अन्वयव्यतिरेक - नवम: समास:

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ श्रीराम समर्थ ॥
विराट देह ईश्वराचे । असे जड पंचभूतांचे । सत्त्वस्वरूप नव्हे साचें । दृश्य म्हणूनि ॥१॥
पृथिवी आप अनळ । तिनी भूतें दृश्य सकळ । दोनी भूतें केवळ । भासरूप ॥२॥
शरीरांतचि स्पर्शे । परी नेत्रासी न दिसे । द्वयभूतांसी मनोभासें । ऐसें बोलिजे ॥३॥
त्रयभूत अधिष्ठान विराटाचें । अंश प्रचीतरूपाचे । द्वयभूत सूक्ष्माचें । कर्तृत्व असे ॥४॥
विराट जड देह ईश्वराचा । ब्रह्मा अभिंमानी तेथींचा । उत्पत्ति अवस्था अकार मात्रेचा । प्रचीत पाहतां ॥५॥
इतुकें ज्याचें करणें । म्हणोनि स्वरूप न कळे पूर्णपणें । हिरण्यगर्भ सावधपणें । सांगतों ऐक ॥६॥
हिरण्यगर्भ ईश्वराचा लिंगदेह । सूक्ष्म पंचभूतांचा नि:संदेह । त्यामध्यें प्रचीत पाहे । असे द्वयभूतांचा ॥७॥
वायु आकाश हे दोन । हिरण्यगर्भाचें अधिष्ठान । आकाशपंचक सांगेन । सावध ऐका ॥८॥
अंत: करण विष्णु मन चंद्रमा । बुद्धि ब्रह्मा चित्त नारायणनामा । रुद्रअहंकार तुम्हां । सांगों पुढें ॥९॥
नाग कूर्म क्रकश । देवदत्त धनंजय विशेष । हे पंचप्राण अंश । प्रभंजनाचे ॥१०॥
श्रोत्र दिशा त्वचा अनिळ । चक्षु सूर्य जिव्हा जळ । घ्राण अश्र्विनीदेव सकळ । विचार पाहावा ॥११॥
वाचा वन्हि पाणी सुरपति । पाद उपेंद्र शिश्न प्रजापति । गुद इंद्रिय नैरृति । असे निरोपिली ॥१२॥
शब्द स्पर्श रूप रस । गंध पृथ्वीचा अंश । या पंचमात्रा विषयविलास । उभयतां असती ॥१३॥
ऐसे पंचवीस प्रकार । मिळोनि हिरण्यगर्भ साचार । येथें मातृका उकार । अभिमानी विष्णु ॥१४॥
स्थिति अवस्था प्रतिपाळणें । विष्णु अवतार घेणें । धर्मरक्षणाकारणें । म्हणूनियां ॥१५॥
स्वरूप निर्गुण निर्विकार । तेथें कैसा हो विकार । म्हनूनियां तो प्रकार । वेगळाचि असे ॥१६॥
अव्याकृति मूळप्रकृति । तेथें जाऊनि बसली वृत्ति । तेचि व्हावया निवृत्ति । पुढें परिसावें ॥१७॥
इतिश्री व्यतिरेक । ज्ञानप्रळयो निश्चयात्मक । स्वामी कृपा समर्थ एक । सेवकावरी ॥१८॥
इति नवम: समास: ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP