अंक पहिला - प्रवेश तिसरा

गडकर्‍यांची नाटके मराठी भाषेचे कायमचे अलंकार बनलेले आहेत, आपली नाटके वाङ्मयदृष्ट्या वरच्या दर्जाची व्हावी याची त्यांनी फार खबरदारी घेतली होती.


[वलवंत प्रासादिक नाटकमंडळीचा दिवाणखाना. तालमीचा देखावा. कांहीं मंडळी जमली आहेत, कांहीं येताहेत, एकजण मध्येंच निजले आहेत.]

काका: चलरे; कृष्णा, दे घंटा आणि हाक मार वडया मंडळीला; ददा, पांडू, भाऊराव (दोन तीन मुलें जातात.) हें कोण निजलें आहे. देसपांडे का ? उठीव त्यांना !
कृष्णाः देशपांडे, अहो देशपांडे, उठा कीं.
देशपांडे : अरे कां त्रास देतोस मर्दा;  आहे काय गडबड !
कृष्णा: अहो तालीम.
देशः तालीम नाहीं आखाडा.
कृष्णाः काय कोठयांचा नाद हा.
देश: नाद नाहीं आवाज.
काका: अहो, बस करा कीं; उठा, (देशपांडे उठून बसतात. मुलें येतात.)
गोपाळ: काका, अण्णासाहेब गेले आहेत बाहेर. पंत म्हणतात माझी आहे पाठ नक्कल; आणि गणपतराव म्हणतात तुम्ही सुरू करा मी आलोंच. रघुनाथ, भाऊराव म्हणतात मी भांग काढून येतों केंसांना ?
देश : भांग का गांजा ? (दोघे तिघे जण येतात.)
पांडू: का काका, आम्हांला जरा उशीर झाला कीं कायदे आणि कलमें काढिलीं, आताम करा कीं दंड ?
देशः दंड का हात ?
काका: आम्ही कशाला बसतों कुणाला दंड करीत; मालक जाणे अन् तो दंड जाणे ! तो मालकांचा मान !
देश: मान का कंबर !
पांडूः हं, तें ठीकच आहे; मोठयांना कोण ठेवणार नांवं ?
देशः नांव नाहीं होडी.
तात्याः गप्य बैस कसा, पांडू; अरे, ती वडील मंडळी, आपण त्यांना असें बोंलू नये. त्यांनीं कांहीं केलें तरी आपल्याला तीं पूज्यच !
देशः पूज्य का शून्य.
काका : बस करा आपला फाजीलपणा, देशापांडे, नक्कल आहे का उद्यांची पाठ ?
देशः (हळूच एकीकडे) पाठ का पोट ?
काका: बरें भाऊराव येईपर्यंत तेवढें “ जाऊं कामाला ” घ्या बसवून ! पांडू, सूर धर काळ्या पांचव्याचा मध्यम.
देश: (एकीकडे) मध्यम का उत्तम. (कांहीं मुलें पुढें येतात.)
मुले : जाऊं कामाला ! चला ग दिवस किती आला ॥
काका:  ए विन्या, नीट म्हण कीं लेका जा-ऊं.
विन्या: जाऊं [त्याचा सूर चुकतो]
काकाः अरे लेका, जा-आ-आ ऊं.
विन्याः जा-आ-आ ऊं. [सूर पुन्हां चुकतो.]
काकाः जा-आ-आ आ.
विन्याः जा-आ-आ-आ-आ.
काका: चार कशाला आकार घेतोस ? जा-आ-आ-आ. प, ध, प, सा.
विन्याः प, ध, प, सा.
देशः पसा कां मूठ ?
काका: आ-आ-आ-आ-प, ध, प, सा. (काका व विन्या म्हणतात.)
गणूः [एकीकडे] तात्या हे कावळ्याची “सारीगम” करण्यापैकीच हं. खालेरीस आपला मुक्काम होता; तेव्हां एकदां सकाळीं कावळा ओरडत होता
एकः काका पडले गाष्यांतले दरदी; केली सुरुवात त्याच्या ओरडण्याची सुरावट करायला. त्यांतलाच हा अव्यापारेपु व्यापार. या मूठभर पोराला काय कळणार यांचा ‘पधपसा’ नि’निसधप’ !
काकाः जा, लेका, म्हण कसें तरी. [मुलें पद म्हणतात.]
शंकर: उपवन तरुवेलींना जल अमी घालाया जातें ॥ जल मी घालाया जातें.
हरि: हरिण-शिशूंना कोमल पल्लव-काका, हरिण-शिशृंना म्हणजे काय?
काका: यांत काय अवघड आहे; अरे वेटया, हरिण म्हणजे हरणें आणि शिशू म्हणजे असे ! हरिण शिशूंना म्हणजे ससे नी विश्व म्हणजे विशवे.
हरिः हरिण-शिशूंना कोमल पल्लव चाराया जातें । पल्लव चाराया जातें ॥
गोपाळ: कादंबरीची कुसुम कंचुकी गुंफाया जातें । कंचुकी गुंफाया जातें ॥
काका: जरा चेहर्‍यांत मजा आणा कीं थोडी ! रडतोस कां असा.
दामूः पंजर शुकसारिकेस गायन शिकवाया जातें । सगायन शिकवाया ॥
काका: अरे खुळ्या सगायन काय ? आणि तूं काय गायन शिकविणार ! मांजर खाल्ल्यासाखा ओरडतो आहेस नुसता ! नाहीं आवाजांत प्रेम कीं नाहीं गाण्यांत ढंग ! आणि म्हणे गायन शिकवाया जातें.
दामूः काका, भाऊराव आले ? [भाऊराव येतात]
काका: हं मग घ्या मुलींचा प्रवेश शारदेंतला !
रघुः काका, मी करूं वल्लरीची नक्कल ?
काका: लेका, आवाजाचें झालें आहे मडकें आणि वल्लरीची नक्कल कशाला ? बसत जा आजपासून आंतल्या पेटीवर !
शंकर: तात्या तुमचे बाळाभाऊ आले ! [बाळाभाऊ दोघांशीं बोलत बोलत येतात.]
काका: तात्या, हं, आज होऊन जाऊंदे याची गम्मत.
तात्या: ओ हो हो हो, बाळाभाऊ ? या, गुरु.
बाळा: गुरू ! कोण आम्ही का तुम्ही ? वा: भय्या !
तात्या: [हसत] भले ! आम्ही गुरू वाटतें ! आमची काय आहे योग्यता गुरू व्हायची !
देश: [एकीकडे] गुरू का जनावर !
बाळाः बनवा, बनवा बुवा आम्हांला !
तात्याः हें बनवणें वाटतें ! आतां मात्र हात जोडले; माफ करा. बाळाभाऊ; तुमची काय गोष्ट; आज तुम्ही नाटकांत नाहीं, नाहींतर झुलवून सोडलें असतें लोकांना.
काका: काय, तात्या, बाळाभाऊ गातात वाटतें !
तात्याः गातात ! तुम्हीं ऐकलें नाहींत कधी ! किर्लोस्करांच्या भाऊरावामार्गें एवढा एकच प्राणी आहे आज ! आपल्या इथें नेहमीं येतात तर खरें ! तान तयारी भलतीकडे, गळा फिरता, आवाजांत झार अशी आहे अगदीं किनरीसारखी ! आतां गंधर्वाचा पाडा शिल्लक नाहीं, नाहींतर हे सव्वा, दीड, अडीच गंधर्वापेक्षांही बालगंधर्व व्हावयाचे.
भाऊ: मग, तात्या, होऊंद्या आतां कांहीं !
काका: हो खरेंच, ऐकवा कांहीं आम्हांला !
तात्या: बाळाभाऊ, या पुढें ! भय्या एकच चीज, पण ऐशी झाली पाहिजे कीं अगदीं भलतीकडे ! काका, सुरलपणाबद्दल तर शिकरत आहे ! रहिमतखां झक मारतो, यांच्यापुढें !
बाळा: ए, तात्या ! काय हें ! आम्ही आपलें उगीच आ करणारे.
तात्याः आ करणारे ! लोकांना आश्चर्यानें “आ” करायला लावाल ! काका हें सारें उगीच वरवर बरें का ? गृहस्थाच्या अंगांत इतके गुण आहेत पण कोणी स्तुति केली कीं बिघडलें बस्तान !
गण: हं, मग, तात्या, आतां उशीर कां !
तात्या: बाळाभाऊ करा सुरुवात. कृष्णा घे तबला.
बाळाः (गंभीर आवाजानें तात्याच्या कानाशीं लागून पण सर्वांस ऐकूं येत जाईल अश रीतीनें) वडी मंडळी ? जाऊं द्या ! तुम्ही एकदां चढयां सुरांत दोन ताना फेंका कीं चिमणीसारखें तोंड होईल एकेकाचें ! बडी मंडळी ! देखनेमें ढबू और चलनेमें शिवराई ! (उघड) म्हणा, आपल्याला थोडाच रंग मारायचा आहे ?
बाळाः पण-पण बुवा.
देश: (मध्येंच) पण कां पैज ?
बाळाः तात्या, वेळ जातो आहे उगीच !
तात्याः बाळाभाऊ, हं, पांडू, धर सूर! [पांडू पेटीचा सूर धरतो.]
बाळा: (निरनिराळे सूर बदलून) आ-आ-आ-आ. हं ठीक आहे. नाहींतर एक सूर चढा घ्या अजून, [पांडू तसें करितो.]
बाळाः मग काय, म्हणायचें तात्या ! [बाळाभाऊ पुढील ठुंबरी वेडया वांकडया सुरांत ओरडतात; तात्या बढजाव भय्या म्हणून म्हणतात; मंडळी तोंडाला पद लावून हंसतात व मधून “वाहवा” देतात. बाळाभाऊ क्रमाक्रमानें आवाज चढवीत शेवटीं किंकाळ्या मारितात व ताल प्रथम सावकाश (लय) नंतर फार जल्द (दुगण) व एकदम अगदीं सावकाश (ठाय) असा बदलून मधून मधून भरपूर ताना मारितात. मंडळी माना डोलावितात.]
(चीज)
बाळाः जो तूं गुण समजत सुन हमरी ॥
काका: वाहवाः बाळाभाऊ, वाहवा तात्या खूप मजा केली.
भाऊरव: शिकले कुठें हें इतकें ?
बाळाः शिकण्यासारखें आहे काय त्यांत, उगीच आपुलें वडें वांकुडें गाईन परी तुझा म्हणवीन.
तात्या: अहो खर्‍या हिर्‍याला उसनी चमक हवी कशाला ? हें सारें ऐकून ऐकून झालें आहे नुसतें.
(मुलें बाळाभाऊस मधून मधून ताना घ्यावयाला सांगतात, बाळाभाऊ, वेडयावांकडया ताना मारितात, तात्या बोटानें गिरक्या घेऊन त्यांना सूचना देतात.)
रघूः बाळाभाऊ आतां जिन्याची तान,
शंकरः भले, आतां जिन्याची तान,
रघुः आतां चक्री तान,
तात्याः बाळाभाऊ, आतां लावणी ‘नका टाकून जाऊं,’
काका: तात्या आतां जरा यंत्र थांबवा. हा ग्रामगीताचा प्रकार नको.
तात्याः यंत्र थांबवा कशाला, आतांशा गाणार्‍या यंत्रातून चांगले मोठे प्रतिष्ठित लोक सुद्धां ही लावणी बरोबर बिनदिक्कत ऐकत बसतात. मग आमच्या या यंत्रानेंच काय पाप केलें आहे, तें कांहीं नाहीं चलदेव. बाळाभाऊ अगदी हावभाव सुद्धां,
(तात्या शिकवितात बाळाभाऊ हावभावासकट वरील लावणी म्हणतात.)
काका: भेल, बाळाभाऊ, खूप आहे ! हावभावाची तर शिकस्त आहे !
तात्याः नाटकांत येणार आहेत आपल्या ! चालेल का नाहीं ?
पंतः चालेल म्हणजे? किर्लोस्करांतल्या बालगंधर्वावर आहे कडी !
देशः कडी का कुलूप ?
पंतः घाला कीं तुमच्या तोंडाला कुलूप एकदां !
काकाः बरें तात्या, आणखी कांहीं सुनवा कीं ?
तात्याः बाळाभाऊ, होऊन जाऊं द्या एकदां अखेरचें ! काय पाहिजे मंडळी, ‘नच सुंदरी करूं कोपा ?’ ‘कीं अरसिक किती हा शेला?’
रघूः “अरसिक किती हा " च होऊं द्या !
कृष्णाः आणखी, तात्या, परवां रंगपटांत झालें तशा थाटानें !
ता त्याः हरकत नाहीं, का बाळाभाऊ ?
बाळाः म्हणजे पदर घेऊन ? माफ करा भय्या ! बनवितां वाटतें आम्हांला ?
तात्याः बनवितों ? तुम्हांला वाटतें कां तसें खरोखरीच ? मग काय, राहिलें आमचें म्हणणें ! बाकी, बाळाभाऊ, आम्ही तुम्हांला मंडळींतले समजतों आणि तुम्हीं मात्र फटकून असतां बरें का ?
काकाः बरें, बुवा गाणें आपलें असें तसें असतें तर मग भाग निराळा,
पंतः हो, पण आवाज जसा गळी: म्हणणें ढंगदार ! मग बनविणार कसें इथें ?
तात्याः आणि मी तुम्हांला वनवीन ? आपल्या मंडळीला बनविलें म्हणजे झालेंच कीं मग ? तुम्हांला वाटलें का खरेंच तुमचा आवाज वाईट आहे आणि ही सारी थट्टा म्हणून ?
बाळाः नाहीं, पण उगीच बाहेरची मंडळी आली म्हणजे पंचाईत.
तात्याः बाहेरचें कोण येणार ? येवढी आपलीच मंडळी ! मी करतों सारी यवस्था.
पंत: नाहींटर त्यांना आवडत नसेल तर राहूं दे तात्या ? उगीच कशाला इतका खल !
देश: खल का बत्ता !
तात्याः नाहीं; नाहीं; म्हणावयाचें ना गुरु ?
बाळाः म्हणूं कीं ? पण बाहेरचें कुणि---
तात्याः मी तें करितों सारें ठीक ! अरे, कोणी तरी बसा आणि कुणी दारांत आलें तर एकदन कळवा पाहूं ? कोण बसेल बरं, कृष्णा ?
गणूः कृष्णा कशाला, मीच बसतों कीं; उगीच पोरासोरीं काम नको.
तात्याः बस, सत्रा आणे काम ! (गणू जाऊं लागतो.)
बाळाः गणपतराव, भय्या तसदी पडते आहे ? माफ करायची हं.
गणूः अरे दोस्त, तुमच्यासाठीं जान कुरबान आहे. (एका टोंकाला जाऊन बसतो.)
तात्याः ठीक आतां उठा भय्य; रघु, जा त्यांना पदर दे पाहूं; हें घे माझें उपरणें.
बाळाः तात्या पदरच कशाला पण नुसतें म्हणतों कीं.
तात्याः हं एकदां भाषा झाल्यावर बदलायचें नाहीं गुरु. जारे रघु; कर सोंग तयार. या उपरण्याचा पदर दे. सदर्‍याच्या बाह्या चोळीवजा सरकीव म्हणजे झालें. टोपबीप नको आज.
रघुः पण तात्या चोळीला कापूस नाहींना इथें.
तात्याः अरे नसूं दे लेका कापूस. ते धाकटे रंगाचे रिकामे पेले आहेत ना कोनाडयांत तेच घे लौकर जा.
पंतः ठीक रंग आहे. तात्या.
(बाळाभाऊ. रघु व एकदोन मुलें जातात.)
काका: खूप बनविला आहेंस बुवा !
[वसंत व मधुकर येतात.]
मणूः ओहोहो ! कोण मधुकर आणि वसंतराव ! या बसा ! कोणिकडे आज वाट चुकालं ?
मधुः आमचे ते बाळाभाऊ वैद्य; त्यांना बोलवावयाला आलों.
गणूः होय का ? या मूर्तीशीं काय काम निघालें तुमचें ?
मधुः थोडेंच काम होतें; आहेतु का ते ?
गणूः आहेत: पण जरा बाजूला उभे राहून थोडी मजा पाहा त्यांची, पुढें माच येऊं नका इतक्यांत; नाहींतर त्यांचा फिक्का पडेल.
(मधुकर व वसंत थोडे बाजूला सरतात. नंतर धोतराचा पद घेतलेले स्त्रीवेषधारी बाळाभाऊ येतात.)
काकाः तात्या सोंगांतसुद्धा प्रेम आहे, चालण्यांतुसुद्धां लकब आहे थोडी.
पंतः हं हं बाळाभाऊ, खूप आहे बरें; चालूं द्या आतां.
[एका उपरण्याचा शेला घेऊन बाळाभाऊ वेडयावांकडया अभिनयांत “ अरसिक किती हा शेला ” हें पद म्हणतात. मंडळीचा गोंधळ चालूच आहे.]
काका: शाबास गबृ ! अगदीं सही भाऊराव कोल्हटकर !
देशः सही नाहीं शिक्का.
पंतः सवाई भाऊराव म्हणाना ! हा गुण नवीनच कळला !
तात्याः अहो, झांकलें माणिक आहे माणिक ! गाणें आहे; चेहरा आहे; अभिनय आहे; शिवाय कवि आहेत !
काकाः कया सांगतोस !
तात्याः खरेंच: नाटक लिहिलें आहे त्यांनीं एक ! त्याचें नांव वैद्यनाटक !
बाळाः वः तात्या, वैद्यनाटक नव्हे; नाटयवैद्यक !
काकाः म्हणजे वैद्यकाची भानगड आहे वाटतें त्यांत ?
तात्याः म्हणजे-त्यांचे वडील मोठे प्रसिद्ध वैद्य होते ! आणि हे नाटयभक्त; तेव्हां आपल्या वडिलोपार्जित धंद्याचें नांव गाजविण्यासाठीं तोच विषय घेतला नाटकाला ! हो, कवीला काय कमी ? “ जहां न पहूंचे रवि; वहां पहूंचे कवि !” त्यांत नायिकेला कामज्वर भरला होतात तो पांचव्या अंकांत काडेचिराइताचा काढा देऊन ह्टविला असा भाग आहे एकंदर !
पंतः वाहवा ! ऐकायला मिळालें पाहिजे बुवा एकदा !
काकाः बरें, तात्या, आतां अखेरचें एक; म्हणजे खेल खलास !
तात्याः बाळाभाऊ ‘जाई परतोनि’ आतां ! आणि शेवटीं म्हणत म्हणत आंत निघून जायचें !
[कृष्णाला हरिण कल्पून बाळाभाऊ पद म्हणतातः मधून मधून घसा फोडून रडतात; मंडळी रडण्याचा आविभवि आणितात; तात्या तर ओक्साबोक्शीं रडतात. शेवटीं बाळाभाऊ झटक्यानें निघून खोलींत जातात, टाळ्यांचा गजर.]
मधुः का हो, गणपतराव, अगदीं हुबेहूब माकडचेष्टा आहेत या !
ग णूः तो मदारी आहेना आमचा तात्या । असें हुरळलेलें तट्टू तात्याच्या तावडींत सांपडलें कीं त्यानें बनविलेंच त्याला ! जरा चढविलें कीं झाळें काम !
वसंतः म्हणजे, ही काय जादू आहे तात्याजवळ !
गणूः उद्योग काय तात्याला दुसरा ! हा बाळाभाऊ अगदीं फटेल ना ! पण तात्याच्या अर्घ्या वचनांत अगदीं ! तात्याचें वाक्य त्याला प्रमाण !
मधुः फारच नवल म्हणायचें बुवा !
गणूः नवल कशाचें ! एकटा बाळाभाऊच आहे का असा ! मुक्कामाच्या दर गांवाला आमच्या तात्याचीं एक दोन कुळें आहेतच ! एरवीं ही मंडळी खूप हुषार; पण एवढया बाबतींत ढिसाळ ! चांगलें सात सात यत्ता शिकलेले लोकसुद्धां आहेत तात्याच्या यादींत ! [बाळाभाऊ बाहेर येतात.] बाळाभाऊ, हे मधुकर आले आहेत तुमच्याकडे !
बाळाः [गडबडीनें] कसें काय मधुकर ! कुणीकडे आज ?
मधु: तुमच्याकडेच आलों आहे ! अप्पांनीं तुम्हांला बोलाबिलें आहे घरीं. तुम्ही वेणूताईला एकदां शास्त्रोक्त पाहून जा म्हणजे बरें पडेल ! आज किंवा उद्यां तुमच्या सवडीप्रमाणें येऊन जा.
बाळाः ठीक आहे ! चला ! आतां पाहतों कांहीं काम नसलें तर, नाहीं तर उद्यां येईन. चला, बरें आहे, मंडळी, जरा जाऊन येतों. [मधु व वसंत नमस्कार वगैरे करितात व बाळाभाऊसह जातात. मंडळींत खूप हंशा होतो.]

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP