(पात्रे- भगीरथ व शरद; शरद रडते आहे.)
भगीरथ - (स्वगत) भाईसाहेबांचं माझ्याशी असं तुटकपणाचं वागणं का होतं याचं कारण आता माझ्या लक्षात आलं! हा रोगातला रोग, मनाला मारणारा, जिवाला जाळणारा, हा मत्सर आहे! प्रेमाच्या स्पर्धेत निराश झालेल्या दीन जिवांचा हा निर्वाणीचा मत्सर आहे. कडू काळाचा कडवटपणाही याच्यापुढं अमृतासारखा वाटेल! या वयात, अशा अपत्यस्नेहाच्या भरात, भाईसाहेबांच्या विवेकशाली पुरुषालासुध्दा प्रेमानं- हे प्रेम नाही; निराशेत सात्त्वि प्रेम करुणावृत्तीचं रूप घेतं- या कामानं- कदाचित ज्याचं त्याला कळल्यावाचूनही असं होत असेल. या स्पर्धेची जाणीव रामलालांना पहिल्यापासूनच- नको हा विचार! भाईसाहेबांच्या नावाचा अगदी अनुदार उल्लेख झाला आणि विचार तर अगदी भलता झाला! अरेरे! परमेश्वरा, किती दु:खप्रद प्रसंगात मला आणून ठेवलंस हे! भाईसाहेबांच्या मनोवृत्तीविषयी न्यायनिष्ठुर निर्णय देण्यासाठी या हतभागी भगीरथानं विचार करावा? त्यांनी माझ्यावर केलेले उपकार आठवले म्हणजे माझ्या स्वत:चाही मला विसर पडायला हवा! दारूच्या नादानं जीवन्मृत झालेल्या भगीरथाला त्यांनी पुनर्जन्म दिला आणि त्यांच्या वर्तनाकडे त्या मीच अशा टीकादृष्टीनं पाहायचं? पित्याच्या पुण्यवृत्तीबद्दल संशय घ्यायचा, मातेच्या शुध्द शीलाबद्दल नीचपणानं चौकशी करायची, प्रत्यक्ष परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल तर्कवितर्क लढवायचे, तशातलंच हे अनन्वित पातक आहे! भाईसाहेबांनी आधीच आपल्या प्रेमाची रतिमात्र तरी कल्पना मला दिली असती तर शरदच्या स्नेहभावाला प्रेमाच्या पायरीवर चढविण्याऐवजी मी केवळ परिचयाच्या उदासीन पदावर बसविलं असतं! पण त्यांनाच आधी त्यांच्या मनाची वृत्ती कळली नसेल! ते काही असो; माझ्या जीविताची वाटेल ती वाट लागली तरी भाईसाहेबांच्या सुखाच्या वाटेत मी कधीही आड येणार नाही. भगीरथप्रयत्नांनी शरदच्या प्रेमाचा वेग भाईसाहेबांकडे वळविलाच पाहिजे. (उघड) शरद, अशा हृदयभेदक स्थितीतही तुझ्याशी निष्ठुरपणानं बोलतो याची मला क्षमा कर. आता तुझ्याशी असं बोलताना मला समाधान वाटत आहे असे मुळीच समजू नकोस. या विषारी विचारानं माझं हृदय आतल्या आत सारखं जळत आहे. अगदी उपाय नाही म्हणूनच मला असं बोलावं लागत आहे, त्याची क्षमा कर आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. शरद, भगीरथाच्या सुखासाठी वाटेल ते दु:ख भोगायला तू तयार आहेस का? हं, अशी रडून मला निरुत्साह करू नकोस! संशयाच्या दीन दृष्टीनं पाहू नकोस! अशा प्रश्नाचं स्पष्ट शब्दांनी उत्तर देणं कोणत्याही बालिकेला, त्यातून तुझ्यासारख्या कोमल मनाच्या आणि आजन्म दु:खाग्नीत करपून निघणार्या बालविधवेला अगदीच मरणाहूनही अधिक आहे, हे मी जाणून आहे! पण आताचा प्रसंगच असा चमत्कारिक आहे, की स्पष्ट बोलल्यावाचून गत्यंतर नाही. कुलीनतेची मर्यादा आणि प्रायोजकता यांनाही आपण क्षणभर बाजूला ठेवलं पाहिजे. सांग शरद, अगदी मोकळया मनानं सांग. भगीरथाच्या सुखासाठी तू वाटेल ते दु:ख भोगायला तयार होशील का?
शरद - तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं कारणच नाही. जे तुमचं सुख ते माझं दु:ख असं कधी तरी घडेल का?
भगीरथ - प्रेमाच्या सहवासात राहताना भिन्न जिवांना जी एकरूपता मिळते तीच विरहाच्या चिरनिराश सृष्टीतही राखणे फार दुष्कर आहे.
शरद - विरहाची सृष्टी! विरहाची कल्पना आपण आता-
भगीरथ - मनाचा धडा करून एकदाच, एकदम स्पष्टपणं काय ते बोलून टाकतो. शरद, दुसर्या कशासाठी जरी नाही, तरी केवळ या भगीरथाच्या सुखासाठी- शरद, क्षमा कर, हात जोडून हजार वेळा तुझी क्षमा मागतो- पण तुला भाईसाहेबांची विनंती मान्य करावी लागेल! रामलालशीच तुला पुनर्विवाह करावा लागेल!
शरद - भगीरथ, भगीरथ, काय हो बोललात हे? खरोखरीच तुमचं हृदय पार जळून गेलं आहे का? अगदी विषाचा- भगीरथ, हृदयदाहक प्राणघातक विषाचा- वर्षाव केलात हो माझ्यावर!
भगीरथ - भगीरथाच्या हृदरोगावर हे विषच अमृतासारखं गुणकारी आहे! याच विषाच्या सेवनानं तुझ्या हृदयाच्याही वृत्ती मरून जाऊ देत!
शरद - भगीरथ, तुमच्या चरणी वाहिलेले हे प्राण आता दुसर्याचे कसे हो होतील?
भगीरथ - रामलालच्या चरणांशी माझे प्राण गहाण पडले आहेत. तुझ्या प्राणांच्या विनिमयानंच मला माझ्या प्राणांची पुन्हा प्राप्ती होणार आहे! शरद, माझ्या या कर्तव्याच्या स्वार्थवृत्तीची मला क्षमा कर!
शरद - नका हो नका असं बोलू, भगीरथ! तुमच्या शब्दाशब्दानं माझ्या हृदयावर कसे विषारी घाव बसताहेत, याचा थोडा तरी विचार करा!
भगीरथ - कृतज्ञता विचारशील नसते! भाईसाहेबांचे आजवर माझ्यावर आणि तुझ्यावरही किती उपकार झाले आहेत त्यांची नीट आठवण कर! त्या उपकारांची फेड आपल्याला करायला नको का? देवदैत्यांनी समुद्रमंथन करून चौदा रत्नं बाहेर काढली; त्यात स्पर्शमात्रानं जीवनाश करणारी सुरा आणि स्पर्शमात्रानं चिरंजीवन देणारी सुधा अशी दोन परस्परविरोधी रत्नं सापडली. पापपूर्ण पृथ्वीवर पहिल्याचा पूर्णावतार झाला आणि दुसरं स्त्रियांच्या अधरामृताच्या रूपानं मनुष्यजातीच्या वाटणीला आलं. एका रत्नाच्या यातनामय तापातून ज्यांनी माझी सुटका केली त्यांच्याच सुखासाठी दुसर्या रत्नाच्या सुखाचाही मला त्याग केला पाहिजे. संसारात सुखदु:खाचं मिश्रण अभिन्नस्वरूपाचं आहे. काळोखाची एक रात्र काढून टाकली तर तिच्याबरोबरच प्रकाशपूर्ण दिवसाकडेही डोळेझाक करायला पाहिजे. दु:खाचा एक अंश टाळण्यासाठी त्याच्याशी संलग्न असलेल्या सुखांशालाही दूर करावं लागतं, हा ईश्वराच्या घरचा निष्ठुर न्याय आहे.
शरद - भगीरथ, असे निर्दय कसे हो झालात?
(राग- जागी; ताल- त्रिवट. चाल- दिलभर जानुवे.) कृति अशी भीषणा । अन्य ना ॥धृ०॥ वितरिल मना । परमेशाच्या । यातना! ॥१॥ कोमलतरा । वनिताचित्ता । जाळी ना? ॥२॥
भगीरथ - भगीरथाच्या जगातली परमेश्वराची मूर्ती रामलालच्या रूपानं उभी आहे. आचार्य देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव, या आपल्या आर्यधर्माच्या अनुल्लंघनीय आज्ञा आहेत. भाईसाहेबांनी पित्याप्रमाणं मला पुनर्जन्म दिला. जगाच्या उपहासानं दु:खावलेल्या माझ्या मनोवृत्तीची मातृप्रेमानं जोपासना केली; भावी आयुष्याचं सार्थक होण्यासाठी महन्मान्य मार्गाचा मला गुरुपदेश केला; माता, पिता, गुरू, यांच्या या त्रिभूवनवंद्य त्रिमूर्तीला माझ्या दृष्टीनं परमेश्वराची पुण्यपदवी प्राप्त झाली आहे. या परमेश्वराच्या इच्छेसाठी सर्वस्वी आत्मयज्ञ करण्याला मला तत्पर व्हायला नको का? श्रीकृष्णपरमात्म्याच्या इच्छेसाठी मयूरध्वजराजानं आपलं अर्ध अंग करवतीनं कापून दिलं, त्याप्रमाणं माझ्या परमेश्वराच्या सुखासाठी माझ्या जिवापासून माझ्या भावी अर्धांगीला तोडणारी ही आकाशाची कुऱ्हाड- (स्वगत) पण नको. अशा अनुचित उद्गारांनी शरदच्या मनात भाईसाहेबांबद्दल अनादर उत्पन्न होईल. दातृबुध्दीच्या श्रध्देप्रमाणंच दानवस्तूची पवित्रताही त्यागाला आवश्यक आहे.
शरद - बोलता बोलता मध्येच थांबलात! तुमची ही निष्ठुरता तुमच्या हृदयालाही मान्य नाही. भगीरथ, दया करा, तुमच्या चरणी शरण आलेल्या प्रेमळ जिवाला असं दूर लोटू नका. शरदच्या सुखासाठी, तुमच्या स्वत:च्या सुखासाठी, आपल्या दोघांच्या दुबळया प्रेमाला पायाखाली तुडवू नका.
(राग- भैरवी; ताल- त्रिवट. चाल- तुम जागो हा.) मजला वृथा । नाथा, का देता क्लेशा प्रखरा या ॥धृ०॥ चुरुनि प्रेमा । मम शुध्द कामा । हृदयांते का दहता उभयां ॥१॥
भगीरथ - रामलालच्या सुखासाठी अखिल ब्रह्मांडही ब्रह्मार्पण करणं हा भगीरथाचा एकच धर्म आहे. रामलालचं सुख तेच भगीरथाचं सुख, हे मी तुला सांगतो. आणि भगीरथाचं सुख तेच शरदचं सुख, हे तू मला सांगितलंस. आपणा तिघांनाही सुखी होण्याचा याखेरीज दुसरा मार्गच नाही. मी तुझ्याशी विवाह केला तर ऐन सुखाच्या भरातही भाईसाहेबांच्या निराशमुद्रेची करुणादृष्टी अष्टौप्रहर आपल्याकडे पाहात राहील! असमाधानाच्या मोलानं असं दुर्दैवी सुख मिळविण्यात काय अर्थ आहे? शरद, आता विचाराच्या दृष्टीनं आपल्या भाग्यशाली दु:स्थितीकडे पाहा, तुझ्या प्राप्तीमुळे भाईसाहेब सुखात आहेत; त्यांच्या सुखाला साहाय्य केल्यामुळं माझी कृतज्ञता संतुष्ट झाली आहे; मला ऋणमुक्त करण्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केल्यामुळे तुला समाधान वाटत आहे! शरद, हा मनोहर मनोभंग सुदैवानं आपणाला लाभणार आहे. भाईसाहेबांच्या उपकारांची फेड केल्यावाचून मिळविलेलं सुख केवळ अन्यायाचं होईल. शरद, तुला निर्वाणीचं सांगतो, या आत्मत्यागाच्या ब्रह्मानंदापासून मला दूर केलंस तरीही यावज्जीव मी तुझ्याशी पुनर्लग्न करणं शक्य नाही. पुन्हा सांगतो, माझ्या उपकारकर्त्याशी कृतघ्नतेनं वागलो, तर ते अतिशय अन्यायाचं होईल.
शरद - मनाचा कोंडमारा झाल्यामुळे अगदी निर्भीडपणानं बोलते- मी हिंदू समाजातली बालविधवा आहे. माझ्या निर्भीडपणाला जग अगदी निर्लज्जपणासुध्दा म्हणेल, पण भगीरथ, उपकारकर्त्याशी कृतघ्नपणानं वागणं हे अन्यायाचे आहे, तसंच प्रेमाशी विश्वासघातानं वागणं हे तरी अन्यायाचं नाही का?
भगीरथ - न्यायान्यायाचा त्रिकालबाधित निर्णय त्रिकालज्ञ ऋषींनासुध्दा करता आला नाही. आजची न्यायाची गोष्ट उद्या अन्यायाची ठरेल; कालचा अन्याय आज न्याय ठरत असेल; न्यायान्यायाची सारासारविवेकबुध्दी देशकालानुरूप बदलत असते. त्यातून पूर्वेचा पश्चिमेशी जो एकजीव संयोग होत आहे त्या कालात आपण जन्माला आलो आहोत. भारतवर्षाचा विवेकसूर्य चालू काली संक्रमणावस्थेत असल्यामुळे विचाराचे वारे नियमानं वाहात नाहीत. सुखाच्या तरुण इच्छा नव्या विचाराच्या आणि नव्या कल्पनांच्या एका पिढीच्या हृदयात उत्पन्न होतात, आणि त्या सुखांची साधनं पुरविण्याचं अगदी निराळया पिढीच्या हाती असतं. भिन्नसंस्कृतीच्या या संक्रांतीकालात आशेच्या पायावर उभारलेल्या आपल्या वाटेवरच्या इमारती ढासळू लागल्या तर तो कठोर काळाचा दोष आहे. वडिलांच्या मनाला न दुखविणारा त्यागधर्म आजच्या तरुण पिढीनं आचरणात आणला पाहिजे. शरद, प्रेमळ मुली, आपला आजपर्यंतचा प्रेमळ सहवास हेच आपलं सुखसर्वस्व! तुझ्या-माझ्या सुखावर ही संक्रांत बसली तरी तीळमात्राच्या प्राप्तींनाही गोड बोलून आपण आजचा सण साजरा केला पाहिजे. शरद, भगीरथाच्या सर्वस्वाची तुला शपथ आहे. मी तुझा त्याग करणं कितीही अन्यायाचं असलं तरी त्याला तू आपली संमती दे. अशा अडचणीच्या प्रसंगी या दोन अन्यायांतून एकाचा तरी मला अवलंब करावा लागणारच. कोणता तरी अन्याय करणं ज्या वेळी आवश्यक होऊन बसतं, त्या वेळी ज्या अन्यायामुळं अंत:करणाची जाणिवेनं तळमळ होत नाही तोच मनुष्यमात्राला क्षम्य आहे. शरद, याच पावली भाईसाहेबांकडे चल, माझ्या मृत प्रेमाची अखेरची इच्छा म्हणून तुला सांगतो की, भाईसाहेबांच्या विनंतीचा- आणि आता ती माझीही विनंती आहे- या विनंतीचा अनादर करू नकोस. माझ्या जन्मदात्याला माझ्यामुळं दु:ख झालं तर यापुढं मी जगणं शक्य नाही. अजून रडतेस? वेडे, रडणं हे संसारात संकटाशी लढण्याचं हत्यार नाही! (स्वगत) हिच्या या रडण्यामुळं या त्यागाचा मला केवढा आनंद वाटत आहे! माझ्या विनंतीला ही चुकून तरी मनापासून रुकार देईल की काय अशी मनाला सारखी भीती वाटते. हिच्या इच्छेविरुध्द आणि केवळ माझ्या इच्छेमुळेच ही हा स्वार्थत्याग करीत आहे या कल्पनेतच माझ्या आनंदाचं रहस्य आहे. (उघड) शरद, चल माझ्याबरोबर आणि आता यापुढं रडशील तर तुला माझ्या गळयाची शपथ आहे. (जातात.)