यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः ।
यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पंद संग्रहेण प्रवक्ष्ये ॥११॥
सर्व ज्ञानामाजीं । जें का श्रेष्ठ ज्ञान । तयाची जे खाण । स्वयें होती ॥१८९॥
ऐसे महा -ज्ञानी । जयासी साचार । बोलती ‘ अक्षर ’ । ऐशा नांवें ॥१९०॥
झंझावातें मेघ । उडोनियां जाय । परी मोडे काय । गगन तें ? ॥१९१॥
तैसें ज्ञानें जें जें । आकळिलें जाय । म्हणूं ये तें काय । चिरंतन ॥१९२॥
मग अविंनाश । नेणवे जें कांहीं । अक्षर तें पाहीं । स्वभावें चि ॥१९३॥
क्षरे ना म्हणोनि । वेदवेत्ते नर । बोलती अक्षर । जयालागीं ॥१९४॥
परब्रह्मरूप । जें का मायातीत । जयातें विरक्त । अपेक्षिती ॥१९५॥
विषयांचें विष । सांडोनि सकळ । करोनि निर्मळ । सर्वेंद्रियें ॥१९६॥
देहवृक्षातळीं । बैसोनियां वाट । जयाची पहात । निरंतर ॥१९७॥
प्रपंचीं निष्काम । जाहले जे पार्था । तयांसी सर्वथा । इष्ट जें का ॥१९८॥
आणि जयाचिया । आवडीनें देख । ब्रह्मचर्यादिक । संकटें हि ॥१९९॥
लेखिती ना मन । करोनि कठिण । साधिती दमन । इंद्रियांचें ॥२००॥
ऐसें जें का पद । दुर्लभ अगाध । वेद ते हि मुग्घ । झाले जेथें ॥२०१॥
तत्पदीं विलीन । होती ते साचार । ठेविती शरीर । ह्यापरी जें ॥२०२॥
तरी ती च स्थिति । पुन्हां एकवेळ । सांगतों सकळ । तुजलागीं ॥२०३॥
तेव्हां पार्थ म्हणे । प्रभो चक्रपाणी । ऐसें चि हें मनीं । होतें माझ्या ॥२०४॥
तंव कृपा केली । सहजें आपण । तरी निवेदन । करावें जी ॥२०५॥
परी बोलणें तें । असावें सुगम । आकळेल मर्म । जेणें मज ॥२०६॥
तंव काय बोले । त्रैलोक्याचा दीप । परमात्मरूप । नारायण ॥२०७॥
म्हणे पार्था , तुज । काय त्याची चिंता । सुखें ऐक आतां । सारांशें तें ॥२०८॥
विषयांच्या ठायीं । लागे अति ओढ । मनाची ही खोड । स्वाभाविक ॥२०९॥
तयासी अभ्यासें । वळवोनि आंत । बुडे ह्रदयांत । ऐसें करीं ॥२१०॥
सर्व द्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च ।
मूर्घ्न्याघायात्मनः । प्राणमास्थितो योगधारणाम् ॥१२॥
इंद्रियांचीं द्वारें । करोनियां बंद । मनातें निर्बंघ । घालोनियां ॥२११॥
होईल अखंड । संयमी जीवन । तरी च हें जाण । घडेल गा ॥२१२॥
पार्था , जैसा पंगु । राहे जाग्यावरी । कोंडलें अंतरीं । तैसें मन ॥२१३॥
मग तें तेथें चि । राहेल निवांत । स्थिरावेल चित्त । स्वाभावतां ॥२१४॥
शांतचित्तें मग । ॐ कारीं संलग्न । करावा तो प्राण । वायु पार्था ॥२१५॥
सुषुम्नेच्या मार्गें । मूर्घन्याकाशांत । आणोनियां तेथ । धनंजया ॥२१६॥
अकार उकार । मकार ह्या तीन । मात्रा होती लीन । अर्घबिंबीं ॥२१७॥
तोंवरी घरावा । घारणेच्या बळें । शून्यामाजीं मिळे । न मिळे ऐसा ॥२१८॥
मग तो समीर । शून्यीं होतां स्थिर । विराजे ॐ कार । जैसा बिंबीं ॥२१९॥
ॐ मित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन् ।
यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ॥१३॥
पूर्ण झालें तेथें । ॐ कार -स्मरण । लीन होतां प्राण । महाशून्यीं ॥२२०॥
प्रणवान्तीं मग । सहज संपूर्ण । उरे महाशून्य । एकलें चि ॥२२१॥
म्हणोनि ॐ कार । एक जया नाम । एकाक्षरी ब्रह्म । असे जें का ॥२२२॥
तें चि माझें श्रेष्ठ । रूप आठवोनि । ह्यापरी । निदानीं । ठेवी देह ॥२२३॥
ज्याहून आणिक । नाहीं दुजी प्राप्ति । मद्रूपाची स्थिति । ऐसी जी का ॥२२४॥
ती तो पावे पार्था । स्वभावें निःशंक । माझ्या ठायीं एक । रूप होतां ॥२२५॥
होईल स्मरण । कैसें अंतकाळीं । ऐसी तुज आली । शंका जरी ॥२२६॥
जीविताचें सुख । बुडोनियां जाय । खळबळ होय । इंद्रियांची ॥२२७॥
मग अंतर्बाह्य । मृत्यूचीं लक्षणें । दिसतां बैसणें । घडे कोणा ॥२२८॥
आणि शांतचित्तें । तेव्हां कैसें कोणीं । घरावें रोधूनि । इंद्रियांतें ॥२२९॥
प्रणवैकनाम । आठवावें चित्तीं । कैसें कोणा अंतीं । सुचावें हें ॥२३०॥
तरी ऐकें ऐशा । संशयातें वीरा । नको देऊं थारा । मनामाजीं ॥२३१॥
नित्य नेमें मज । उपासी जो साच । अंतीं त्याची मी च । करीं सेवा ॥२३२॥
अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः ।
तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः ॥१४॥
मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् ।
नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः ॥१५॥
सर्व प्रवृतींतें । पार्था , निरोधून । विषयां देवोन । तिळांजळी ॥२३३॥
नित्य माझें सुख । भोगिती जे भक्त । मातें ह्रदयांत । सांठवोनि ॥२३४॥
भोग -समाधानीं । होवोनि तल्लीन । जाती विसरोन । क्षुधा -तृषा ॥२३५॥
तेथें जीं बापुडीं । नेत्रेंद्रियादिक । तयांचा तों लेख । कोण करी ॥२३६॥
ऐसे अंतरीं जे । जाहले तल्लीन । माझ्या ठायीं पूर्ण । सामरस्यें ॥२३७॥
उपासिती मातें होवोनियां मी च । ऐसे जे का साच । भक्त माझे ॥२३८॥
स्मरावें तयांनीं । अंतकाळीं मातें । मग मी तयांतें । उद्धरावें ॥२३९॥
ऐसें म्हणूं तरी । थोरवी ती काय । राहिली अद्वय । उपास्तीची ॥२४०॥
पाहें कोणी रंक । सांपडे संकटीं । धांव गा श्रीपति । ऐसें म्हणे ॥२४१॥
मज काकुळती । येतां चि शरण । तेथें मी धांवोन । न जाईं का ? ॥२४२॥
अधिक तें काय । करोनियां भक्ति । जरी ती च स्थिति । भक्तांची हि ॥२४३॥
म्हणोनियां शंका । नको मनीं ऐसी । आठवण कैसी । होय अंतीं ॥२४४॥
अर्जुना , तयांनीं । मज आठवावें । तेव्हां चि पावावें । तयांसी मीं ॥२४५॥
हा हि बोल पार्था । साहवेना मातें । रक्षितों भक्तांतें । निरंतर ॥२४६॥
निरंतर ऋणी । भक्ताचा मी पाहीं । व्हावें उतराई । अंशमात्र ॥२४७॥
म्णोनि निजांगें । करीं परिचर्या । पार्था तयाचिया । अंतकाळीं ॥२४८॥
देह -वैकल्याचा । तया सुकुमारा । न लागावा वारा । म्हणोनियां ॥२४९॥
आत्मबोधाचिया । पिंजर्यामाझारीं । ठेवितों मीं करीं । धरोनियां ॥२५०॥
तयावरी माझ्या । स्मरणाची भली । शीतल साउली । करीतसें ॥२५१॥
ऐशापरी तया । नित्य निरंतर । माझ्या ठायीं स्थिर । बुद्धि देईं ॥२५२॥
म्हणोनियायां पार्था । देहान्तींची व्यथा । बाघे ना मद्भक्तां । कल्पान्तीं हि ॥२५३॥
तयां मद्रूपासी । सुखें चि मी आणीं । देह -गवसणी । फेडोनियां ॥२५४॥
मिथ्या अहंतेची । झाडोनियां धूळ । वासना निर्मळ । करोनियां ॥२५५॥
आपुल्या स्वरूपीं । मेळवितों त्यांतें । भजती जे मातें । सर्वभावें ॥२५६॥
असोनियां देही । पार्था , माझें भक्त । देहीं ना आसक्त । लेशमात्र ॥२५७॥
म्हणोनियां तयां । तनु -त्यागीं देख । होत नाहीं दुःख । वियोगाचें ॥२५८॥
किंवा देहान्तीं च । धावोनियां यावें । मग तयां न्यावें । मद्रूपातें ॥२५९॥
हें हि घडे ना कीं । मरणा आघीं च । मद्रूप ते साच । स्वभावें चि ॥२६०॥
चंद्रिका ती राहे । चंद्राचिया ठायां । जरी पडछया । दिसे जळीं ॥२६१॥
तैसा जरी भक्त । दिसे देहधारी । तरी तो अंतरीं । मद्रूप चि ॥२६२॥
ऐसे नित्ययुक्त । जे का माझे भक्त । तयांसी संतत । सुलभ मी ॥२६३॥
म्हणोनि स्वभावें । अर्जुना देहान्तीं । मद्रूप ते होती । निश्चयेंसीं ॥२६४॥
मग क्लेशरूप । वृक्षांची च बाग । त्रितापांची आग । ऐसें जें का ॥२६५॥
जें का मृत्युरूप । कावळ्याचें अन्न । करी जें निर्माण । दैन्य -दुख ॥२६६॥
महाभयासी जें । पोषी सर्वकाळ । पुरें भांडवल । दुःखाचें जें ॥२६७॥
दुर्मतीचें मृळ । कुकर्माचें फळ । स्वरूप केवळ । व्यामोहाचें ॥२६८॥
सर्व विकारांचें । जें का उपवन । असे जें आसन । संसाराचें ॥२६९॥
सर्व हि व्याधींचें । वाढलें जें ताट । काळाचें उच्छिष्ट । अन्न जें का ॥२७०॥
जन्ममरणाचें । करी जें पोषण । मृर्त आशा जाण । असे जें का ॥२७१॥
असे जें भ्रांतीनें । भरोनि राहिलें । तेविं जें ओतलें । विकल्पाचें ॥२७२॥
पार्था , सर्वथैव । व्याघ्राचें जें गांव । किंबहुना पेंव । विंचवांचें ॥२७३॥
विषय -विज्ञान । यंत्र जें महान् । सख्य -प्रदर्शन । गणिचें ॥२७४॥
विषरूपी शीत । उदकाचा घोट । किंवा माया दाट । डाकिणीची ॥२७५॥
सभ्य चोराचिया । विश्वासाची प्राप्ति । किंवा द्दढ मिठी । कोडियाची ॥२७६॥
कालसर्पाचें जें । पार्था , मृदुपण । सहज गायन । पारघ्याचें ॥२७७॥
किंवा जैसी कोणी । पाहुणा म्हणोनि । घ्यावी मेजवानी । वैरियाची ॥२७८॥
किंवा जणूं केला । दुर्जनें सत्कार । नातरी आगर । अनर्थाचें ॥२७९॥
स्वप्नामाजीं जें का । देखियेलें स्वप्न । बहरलें वन । मृतजळें ॥२८०॥
धूम्र -कणांचें जें । ओतलें गगन । ऐसें पार्था , जाण । शरीर हें ॥२८१॥
ऐशा शरीराची । तयां नाहीं प्राप्ति । मदूप जे होती । अमर्याद ॥२८२॥
आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन ।
मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ॥१६॥
जरी वाटे थोर । ब्रह्मलोक -प्राप्ति । तरी चुके ना ती । यातायात ॥२८३॥
परी झाला ज्याच्या । देहाचा शेवट । दुखे चि ना पोट । त्याचें जैसें ॥२८४॥
किंवा स्वप्नांतील । महापूरें साच । बुडे ना कोणी च । जाग येतां ॥२८५॥
तैसें माझ्या रूपीं । मिळोनियां गेले । तयांचे तुटले । सर्व बंध ॥२८६॥
चिरंजीवांमाजीं । जो का सर्वश्रेष्ठ । असे जो वरिष्ठ । विश्वाकारीं ॥२८७॥
लोकत्रयरूप । पर्वताचा माथा । ऐसा जो का पार्था । सत्यलोक ॥२८८॥
जेथींचिया एका । प्रहरापर्यंत । टिके ना स्वर्गांत । इंद्र एक ॥२८९॥
आणि एक दिन । होतं ऐशा रीती । होवोनियां जाती । चौदा इंद्र ॥२९०॥
सहस्त्रयुगपर्यन्तमहर्यद्ब्रह्मणो विदुः ।
रात्रिं युगसहस्त्रान्तां तेऽहोरात्रविदो जनाः ॥१७॥
जातील सहस्त्र । वेळां युगें चार । तेव्हां चि साचार । ब्रह्म -दिन ॥२९१॥
चौकडया सहस्त्र । तैशा चि आणिक । तेव्हां रात्र एक । सत्यलोकीं ॥२९२॥
दिन आणि रात्र । येथील हीं थोर । देखती अमर । होवोनि जे ॥२९३॥
जाण धजंजया । भाग्यवंत साचे । होती ते स्वर्गींचे । चिरंजीव ॥२९४॥
नाहीं तरी मूळ । इंद्राची ही दशा । होती एक दिसा -। माजीं चौदा ॥२९५॥
मग जे इतर । देवगण पार्था । तयांची प्रतिष्ठा । काय तेथें ॥२९६॥
परी ब्रह्ययाचे । आठ हि प्रहर । देखती जे नर । निजद्दष्टी ॥२९७॥
अहोरात्रविद । ऐसें तयां नांव । जाण स्वयमेव । ज्ञान चि ते ॥२९८॥
अव्यक्ताव्द्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे ।
रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके ॥१८॥
भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते ।
रात्र्यागमेऽवशः पार्थ प्रभवत्यहरागमे ॥१९॥
तया ब्रह्मलोकीं । उगवतां दिन । अव्यक्तापासोन । स्वाभावतां ॥२९९॥
जयाची गणना । करवेना ऐसें । येई व्यक्त दशे -। लागीं विश्व ॥३००॥
आणि आटे सर्व । आकार -सागर । चार हि प्रहर । लोटतां ते ॥३०१॥
मागुतीं पहांत । होतां धनंजया -सागर । लागे भरावया । मग पुन्हां ॥३०२॥
शरत्कालारंभीं । जैशा मेघ -पंक्ति । जिरोनियां जाती । आकाशांत ॥३०३॥
मग ग्रीष्मकाळ । संपतां किरीटी । पुन्हां उद्भवती । तेथें चि त्या ॥३०४॥
तैसा मिळे भूत -। सृष्टीचा समूह । धनंजया ब्रह्म - । दिनारंभीं ॥३०५॥
आणिक सहस्त्र -। वेळां युगें चार । लोटती तोंवर । राहे चि तो ॥३०६॥
मग होतां ब्रह्म - । रात्रीचा समय । विश्व पावे लय । अव्यक्तांत ॥३०७॥
आणि ब्रह्म -रात्र । संपोनि सकळ । मग अळुमाळ । उजाडतां ॥३०८॥
तैसी च ती पुन्हां । विश्वाची रचना । होतसे अर्जुना । पूर्ववत् ॥३०९॥
सत्यलोकांतील । अहोरात्र एक । तयामाजीं देख । धनंयजा ॥३१०॥
विश्वाची उत्पत्ति । आणिक संहार । होय हें चि सार । सांगितलें ॥३११॥
पाहें ब्रह्मयाचें । कैसें थोरपण । कीं तो सांठवण । सृष्टि -बीजा ॥३१२॥
ऐसा थोर परी । तया हि शेवटीं । चुके ना किरीटी । जन्म -मृत्यु ॥३१३॥
नाहीं तरी सत्य - । लोकींचा हा सारा । असे जो पसारा । त्रैलोक्याचा ॥३१४॥
अर्जुना तो मांडे । एकाएकीं जाण । उगवतां दिन । ब्रह्मयाचा ॥३१५॥
मग प्राप्त होतां । रात्रीचा समय । तो चि लीन होय । आपोआप ॥३१६॥
स्वाभावतां ऐसीं । भूतें जेथें होती । तेथें चि पावती । साम्यावस्था ॥३१७॥
सामावतें बीजीं । जैसें वृक्षपण । मेघ होती लीन । आकाशांत ॥३१८॥
तैसें अनेकत्व । सामावतें जेथें । बोलती तयातें । ‘ साम्य ’ ऐसें ॥३१९॥
परस्तस्मात्तु भावोऽन्योऽव्यक्ताऽव्यक्तात्सनातनः ।
यः स सर्वेषु नश्यत्सु न विनश्यति ॥२०॥
तेथें भूत -संज्ञा । उरे चि ना देख । नाहीं न्यूनाधिक । म्हणोनियां ॥३२०॥
मुरोनियां दूध । तें चि होतां दहीं । नामरूप पाहीं । हारपतें ॥३२१॥
तैसा आकाराचा । लोप होतां जाण । लोपे जगपण । जगाचें तें ॥३२२॥
परी ज्या अव्यक्ता -। पासोनि हें झालें । तें तंव राहिलें । जैसेंतैसें ॥३२३॥
तेव्हां चि तयातें । बोलती ‘ अव्यक्त ’ । साकारतां ‘व्यक्त ’ । नांव देती ॥३२४॥
एकास्तव एक । सापेक्ष हीं नांवें । पाहतां स्वभावें । वस्तु एक ॥३२५॥
आटवितां जैसा । हेम -अलंकार । लगड साचार । म्हणूं तया ॥३२६॥
मग लगडीचीं । करितां भूषणें । घनाकारपणें । उरे ना ती ॥३२७॥
अर्जुना , लगड । आणि अलंकार । एक चि साचार । सुवर्णाचीं ॥३२८॥
तेविं निराकार । आणिक साकार । दोहोंसी आधार । ब्रह्म एक ॥३२९॥
ब्रह्म ना तें व्यक्त । ब्रह्म ना अव्यक्त । ना तें नाशिवंत । ना तें नित्य ॥३३०॥
व्यक्ताव्यक्त दोन्ही । गिळोनि हे भाव । तें तों स्वयमेव । नित्य -सिद्ध ॥३३१॥
राहे विश्वाकार । होवोनियां पार्था । न लोपे लोपतां । विश्वपण ॥३३२॥
अक्षरें तीं जैसीं । टाकिता पुसोन । न जाय लोपोन । अर्थबोध ॥३३३॥
उदकीं तरंग । होती जाती पाहें । उदक तें आहे । सर्वकाळ ॥३३४॥
तैसें नाशिवंत । भूतमात्रीं देख । अविनाश एक । परब्रह्म ॥३३५॥
किंवा आटतिये । अलंकारीं एक । नाटतें कनक । असे जैसें ॥३३६॥
तैसें मर्त्य जीवां -। माजीं जें अमर । नित्य निरंतर । असे कांहीं ॥३३७॥