अंक चवथा - प्रवेश दुसरा

‘पंडितराज जगन्नाथ’या नाटकावा नायक महान् संस्कृत कवि आणि विख्यात साहित्य-शास्त्र-पंडित जगन्नाथ हा आहे. यातील ‘गंगालहरी’ स्तोत्र आजही घरोघरी वाचले जाते.


[ स्थळ : गंगेचा घाट. वेळ : सूर्यास्तापूर्वींची. मावळतीच्या तांबूस सोनेरी किरणांनीं तो घाट उजळून निघाला आहे. आनि जगन्नाथपंडित त्या घाटाच्या कठडयावर पद‌मासन घालून, गंगेकडे तोंड करून बसले आहेत. शेजारीं लवंगिका आहे. गंभीर स्वरांत दोघेहि गंगा--स्तोत्र म्हणत आहेत. ]

जगन्नाध :

धन्य भागीरथी : जननि वरदायिनी ।
दुरित सारें हरो माय भंदाकिनी ॥धु०॥
राजराजेश्वरी ! रूप तव पाहुनी
हर--शिरीं चंद्रभा जाय कृश होउनी !-
शैलजा--मत्सरां हरहि अवमानुनी
तुजसि सन्मानितो निजशिरीं घेउनी

माते, तुला भेटण्यासाठीं यमुनामाई हरिकथेचं अमृत घेऊन येते आणि शरयू प्रभुरामचंद्राच्या कथेचं पुण्य तुला अर्णण करते.

भेटण्या येतसे भगिनि यमुना तुला
हरिकथेची मुधा मधुरतम घेउनी
आणि शरयूहि ये घेउनी रघुकथा
मिळतसे तुज अशी पुण्यमय खंडणी ॥

 ( बन्सीराम प्रवेश करून भजनांत तल्लीन झाल्याचा आविर्भाव करतो. )
पण मी तुला भक्तिभावाखेरीज कसली खंडणी देणार ?. तरीहि तूं मला दूर लोटणार नाहींस, याची खात्री आहे. कारण--

भक्त--जन वेदना ऐकुनी पाहुनी
दाटली जी दया शंकराच्या मनीं--तीच
ओसंडूनी वाहते भूवरी
दुग्धधारा जणूं भक्त--जन धारिणी !

बन्सीराम :  ( मोठयानें किंचाळून ) दुग्धधारा ! बाहवा, आपल्या शब्दा--शब्दांतून दुग्धधारांचे शेंकडों कुभं ओसंडत आहेत ! धन्य पंडितराज जगन्नाथ ! धन्य गंगालहरी ! धन्य धन्य ही गंगाभक्ति ! ( लवंगिका संतापून उदे‌गानं मागें वळून पाहाते. ) बाईसाहेब, रागावलंत ? अहो, मी पंडितराजांची स्तुति करीत आहें ! ( हात जोडून ) अजी मै उनकी शोहरत सुनाता हूं आप लोगोंका किस्मतका दरवाजा खुल गया--है ! पंडितराज जगन्नाथ की जय हो ! पंडितराज राजतिलक जगन्नाथ की जय हो ! देवी लवंगिका की जय हो !

लवंगिका : ( जरा आश्रर्यानं ) कोण बन्सीराम ? तुम्ही ? अन्‌ हात जोडून आमच्यापुढें ?

वन्सीराम : उपहासाचे असे तिखट तीर मारूं नका ! तुम्हांला आजवर नाइलाजानं विरोध करावा लागला. पण आतां आमचं मतपरिवर्तन झालं आहे. ह्र्दयपरिवर्तन झालं आहे ! क्षमा करा जुन्या अपराधांची !

लवंगिका : क्षमा करण्याचा अधिकार माझा नाहीं; या पवित्र गंगामाईचा आहे. तिची क्षमा मागा वाटलं तर. आणि आमच्याविषयीं मत--परिवर्तन झालंच असेल, तर फक्त एक गोष्ट आमच्यासाठीं करा.

वन्सीराम एकच काय ? पन्नास करूं ! ( उत्साहानें ) बोला, काय करूं मी आपल्यासाठीं ? आमच्या आदरणीय पंडितराजासाठीं ? सांगा, काय करूं मी ?

लवंगिका : इथून निघून जा ! यांच्या भजनांत खंड पाडूं नका !

बन्सीराम :  ( मोठयानं ) भजन बस्स झालं ! ( लवंगिका उद्वेगानं पाहाते. ) पुन्हां रागावलांत तुम्ही ? सहजिकच आहे तें. पण खरंच सांगतों, तुमचं हें कष्टमय, दुःखमय, चिंतामय जीवन संपावं. म्हणून हिताचा सल्ला देण्यासाठीं अनाहूतपणें आलों मी ! आमच्या आदरणीय पंडितराजांच्याविषयीं माझ्या मनांत वाहात असलेला प्रेमाचा प्रवाह उसळून आला आहे. आणि म्हणून--

लवंगिका : तुमच्या प्रेमाचा तो प्रवाह देखील या गंगेंतच मिसळून टाका. कारण, जें जें गंगेला मिळतं तें तें सफल होतं, पवित्रे होतं. अहो, काय सांगूं हिच्या संसर्गाचा महिमा !

बन्सीराम : कांहीं सांगूं नका. आधीं पतिराजांना--पतिराजांना--शुद्धीवर आणा. ( जगन्नाथांकडे वळून ) जगन्नाथराय, माझं बोलणं तर पुरतं ऐकून घ्याल कीं नाहीं ?? अहो, गंगेची महती गाण्याची जरूरीच नाहीं !! पाहा ना. सारं जग मला थापाडया, नीच, संधिसाधु म्हणतं ; पण केवळ तुमच्या या गोड गंगालहरीच्या नुसत्या श्रवणानं माझे दुर्गुण जळून खाक झालेत. माझं संपूर्ण ह्रदय--परिवर्तन झालं !

जगन्नाथ : आणि माझं देखील ! आतां गंगेखेरीज दुसर्‍या कोणत्याहि विषयाला या ह्रदयांत जागा नाहीं. स्तोत्र गाईन तर गंगेचं ! दर्शन घेईन, तर तें केवळ गंगेचंच ! चिंतन--मनन--पूजन--भजन करीन, तर तें केवळ गंगेचंच!. म्हणून म्हणतों. इथं दुसरा विषय काढूंच नका.

बन्सीराम : अहो, पण मी तुमच्या हिताची शुभवार्ता सांगायला आलोंय‍. ती तर ऐकाल कीं नाहीं ?

जगन्नाथ : शुभवार्ता ? माझी ही गंगामैय्या लाटांलाटांतून मला शुभवार्ताच सांगत आहे, कीं ‘ जगन्नाथ, सोड सोड हा पसारा. तुझा मोक्षकाळ जवळ आला आहे.’ याहून दूसरी शुभवार्ता ती कसली ?

बन्सीराम : सांगतों. जगन्नाथराय, मी तुम्हांस वरपांगी विरोध करीत असतांनाच, अंतस्थपणें--अगदीं गुणचूप--तुमच्या हिताचीच तजवीज करीत होतों. पंडितराज.

जगन्नाथ : पुरे पुरे ! व्यर्थ माझी भजनसमाधी मोडलीत. आई गंगे ! सोडव मल या मूर्ख जगाच्या कटकटींपासून. या दुनियेल विटूनच मी तुझ्याजवळ आलों.

निकट तव पातला बाळ हा अवगुणी
भ्रमुनि माया--वनीं थकुनि वैतागुनी ।
त्यास अंकीं तुझ्या वत्सले घेउनी--
निजव अंगाइचें गीत तूं गाउनी ॥

शिपाई :  ( प्रवेश करून ) खामोश ! गाना बंद करना वे पागल. ( जगन्नाथराय गंगालहरी चालूच ठेवतात. ) अबे, सुनने नही आता है क्या ? बंद करो जल्दीसे. गाना गानेको मना है ! आलमगिरी राजमें गाना--बजाना बंद !

लवंगिका : चांडाळांनो, दूर व्हा. गंगेच्या भक्तिगीतालाही मनाई ? अरे नीचांनो, गंगेच्या भजनाचंहि सुख आम्हांला तुम्ही मिळूं देणार नाही ?

शिपाई :  ( हांसून ) हा: हा: हा: ! सुख चाहिये तो गंगा काहे को ? गंगेचं गाणं म्हण्याऐवजीं भांगेचं पिणं चांगलं ! गंगा गंगा क्या चीज है ? भगवान भोलानाथ गंगेला डोक्यावरच घेतो, पण भांगेला तर पोटांत घेऊन तिच्या गुंगीला डोक्यांत जागा देतो ! माताजी, शंकरजीने ही कहा है--

‘ भांग पीनेसे क्या नफा ? तो आँखे लाल और दिल सफा ! ’

लवंगिका : बस्स झाली तुझी बडबड. गंगालहरी म्हणूं द्या त्यांना !

शिपाई : खामोश ! गंगालहरी की बात छोड दो. आम्ही फक्त सरकारी लहरी जाणतों ! खबरदार गाणं म्हणाल तर--सरकारी हुकुम आहे हा !

लवंगिका : सरकारी हुकूम ? यांनीं दिल्लीश्वर शाहजहान‌शिवाय कुणाला सरकार मानलं नाहीं अन‍ त्या जगदीश्वराच्या हुकुमाविना कोणाचाहि हुकूम मानला नाहीं-- मानणार नाहींत !

शिपाई : मानणार नाहीं, तर गंगेंत देईन फेकून.

जगन्नाथ : ( समाधींतून जागृत होऊन ) काय म्हटलंत ? गंगेंत फेकून द्याल ? वा: ! ती तर इष्टापत्तीच होईल. कारण सारं ब्रह्मांडच ह्या गंगामाईंचा लाटांलहरींवर हिंदोळत आहे--‘ इदं हि व्रह्मांडं सकल भुवना भोग भवनम‌.

शिपाई : खामोश, खामोश ! बन्सीराम, या पंडिताला भुतानं पछाडलेलं दिसतं. तेव्हां याला झोडपून. ( सोटा उगारतो )

हरीराम : ( प्र्वेश करून ) हां हां शिपाईदादा, कांहीं झालं तरी औरंगजेब बादशहाचे बहिणोई आहेत हे. मोठे शायरहि आहेत. तेव्हां अशी दांडगाई कामाची नाहीं-- तुम्ही असं करा, सुभेदाराचं फर्माना आणा अथवा सुभेदारसाहेबांनाच घेऊन या.

शिपाई : अच्छा, यह भी कहना ठीक है ! आत्तां फर्मानाचा कागद घेऊन येतों--सही शिक्क्याचा. लेकिन‌ यह पागलको संभलना. ( जातो. )

हरीराम : देखा पंडितराज, मोठया युक्तीनं घालवावं लागलं या दांडगेश्वराला. आम्ही तुमचे तात्त्विक विरोधक; पण तुमची ही विटंबना बघवत नाहीं हो आतां. तुम्हांस भजन म्हणण्याचीहि चोरी ?

जगन्नाथ : हो. तुम्हीं देखील नाहीं का अडथला आणला माझ्या गंगालहरींत ?

हरीराम : अहो, पण आमचा हेतु वेगळा होता. आम्ही गंगालहरी बंद करायल नव्हतों आलों, तर गंगालहरीच्या कर्त्याला शुभवार्ता सांगायला आलों होतों. चकित‌ व्हाल ती ऐकून. सांगूं ?

[ जगन्नाथ कांहीं बोलण्याच्या आंतच, संधीचा फायदा घेऊन, बन्सीराम बोलून लागतो ]

बन्सीराम : अहो, मीं माझ्या एका मित्राला--आपल्या दयानंदाला--कामरूपच्या राजाकडे पाठवलं होतं--खुलासेवार पत्र देऊन ! आणि आनंदाची गोष्ट ही, कीं, माझ्या या गोष्टीला यश येऊन, कामरूपच्या दरबारचं आमंत्रण आलं आहे तुम्हांला. येईलच तो इतक्यांत तें नेमणुकपत्र नि प्रवासखर्चाच्या मोहरा घेऊन.

जगन्नाथ : गंगार्पणमस्तु ! तेंहि गंगेलाच अर्पण करा. राजकविपदच काय, कोणी साक्षात‌ राज्यपद दिलं, तरी तें मी गंगेलाच अपर्ण. करीन, फार कशाला. प्राणापलिकडे जपून ठेवलेले माझे ग्रंथहि मी आज गंगार्पण करणा आहें. त्या पुस्तकांबरोबर पुस्तकी पांडित्याचा उरलसुरला गर्वहि गंगेंत विलीन होऊं दे ! लंवगिके, जा. माझे ते ग्रंथ आत्तांच घेऊन ये. अग, घुटमळतेस कां ? जा, कशा कशाचाहि मोह आतां उरायला नको.

लवंगिका : मोह उरलेलाच नाहीं. पण नाथ, ते अमोल ग्रंथ गंगेंत बुडविण्याची काय जरूरी ? त्याऐवजीं चिन्ह म्हणून राजा प्राणनारायणांकडेच पाठवून देऊं ते, गंगार्पण--बुद्धीनं.

जगन्नाथ : ठीक आहे तुझी सूचना, पण तीहि आतांच अंमलांत आणायला पाहिजे.

बन्सीराम : हां सच है ! कोनतंहि सत्कृत्य लांबणीवर पडायला नको.

हरीराम : कल का आज, और आज का अभी.

जनन्नाथ : जा, घेऊन ये ते ग्रंथ, तो ‘ रसगंगाधर,’ तो ‘ भाभिनीविलास, ’ तें ‘ चित्रमीमांसाखंडन ’. कांहीं एक ठेवूम नकोस . जा म्हटलं ना ? आयुष्याचा ग्रंथ आटोपत आला, तरीया ग्रंथांचा मोह ? जा. ज्याची जरूरी नाहीं, तें कांहींएक ठेवायंच नाहीं आपल्याजवळ, ( लवंगिका जाते. ) बन्सीराम, राजा प्राणनारायणांना ते ग्रंथ देऊन टाका, आणि माझा कृतज्ञ प्रणाम कळवा त्यांना.

बन्सीराम : पंडितराज, पंडितराज ! हें मामुली काम मी करीन हो ! पण मला खरं खरं सांगा, त्या दानशूर गुणग्राही राजाकडे तुम्ही जाणार नाहीं ?

जगन्नाथ : राजाकडे जाणारच आहे मी. पण तें या राजाकडे नव्हे, त्या राजाकडे ! ( आकाशाकडे बोट दाखवून. ) अखिल ब्रह्मांडाच्या राजाकडे ! एक फुंकर मारतांच चंद्रसूर्य निर्माण करण्याचं ज्याचं सामर्थ्य आहे, त्या राजराजेश्वराकडे !  पण या जगांतील कोणत्याहि राजापुढें आतां हें मस्तक वांकणार नाहीं.

हरीराम : धन्य धन्य ही गंगाभक्ति ! पण पंडितराज, या घाटाच्या पायर्‍यांवर तडफडून तडफडून मरण्याऐवजीं त्या कामरूपच्या राज--मंदिराच्या पायर्‍या चढा !

जगन्नाथ : राजमंदिराच्या पायर्‍या मला चढायल सांगतां ? हा पाहा त्या राजराजेश्वराच्या आकाश--मंदिराकडे जाणारा गंगाप्रवाहाचा संगमरवरी निजा !-- थेट आकाशापासून भूतळापर्यंत बांधलेला ! नव्हे, पाताळापर्यंत गेलेला ! अस्मानांतल्या भागाला आकाशगंगा म्हणतात, धरणीवरील भागाला केवळ गंगा म्हणतात, आणि सगरपुत्रांच्या उद्धारासाठीं पाताळांत गेलेल्या भागाला म्हणतात पाताळगंगा ! असा हा दिव्य सोपान सोहून, येथल्या राजमंदिरांचे क्षुद्र जिने चढूं ?

वन्सीराम : हो, तेंच तुमच्या--अन्‌ आमच्यादेखील--हिताचं आहे. आमच्या आदरणीय जगन्नाथरायांनीं पुनश्व राजकवीची तोलामोलाची भूमिका या संसारनाटकांत केलीच पाहिजे !

जगन्नाथ : छे:, तें आतां शक्य नाहीं, कारण--

दो घटिकांचें जीवन--नाटक, नाटकास या मन विटलें ।
जीवनास या मन विटलें ॥ध्रु०॥
सूत्रधार परमेश खोडकर
आपणांस या रंगभूभिवर
पाजुनि माया मद्य मनोहर
लोटुन देईं कधिं न कळे.
कैफ उतरतां कळे अचानक
खेळ चालला हा शोकान्तिक.
याच्या मायापाशीं मोहक
जे नच फसले तेच भले !

बन्सीराम : हे वैराग्याचे, त्यागाचे उच्च विचार ठीकच आहेत. पण लोक त्या वैराग्याल दुर्बळाचा वैताग म्हणतात.

हरीराम : [ पुढे सरसावून ] आणि हें देखील विसरूं नका, कीं गंगामाईची भक्ति तुम्ही राजाश्रयाच्या बळावर अधिक चांगली करूं शकाल ! मोठमोठे घाट बांधूं शकाल. आपल्या मठांचें वैभव वाढवूं शकाल. गंगाकिनारीं अन्नछत्र घालूं शकाल.

जगन्नाथ : लोककल्याणाचं आकर्षक चित्र उभं करून मला भुरळ घालूं नका त्या दरबारी वैभवाची ! अरे, मी अशा उच्च वैभवांत लोळत आहें, कीं त्यापुढें या ऐहिक जगांतलं राजवैभवहि क्षुद्र वाटावं !. मला इथलं कांहीं एक नको आहे. तो दरबार नको; तें राजकविपद नको ! काळपुरुषाच्या एका टिचकीनं खलकन‌ कोसळणारा तो क्षणभंगुर सुखांचा नि श्रीमंतीचा ठिसूळ ऐनेमहाल नको--

नको नको सुख वैभव रे ॥ध्रु०॥
या गंगेचा पावन बिंदु भवसिंधूंतुन तारिल रे
ताप---पाप जी सहज हरी
भालचंद्रही शिरीं धरीं
त्या गंगेचा मातीचा कण, माझी वणवण शमविल रे.

हरीराम : ( एकदम पवित्रा बदलून ) बहोत अच्छा, बहोत अच्छा ! चला चला बन्सीराम, एक प्रश्न मिटला. मला वाटलंच होतं, कीं हा उलटया खोपडीचा पंडित, त्या शुभवातेंचं अस्सं स्वागत करील. चला, मरूं द्या या धर्म भ्रष्टाल असाच गंगाकिनारीं ! बहोत अच्छा. तुम्हांला सुख नको, वैभव नको. हें फार चांगलं ! ( बन्सीरामल खूण करून निघून जातो, )

वन्सीराम : ( जणूं स्वतःशींच ) ए भगवान ! असे पढतमूर्ख तूं पैदा केलेस, म्हणूनच आमचा चरितार्थ ठीक चालला आहे. ( जगन्नाथांस ) हँ: हँ: हँ: बरं आहे, येतोंच थोडया वेळानं. एके काळीं तुम्हांला वैभवाचा माज चढला होता, आतां वैराग्याचा उन्माद चढला आहे ! ( छद्मी हांसत निघून जातो. )

[ काशीप्रसाद--दयानंद घाईघाईनें प्रवेश करतात. ]

दयानंद : घात हुवा पंडितजी ! घात हुवा !

जगन्नाथ : काय ? काय झालं ?

दयानंद : देवीजी गंगाकी धारमें डूब गई !

जगन्नाथ : काय ? लवंगिका गंगेंत बुडाली ? तिला तर ग्रंथ आणायल पाठविलं होतं !

दयानंद : सुभेदाराच्या गुंडांनीं त्यांना पळविण्याची कोशीस केली; इतक्यांत आम्ही तिथं पोहोचलों. खूप झगडलों. पण.

काशीप्रसाद :  ( खिन्नपणें ) पण कांहीं उपयोग झाला नाहीं. पंडितजी, आमची ताकदच कमी पडली !

दयानंद : लेकिन‌ ते हरामखोर आमच्याशीं झगडण्यांत गुंतले, तेव्हां देवीजी दौडत दौडत गंगाकिनारीं गेल्या, अन‌ ‘ जय गंगे भागीरथी ’ असा पुकारा करून, त्यांनीं गंगेंत उडी घेतली ! आम्ही तिथं पोहोचण्यापूर्वींच गंगामाईनं त्यांना आपल्या कुशींत घेतलं !

जगन्नाथ :  ( शून्यपणें ) या जगाच्या रंगभूमीवर मला एकटयाल सोडून गेली ती ! माझी वनिता गेली; कविता गेली; शिवशक्ति अंतर्धान पावली !

काशीप्रसाद : ( हुंदका देऊन ) होय पंडितजी, ‘ जय गंगे भागीरथी ’ असा टाहो फोडून त्या पतिव्रतेनं गंगेंत उडी घेतली.

[ विजांचा लखलखाट नि मेघगर्जना होतात. जगन्नाथ अवाक‍६ होतो. ]
आम्ही दुर्बल ठरलों. बाईसाहेबांचं रक्षण करूं शकलों नाहीं. क्षमा करा. ( हुंदक देतो. )

जगन्नाथ : तुम्हांला कसली क्षमा करायची ? क्षमेचे मूर्तिमंत अवतार तुम्ही. तुम्हीच माझ्या अनंत अपराधांची क्षमा करा. आणि हें बघा. आधीं ते दुर्बळ अश्रु आवरा पाहूं. अहो, जीवन--संग्रामांत झुंजतां झुंजतां मरण पावली ती ! पातिव्रत्याच्या आदर्श जगापुढें ठेवून. भरल्या मळवटानं ती आपल्या खर्‍याखुर्‍या माहेरास निघाली. ज्या एकमेव कोमव तंतूनं मी जगाच्या मायानगरींतजकडलों होतों, तो तंतूच त्या साध्वीनं आपल्या मंगल मरणानं तोडून टाकल अन्‌ माझ्या मोक्षपंथाची वाट मोकळी केली !. आतां शोक आवरा अन‌ त्या वाटेनं मला जाऊं द्या. मला प्रवासाल निघूं द्या.

दयानंद : नाहीं जगन्नाथराय, तुम्ही ही वाराणसी सोडून जाऊं नका.

जगन्नाथ : ही वाराणसी म्हणजे मोक्ष--सोपानाची पहिली पायरी. सोडावीच लागते ती कधीं तरी.

काशीप्रसाद : नाहीं पंडितराज, तुम्हांल माझ्या प्राणांची.

जगन्नाथ : शपथ घालूं नका. मनुष्य चांगल्या गोष्टीला निघाला, कीं त्याला आडकाठी का करायची असते ? मी आतां दिव्य प्रवासाल निघालों आहें.

दयानंद : कोणता प्रवास ? पंडितराज, आम्हांल इथंच दुःखांत लोटून आपण प्रवासाला तरी कोणत्या निघालं आहांत ? ह्रषिकेश ? बद्रिनाथ--बद्रिकेदार ?

जगन्नाथ : नाहीं. त्याच्याहि पुढें. हा आहे मोक्षनगरीचा प्रवास ! सांतापासून अनंताकडे, नाशिवंतापासून अविनाशाकडे जाणारा प्रवास ! एक पाय चंद्रावर तर दुसरा सूर्यावर टाकीत ! कधीं सूर्यमालिकांचे अग्निपराग अंगावर झेलीत, तर कधीं शीतल चद्रिकेच्या अमृत तुषारांनीं ओलाचिंब होत ! हिरव्या. पिवव्या, निळ्या, जांभळ्या. सोनेरी, चन्देरी, केशरी प्रकाशांची रंगपंचमी बघत ! सुसाट वादळाच्या वेगानं, माहेरीं निघालेल्या मुलीच्या अधीरतेनं. मेघांची यक्षनगरं मागें टाकीत ! तारामंडळामागून तारामंळ ओलांडीतध्रुवाच्या पाराभोंवतीं प्रदक्षिणा घालणार्‍या सप्तर्षींचा ‘ सो ऽ हम‌ ! जो ऽ हम‍ ’ घोष ऐकत--हा जगन्नाथ त्या जगन्नियंत्याकडे जाणार !!.

[ मेघगर्जना होतात, विजा चमचमतात. ]

काशीप्रसाद :  पण मी जाऊं देणार नाहीं तुम्हांला, सारं दुःख गिळून तुम्हांला तुमचं यर्तव्य पुरं केलंच पाहिजे.

जगन्नाथ : अगदीं खरं--पण वेगळ्या अर्थांन ! मोक्षाच्या अर्ध्या वाटेवर माझी वाट पाहाणारी लवंगिका. ( मेघांचा गडगडाड व विजेचा लखलखाट होतो. ). या मेघगर्जनांतून, मला माझ्या कर्तव्याचीच साद घालीत आहे ! इतकंच नव्हे, तर ती पाहा, ती पाहा.

काशीप्रसाद : कोण ? कसले भास होत आहेत तुम्हांला ?


जगन्नाथ : भास नव्हे हो. ती पाहा. दुग्धवल लाटांच्या उसळत्या शिखरावर बसलेली, धवल चंद्रिकेचा मुकुट धारख केलेली, हिमधवल कमळं हातीं घेतलेली, धवलवसना. धवलरदना. धवलस्मिता जगज्जननी जान्हवी मला बोलावीत आहे !

[ मेघगर्जना, विजांचा चकचकाट. वादळाचा आवाज, गंगेचा खळखळाट ]

दयानंद : देवीजींच्या चिरविरहानं भ्रमिष्ट झालेल्या चित्ताचे हे आभास आहेत. पंडितराज, शांत व्हा. चला, माझ्या घरीं चला.

कशीप्रसाद : थंडगार वादळी बारे सुटले आहेत. विजा कडकडत आहेत. महापूर लोटला आहे. चला, शहरांत चला. गंगेला अकाली पूर आला आहे.

जगन्नाथ : अहो, अकाली नव्हे: योग्य वेळाँच हा आनंदाचा महापूर उसळत आहे!. आपल्या लाटालहरींचे हात प्रेमानं पुढें पसरून गंगामाई या श्रांत  बालकाकडे येत आहे. पाहा पाहा, घाटाची एकेक पायरी चढून ती वर येत आहे. माते ! तुझा जयजयकार असो.

जय गंगे भागीरथी ! हर गंगे भागीरथी ॥ध्रु०॥
जयजयकारें तुझ्या मंगले !
दुमदुमलें अंबर--धरती !.
उदक नव्हे. तव उदारताची
अखंड वाहे या जगती !.
परम दयाळे ! महन्मंगले !
देईं भक्ताला मुक्ती !.
जय गंगें भागीरथी ! जय गंगे भागीरथी !

[ हें भजन एक वेळ म्हणून होतांच बन्सीराम, हरीराम, अन‌ शिपाई इत्यादी प्रवेश करतात. ]

शिपाई : खामोश ! बंद करो बे यह ‘ गंगालहरी !’ गाना--बजाना बंद ! [ गंगालहरी चालूच आहे. दयानंद--काशीप्रसाद पुढें सरसावून विरोधकांना आडवतात. तेवढयांत, भजन म्हणत म्हणत घाटाच्या कठडयावर गेलेले जगन्नाथराय, ‘ जय गंगे भागीरथी ’ अशी गगनभेदी गर्जना करीत असतांनाच गंगेंत खेचले जातात नि विलीन होतात. ती अखेरची गर्जना कानीं येतांच भानावर आलेला दयानंद किंचाळतो-- ]

दयानंद : पंडितजी, पंडितजी ऽ !--आपले जगन्नाथराय गेले ! [ प्रचंड मेघगर्जना होते, विजांचा कडकडाट होतो. अन‌ ए तेजोवलय आकाशाच्या पडद्यावरून वरवर सरकत जातें. तीच जगन्नाथांची प्राणज्योत ! ]

काशीप्रसाद : तो मानधन महात्मा दिव्य प्रवासाला निघाल, आणि आतां मागें राहिली केवळ त्याची कीर्ति. अमर गंगालहरी !

विभूषितानंग--रिपूत्तमांगा
सद्य: कृतानेक--जनार्तिभंगा ।
मनोहरोत्तुंग--चलत‌तरंगा
गंगा तवांगान्यमली करोतु ॥

( वांकून नमस्कार करतो. )

[ दिशादिशांतून गंगा--लहरीचे प्रतिध्वनि उमटतात. ]

पडदा पडतो

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP