें समाधान चळे । विवेक उठोनि पळे । बळेंचि वृत्ति ढांसळे । संगदोषें ॥५॥
स्वामी प्रपंचाचे गुणें । परमार्था आणिलें उणें । ईश्वरआज्ञेप्रमाणें । क्रिया न घडे ॥६॥
दु:ख शोका आला चित्तीं । समाधान करावें किती । विक्षेप होतां चित्तवृत्ति । दंडगें लागे ॥७॥
प्रपंचें केलें कासाविस । घेऊंच नेदी उमस । तेणें गुणें उपजे त्रास । संसाराचा ॥८॥
आतां पुरे हा संसार । झाले दु: खाचे डोंगर । अंतरसाक्ष विचार । सर्व जाणती ॥९॥
तरी आतां काय करावें । कोणे समाधानें असावें । मज दातारें सांगावें । कृपा करोनी ॥१०॥
ऐशी शिष्याची करुणा । ऐकोनि बोले गुरुराणा । केली पाहिजे विचारणा । पुढिले अध्याचीं ॥११॥
इति श्रीअंतर्भाव । जन्ममृत्यू समूळ वाव । रामदासीं सद्गुरुराव । प्रसन्न झाले ॥१२॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : April 12, 2014
TOP