अंक तीसरा - प्रवेश दुसरा

‘पंडितराज जगन्नाथ’या नाटकावा नायक महान्‍ संस्कृत कवि आणि विख्यात साहित्य-शास्त्र-पंडित जगन्नाथ हा आहे. यातील ‘गंगालहरी’ स्तोत्र आजही घरोघरी वाचले जाते.


[ स्थळ: - पंडितराज जगन्नाथांचा महाल. वेळ : संध्याकाळ. कलिया समई लवीत असून लवंगिका खिडकीशीं उभी राहून जगन्नाथरायांची वाट पाहात आहे. ]
लवंगिका : कलिया, दिवेलागणीची वेळ झाली तरी अजून यांचा पत्ता नाहीं ! तेंहि ठीकच आहे म्हण. आज दुपारीं वाढदिवसाची मेजवानी भरपूर झाल्यामुळें, त्यांना रात्रीं जेवायचं नसेल. मग घरची याद कशी होणार ?

कलिया : याद कां होणार नाहीं ? बाईसाहेब, दुपारीं बढिया खाना झाला असला, तरी रात्रीची खरीखुरी मिठी मेजवानी रंगेल पति वाढदिवसाला तरी खासच चुकविणार नाहीं !

लवंगिका : ( लटक्या रागानं ) चल, चावट कुठली !

कलिया : यांत चावटपणा तो कसला सरकार ? आताण तुम्हीच सांगा, मेजवानी या शब्दांत ‘ जवानी ’ आहे कीं नाहीं ?

लवंगिका : आहे.

कलिया : अहो, म्हणूनच म्हणतें,  जींत जवानीचा जल्लोश आहे, मधुर मिठीची मिठाई आहे,  तीच खरी मेजवानी !

लवंगिका : तुला भलत्यावेळीं कोठया कशा सुचतात ग ? मला इकडे विरहाचा उपवास घडतो आहे, अन‌ तूं मिठी मेजवानीची याद देऊन मल अधिकच अधीर करीत आहेस !

कलिया : अहो, पण अधीर व्हायचं कारणच नाहीं, कारण त्या धीरगंभीर महाकवीला अधीर करून आपल्या महालाकडे खेंचून आणण्याची युक्ति फक्त आपल्यालाच अवगत आहे.

लवगिका : युक्ति ?.  कोणती युक्ति ?

[ कलिया लवंगिकेच्या कानांत कांहींतरी सांगते. ]

लवंगिका : हं. हं. ती युक्ति होय ? पण तिचा आतां कांहीं उपयोग नाहीं. पूर्वी ते माझा आलाप ऐकून आले, आतां विलाप ऐकूनहि येणार नाहींत ! अग, लज़ग्नापूर्वीची गोष्ट निराळी, लग्नानंतरची निराळी. लग्नापूर्वी स्त्रीचा मुर्खपणाहि पुरुष ऐकून घेतो, परंतु लग्नानंतर तिचा शहाणपणाहि तो ऐकून घेत नाहीं. लग्नापूर्वी स्त्री बोलते; पुरुष ऐकतो. लग्नानंतर पुरुष बोलतो, अन‌ बिचारी स्त्री ऐकून घेते.

कलिया : हो, पण मी मात्र तुमचं कांहीं ऐकून घेणार नाहीं. या पाहूं इकडे. बसा इथं, हा तंबोरा घ्या. अन‌ आलाप सुरू करा, जगन्नाथरायांचं तें मधुर भजन म्हणा--‘ जय गंगे भागीरथी !’

[ लवंगिका आलप घेते. ती आलापाच्या मध्यावर असतांनाच खिडकी जवळ असलेली कलिया, घाईघाईनं लवंगिकेजवळ येऊन उद‌गारते--]

कलिया : सरकार, सरकार ! बडी ताज्जुबकी बात है !

लवंगिका : काय झालं ग ?

कलिया : ‘ भजन ऐकुनी आले प्रियजन. ’

लवंगिका : कोण ? ते आलेत ? ( तंबोरा खालीं ठेवून अधीरतेनं उठते. )

कलिया : अंहं , प्रियजन म्हणजे गुरुजन ! उस्तादजी आपल्याला प्रियच नाहींत का ?

लवंगिका : ( रागावून ) कलिया ऽ!

[ इतक्यांत उस्ताद जमनलाल वाढदिवसाच्या भेटीची नक्षीदार पेटिका घेऊण प्रवेशतो. ]

जमनलाल : कां थांबवलेत त्या भजनाचे आलाप ? म्हणा, जगन्नाथरायांचं गोड भजन म्हण. ‘ जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी !’

लवंगिका : उस्ताद, तें भजन आतां आम्ही नाहीं म्हणणार. तें आतां तुम्हींच म्हणावं,

जमनलाल : ठीक आहे. ठीक आहे. मी म्हणतो. परवां यमुनेच्या तीरावर जगन्नाथरायांनीं तें भजन म्हटलं, तेव्हां सारा समाज नागासारखा डोलायल लागल ! वाहवा !--

जय गंगे भागीरथी ! हरगंगे भागीरथी ! ॥ध्रु॥
चिदानंद शिव--सुंदरतेची पावनतेची तूं मूर्ती
म्हणुनि घेउनी तुला शिरावर गाइं महेश्वर तव महती !
जगदाधारा तव जलधारा अमुत--मधुरा--कांतिमती
‘ शंकर शंकर ! जय शिव--शंकर !’ लहरि लहरि त्या निनादती !

लवंगिका : अगबाई, गाण्यांत रमलें अन‌ नमस्कार करायल विसरलेंच की मी. ( बांकून नमस्कार करते. )

जमनलाल : शतायुषी भव ! सुखी भव !

लवंगिका : कलिया, उस्तादांना जलपान नाहीं का द्यायचं ?

कलिया : देतेंच बाईसाहेब, पण तें मधुर भजन ऐकण्यांत भान नाहीं राहिलं. ( आंत जाते व थोडया वेळानें पेय घेऊन येते. )

जमनलाल : ( बरोबर आणलेली वर्घापन--दिनाची भेट पुढें करीत ) आज तुमचा शादीचा वाढदिवस. तुम्हांल ‘ शादी मुबारक ’ करायल आलों आहें मी. रियाजाप्रमाणेंच रिवाजहि ठाऊक आहे मला ! ही आमची लहानशी भेट. तुम्हांला आणि जगन्नाथरायांना !

लवंगिका : बहोत बहोत शुक्रिया, आमच्या शादीला नत्त्वत: विरोध होता तुमचा, तरी आमच्या शादीनं आनंदित झालेल्यांपैकीं तुम्ही आहांत. हें मी विसरणार नाहीं कधीं.

जमनलाल : अहो, आम्ही जुन्या वळणाचीं माणसं. कोणीं रूढी मोडूं नवे, असंच वाटतं आम्हांला. पण तुमचा नि जगन्नाथांचा रोहिणी--चंद्रासारखा संयोग पाहून आनंद होतो आम्हांला !. अहो, पण जगन्नाथराय कुठें आहेत ?

लवंगिका : दुपारपासून जे बाहेर गेले आहेत ते अजून पत्ता नाहीं त्यांचा.

जमनलाल : खरेखुरे कलावंत ते. त्यांना शादी काय, शादीचा वाढदिवस काय, दिवाळी काय, दसरा काय, दरबार काय--सारं कांहीं सारखंच !

लवंगिका : पण असा स्वभाव बरा म्हणायचा का उस्ताद ?

जमनलाल : हें घ्या ! त्यांच्य़ा कलवंत, कलंदर--वृत्तीवरच भाळलांत ना तुम्ही !. काय कलिया ?

कलिया : होय, अगदी बरोबर. परवां काय झालं गुरुजी.

लवंगिका : ए चूप ग.

जमनलाल : बोलूं द्या तिला बाईसाहेब. कळूं तरी द्या नवराबायकोंतलं रहस्य !

कलिया : बाईसाहेब जरीच्या शलाका असलेली पांढरीशुभ्र तलम साडी नेसून समोरून येत होत्या. झरोक्यांतून सूर्योचीं सोनेरी किरणं त्यांच्या अंगावर पडलेलीं होतीं. अशा वेळीं जगन्नाथराय बाईसाहेबांकडे पाहून, पण वस्तुत: आपल्या वेगळ्याच तंद्रींत, उद‌गारले --

मूर्तिमंत देवदया येइं भूतलीं
नेसुनिया धवल वसन तलम मल्मली !
सोनेरी अरुण--किरण जरतार शोभली.

तेव्हां बाईसाहेबांना वाटलं. हें आपलंच वर्णन आहे. अन‌ त्यांनीं मंजुळ आवाजांत पुकारलं,‘ नाऽथ’.

लवंगिका : कलिया, कलिया, हें ग काय ?

कलिया : गंमत बाईसाहेब ! हं, तर काय सांगत होतें. बाईसाहेब म्हणाल्या, ‘ नाऽथ. ’ पण त्यांच्या नाथांनीं पुढची ओळ म्हटली--

‘ हे तुषार चमकदार रत्नेंच शोभलीं !
जय गंगे भागीरथी ! हरगंगे भागीरथी !!

हरहर ! तेव्हां कुठं बाईसाहेबांच्या ध्यानांत आलं, कीं सकाळच्या वेळीं धुक्याचं पांढरंशुभ्र तलम वस्त्र नेसलेल्या, चमकदार तुषारांचे हिरेमोती अंगावर असलेल्या गंगामाईचं वर्णन आहे हें ! आपलं नव्हे !

लवंगिका : ( खोटया संतापानें ) वटवट बंद कर ग !

कलिया : उस्तादजी, अगदी अस्साच घुस्सा आला होता त्यांना !

जमनलाल : हं, म्हणजे खोटा खोटा ! बाकी राग येण्याचं कारणच नव्हतं म्हणा, जगन्नाथरायांचं जीवन सुखी करणार्‍या गंगाच आहेत त्या !. असो, पण ते ‘ गंगाधर ’ कुठें आहेत ?

कलिया : रमले असतील ‘ गंगालहरीं ’ त किंवा ‘ रसगंगाधरां ’ त !

लवंगिका ( तकारीच्या स्वरांत-- ) हो, घरादाराला अन‌ बायकोला विसरून !

जमनलाल : छे, छे. बाईसाहेब, असं स्वप्नांतहि आणूं नका. जगन्नाथांसारख्या थोर कलावंताचं, महापुरुषाचं, निष्ठावंत प्रेमिकाचं हें असंच होतं !

लवंगिका :  असंच म्हणजे कसं ?

जमनलाल : अहो, सार्‍या दुनियेचं सौंदर्य पाहातां पाहातां , तिच्या पलिकडचं सौंदर्य त्यांना दिसूं लागतं. नश्वर सौंदर्यांतूनच शाश्वत सौंदर्याकडे ते जातात. सितार्‍यांच्या लकाकींत, धबधब्याच्या दुधाळ धारा-नृत्यांत, फुलांच्या मंद हास्यांत, इतकंच काय, पण सुंदरींच्या मधुर स्मितांत, परमेश्वरी शाक्तीच हंसत असल्याचा भास त्यांना होतो, मग ते त्यांतच दंग होतात !

लवंगिका : अहो, पण यामुळें त्यांचं बायकोबरचं प्रेम का ओसरावं ?.

जमनलाल : ओसरत नाहींत तें, त्याचं स्वरूप बदलतं, बाईसाहेब, परमेश्वरी प्रेमाचा मार्ग प्रेयसीच्या पासादावरून जातो म्हणतात ! तुम्हांला कल्पनाही नसेल, पण बाईसाहेब, तुमच्यावरच्या अलोट प्रेमांतूनच, पंडितराजांना परमेश्वरी प्रेमाची प्रकाश--किरणं दिसत असतील.

लवंगिका : माफ करा हं उस्तादजी, तुमचं हें तत्त्वज्ञान मला नीटसं कळलं नाहीं.

जमनलाल : कळेल, कळेल एक दिवस. जगन्नाथरायांच्या संध्याच्या विचित्र वागण्याचं रहस्य तुम्हांला कळेलच. कारण तुमच्या दिलांच्या दिलरुब्यांच्या तारा एकाच स्वरांत लागलेल्या आहेत. एकाचा झंकार आपोआप द्सर्‍याच्या तारांत झंकारेल !

[ इतक्यांत एक नोकर प्रवेश करतो. ]

नोकर : वाराणशीच्या पंडित--सभेचे कोणी आचार्य आले आहेत, बाईसाहेव,

लवंगिका : तर मग येऊं दे त्यांना आंत.

काशीप्रसाद :  ( प्रवेश करून ) शुभं भवतु । माझं नांव काशीप्रसाद, वाराणशीच्या धर्मसभेचा मी एक आचार्य आहें. वाराणशीच्या महाराजंकडून निरोप घेऊन आलों आहें.

जमनलाल : पण जगन्नाथराय घरीं नाहींत. बाहेर गेले आहेत. पण आपण बसा ना. उभे कां ? कलिया, त्या आसनावर हरिणाजिन टाक पाहूं. ( कलिया हरिणाजिन टाकते. ) बिराजिये पंडतजी ! उन्हांतून दमून भागून आलेले दिसतां, जलपान मागवूं का ?

काशीप्रसाद : नको. आपल्या आतिथ्याबद्दल मी आपला आभारी आहें.

लवंगिका : उस्तादजी, त्यांना म्हणावं, भोजन--प्रबंध ब्राह्मणी आहे.

काशीप्रसाद : तरी मला कांहीं नको, आपल्या आस्थेबाईकपणाबद्दल मी खरंच आभारी आहें.

जमनलाल : ठीक आहे. मी आपल्या भावना जाणूं शकतों ! आम्हां संगीत--उस्तादांप्रमाणें तुम्हीं आपलं कडक ब्राह्मण्य सोडलं नाहीं अजून. जगन्नाथरायांना धर्मभ्रष्ट मानून.

काशीप्रसाद : गैरसमज करून घेऊं नका, उस्तादजी, खरं सांगायचं म्हणजे. जगन्नाथांनीं केलेलं रूढिमंजन मला सुतराम‌ मान्य नाहीं. पण याचा अर्थ त्यांना धर्माभिमान नाहीं, ते महापातकी झाले, असंहि मी मानत नाहीं, पण मलाहि माझ्या मर्यादा आहेत. मी येथें कांहींहि घेतलं नाहीं, तर राग मानूं नये बाईसाहेबांनीं.

लवंगिका : नही जी ! राग कसला मानायचा ? उलट तुमच्या या थोरपणाबद्दल मी कृतज्ञता कशी व्यक्त करूं, हेंच समजत नाहीं.

काशीप्रसाद : यांत थोरपणा कसला ? पंडितराज--राजतिलकांची गाढ विद्वत्ता, सरस कवित्व आणि बाणेदार दिलदारी यांविषयीं कोणाला आदर वाटणार नाहीं ? त्यांनीं यात्रेकरूंवरचा कर उठवून केलेली गंगामातेचीं सेवा निदान माझ्यासारखे त्यांचे चाहते कसे विसरतील ?. त्यांच्याविषयीं इतका आदर वाटतो. म्हणून तर एका कामाच्या निमित्तानं त्यांचा परिचय करून घ्यायल आलों. केव्हां येतील ते ?

लवंगिका : खरं तर याच्या आधींच यायला पाहिजे होते.

जमनलाल : पण शायर आहेत ते. त्यांचा काय भरंवसा ?

काशीप्रसाद : मग मी असं करतों. इतर कांहीं कामं उरकून थोडया वेळानं येतों.

लवंगिका : सावकाश या; केव्हांहि या. हें घर आपल्यासारख्या थोरांसाठीं केव्हांहि उघडं आहे.

काशीप्रसाद : बंर तर. येतोंच मी. काम विशेष नाहीं, पण त्या निमित्तानं माझ्या एका आवडत्या महाकवीचा परिचय होईल, हाच लाभ ! येतोंच मी एका प्रहरांत. ( काशीप्रसाद जातो. )

जमनलाल : मीहि निघतों बाईसाहेब. उद्यां येईन याच वेळीं शिकवणीला. ( जाता, )

लवंगिका : ( खिडकीपाशीं जाऊन ) यांचा अजून पत्ता नाहीं, कलिया, कुठें असतील ग ते ?

कलिया : यमुनेच्या तीरावर तर त्यांचं कविमन आज रमलं नसेल ना ?

लवंगिका : होय, तसंच असेल. संध्या ते यमुनाजींचं स्तोत्र लिहीत आहेत; तेव्हां बसले असतील त्या शांत तीरावर समाधी लावून.

कलिया : तर मग बाईसाहेब, त्यांची इथं वाट पाहाण्यांत काय अर्थ ? त्यापेक्षां यमुनेच्या तीरीं जाऊनच त्यांना कां गांठूं नये ?

लवंगिका : खरंच, या रम्य संध्याकाळीं, आजच्या आनंदाच्या दिवशीं त्यांना यमुनेवरच अचानक गांठायचं, वाढदिवसाची भेटहि तिथंत द्यायची अन‌ त्यांना चकित करायचं-- ही कल्पना तर छानच आहे !

कलिया : होय ना ? तर मग ती अंमलांतच आणा झटपट.

लवंगिका : बरं बाई ! जशी तुझी इच्छा .

कलिया : हं, म्हणजे जशी कांहीं तुमची इच्छा नव्हेच !. बरं, हा घ्या शेला. बाईसाहेब, यमुनातटावर जगन्नाथांना भेटायला निघायचं, म्हणजे थाटमाट केलाच पाहिजे राधिजे राधिकेनं ! ( लवंगिका शेला घेते व आरशासमोर उभी राहून केसावर फणी फरवते, आणि बिंदी धालूं लागते. ) हं आटपा लवकर बाईसाहेब. अंधार पडण्यापूर्वीच गेलं पाहिजे. ( लवंगिका आरशांत बबून, कपडे ठाकठीक करीतच असते. ) सरकार. जल्दीनं निघा, नाहींतर मला म्हणावं लागेल--

लवंगिका : ( आरशापुढेंच उभी असलेली. मागें मान वळबून ) काय म्हणावं लागेल ?

कलिया : ( साभिनय नृत्यासह म्हणते --)

न कर नितंबिनि ! गमन--विलंबन
अनुसर त्या परमेशा ॥ध्रु०॥
मंद समीरीं यमुना--तीरीं कुंजवनीं वनमाली,
पुंड--पयोधर मर्दन करुनी
होई जो सुखशाली--
चल सखि सत्त्वर, भेटाया त्या मदन--मनोहर--वेषा ॥
संकेताची मधुर मधुर जो हरि वाजवितो वेणू
तो तुज रिझविल, करील पुलकित
तव तनुचा अणुरेणू
चल सखि झटपट, आलिंगाया
खटनट त्या कमलेशा ॥

 ( गीत संपतांच जगन्नाथराय प्रवेश करतात. त्यांना पाहातांच शाहजादी लवंगिका लटक्या रागानें तोंड वळवून दूर जाऊन उभी राहाते. )

जगन्नाथ : कलिया राणीसरकारांनीं आतां यमुनातीरीं जाण्याचं कारण नाहीं, तो ‘ खटनट परमेश्वर ’ आपण होऊन इथं आला आहे.

लवंगिका : कलिया. म्हणूनच आपण त्या दुसर्‍या महालांत जाऊं, गाण्याचा रियाज करूं, त्यांना कशाला त्रास उगाच ? चल. ( कलियाला बरोबर घेऊन जाऊं लगते. )

कलिया : थांबा बाईसाहेब, तुम्ही निघालांत, पण तुमचं मन इथंच घुटमळत असेल. त्याची संवय जायची नाहीं एकाएकीं ! तें मन घ्या आधीं आपल्याबरोबर नि चला. नाहींतर परत इथंच यावं लागेल ! ( लवंगिका खोटया रोषानें पाहाते. )

जगन्नाथ : कलिया. तें भाग्य आमच्या वांटयाला कुठलं ? मुळच्या उर्दू काव्यांतील नायिका आहेत ना त्या, आशिकाला ठोकरून जानार्‍या !

लवंगिका : कलिया. पाहिलास ना आमच्या संसार--नगरीचा उलटा न्याय ! या पुरुषांना देवानं काळीज दिलेलं आहे कीम नाहीं ?

कलिया : दिलं आहे. पण बाईसाहेब. पुरुषाचं काळीच स्त्रीला एकांतांतच दिसतं म्हणतात ! म्हणून जातें मी. ( कलिया जाऊं लागते. )

लवंगिका : अग, थांब कीं ! तूं परकी का आहेस ?

कलिया : सरकार, चक्रवाक नि चक्रवाकी यांना कमळाचं पान काय परकं असतं ? पण तें मधें आल्यानंदेखील त्यांच्या रंगाचा भंग होतो म्हणतात ! जातेंच मी. ( कलिया मिस्किल स्मित करून निघून जाते. )

[ शाहजादी लवंगिका खोटया रोषानं कोपर्‍यांतील आरशापुढें उभी राहाते--जगन्नाथांकडे पाठ करून. जगन्नाथराय तिचा रुसवा घालविण्यासाठीं तिच्याभोंवतीं रुंजी घालतो; स्वर--माल गुणगुणतो. आणि मग--]

जगन्नाथ : राणीसरकार, रागावलांत वाटतं ? ( शाहजादी उत्तर देत नाहीं. ) खरंच, हा आरसा किती भाग्यवान‌ ! तुमची पाठमोरी आकृतीहि आम्हांस इतकं वेड लवते; आणि या आरशाला तर तुमचं समोरचं लावण्य--दर्शन होतं आहे ! हं, पण जरा जपून बरं का ! आरशाच्या ह्रदयांत ठसलेलं तुमचं रम्य रूप पाहून, तुम्हीच मूर्च्छित पडाल ! ( जगन्नाथराय लवंगिकेपाशीं जातात. ती छटक्या रागानं खिडकीपाशी जाते. ) अग, मागें फीर, मागें फीर ! खिडकीपाशिं उभी राहूं नकोस. मघाशीं खडकींतून दिसणारा चंद्रमा, तुझ्या मधुर दर्शनानं पराजित होऊन. अस्मानाच्या शिखराकडे धांबत आहे. त्याला अधिक लजवूं नकोस !

लवंगिका : ( एकदम मागें वळून ) पुरे पुरे ही तारीफ ( मान वेळावून ) मला चंद्राहून सुंदर म्हणा, नाहींतर विजेहून तेजस्वी म्हणा; मी अशा बोलण्यानं हुरळून जाणार नाहीं. चला, उगाच नका माझ्यामागें लागूं. ( जगन्नाथराय तिच्याजवळ जातात. ती लटक्या रागानं दुसर्‍या टोंकास जाऊन उभी राहाते )

जगन्नाथ : वा ! डोळ्यांत काजळ घातलंय‌ वाटतं ?

नयन तुझे जादुगार ॥ध्रु०॥
हरिणीचा हरिती नूर ।
त्यांत सुंदरी कशास
काजळ हें घातलेंस ? ।
साधाही नयन--बाण
विंधितसे काळजास ।
मग त्याला कां उगाच
कालकूट माखतेस ? ॥

[ जगन्नाथराय जवळ जाऊन तिच्या हनुवटीला हात लावतात. तो झिडकारून खोटया खोटया रागानें लवंगिका दूर सरकते. ]

जगन्नाथ : प्रिये, इतकी कां रागावलीस आज ?

लवंगिका : ( ठसक्यांत ) उशीर करणार्‍यांनींच विचार करावा !

जगन्नाथ : हां, आत्तां कुठें लक्षांत आलं तुझ्या संतापाचं कारण ! अग, पण तुझ्याच कामासाठीं उशीर झाला, तरी तूं रागावतेस ?

लवंगिका : माझ्या कोणत्या कामांत एवढे मश्गुल झालां होतांत हो ?

जगन्नाथ : तुला आज भेट देण्यासाठीं, तुझी एखादी आवडती वस्तु घेऊन वेण्याकरितां, मी भटक भटक भटकलों, म्हणून उशीर झाला जरा.

लवंगिका : ( जरासा राग सोडून ) बंर कबूल. पण अशी कोणती भेट आणलीत. कीं तिच्यासाठीं एवढा उशीर व्हावा ?

जगन्नाथ : सांगूं ? तुला आवडणार्‍या सार्‍या वस्तूंची यादी मनांत ठेवून मी खरेदीला निघालों. तुला आपल्या पुष्करणींत सोडण्यासाठीं राजहंस पाहिजे. मोत्यांचा हार पाहिजे. छुमछुमतीं नुपुरं हवींत, रुणझुणतीं कंकणं हवींत, कानांतले डूल पाहिजेत, सोन्याचं फूल पाहिजे ! हिर्‍याचीं चमकी, डाक्याची मलमल. बनारसी शालू.

लवंगिका : अहो पाहिजे खूप, पण काय आणलंय‌ यांपैकीं ?

जगन्नाथ : ऐक तर. या सार्‍या वस्तूंची आठवण ठेवून मी बाहेर पडलो.

लवंगिका : तें कळलं हो. अखेर काय घेऊन आलांत ? कीं या सर्वच वस्तु आणत्यात ?

जगन्नाथ : अग, ऐकून तर घे. जव्हेरीबाजारांत गेलों. चांदणी चौकांत गेलों.

लवंगिका : तें आलं लक्षांत. तिथंच जायचं असतं नाहीं तरी, सबजीबाजारांत नाहीं ! पण काय घेऊन आलांत ? ( जगन्नाथराय जरा पण राहातात. ) सांगा ना नाथ, काय आणलंत ?

जगन्नाथ : ( हंसून ) ओळख !

लववंगिका : कंबरपट्टा ?. हिर्‍याची चमकी ?. पैंजण ?. सोन्याचं फूल ? कीं या सर्वच वस्तु ?

जगन्नाथ : खरं सांगूं ? एकहि वस्तु आणूं शकलों नाहीं मी !

लवंगिका : ( रागानें उसळून ) वाटलंच होतं मला. या पुरुषांच्या नुसत्या गोड गोड थाप ऐकून घ्या, कां नाहीं आणूं शकलांत हो एकहि वस्तु ?

जगन्नाथ : ऐक. दरवेळीं माझे विचार आडवे आले. एखादी वस्तु मी विकत घेणार तोंच मनांत यायचं, कीं ‘ ही वस्तु त्या विश्वसुंदरीला देणं व्यर्थ आहे !’ त्यांच असं झालं--मला वाटलं--

जगन्नाथ : हवा कशाला राजहंस ? सखि. हंस दोन सुंदर विसावले तव तारुण्याच्या तल्यांत चेतोहर ।

लवंगिका : कां न आणली हीरक--चमकी ?

जगन्नाथ : ती का चमकेल ? तव दांतांच्या यदा हिरकण्या चमचम करतील ! ॥

लवंगिका : कां न आणिली परी गळ्यांतिल मोत्यांची माळ ?

जगन्नाथ : वक्षावरचे हंस तिच्यांतिल मोती खातील ! ॥

लवंगिका : कां न आणिले नवीन पैंजण ?

जनन्नाथ : आणूं व्यर्थ कशास ? तव चरणांचा नूपुर झाला विनम्र हा दास । ॥

लवंगिका : ( रागानें आंत जात ) चला, तुमच्याशीं एकहि शब्द बोलण्यांत अर्थ नाहीं. तुमचं माझ्यावरचं प्रेम ओसरलं. आतां राहिले आहेत केवळ गोड गोड शब्द !

जगन्नाथ : हं, पण तेहि आमच्या नशिबीं नाहींत आज. अग, दोन गोड शब्द तर बोलशील कीं नाहीं आमच्याशीं ?

लवंगिका : मी कशाला बोलूं ? माझ्या सवतीचे गोड गोड मंजुळ मंजुळ शब्द ऐकूनच आलां असाल इथं !

जगन्नाथ : सवत ? काय भलतंच बोलतेस हें ? तुझी सवत आहे तरी कोण, आणि कशी ?

लवंगिका : काळी सांवळी पण सुंदर, मुरडत ठुमकत चालते, मंजुळ गीत गाते !

जगन्नाथ : काळी सांवळीं ? म्हणजे कोणी मद्रदेशीव श्यामला आहे कीं काय ? नाकांत दोन चमक्या घालणारी ?

लवंगिका : नव्हे हो. अगदीं उत्तर भारतीय आहे. अन‌ तरीती श्यामला आहे ! पण ती काळी सांवळी असली, तरी तुम्हांल माझ्याहून प्रिय !  ठीकच आहे म्हणा. अखेर पुरुषांची जात. बायको काळी सांवळी असेल. तर हे एखाद्या गोर्‍यागोमटीसाठीं व्याकुळ होणार. बरं, बायको चांगली केतकीच्या पानासारखी गोरी गोरी पान असली, तर हे एखद्या कृष्ण-सुंदरीच्या काळ्या रंगांतच दंग होणार !- मग तुम्ही तरी अपवाद कसे असाल ?

जगन्नाथ : सुंदरी, सुंदरी ! मंजुभाषिणी ! हें काय भलतंच कुभांड रचलं आहेस तूं ?. बरं. नांव तरी काय त्या सवतीचं ?

लवंगिका : कालिंदी !

जगन्नाथ : म्हणजे ?

लवंगिका :  ( जरा हंसून ) म्हणजे यमुना हो--जिला तुम्ही दिवसांतून दहादां भेटायला जातां, जिच्या सहवासांत तल्लीन होऊन घरदार विसरतां. मला विसरतां.

जगन्नाथ : आलं लक्षांत. अग, पण ती कोणाचीहि सवत होणं शक्य नाहीं. कारण गंगा--यमुना म्हणजे जगन्माता ! काव्य करायल गेलीस, पण जमलं नाहीं तें !

लवंगिका : होय. तेंहि स्वरंच. माझी उपमा चुकली. पण मग होतांत तरी कुठं इतका वेळा ? नाथ, आजच्या वाढदिवशीं देखील तुम्हीं मल विसरावं ना ?

जगन्नाथ: अग, रागावूं नकोस ! प्रिये, मी घरीं येतां येतां यमुनामाईंचं दर्शन घेऊन आलो हें खरं; पण तुला मुळींच विसरलों नाहीं. हा पाहा मोत्यांचा हार. माझ्या खास देखरेखीखालीं बनवून आणला. ( खिशांतून मोत्याचा हार काढतात. ) पाहा, पाहा तरी इकडे. [ ती लाजते, खुदकन‌ . ] आतां हा हार गळ्यांत घालून आम्हांस धन्य करा ! ( लवंगिका अधिकच लजते. जगन्नाथराय दूर उभे राहून तिचं सौंदर्य न्याहाळतात. आणि मग एकदम. ) लवंगिके, काढ, काढ, काढ ती मुक्तामाला गळ्यांतून !

लवंगिका : अगबाई, हें काय भलतंच ? देणगी दिली नाहीं. तोंच तिची मागणी ? दक्षिणी दिलदारीचा प्रकार दिसतो हा ! कीं मला शोभतच नाहीं ही मोत्यांची माळ ?

जगन्नाथ : तसं नब्हे ग !. मला या ‘ मुक्त ’ महात्म्यांचा--या पाणीदार मोत्यांचा--मत्सर वाटत आहे; राहहि येत आहे !

लवंगिका : तो कां ?

जगन्नाथ : अग पाहा, मी तुझ्यापासून दूर; अन‌ स्वतःला ‘ मुक्त ’ म्हणविणारे हे लंपट मोती मात्र इतक्यांतच तुझ्या ह्रदयाशीं हितगुज करीत आहेत ! सागराच्या कपारींत, शिंपल्याच्या तुरुंगांत खितपत पडलेले हे सफेत चोर, हें उच्चपद लाभतांच. कसे गर्वानं चमकत आहेत !. लंवगिके, या भोंदू ‘ मुक्तां ’ ना आधीं दूर कर पाहूं.

लवंगिका : जशी नाथांची आज्ञा ! ( गळ्यांतून मोत्यांची माळ काढीत ) हं, एकूण आम्हां बायकांहून पुरुषच अधिक मत्सरी असतात तर !

जगन्नाथ : बरं राहूं दे त्या भाग्यवंत मुक्तांना तुझ्या गळ्यांत, कारण. त्यांचा त्याग थोर आहे. तपश्चर्या थोर आहे. तुझ्या सहवासासाठीं त्यांनीं देहदंड भोगल आहे ! अग, हे तुझे आशिक.

तीर्थराज सागरास सोडुनि वणवण हे फिरले
‘ मुक्त ’ असोनी तव मोहानें गुण--बंदी झाले ॥
कठीण सुईनें तनु पोखरली, तरि ना डगमगले
त्या त्यागाचें आज तयांना दैवें फळ दिधलें ॥

( हनुवटीला हात लावून-- ) काय, खरं ना ?

लवंगिका : अं हं, अगदीं खोटं ! ( खुदकन‌ हंसते. )

जगन्नाथ : किती मधुर हें हास्य ! पुन: हांस पाहूं. या मौक्तिकांचा गर्व उतरविण्यासाठीं तुझी दंतपंक्ति चमकलीच पाहिजे !

लवंगिका : इश्श ! हा काय वेडेपणा ! ( हंसते. )

जगन्नाथ : किती सुंदर हंसलीस !. भागीरथीच्या धवल हास्याची आठवण झाली  ! ( त्यांना एकदम श्लोक स्फुरतो ) मंदस्मित. मधुरस्मित. दरस्मित.

‘ दरस्मित--समुल्लसद‌--वदन--कांति--पूरामृतै:.

[ कलमदानापाशीं जाऊन श्लोक गुणगुणत लिहूं लागतात. तोंच लवंगिका मेजावरची शाल उचलून, त्यांच्या अंगावर अचानक घालते. ] अग, हें काय ?

लवंगिका : ‘ गंगालहरी ’ ची लहर बाधूं नये, म्हणून ही प्रेमाची शाल ! स्वत: कशिदा काढून सजविलेली--वाढदिवसाची माझी भेट !

जगन्नथा : ( आनंदानें ) लवंगिके, तुझ्या प्रेमाची ही शाल, माझ्या अंगावर अशीच असूं दे !. वा: ! तू मुलायम. तशीच ही शालहि मुलायम ! छे; पण एका बाबतींत तूं या शालीहून थोर आहेस. ही  नुसतं अंगच झांकते, तर तूं माझ्या अंगींचे स्वभावदोषहि तुझ्या प्रेमाच्या आवरणांत झांकून टाकतेस !

लवंगिका : स्तुतीची साखर मात्र चांगलीच पेरतां हं.

जगन्नाथ : हें पाहा, आम्ही दक्षिणी लोक, व्यवहारांत चोख ! तुझ्या रसाळ लालबुंद ओठांची साखर मी घेतों. नि माझ्या ओठांतून बाहेर पडणारी स्तुतीची साखर तुला परत देतों !

[ लंवगिका लटक्या गगानें उठून जाऊं लागते. ]

जगन्नाथ : जाऊं नकोस, सुंदरी, जाऊं नकोस, ! एखाद्याच्या दिलाचा खजिना लुटून. असं पळून जाणं बरं नाहीं. थांब, तुला बाहुपाशांच्या सांखळींतच जखडून ठेवतों ! ( तिल घरतात. इतक्यांत पडद्यांत घंटिकांचा आवाज. )

लवंगिका : अगबाई, स्वरंच, आज त्रिपुरी पौर्णिमेचा दिवस. या दिवशीं शेजारतीला शिवालयांत जाण्याचा तुमचा दखर्षीचा नियम. चल, निघा झटपट. चला, त्या घंटिका बोलावीत आहेत !

जगन्नाथ : पण मी जाणार नाहीं. ( घंटिकांचा आवाज ऐकून ) इकडे आपला शृंगार रंगांत आला असतांना हा घंटिकांचा आत्राज ? या मूर्ख पुजार्‍यांना भलल्या वेळीं परमेश्वर आठवतो तरी कसा ?

लवंगिका : असं बोलूं नये नाथ. तुमचा नियम मोडूं नका; त्या पवित्र घंटिकांचा उपमर्द करूं नका.

जगन्नाथ : तुझ्या कंकणांच्या रणत्काराहून, त्या घंटानादाची मला मुळींच मातब्बरी वाटत नाहीं. लाडके !.

लवंगिका : नको, नको. त्या शिवमंदिरांत आधीं जाऊन या; मग शृंगाराला सारी रात्र मोकळीच आहे.

जगनाथ : अग खुळे, हा आपला रंगमहाल हेंच शिवमंदिर, आणि मीच शंकर. माझ्या मस्तकीं आहे काव्य--गंगा, आणि तूं--या अंकाची स्वामिनी आहेस तूं--जणूं कांहीं पार्वतीच ! ( लवंगिकेला अधिकच जवळ ओडून ) चल, लज्जाभावाचीं वस्त्रं अनंगाच्या होळींत फेकून देऊन, प्रसन्नतेच्या फुलांची शेज सिद्ध कर ! आणि होऊं दे अयच शिव--मंदिरांत खर्‍याखुर्‍या शेजारतीचा सुख--सोहळ !

[ पडद्यांत पुनश्च घंटिकांचा आवाज ]

ऐक, घंटिका आपणांस रंगेल शेजारतीचा इशारा देत आहेत. सांगत आहेत, ‘जगन्नाथ आहे शंक्र, तर लवंगिका आहे पार्वती !’. ये गिरिकन्ये, जवळ ये.

तू सुंदर गिरिकन्या !
चेतविसी कां अनंग ?
तळमळतें अंग अंग
आलिंगन तुज द्याया.
होंऊ दे रति--संगर
कुच--भल्ली कर समोर
मदिर तुझे नयन--तीर.

[ ‘ मंदिर तुझे नयनतीर  ’ या ओळीपाशीं जगन्नाथराय अचानक थबकतात. तिच्या डोळ्यांकडे निरखून पाहातात. मग तिचा हात सोडून एकदम मागें सरकतात. आणि उद‌गारतात-- ]
तुझे नेत्र मंदिर ? तुझे नेत्र तीरासारखे ? नाहीं. नाहीं. तुझ्याकडे कामुकतेनं पाहिलं, ही चूक झाली माझी, तुझ्या स्वानंदमग्न नृत्याच्या नूपुर--झंकारांतून परा, पश्यंती, ही चूक झाली माझी, तुझा स्वानंदमग्न नृत्याच्या नृपुर--झंकारांतून परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरीं निर्माण झाली ! तुझ्या पायींच्या लाक्षारसाचे लाल लाल ठसे उमटून उषेचा आणि संध्येचा अरुण रंग निर्माण झाला ! तुझ्या नयनांतील नीलिमा घेऊनचं विधात्यानं निर्मल गगनाचा विशाल पट रंगविला, अन‌ त्याच नयनांच्या तेजाची सांठवण करून तारामंडळाची जडण--घडण झाली ! सार्‍या चराचराची संचालक शक्ति तूं ! त्या निर्गुण निराकाराला सगुण साकार करणारी मूर्तिमंत प्रीति तूं ! किती पवित्र, किती सुंदर, किती मनोहर ! आणि अशा तुझ्या नेत्रांना मीं ‘ मंदिर ’ म्हटलं. कामुक मानलं. क्षमस्व ! तुझ्याकडे कामुकतेनं पाहिलं, याबद्दल क्षमा कर, तूं तर आदिमाया जगदंबा ! साक्षात‌ देवताच !--

वंदनीया आदिमाया तूं चराचर--मोहिनी
कोटि कोटि चंद्रिकांचें तेज तुझिया लोचनीं ।
तूं महेश्वर-वल्लभा त्याच्याच संगापासुनी--
त्रैलोक्य--गंगा संभवे जगदंबिके ! वरदायिनी ॥

[ तिच्या नेत्रांकडे भक्तिभावानें व आदरानें पाहातात. क्षणभर दोघेहि निःशब्द राहातात. तोंच नोकर दारावर ’ टक‌ टक‌ ’ करून आंत प्रवेशतो ]

नोकर : ( मुजरा करून ) महाराज, वाराणशीच्या राजांकडून एक पंडितजी आले आहेत.

जगन्नाथ : ( शाहजादीस ) या मधुर समाधींत हे विघ्न कशाला आलं ? ( द्वारपालास ) जा सांग त्याल, वेळ नाहीं म्हणून ! ( द्वारपाळ जाऊं लागतो. )

लवंगिका : अरे थांब जरा, ( जगन्नाथांना ) नाथ, विसरलेंच मी, मघाशींच येऊन गेले ते, फार सज्जन गृहस्थ आहेत. काशीप्रसाद त्यांचं नांव. तेथल्या ध्रर्मसभेचे प्रमुख आचार्य आहेत ते. त्यांचं काय काम आहे, तें तर पाहा जरा--वंळात वेळ काढून.

जगन्नाथ : अच्छा. येऊं दे त्यांना आंत. ( द्वारपाळ जातो. ) वाराणशीच्या राजाकडून ? वाराणशीचा राजा ? भर पंगतींत मला टोंकाला बसवून माझा अपमान करणारा ! त्याचा हा दूत.

काशीप्रसाद : ( लवून नमस्कार करीत प्रवेशून ) नमस्ते पंडितराज, मी दुपारीं येऊन गेलों होतों. माझं नांव.

जगन्नाथ : ( मध्येच उतावीळपणें, जरा संतापानें ) तें सारं सांगितलं हिनं. पाल्हाळ नको. बोला. काय काम आहे ?

काशीप्रसाद : पंडितराज,, परवां आमच्या महाराजांची सुवर्ण--तुला आहे. त्यानिमित्त एक उत्तम काव्य करण्याची विनंती त्यांनीं आपणांस केली आहे. हा त्यांचा लखोटा. पंडितराज. ( लखोटा देतो. )

अगन्नाथ : ( लखोटा उघडून, पत्र वाचून ) म्हण “ एक दोन दिवसांत उत्तम कविता लिहून पाठविण्य़ाची कृपा करावी. भरपूर बिदागी मिळेल.” वारे बिदागी देणारे ! जणूं कुबेराचे काकाच ! ( पत्राचा चोळामोळा करून फेकून देतात . )

लवंगिका : हां हां नाथ, हें काय ?

जगन्नाथ : आपण चूप बसा जरा. ( काशीप्रसादला ) सांग जा तुझ्या महाराजाल, ‘ एक तर जगत‌पति परमेश्वर अथवा शाहजहान दिल्लीश्वर आमचे मनोरथ पुरे करण्यास समर्थ आहेत. तुमच्यासारख्या गल्लीबोळांतील राजांची बिदागी आमच्या मीठ--मिरचीसहि पुरणार नाहीं !’

काशीप्रसाद : पंडितराज, हा निरोप मी तोंडी कसा सांगूं ? आपण दोन ओळींचा जबाब लिहून द्यावा, अशी माझी विनंती आहे.

जगन्नाथ : ठीक आहे. तें कलमदान इकडे घे ग जरा. ( लवंगिका कलमदान व कागद आणून देते. जगन्नाथराय कागदावर दोन ओळी लिहितात व तो कागद लखोटयांत घालतात. लखोटा काशीप्रसादला देत.) द्या हें पत्र तुमच्या राजाला. त्याला कविता पाहिजे होती ना ? कवितेंतच लिहून कळवलं आहे--

दिल्लीश्वरो वा जगदीश्वरी वा
मनोरथान‌ पूरयितुम समर्थ :
अन्यैर्नृपालै: परिदीयमानं
शाकाय वा स्याल्लवणाय वा स्यात‍

काशीप्रसाद : ठीक आहे. पंडितराज, आपला हा निरोप मी महाराजांना कळवितों. पण स्पष्ट बोलण्याबद्दल क्षमा करा. आपल्यासारख्या महापंडिताकडून असा उद्धट निरोप गेला, तर आम्ही--तुमचे मूठभर चहाते--तोंडघशीं पडूं. कारण सार्‍या विरोधाला तोंड देऊन. आम्हींच तुमचं नांव या कामासाठीं सुचवलं होतं. आमच्या मठाचे कुलपति, भट्टोजी दीक्षितांचे शिष्य पंडित राघवाचार्य यांनींहि आपलं नांव सुचविलं होतं. ते पुष्कळदां आठवण काढतात आपली.

जन्नगाथ : कोण राघवाचार्य ? तेच काय, पण त्यांचे गुरु देखील किस पेडकी पत्ती ! त्यांच्या व्याकरण टीकेचं--प्रौढ मनोरमेचं--केशवपन मीं केलेलंच आहे ! म्हणे भट्टोजींचे शिष्य राघवाचार्य ! वा: !  शंकराचार्यांचे बापच जसे कांहीं ! माझ्या दारिद्यांत नघ्हती कोणाला माझी आठवण आणि आतां दरबारांत वर्णी लावण्यासाठीं होत आहे ज्याला त्याला माझं स्मरण !

काशीप्रसाद : पंडितराज, आपले खरेखुरे चहातेहि आपणांस ओळखतां येऊं नयेत, इतकी आपली द्दष्टी अंध व्हावी अं ? फलभारानं वृक्ष नम्र होतात; जलभारानं मेघ नम्र होतात; तसंच विद्वत्तेच्या भारानं माणसानं नम्र व्हायला पाहिजे, ‘ विद्या विनयेन शोभते !’ पण हा तुमचा निरोप कांहीं औरच आहे !

जगन्नाथ : आणि य:कश्चित‌ राजाच्या यःकश्चित दूतानं मला उपदेश करावा, हेंहि धाडस औरच आहे !

काशीप्रसाद : धाडस तर खरंच; पण मी आपला खराखुरा चाहता आहें, म्हणूनच कटु सत्य सांगण्याची धिटाई दाखवत आहे. पंडितराज, पुन: तुमचा रोष पत्करून सांगतों, अपमान सहन करून सांगतों. तुमचा यौवनमद दुर्लक्षून बजावतों. गंगेप्रमाणेंच जनगंगेचीहि भावना पायाखालीं तुड्वूं नका ! जशी गंगेला, तशीच जनगंगेलहि वांकडीं वळणं असतात. जसे गंगेंत मोठमोठे नक्र नि खडक दबा धरून बसलेले असतात. तसेच जनगंगेंतहि दुष्ट पुरुष दबा धरून बसलेले असतात. जगंगेंतहि कोठें गाळ असतो, कोठें
शेवाळ असतं. कोठें भयानक डोह असतात ! पण म्हणून तिची थोरची कमी होत नाहीं. जनगंगेला--त्या समाजाला--आपलं म्हणणं प्रेमानं पटवून द्या, वाटल्यास अंमळ भांडा देखील. पण मुलगा आईशीं भांडतो तसं !  प्रेमानं, आदरानं ! पंडितराज, तुमचा उद्धटपणा,. तुमचा हा कडवट.
जगन्नाथ : बस‌ बस‌, पुरे झालं तुमचं प्रवचन, कांहीं लोक मला सरळ सरळ शिव्या देतात; तुम्ही सहानुभूतीचा देखावा करून माझी निंदा करीत आहांत ! पण सारे एकाच माळेचे मणी ! तुमचं सहानुभूतीचं नाटक बंद करा. काय अक्कल शिकवायची असेल. ती त्या मूर्ख समाजाला शिकवा, समाज, समाज, समाज ! वार्‍याप्रमाणें लहरी, पार्‍याप्रमाणें चंचल, सुर्‍याप्रमाणें घातल, कचर्‍याप्रमाणें क्षुल्लक ! अशा समाजाची काय मातब्बरी बाळगायची ? काशीप्रसाद, जो जातिवंत हिर्‍यांना कोळसे समजून जाळायल उठतो अन‌ खलपुरुषांना--नव्हे कृष्णासर्पांना, पुष्पहार समजून गळ्यांत मिरवितो आणि शिरोधार्य अबोल फुलांना मात्र पायदळीं तुडवितो, त्या समाजाची आठवण मला करून देऊं नका. ढोंगीपणाचा शेंदूर फासलेल्या पाषाणांचे देव्हारे माजविणारा आणि खर्‍याखुर्‍या देवमूर्तीना पैजारांचे नैवेद्य दाखविणार्‍या नादान समाजाची महती गायची असेल, तर निघून जा इथून, आणि आतां मेहेरबानी करून, माझं डोकं अधिक पिकवूं नका.

काशीप्रसाद : ठीक आहे. जशी आपली मर्जी, ‘ पंडितराज राजतिलक ’--

मीच ईश्वर मी भोगी
सिद्ध मी बलवान‌ असे ।
गुणाढय कुलवान‌ मोठा
मजला तुलना नसे ॥

या आसुरी गर्वांच घर, वाळवीनं पोखरलेल्या महावृक्षाप्रमाणें धाडकन‌ कोसळून पडतं हें विसरूं नका, म्हणजे झालं. चाललो मी. आतां तो जगन्नाथच ह्या जगन्नाथाचं रक्षण करो ! ( जातो. )

[ जगन्नाथराय दरवाजाकडे क्षणभर शून्य नजरेनं पाहातात. मग अस्वस्थ होऊन एक सोन फेर्‍या मारतात. नंतर अचानक थांबून. ]

जगन्नाथ : गीतेचा प्रसाद देऊन गेले ते काशीप्रसाद ! कुरुंक्षेत्रावरील शंखध्वनीच तो ! कोणी उपदेशाचा शंख वाजवितो, तर कोणी निंदेचा ! ( शाहजादीस आर्तपणें ) लवंगिके, माझें डोकं सुन्न झालं आहे ग ! एखादं गोड भजन म्हण. तें ‘ जय गंगे भागीरथी ! हर गंगे भागीरथी.’

लवंगिका : ( प्रेमानं खांद्यावर हात ठेवून ) शांत व्हा नाथ.

[ इतक्यांत, पडद्यांत कोलाहल सुरु होतो. ‘ पंडितजी, बाहर निकलो,’ ‘ पडित जगन्नाथ, कर्मचंडाल ’ इत्यादि संमिश्र घोषणा उठतात. लंबगिका खिडकींतून बाहेर डोकावते. घाबरून जगन्नाथांपाशीं येते. ]

लवंगिका : नाथ, नाथ, शेंकडो लोक जमले आहेत आपल्या घराभोंवतीं !

जगनाथ : मग एवढं घाबरायल काय झालं ? या शंकराच्या तपोवनाभोंवतीं वेताळ जमले आहेत !

लवंगिका : ही थट्टा-मस्करीची वेळ नव्हे, नाथ ! ( पडद्यांत कोलाहल. ) ऐका ऐका, लोक खबळले आहेत; चवताळले आहेत; आपल्या घरावर चालून आले आहेत; आपल्या नांवानं ओरडत आहेत ! ( जगन्नाथांच्या खांद्यावर मान टाकने, )

जगन्नाथ : घाबरूं नकोस लाडके, घाबरूं नकोस, ओरडतील अन‌ जातील निघून, पिसाळलेले कुत्ते भुंकत आहेत भुंकूं दे विचार्‍यांना ! दुर्दैंवाच्या वादळानं सत्तेचा राजमहाल कोसळूं शकतो; पण विद्वतेचा हिमालय डलमळूं शकत नाहीं !. ( दरवाजाल धक्के. डोक्याल खोक पडलेला दारपाळ झोकांडया खात प्रवेशतो, त्याच्या पाठोपाठ मन्सुरखां, कलंदर, बन्सीराम, हरीराम प्रवेश करतात, ते द्वारपाळाला बाहेर लोटून जगन्नाथरायांकडे वळतात. जगन्नाथराय लवंगिकेला अंतःपुरांत जावयास खुणावतात. ती आंत गेल्यानंतर जगन्नाथराय दरडावतात -- )

जगन्नाथ : काय तमाशा मांडला आहे हा ? मन्सूरखां, दांडगाईनं घरांत घुसणं दरबारी लोकांना तरी शोभत नाहीं.

मन्सूरखां : रयतेच्या देवाधर्मांत बेवंदशाही माजविणार्‍या पंडिताल या दांडगाईचा इतका गुस्सा यावा अं ?

जगन्नाथ : सरळ बोला. आपल्या बोलण्याचा अर्थ लक्षांत नाहीं आला माझ्या.

मन्सूरखां : या पंडितांच्या पुढार्‍यांना विचारा. कहिये. पंडित हरीरामजी. बन्सीरामजी, आपकी क्या शिकायत है इनके खिलाफ ?

हरीराम : हमारा तो इन्होने कुछ बिघाडा नही ! लेकिन‌, लेकिन.

जगन्नाथ : लेकिन‌ क्या ? झटपट बोला, काय शिकायत आहे तुमची ?

हरीराम : आमचा धर्म वाटविला आहे तुम्हीं ! आमचा धर्म गोत्यांत आणला आहे तुम्हीं  !

कलंदर : और हमारा मी ! आमचाहि धर्म स्वतर्‍यांत टाकला आहे तुम्हीं.

जगन्नाथ : मीं ? आणि एकाच वेळीं दोन धर्म स्वतर्‍यांत टाकले आहेत ? आश्वरर्य आहे !

कलंदर : दोनच काय, दोनशें धर्महि तुम्ही स्वतर्‍यांत टाकाल, कचर्‍यांत ढकलल  ! एकदां बेमुर्वत ढकलढकलीचि आदत जडली. कीं माणुस कुठं काय ढकलील याचा नेम नाहीं. आदत बडी बुरी चीज आहे !

बन्सीराम : सरळच सांगायचं, तर पंडितराज, ( अल्लोपनिषदांची पोथी उंच उभारून ) हें ‘ अल्लोपनिषद ’ देववाणींत लिहून आपण हिंदु--मुसलमानांच्या पवित्र भावना पायदळीं तुडविल्या आहेत.

हरीराम  : अल्लाची तारीफ संस्कृतांत करून आपण ती देववाणी बाटविली आहे !

कलंदर : और अल्लाभी बाटविला आहे. त्याला तुमच्या संस्कृत किताबांत कोंबून !

बन्सीराम : हें अमंगळ पुस्तक आम्ही भरतभेंत नि चव्हाटया--चव्हाटयावर जाळून टाकूं !

कलंदर : जाळून नाहीं पुरून टाकूं ! दहन नही, दफन !

हरीरीम : होय. उपनिषदांची पवित्र परंपरा बाटविणारी ही तुमची पोथी हिंदु रयत जाळून टाकील, आणि आमचे मुसलमान बंधु पुरुन टाकतील.

जगन्नाथ : आणि तरीहि त्यांतलं सत्य सर्वांना पुरून उरेल ! अल्ला नि ईश्वर हीं एकाच महान‌ शक्तीचीं दोन नांव आहेत, असं मानण्यांत मीं काय पाखंड केळं ? अरे, किती कोत्या वृत्तीचे भिक्षुक आहांत रे तुम्ही ?

बन्सीराम : काय वाटेल त्या कल्पना करा, तुमच्या पाखंडगिरीचा आतांच धर्मसर्भेंत जाव द्यावा लागेल तुम्हांला ! क्यौं सरदार मन्सूरखां ?

मन्सूरखां : बिलकुल ठीक. जाब द्यावाच लगेल. जगन्नाथ. नया राज शुरु हो रहा है ? जरा आँखें खोलके देखो जनाब !

जगन्नाथ : म्हणजे ?

मन्सूरखां : औरंगजेबांनीं जिहाद पुकारल आहे. इस्लामच्या वैर्‍याला-- तुमच्या सासर्‍याला--आग्र्याच्या किल्लयांत कैद केलं आहे.

जगन्नाथ : ( दुःखानं स्तंभित होऊन ) काय ? अब्बाजान कैदेंत पडले ? औरंगजेबानं प्रत्यक्ष बापाला कैदेंत टाकलं ?

कलंदर : हां, धर्मकार्यांत बाप आडवा आला, तर त्यालाहि कापून काढलं पाहिजे ! लोकिन‌ शाहजाद्यांनीं रहेम करून सिर्फ कैदेंतच टाकलं आहे त्यांना !

मन्सूरखां : यही नही, आतां थोडयच दिवसांत शाहजादे औरंगजेब, पैगंबराचे बंदे दिल्लीच्या तक्तावर बसतील , समजलांत ?

जगन्नाथ : पण. पण दाराशुकोह.

मन्सूरखां : तो नापाक दारा ? तुमचा नादान दोस्त ? दिल्लीबाहेर आहे संध्या, नव्वा शहेनशहांचा कैदी होऊनच तो या दिल्लींत येईल ! पंडितराज, तुमचे पोशिंदे तख्तावरून खाली खेंचले जात आहेत.

जगन्नाथ : तीं लक्षणं उघडच दिसत आहेत. हे पगडीफिरवू बन्सीराम नि हरीराम तुमच्याबरोबर एरव्हीं इथं आलेच नसते. परवां परवांपर्य़ंत दाराशुकोहचे पाय चाटणार्‍या यांच्या जिभा, माझी खुषामत करणार्‍या जिभा,  आज गरळ ओकूं लागल्या , तेव्हांच मीं ओळखलं, कीं जुनी राजवट जाऊन नवी राजवट येत आहे ! पगडीफिरावू पातकी आहेत हे.

मन्सूरखां : फिरवली पगडी तरी काय बिघडलं ? जगन्नाथ, तुम्हांल  तुमचं डोकं मारलं जांऊ नये, असं वाटत असेल, तर याच पावलीं पंडित-सभेंत येऊन या जातभाईंची माफी मागा; तुमची ती नापाक किताब स्वतःच्या हातांनीं जाळून टाका; शाहजादीशीं काडीमोड घ्या; दाराचा पंथ सोडा अन्‌ नव्या राजवटीची तारीफ करून अब्रु वांचवा; जान वांचवा.

हरीराम : केवळ प्राण वांचविण्याकरीतांच नाहीं, तर ‘ बहुजनसुखाय, बहुजनहिताय ’ तुमचा हटवादीपणा सोडा जगन्नाथराय !

मन्सूरखां : अहो, कांहीं व्यापक द्दष्टिकोन स्वीकारा: बदलत्या काळाचीं बदलतीं पावलं ओळखा.

हरीराम : नव्या राजवटीचा ‘ मंगल कलश ’ स्थापन होत असतांना , तुम्हीं ही अशी संकुचित वृत्ति बालगावी अं ? अधःपात आहे तुमचा !

जगन्नाथ : ( संतापानें ) चालते व्हा इथून . उगवल्या सूर्याला वंदन करणारा पोटभरू नाहीं मी ! जिकडे सरशी तिकडे सलाम करणारा गुलाम नाहीं मी. घटके-- घटकेल पगडी फिरविणारा राजकारणी नाहीं मी. कविता विकणारा कंगाल शायर नाहीं मी !.

मन्सूरखां : माहीत आहे आम्हांला आपण कोण आहांत तें. आणि कसे आहांत तें. ( खिशांतून भेंडोळें बाहेर काढून वाचतो. ) ऐका तुमच्या पापांचा पाढा “ तुम्हीं दक्षिणेंतील गोवळकोंडा, विजापूरच्या बादशहांना दिल्ली दरबारची बित्तंबातमीं पुरविली आहे.“

कलंदर : ( मध्येंच ) शिवाजी भोसल्यांचं नांव राहिलं वाततें !. शिवाजी राजाचे दरबारी तुमच्या घरीं उतरून कारस्थानं करतात. त्यांच्याकडून भरपूर बिदागी घेऊन तुम्हीं त्यांना थारा दिला आहे !

मन्सूरखां : सालिना दहा हजार रुपयांचा मलिदा खाऊन, कंदाहराच्या सुलतानाला तुम्हीं दिल्ली--दरबारचा भेद गुपचूप कळविल आहे !

बन्सीराम : आपल्या तेलंगी भाईबंदांची सरकारी दफ्तर--खात्यांत वर्णी लावून तुम्हीं लांच खाल्ली आहे.

मन्सूरखां : अदालतीवर दाराच्यां मार्फत दड्पण आणून तुम्ही फैसले फिरविले आहेत, आणि त्यासाठीं पैसे खाल्ले आहेत. वाचा हें आरोपपत्र, वाचा, वाचा हें दिल्लींत येऊं घातलेल्या नव्व्या राजवटीचं आरोपपत्र ! त्यावरची कोतवालांची सही पाहा--दफ्तरखात्याचा शिक्का पाहा.

कलंदर : देखो तो वो सही शिक्का ! सही सही आमच्या उस्तादांच्या चेहर्‍यासारखाच रुबाबदार आहे तो ! देखो, देखो तो सही वो सही !

मन्सूरखां : वाचा, वाचा हे आरोप.

जगन्नाथ : कांहीं एक जरूर नाहीं तें खोटं आरोप--पत्र पाहाण्याची. आतां दिल्लीश्वरांचा पाठिंबा असतांना, अशीं हजारों पत्रं बनवितां येतील.

मन्सूरखां : बिलकूल झूट . तमाम रयत दाराच्या जुलमी राजवटीच्या खिलाफ खवळून उठली आहे आणि तुमच्यासारख्या गुन्हेगारांना कडक सजा करावी असाच जनतेचा.

जगन्नाथ : जनतेच्या नांवाचा जप कशाला करतां उगाच ? आपल्या काळ्या कृत्यांवर जनहिताच्या नांवानं पांढरा अभ्रा चढविण्याचा सत्तालोलुपांचा धंदा आजचा नाहीं; प्राचीन काळापासून चालत आला आहे. आपल पक्ष हाच जनतेचा पक्ष, असं म्हणून इतरांचा श्राद्धपक्ष करण्याचे पक्षपाती झटके कुटिल राजनीतीला वारंवार येतच असतात ! रयतेचं रायतं तोंडीं लावल्यावांचून सत्ताबाजांचा पोटोबा नीट भरत नाहीं. म्हणे रयतेचं फर्मान ! रयत रयत म्हणजे तरी कोण हो ? तुम्हीं अन‌ तुमचे शें--पांचशें भाडोत्री गुंड--पुंड म्हणजे रयत असंच ना ? त्यांचा धाक मला दाखवितां ? राजकारनापासून दूर असलेल्या माझ्यासरख्या माणसावर खोटेनाटे आरोप करण्याची अन‌ या गुंडांच्या बळावर घरांत घुसण्याची तुमची काय टाप होती ? नव्या दिल्लीपतीचा पाठिंबा आहे. म्हणूनच ना ही  गुंडगिरी करण्याची हिंमत तुम्हांला झालीं ?

मन्सूरखां : ही गुंडगिरीम नाहीं. पंडितराज, ही गुंडगिरी नाहीं, हा उठाव आहे !

हरीराम : अलबत‌, तुमच्या फितुरीनं आणि दाराच्या झोटिंगशाहीनं पातशाही धोक्याम्त आली आहे; रयतेचाच धर्म धोक्यांत आला आहे; म्हणूनच औरंजेबाच्या पक्षाला हातीं सत्ता घ्यावी लागत आहे.

बन्सीराम : आणि आम्हांल साथ द्यावी लागत आहे.

मन्सूरखां : जाऊं द्या हो. ही फजूल वादाबादी पाहिजे कशाला ? जनतेची शिकायत‌ तुम्हीं मांडली; कोतवालांचं ’ आरोप--पत्र ‘ आम्हीं यांना सांगितलं. संपलं आपलं काम, पंडितराज. हें घ्या आरोपपत्र, आणि सरळ कोतवालींत चला, तिथं काय सांगायचं असेल तें सांगा. ( कोतवालांच फर्मांन देतो. )

जगन्नाथ :  ( फर्मान हातीं घेऊन ) ठीक आहे. जशी तुमची इच्छा. खरं म्हणजे कोतवालांसमोर कंठशोष करून कांहीहि उपयोग नाहीं. तुमचे नवे दिल्लीपति मोठे चोर, तर हे छोटे चोर ! आणि तुम्ही सारे त्यांचे साथीदार. आरोप करणारे तुम्हीच, निवडा करणारेहि तुम्हीच. सारा चोरांचा बाजार !. पण हद्दपारीचीच काय, मरणाचीदेखील मनोमन तयारी करून मी येत आहे. तुम्ही व्हा पुढें. आलोंच मी घटकाभरांत.

बन्सीराम : बहोत अच्छा. घटका भरतच आली आहे तुमची ! चलो मन्सूरखां, आपली फत्ते होणार अन‌ यांचा फजीतवाडा ! चलो ! ( मन्सूर, कलंदर, हररिम व बन्सीराम जातात. )

लवंगिका : ( प्रवेश करून. आर्त त्वरांत-- ) जगन्ना ऽ थ !

जगन्नाथ : होय लवंगिके, कालचक्र उलट फिरायला लागलं आहे. मीं दाराचा पक्ष सोडावा, म्हणून खोटया आरोपांची तलवार माझ्यावर टांगली आहे. बहुथा आज सारी धनदौलत सोडून आपल्याला दिल्लीबाहेर जावं लागेल.

लवंगिका : काय दिल्लीबाहेर  ? आणि आपला कांहीं अपराध नसतांना ?

जगन्नाथ : अपराध नसतांनासुद्धां . या घराबाहेरच नव्हे, तर नव्या राजवटीच्या जगाबहेरसुद्धां. निरपराधांचं रक्त सांडल्याविना सत्ताबाजांचीं सिहासनं मांडलीं जात नाहींत ! पण लवंगिके, घाबरूं नकोस, येऊं देत. हजार आपत्ति येऊं देत. आपत्तींचा दावानल आपल्याभोंवतीं धडधडा पेटूं दे, आपत्तीशिवाय सद‌गुणांची संपत्ति उजळत नाहीं, अग्निकुडांत पडल्याशिवाय चंदनाचा लोकोत्तर सुगंध प्रकट होत नाहीं. आपत्तीनीं विचलित होण्याचं कारण काय ? थोर पुरुषांच्या पौरुषावर जशा युवती, तशाच आपत्तीहि भाळत असतात, येऊं देत, ह्जारों आपत्ति येऊं देत. हा जगन्नाथ आपत्तीला घाबरणार नाहीं.

लवंगिका : आणि मीहि घाबरणार नाहीं. जशी तुमची कविता कच्च्या दिलची नाहीं. तशीच तुमची वनिताहि कच्च्या दिलाची नाहीं. ज्या तेजस्वी अग्रीला साक्ष ठेवून मीं तुमच्या हातांत हात दिला, त्या अग्नीला साक्ष ठेवून मी सांगतें, कीं चंद्र तिथे चंद्रिका. हर तिथे अंबिका आणि जिथें जगन्नाथ तिथेंच ही लवंगिल !

पडदा पडतो

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP