( रस्त्याचा देखावा . नलाचा सारथि वार्ष्णेय चाललेला असतो . मागून दमनक म्हणजे चार्वाक येतो )
दमनक - वार्ष्णेय , ए वार्ष्णेया , अरे चाललास कुठे ?
वार्ष्णेय - कां रे ? तुला कां नसत्या चौकशा ?
दमनक - छे छे , तसं काही नाही . पण मला आपली संवयच लागली आहे , ज्यात त्यात तोंड खुपसायची . खूप प्रयत्न केला पण तोंड काही केल्या गप्पच बसत नाही .
वार्ष्णेय - नाहीच गप्प बसणार ते , एखाद्यानं फोडल्याशिवाय !
दमनक - कां रे बाबा , इतकं चिडायला काय झालं ? मी आपलं सहज विचारलं कुठे चाललास म्हणून तर -
वार्ष्णेय - तुला सगळं माहीत असून पुन्हा पुन्हा विचारतोस म्हणून राग येतो . दर वेळी खाजवून खरुज काढतोस . पण लक्ष्यात ठेव की नलराजांचं सारथ्य करणं ही सोपी गोष्ट नाही . मी तरी अत्यंत मानाची गोष्ट समजतो ती . तुझ्यासारख्या कुत्र्याला त्यातलं श्रेष्ठत्व समजणार नाही .
दमनक - गप बस रे ! तुझ्या त्या नलराजांचं माहात्म्य सांगू नकोस आता . विचारतो कोण तुझ्या नल महाराजाला अजून दोन दिवसांनी ? आताच आपलं पुष्करचं - पुष्कर महाराजांचं सारथ्य करायला लाग .
वार्ष्णेय - म्हणजे ? दमनका म्हणतोयस तरी काय ? शुद्धीवर आहेस ना ? कां झोंकून आला आहेस ? असा मूर्खासारखा काय बडबडतोयस ?
दमनक - मी मूर्खहि नाही आणि झोकूनहि आलेलो नाही . तुझ्या माझ्यात फरक इतकाच की तूं आंधळा आहेस - डोळे असूनसुद्धा , आणि मी सूक्ष्म दृष्टीचा आणि तिखट कानांचा आहे . मूर्खा , मी राजवाडयात उगीच वेंधळयासारखा हिंडत नसतो . प्रत्येकावर चांगलं लक्ष्य असतं माझं . तूंच नलावर विश्वार टाकून , डोळे मिटून अन् कान झांकून वागत असतोस .
वार्ष्णेय - मग ? म्हणणं तरी काय तुझं ?
दमनक - मूर्खा , तुझ्याजवळ थोडी जरी अक्कल शिल्लक असली तरी तूं माझं ऐकशील आणि तत्काळ नलाची नोकरी सोडशील . तसं नाही केलंस तर मात्र तुझी काही धडगत नाही .
वार्ष्णेय - म्हणजे दमनका ? म्हणतोयस तरी काय तूं ? मला काहीच समजत नाही . काय ते स्पष्टपणे नीट सांग पाहू . काय जी नवीन बातमी आणली आहेस तूं ती एका क्षणाचाहि विलंब न लावता सांगून टाक .
दमनक - ( हंसून ) मी मूर्ख ना रे ? मग माझी काय वायफळ वटवट ऐकतोस ? आलास तसा जा रथ जोडायला . आणि तीन चार दिवसांनी जा त्यातूनच यमदरबारीं !
वार्ष्णेय - बास बास , दमनका , नको असा टोचून बोलूस . आधीच तुझ्या बोलण्यानं मी गलितगात्र झालो आहे . आणि त्यात असे वर्मी घाव घालू नकोस . मी तुला मूर्ख म्हणलो ते शब्द मी परत घेतो . पण तुला माहीत असेल ते सगळं मला इत्थंभूत सांग .
दमनक - ऐक तर ! पहिली गोष्ट म्हणजे तूं डोळे असून अंधळा , कान असून बहिरा , आणि डोकं असून बिनडोक आहेस . तुझी कींव येऊनच मी तुला सगळं सांगणार आहे . पण लक्ष्यात ठेव या कानाची बातमी त्या कानाला कळता कामा नये .
वार्ष्णेय - मान्य . एकदम मान्य . सांग लवकर पुढे .
दमनक - सांगतो . पण कुणी सांगितलं , कसं कळलं असले फालतू प्रश्न विचारण्याच्या भरीस पडू नकोस .
वार्ष्णेय - नाही . नाही रे बाबा . एक चकार शब्दहि तोंडावाटे काढणार नाही मी . अगदी शपथ घेऊन सांगतो . पण लवकर सांगायला सुरवात कर .
दमनक - ऐक तर . नीट कान उघडे ठेवून ऐक . मला असं कळलं आहे की पुष्कराज नलराजांना द्यूत खेळायला भाग पडणार आणि कपटानं प्रत्येक डावात नलाला हारविणार . आणि शेवटी राज्य जिंकून नलाला हांकलून देणार . पुष्कर राजे झाले की नलाची आणि त्याच्या माणसांची काय वाताहात होईल तूंच कल्पना कर की ! म्हणून सांगतो , आजच्या आज नलाची नोकरी सोडून पुष्करराजांचं सारथ्य करायला लाग .
वार्ष्णेय - काय ? काय ऐकतो आहे हे मी ? माझ्या कानांवर माझा विश्वासच बसत नाही . मी स्वप्नात तर नाही ना ?
दमनक - नाही नाही , वार्ष्णेया , तूं चांगला शुद्धीवर आहेस . पण ही घटनाच एखाद्या स्वप्नासारखी आहे . जाऊ दे . आपल्याला त्याच्याशी काय करायचं आहे ? कोणी कां राजा असेना ! पैसा मिळण्याशी कारण . कुणीकडून तरी पोट भरायचं !
वार्ष्णेय - पण -
दमनक - पण नाही अन् बीण नाही . माझं ऐक आपला तूं . मी सांगतो यातला एकहि शब्द खोटा ठरणं शक्य नाही . नलाची नोकरी सोड आणि -
वार्ष्णेय - हलकटा , असं सांगतांना लाज नाही वाटत तुला ?
दमनक - निर्लज्जं सदा सुखी !
वार्ष्णेय - इतका नीचपणा तुझ्या अंगीं भरला असेल असं वाटलं नव्हते मला कधी ! तुला काय म्हणावं तेच समजत नाही मला . अधमा , साधं कुत्रंसुद्धा धन्यासाठी आपला प्राण टाकायला तयार असतं आणि तूं -
दमनक - मी कुत्रं नाही . माणूस आहे .
वार्ष्णेय - नीचा , नलराजांवरील संकटाची आधी कल्पना आली असूनहि षंढासारखा गप बसून राहतोस ? आतापासून पुष्कराच्या कच्छपी लागून , पाजी माणसा , मलाहि तसंच करायला सांगतोस ? इतकं बोलायला तुझी जीभ हलते तरी कशी ?
दमनक - पहिल्यापासूनच माझी जीभ जरा जास्तच वळवळते .
वार्ष्णेय - मूर्खा , या क्षणीं तुझी जीभ हांसडून काढली असती ; पण आताच्या आता मला महाराजांच्या कानावर सगळया गोष्टी घातल्या पाहिजेत . चालता हो , चालता हो माझ्या पुढून ; नाही तर नाहक बळी पडशील माझ्या तलवारीला . आणि खबरदार , याच्यापुढे नलराजांविषयी अनुदार उदगार काढलेस तर .
दमनक - मूढा , तूं काय मला दम देऊन राहीला आहेस ? नल आजचा दिवस तरी गादीवर राहील कां ? एखादे वेळी आत्ताच राज्य हरलाहि असेल तो . आता नलाच्या बाजूच्या सर्वांची सरसहा ससेहोलपट होईल कि नाही बघ .
वार्ष्णेय - गप बस .
दमनक - ज्याचं करावं बरं तो म्हणतो माझंच खरं ! तुला वाचविण्यासाठी म्हणून मी तुला माहिती दिली तर उलट माझ्यावरच उलटतोस होय ? तूं माझा इतका अपमान केला आहेस तरी मी पुन्हा तुला सांगतो . शहाणा असलास तर पुष्कराची नोकरी धर .
वार्ष्णेय - छे छे ! या जन्मीं तरी ते शक्य नाही . नलराजांसाठी माझी मान मी कापून देईन , पण त्यांच्या शत्रूंपुढे ती कदापि वांकणार नाही . वेळच आली तर दुसर्या राजाकडे नोकरी करीन पण त्या पुरुषाधम पाजी पुष्कराचं तोंड देखिल बघणार नाही . पुष्कर इतका नीच असेल असं वाटलं नव्हतं मला . नलराज त्याच्याशी असं काय वाईट वागत होते म्हणून त्या सापानं असा डाव साधला ? पुष्करा , पुण्यश्लोक नलराजांना छळण्याचं हे पाप फेडशील तरी कोठे ?
दमनक - कपाळी लिहीलं असेल ते चुकत नाही म्हणतात तेच खरं ! नाही तर आधी बातमी देऊन शीरसलामत सुटायला केवढी मोठी संधी दिली होती मी याला . पण काय उपयोग ? नलाला वांचवू बघेल आणि स्वतःचा गळा कापून घेईल .
वार्ष्णेय - काय बडबडतो आहेस ?
दमनक - काही नाही . म्हटलं विनाश काली मोठमोठ्या विद्वानांची सुद्धा मति गुंग होते , मग तूं तर काय मूर्खातला मूर्ख ! तुला कुठली बुद्धि सुचायला ? नहुष येवढा इंद्रपदाला पोचलेला राजर्षि - त्याला तेवढेहि कळू नये की ऋषिमुनींना आपले भारवाहक करु नये म्हणून ? त्रिभुवन जिंकणारा बळी , त्याला शुक्राचार्य सांगत असूनहि वामनाचा कावा कां कळला नाही ? इतकंच काय पण तुमचे ते पुण्यश्लोक नलराज बसलेच की नाही फांसे खेळायला धोका पत्करुन ?
वार्ष्णेय - निर्लज्ज माणसा , ज्या अर्थी इथून जाण्याची बुद्धि तुला होत नाही त्या अर्थी तुझीच शंभर वर्षे भरलेली दिसतात . माझ्यावर संकट कोसळणार असलं तरी ते अजून दूर आहे . आणि त्यातून पार पडायला मी समर्थ आहे . पण तूं मात्र आत्ताच माझ्या तलवारीला बळी पडणार . ( तलवार उपसतो . )
दमनक - ( दूर पळून ) अरे जा रे , तुझ्या तलवारीला बळी पडायला मी काही शेणाचा गोळा नाही . तूं काय तलवार चालवावीस ? तूं त्या नलाचे घोडे धुवावेस घोडे !
वार्ष्णेय - हो हो , तुझ्या रक्तानंच धुतो घोडे आता . तुला दाखवलंच पाहीजे माझं युद्धकौशल्य .
दमनक - आता नको . मला जाता जायचं आहे पुष्करराजांकडे . तेव्हा आता मी जातोच कसा ! पण लक्ष्यात ठेव की नल राज्य हरणारंच . आणि पुष्कर गादीवर बसणारच . मग जी कत्तल होईल त्याल तुला मारायला मी स्वतःच येईन . आज तूं माझा असंख्य तर्हांनी अपमान केलेला आहेस . तेव्हा उद्या काय करायचं ते मी बघतोच . पण मी नीचपणा करणार नाही . तुझ्या आवडीचा मृत्यु मी तुला देईन . तुला घोडे फार आवडतात नाही कां ? मग मी तुला घोडयांच्या मागे बांधून घोडे पिटाळीन . मग फरपटत , ठेंचाळत जातांना पटकन् प्राण जाईल तुझा . आता -
वार्ष्णेय - पण येवढं करायला उद्यापर्यन्त मी तुला ठेवलं तर ना ? तुला आताच यमसदनाला पाठवून देतो . ( वार्ष्णेय दमनकावर धावून जातो . दमनक पळून जातो ) ( स्वगत ) काय म्हणावं या माणसाला ? याला ही बातमी लागली तरी कशी ? आताच्या आता ही गोष्ट महाराजांच्या कानावर घातली पाहीजे . पण खरंच जर ते द्यूत खेळायला बसले असले तर ? - तर सगळाच घात झाला म्हणायचा . चला , आता क्षणाचाहि विलंब लावता कामा नये . कारण प्रत्येक क्षणाची किंमत नलदमयंतीच्या दैवानेच होणार . आधी महाराजांना शोधलं पाहीजे . आणि ते जर खरंच खेळायला लागले असले तर तसंच दमयंती राणींकडे गेलं पाहीजे . पाहू त्यांना तरी काही उपाय सुचतो कां ? मला तर यावर काहीच तोड दिसत नाही .
( अंक पहिला - प्रवेश तिसरा समाप्त )