शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः ।
नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् ॥११॥
तरी पार्था आतां । ऐक सविस्तर । सांगतों साचार । योगमार्ग ॥३२७॥
परी अभ्यासेनि । घ्यावा अनुभव । तरी च तें सर्व । सार्थ होय ॥३२८॥
ह्या चि लागीं तैसें । सुयोग्य बरवें । लागेल पहावें । स्थान एक ॥३२९॥
मनःशातींसाठीं । घालितां आसन । नुठावें जेथून । ऐसें वाटे ॥३३०॥
देखोनि जें वाढे । वैराग्य द्विगुणें । जें कां संतजनें । वसविलें ॥३३१॥
जेथें संतोषासी । लाभतें साहाय्य । जेथें मनोधैर्य । उल्हासतें ॥३३२॥
जेथें अनायासें । घडे योगाभ्यास । लाधे साधकास । स्वानुभूति ॥३३३॥
ऐसी रम्यतेसी । थोरवी साचार । असे निरंतर । जया स्थानीं ॥३३४॥
पाहें पाखांडी जो । तयाचें हि मन । पाहोनि तें स्थान । वेध घेई ॥३३५॥
तया हि तेथें चि । आचरावें तप । ऐसी आपोआप । इच्छा होय ॥३३६॥
हिंडतां सहज । कोणी अकस्मात् । जरी झाला प्राप्त । तया स्थानीं ॥३३७॥
असो कामुक हि । तरी तेथोनियां । मागें परताया । विसरे तो ॥३३८॥
न राहता तरी । तया हि राहवी । तेवीं चि बैसवी । हिंडत्यातेम ॥३३९॥
झोंपलें वैराग्य । तरी थापटोनि । जागृतीसी आणी । तयासी जें ॥३४०॥
विलासी जे होती । तयांतें हि साच । पाहतांक्षणींच । ऐसें वाटे ॥३४१॥
राज्य तरी तें हि । सोडोनियां द्यावें । येथें चि रहावें । स्वस्थपणें ॥३४२॥
ऐसें जें सुंदर । पावन उत्तम । जेथें भेटे ब्रह्म । मूर्तिमंत ॥३४३॥
पहावें तैसें च । आणिक हि एक । राहती साधक । जया स्थानीं ॥३४४॥
आणि जे का होती । सामान्य सकळ । तयांची वर्दळ । नसे जेथें ॥३४५॥
अमृतासमान । गोड जीं समूळ । दाट झाडें फळ -। युक्त जेथें ॥३४६॥
वर्षाकाळ तरी । अत्यंत निर्मळ । विशेष जें जळ । निर्झरांचें ॥३४७॥
तें चि जया स्थानीं । पाउलागणिक । आढळे गा देख । अनायासें ॥३४८॥
ऊन तें हि जेथें । सौम्य भासताहे । मंद वारा वाहे । शांतपणें ॥३४९॥
जेथें एकाएकीं । रिघेना श्वापद । शुक वा षट्पद । नाढळती ॥३५०॥
बहुधा निःशब्द । असावें तें स्थळ । बैसला कोकिळ । बसो तेथें ॥३५१॥
जळाश्रयें हंस । असोत त्या ठायीं । चार दोन पाहीं । चक्रवाक ॥३५२॥
मध्यंतरी मोर । आले गेले कांहीं । आमुची ना नाहीं । तयालागीं ॥३५३॥
परी योगाभ्यास । ऐसें चि ठिकाण । आवश्यक जाण । पंडुसुता ॥३५४॥
मग गूढ मठ । किंवा शिवालय । मानलें जें होय । चित्तालागीं ॥३५५॥
दोहोंतील एक । कोणतें हि घ्यावें । तेथें चि बैसावें । एकांतांत ॥३५६॥
पाहोनि जें स्थान । स्थिरावेल मन । तेथें चि आसन । रचावें गा ॥३५७॥
वरी मृगाजिन । माजीं धूतवस्त्र । तळवटीं साग्र । दर्भाकुर ॥३५८॥
सारिखे सुबद्ध । असावे कोमल । कीं जे राहतील । एकपाडें ॥३५९॥
परी जरी होय । आसन तें उंच । तरी अंग साच । कलंडेल ॥३६०॥
तेविं होय जरी । सहजें सखल । तरी बाधतील । भूमिदोष ॥३६१॥
म्हणोनियां तैसें । करावें ना कांहीं । धरावें तें पाहीं । समभाग ॥३६२॥
आसन तें ऐसें । असावें साचार । पुरे हा विस्तार । येथें आतां ॥३६३॥
तत्रैकाग्र्म मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः ।
उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये ॥१२॥
तरी ऐसें स्थान । पाहोनियां तेथें । मग स्वस्थचित्तें । धनंजया ॥३६४॥
घ्यावा अनुभव । योगाचा संपूर्ण । करोनि स्मरण । सद्गुरुचें ॥३६५॥
सद्गुरु सादर । आठवतां चित्तीं । भरे सत्त्ववृत्ति । अंतर्बाह्य ॥३६६॥
अहं -भावनेची । विरे कठिणता । स्फुरे स्वभावतां । सोऽहंभाव ॥३६७॥
तेणें विषयांचा । पडोनि विसर । जिरे सर्व जोर । इंद्रियांचा ॥३६८॥
अंतरीं रिघोन । स्थिरावे तें मन । ऐसें ऐक्य पूर्ण । प्राप्त होय ॥३६९॥
तोंवरी तैसें चि । करावें स्मरण । तेथें चि राहोन । साधकानें ॥३७०॥
त्या चि ऐक्यतेच्या । बोधें मग तेणें । आसनीं बैसणें । स्वस्थ -चित्तें ॥३७१॥
आतां अंग चि तें । सांवरी अंगातें । घरी पवनातें । पवन तो ॥३७२॥
ऐसा अनुभव । पावे उत्कषातें । बैसतां चि तेथें । आसनीं त्या ॥३७३॥
प्रकृत्तीची धांव । वळोनि माघारी । येई ऐल तीरीं । समाधि ती ॥३७४॥
सर्व हि अभ्यास । पूर्ण होतो साच । बैसतांक्षणीं च । आपोआप ॥३७५॥
मुद्रेचें महत्त्व । ऐसें चि तें आतां । ऐक पंडुसुता । सांगेन मी ॥३७६॥
पोटर्या मांडीसी । ठेवाव्या जडोनि । वांकडे करोनि । तळपाय ॥३७७॥
आधारचक्राच्या । बुडाशीं सुस्थिर । लावावे साचार । बळकट ॥३७८॥
टांचेनें शिवण । धरावी दाबून । तळीं नेहटून । सव्ह पाय ॥३७९॥
सव्य पायावरी । मग डावा पाय । बैसता तो होय । स्वभावें ॥३८०॥
गुद आणि शिश्न । ह्यांमाजीं साचार । जागा असे चार । अंगुळें जी ॥३८१॥
मागें पुढें दीड । सोडितां त्यांतील । मध्यें एकांगुळ । राहे जागा ॥३८२॥
सव्य टांचेनें ती । धरावी दाबून । तोल सांभाळून । शरीराचा ॥३८३॥
कळे नकळेसा । उचलावा चांग । पृष्ठवंशभाग । शेवटील ॥३८४॥
दोन हि पायांचे । घोटे धरावेत । त्या चि प्रमाणात । धनुर्धरा ॥३८५॥
मग सर्व देह । टांचेचिया माथां । राहतो सर्वथा । स्वयंसिद्ध ॥३८६॥
अर्जुना हा ऐसा । मूळबंध जाण । वज्रासन गौण । नाम ह्यासी ॥३८७॥
ऐसी मूलाधारीं । मुद्रा पडे चांग । आणि अधोमार्ग । मोडे जेव्हां ॥३८८॥
तेव्हां तो अपान । आंतलिया अंगें । ओहटाया लागे । आपोआप ॥३८९॥
समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः ।
संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्वानवलोकयन् ॥१३॥
तंव हस्तांजलि । द्रोणाकार झाली । सहजें बैसली । वाम -पदीं ॥३९०॥
म्हणोनियां खांदे । दोन हि ते मग । उंचावले चांग । दिसे ऐसें ॥३९१॥
तयांमाजीं राहे । मस्तक तें घट्ट । होतां उभा ताठ । पृष्ठवंश ॥३९२॥
आणि कवाडें जीं । लोचनद्वाराचीं । पाहती तीं साचीं । बंद होवों ॥३९३॥
वरील पापण्या । ढळती त्या खालीं । खालील त्या तळीं । पसरती ॥३९४॥
म्हणोनियां पाहें । तेथें अर्धमात्र । उघडले नेत्र । ऐसें दिसे ॥३९५॥
दृष्टि अंतर्मुख । झाली ऐसी जरी । कौतुकें बाहेरी । पाहूं लागे ॥३९६॥
तरी स्वभावें ती । पडे नासाग्रींच । जडोनि तेथें च । राहे मग ॥३९७॥
स्थिरावली आंत । म्हणोनि साचार । मागुती बाहेर । पडे ना ती ॥३९८॥
दहा हि दिशांसी । आतां घ्यावी भेट । पहावी कीं वाट । रुपाची त्या ॥३९९॥
पार्था ऐसी चाड । उरे चि ना कांहीं । सर्वथैव पाहीं । दृष्टीलागीं ॥४००॥
मग हनुवटी । दाटे खळगींत । होतां आकुंचित । कंठनाळ ॥४०१॥
आणि दृढपणें । राहे नेहटून । सर्वथा ती जाण । वक्षःस्थळीं ॥४०२॥
माजीं कंठमणि । लोपोनियां जाय । ऐसा बंध होय । जालंधर ॥४०३॥
स्वाधिष्ठानाचिया । वरील कांठाशीं । नाभिस्थानापाशीं । तळवंटीं ॥४०४॥
बंध ओढियाणा । पडतां चि जाण । फुगे नाभिस्थान । ऊर्ध्वभागीं ॥४०५॥
होवोनि सपाट । उदराचा प्रांत । फांके अंतरांत । हृदयकोश ॥४९६॥
प्रशान्तात्मा विगतभीर्ब्रह्मचारिव्रते स्थितः ।
मनः संयम्य मच्चितो युक्त आसीत मत्परः ॥१४॥
बाहेर ही ऐसी । अभ्यासासी छाया । पडे धनंजया । देहावरी ॥४०७॥
तों चि अति मनो -। धर्माचें सकळ । मोडतसे बळ । एकाएकीं ॥४०८॥
वासना निमोन । प्रवृत्ति शमोन । अंगें विरे मन । स्वभावें चि ॥४०९॥
क्षुधा काय झाली । निद्रा कोठें गेली । स्मृति हि राहिली । नाहीं ह्याची ॥४१०॥
मूळबंधे जो का । कोंडला अपान । मुरडे तो जाण । ऊर्ध्वगती ॥४११॥
मुरडतां वरी । अडकोनि मग । सहजें चि फूग । धरीतसे ॥४१२॥
क्षोभला तो तेव्हां । होवोनियां मस्त । आवेशें गर्जत । राहे ठायीं ॥४१३॥
मग तो तेथें च । राहोनियां स्थिर । झुंजे मणिपूर । चक्रासवें ॥४१४॥
ऐसी वाहुटळ । बळावतां थोर । सकळ उदर । शोधोनियां ॥४१५॥
बाळपणांतील । सांचली जी घाण । टाकितो काढून । बाहेरी ती ॥४१६॥
न सांपडे वाट । वळावया आंत । म्हणोनि कोठयांत । संचरे तो ॥४१७॥
करोनियां नष्ट । कफ आणि पित्त । ओलांडितो सप्त -। धातु -स्थानें ॥४१८॥
अस्थिगत मज्जा । काढितो बाहेर । फोडितो डोंगर । मेदाचे हि ॥४१९॥
विघडवी गात्रें । सोडवी नाडीतें । ऐसा साधकातें । भेडसावी ॥४२०॥
परी त्या साधकें । सोडूं नये धीर । असावेम खंबीर । अंतर्यामीं ॥४२१॥
नाना व्याधी दावी । सवें चि हारवी । एकत्र कालवी । आप -पृथ्वी ॥४२२॥
चालली खळाळ । ऐसी एकीकडे । तों चि काय घडे । दुजें देख ॥४२३॥
पार्था आसनाची । उष्णता लागोनि । शक्ति कुंडलिनी । जागी होय ॥४२४॥
नागिणीचें पिलूं । कुंकुमें माखलें । घालोनि वेटाळें । झोंपे जैसें ॥४२५॥
तैसी कुंडलिनी । जणूं ती नागीण । अर्जुना होवोन । अधोमुख ॥४२६॥
घालोनि केवळ । वेढे साडेतीन । राहिली झोंपोन । भुकेली जी ॥४२७॥
ठेविली अग्नीची । ज्वाला दुमडोन । कीं जणूं कंकण । विजेचें तें ॥४२८॥
शुद्ध सुवर्णाचे । वेढे कीं घोटीव । ऐसी जी आटीव । कुंडलिनी ॥४२९॥
होती नाभि -कंदीं । बैसली दाटोन । बंधयुक्त जाण । व्यवस्थित ॥४३०॥
होय कैसी पार्था । सावध ती आतां । चिमटोन जातां । वज्रासनें ॥४३१॥
जैसें का नक्षत्र । पडावें तुटोन । मोडावें आसन । सूर्याचें कीं ॥४३२॥
किंवा तेजोरुप । बीजासी साचार । फुटावा अंकुर । जिया परी ॥४३३॥
तैसी वेढयांलागी । स्वभावें सोडीत । आळेपिळे देत । निजांगासी ॥४३४॥
शक्ति कुंडलिनी । दिसे ती साचार । नाभिकंदावर । उभी ठेली ॥४३५॥
बहुत दिसांसी । आधीं च भुकेली । वरी जागी केली । चिमटोन ॥४३६॥
तेणें निमित्तें ती । मग आवेशून । पसरी वदन । ऊर्ध्व उजू ॥४३७॥
हृदयकोशाचिया । खालतीं भरोन । राहे जो पवन । धनंजया ॥४३८॥
तया सकळ हि । पवनालागोन । दृढ आलिंगन । देवोनियां ॥४३९॥
मुखींच्या ज्वाळांनी । खालीं वरी मग । घेई सर्व भाग । कवळोनि ॥४४०॥
मांसल जे ठाय । खाय ते कौतुकें । तोडोनि लचके । वरिवरी ॥४४१॥
मग असे देहीं । जें कांहीं समांस । तयाचा चि घांस । घेऊं लागे ॥४४२॥
हृदयाचें स्थान । जें का तेथील हि । मग घांस घेई । एक दोन ॥४४३॥
शोधी तळपाय । शोधी तळहात । सर्वथा भेदीत । ऊर्ध्वभाग ॥४४४॥
ठायीं च राहोन । सांध्यासांध्यांतून । झाडा घेई पूर्ण । प्रत्यंगाचा ॥४४५॥
न सोडी स्व -स्थान । तरी हि ती जाण । सत्त्व घे काढोन । नखाचें हि ॥४४६॥
धुवोनि त्वचेसी । मग ठेवी कैसी । अस्थिपंजराशीं । जडोनियां ॥४४७॥
शिरांचे हि हीर । काढी ओरपून । घेई निरपून । अस्थिरस ॥४४८॥
तंव बाह्यभागीं । केसांसीं जीं मुळें । वाढणें खुंटलें । तयांचें हि ॥४४९॥
सात हि धातूंच्या । सागराचे घोट । घेई घटाघट । तृषार्त ती ॥४५०॥
पार्था ऐशा रीती । शरीर संपूर्ण । टाकी तापवोन । लगोलग ॥४५१॥
नासांपुटांतून । वाहतसे वारा । अंगुळें जो बारा । धनुर्धरा ॥४५२॥
तयालागीं घट्ट । धरोनियां आंत । ओढिते ती तेथ । राहोनियां ॥४५३॥
अपान तो पावे । वरी आकुंचन । प्राण तो वरोन । खचे खाली ॥४५४॥
आतां तयांचिया । मीलनीं साचार । उरती पदर । षट्चक्रांचें ॥४५५॥
नाहीं तरी तयां । दोहोंची हि भेट । व्हावयाची तेथ । त्या चि वेळीं ॥४५६॥
परी क्षणभरी । क्षुब्ध कुंडलिनी । तयां नोळखोनि । काय बोले ॥४५७॥
म्हणे तुम्ही कोण । आलांत कां येथें । चला व्हा चालते । पलीकडे ॥४५८॥
ऐक पार्था धातु । पार्थिव आघवी । खावोनि न ठेवी । शेष कांहीं ॥४५९॥
आणि जो जो अंश । पाण्याचा म्हणोन । चाटोन पुसोन । टाकी तो हि ॥४६०॥
ऐशा परी तेथें । महाभूतें दोन । खावोनियां पूर्ण । तृप्त होतां ॥४६१॥
शक्ति कुंडलिनी । पहा राहे कैसी । सुषुम्नेच्यापाशीं । सौम्यपणें ॥४६२॥
पावोनियां तृप्ति । होतां समाधान । टाकी मुखांतून । गरळ जें ॥४६३॥
त्या चि विषरुप । अमृताच्या योगें । धनंजया जगे । प्राणवायु ॥४६४॥
निघे मुखांतून । अग्नि मूर्तिमंत । परी करी शांत । अंतर्बाह्य ॥४६५॥
तिये वेळीं मग । गेलें बळ येतें । सर्व हि गात्रांतें । पुनरपि ॥४६६॥
थांबती व्यापार । नऊ हि वायूंचे । वाहणें नाडयांचें । बंद पडे ॥४६७॥
म्हणोनियां तेथें । स्वभावें सर्वथा । राहती ना पार्था । देह -धर्म ॥४६८॥
इडा -पिंगलांचें । होवोनि मीलन । सुटती संपूर्ण । तिन्ही गांठी ॥४६९॥
आणि चक्रांचे ते । सहा हि पदर । फुटती साचार । धनुर्धरा ॥४७०॥
मग चंद्र सूर्य । ऐशीं काल्पनिक । नांवेम देती देख । जयालागीं ॥४७१॥
तया पवनाचें । दिसे ना ठिकाण । प्रदीप लावोन । शोधितां हि ॥४७२॥
बुद्धीची कणिका । चैतन्यांत विरे । सुगंध जो उरे । घ्राणामाजीं ॥४७३॥
तो हि कुंडलिनी -। संगें पार्था पाहें । संचरोनि राहे । सुषुम्नेंत ॥४७४॥
तों चि वरतोन । चंद्रामृत -तळें । हळु कलंडलें । शक्तिमुखीं ॥४७५॥
कूंडलिनीद्वारा । मग तें अमृत । पार्था सर्वागांत । संचरे गा ॥४७६॥
आणि प्राणवायु । तो हि जाय साच । जागच्याजागीं च । मुरोनियां ॥४७७॥
तप्त होतां मूस । तयांतील मेण । जातसे निघून । जैशा रीती ॥४७८॥
मग धातुरस । जो का रसरशीत । राहे तो मुशींत । कोंदाटून ॥४७९॥
तैसी जणूं काय । त्वचेचा पदर । अर्जुना साचार । पांघरोनि ॥४८०॥
दिसे मूर्तिमंत । प्रकटली कांति । धरोनि आकृति । शरिराची ॥४८१॥
किंवा सूर्ये घेतां । मेघ -प्रावरण । प्रभा ती झांकोन । जाय जैसी ॥४८२॥
परि होतां दूर । मेघाचें पटल । प्रभेची झळाळ । धरों न ये ॥४८३॥
त्वचेचा वरील । शुष्क जो का भुसा । झडोनि तो तैसा । जातां मग ॥४८४॥
अंगकांतीची ती । दिसूं लागे झाके । जैसा का स्फटिक । मूर्तिमंत ॥४८५॥
किंवा रत्नरुप । बीजालागीं जाण । धुमारे फुटोन । आले जैसे ॥४८६॥
किंवा सायंकाळ । होतां चि गगन । करी उधळण । रंगांची जय ॥४८७॥
जणूं घेवोनियां । तयांचें साहाय्ये । घडिलें कीं काय । शरीर तें ॥४८८॥
आत्मप्रकाशाची । किंवा वाटे साच । शुद्ध प्रतिमा च । प्रकटली ॥४८९॥
ओतलें तें जैसें । चैतन्याच्या रसें । किंवा भरलेंसे । कुंकुमें चि ॥४९०॥
ना तरी ऐसें चि । वाटतें निभ्रांत । जणूं मूर्तिमंत । शांति च ती ॥४९१॥
नव्हे तें शरीर । रंग चि ते साचे । आनंद -चित्रांचे । ऐसें वाटे ॥४९२॥
आत्म -सुखाची ती । नातरी मूर्तीच । रोपटें कीं साच । संतोषाचें ॥४९३॥
ना तरी सुवर्ण -। चंपकाचा कळा । किंवा तो पुतळा । अमृताचा ॥४९४॥
ना तरी उद्यान । तरारलें पूर्ण । अर्जुना तें जाण । मार्दवाचें ॥४९५॥
शरदृतूंतील । पौर्णिमेच्या ओलें । कीं तें पालवलें । चंद्रबिंब ! ॥४९६॥
ना तरी ती वाटे । योगासनीं साच । मूर्ति तेजाची च । बैसलीसे ॥४९७॥
पडे चंद्रामृत । शक्तिमुखीं जेव्हां । शरीर तें तेव्हां । ऐसें होय ॥४९८॥
मग पाहोनि त्या । शरीरकृतीस । सहजें काळास । धाक वाटे ॥४९९॥
वार्धक्य मुरडे । तारुण्य हि मोडे । लोपली उघडे । बाळ -दशा ॥५००॥
बाळ -दशा तरी । थोर पराक्रम । असे निरुपम । धैर्य तें हि ॥५०१।
सुवर्णवृक्षाच्या । पालवीतें यावी । जैसी नित्य नवी । रत्नकळी ॥५०२॥
तैसीं नखें नवीं । निघती साचार । सतेज सुंदर । धनुर्धरा ॥५०३॥
दांत हि नवीन । तैसे चि ते येती । परी कैसे होती । अति सान ॥५०४॥
दोन हि बाजूंस । पार्था ऐसें भासे । जणूं बैसलीसे । रत्न -पंक्ति ॥५०५॥
सानुलीं माणिकें । कण्या तयांच्या हि । स्वभावें ज्या पाहीं । अणुतुल्य ॥५०६॥
तैसीं तीं रोमाग्रें । सतेज सुंदर । सर्वागीं साचार । उठावती ॥५०७॥
तेविं तळपाय । आणि करतळें । जैसीं रातोत्पलें । तैसीं होती ॥५०८॥
आणि काय सांगूं । तयाच्या नेत्रांते । निर्मळत्व येतें । निरुपम ॥५०९॥
पक्कदशेप्रति । पोहोंचतां मोतीं । न मावे संपुटीं । शिंपीचिया ॥५१०॥
मग शिंपीचा त्या । सांधा उकलोन । पडे मोतीं जाण । बाहेरी तें ॥५११॥
तैसी पापण्याच्या । मावे ना वेंगेत । अर्ध -उन्मीलित । दृष्टि होय ॥५१२॥
जरी ऐसी दृष्टि । अर्ध -उन्मीलित । तरी ती व्यापीत । गगनासी ॥५१३॥
देह तरी होय । सुवर्णासारिखा । परी तो हलका । वायुतुल्य ॥५१४॥
कीं जे देहीं अंश । आप -पृथ्वीयेचे । नांव हि तयांचें । नुर तेथें ॥५१५॥
मग सागराच्या । पैलाड हि देखे । विचार तो ऐके । स्वर्गातील ॥५१६॥
आणि मुंगीचें हि । जें का मनोगत । तें तें हि समस्त । ओलखे तो ॥५१७॥
होय वायुरुप । वारुवरी स्वार । तेविं पाण्यावर । चालूं शके ॥५१८॥
चालूं शके तरी । पाण्याचा त्या स्पर्श । पाउलातें लश -। मात्र नाहीं ! ॥५१९॥
प्रसंगानुसार । तयालागीं देख । लाभती अनेक । सिद्धि ऐशा ॥५२०॥
असो ऐकें पार्था । कुंडलिनी तेथ । प्राणाचा त्या हात । धरोनियां ॥५२१॥
मग गगनाची । पायरी करोन । चढोनि सोपान । सुषुम्नेचा ॥५२२॥
आली हृदयांत । देवी जगदंबा । होय जी का शोभा । चैतन्याची ॥५२३॥
विश्व -बीजांकुरा -। लागीं देई छाया । जी का आदिमाया । शक्तिरुप ॥५२४॥
निराकार पर -। ब्रह्माची जी पिंडी । जन्मभू उघडी । ॐ काराची ॥५२५॥
परब्रह्मरुप । शिवाची सांबळी । कुंडलिनी बाळी । ऐसी जो का ॥५२६॥
अर्जुना ती तेथ । येतां हृदयांत । ध्वनि अनाहत । होऊं लागे ॥५२७॥
कुंडलिनीअंगा । जडोनियां होती । पार्था ज्ञानशक्ति । बुद्धीची जी ॥५२८॥
तियेचिया कानीं । आला अळुमाळ । बोल तो केवळ । अनाहत ॥५२९॥
परा वाणीचिया । कुंडामाजीं देख । होती जीं सुरेख । नाद -चित्रें ॥५३०॥
ॐकार आकृती -। सारिखीं तीं भलीं । कैसीं रेखाटिलीं । उमटती ॥५३१॥
कल्पनेच्या योगें । जाणावें हें साच । तरी कल्पितें च । नाहीं येथें ॥५३२॥
कल्पितें तें मन । आणावें कोठून । जें का शून्यीं लीन । झालें आतां ॥५३३॥
म्हणोनियां काय । गाजे तिये ठायीं । तें चि नेणों कांहीं । धनंजया ॥५३४॥
परी नव्हे तैसें । गेलों विसरोन । तुज कांहीं खूण । सांगायातें ॥५३५॥
जोंवरी पवन । गगनीं तो जाण । नाहीं झाला लीन । संपूर्णत्वें ॥५३६॥
तोंवरी तो पार्था । ध्वनि अनाहत । अखंड घुमत । राहे तेथें ॥५३७॥
अखंड ॐकार -। ध्वनीचिया मेघें । दुमदुमों लागे । हृदयाकाश ॥५३८॥
मग तेणें घोषें । ब्रह्मरंध्रद्वार । उघडे सत्वर । आपोआप ॥५३९॥
असे मूर्धास्थानीं । पद्म -गर्भाकारें । जणूं तें दुसरें । महदाकाश ॥५४०॥
अर्जुना जीवात्मा । जेथें उत्कंठित । स्व -रुपाची भेट । घ्यावयासी ॥५४१॥
तयालागीं तृप्त । करावया जाण । शिदोरी घेवोन । तेजाचीच ॥५४२॥
देवी कुंडलिनी । येतसे धांवोन । द्यावया भोजन । हृदयांत ॥५४३॥
बुद्धिरुप शाक । घेवोनियां हातीं । अर्पी तयाप्रति । नैवेद्य तो ॥५४४॥
तेथें द्वैताचें तो । उरे चि ना नांव । अर्पितां सर्वस्व । ऐशा रीती ॥५४५॥
निज -कांति ऐसी । अर्पितां सकळ । झाली ती केवळ । प्राणरुप ॥५४६॥
तिये वेळीं कैसी । भासली तें देख । सांगतों कौतुक । धनंजया ॥५४७॥
असावी का जैसी । पवनाची पुतळी । दिव्य सोनसळी । वेढोनियां ॥५४८॥
आपुलें तें वस्त्र । मग तिनें जाण । ठेवावें सोडोन । वेगळें चि ॥५४९॥
किंवा पवनाची । लागोनि झुळूक । मालवावी देख । दीपज्योति ॥५५०॥
ना तरी ती वीज । जैसी लखलखून । जावी हारपून । आकाशांत ॥५५१॥
तैसी ती हृदय -। कमळापर्यत । सरी च भासत । सुवर्णाची ॥५५२॥
किंवा तेजोरुप । जळाची ती तेथ । झरी च वाहत । आली काय ! ॥५५३॥
मग हृदयाच्या । मोकळ्या भूमींत । जिरोनियां जात । एकाएकीं ॥५५४॥
शक्ती च माझारीं । शक्तीचें स्वरुप । तेव्हां आपोआप । लय पावे ॥५५५॥
आतां जरी तीतें । म्हणावें शक्ती च । जाणावी ती साच । प्राणरुप ॥५५६॥
तेथें नाद बिंदु । कला आणि ज्योति । सर्व हारपती । एकाएकीं ॥५५७॥
वायु -निरोधन । जिंकावें कीं मन । ध्यान हि संपूर्ण । सरे तेथें ॥५५८॥
आतां कल्पनेचे । सर्व हि व्यापार । थांबती साचार । स्वभावें चि ॥५५९॥
आटती उघड । पंच -महाभूतें । ऐसी स्थिति तेथें । होय देखा ॥५६०॥
पिंडें चि करावा । पिंडाचा तो लय । नाथ -संप्रदाय । ऐसा जो का ॥५६१॥
आदिनाथाची ती । अंतरंग खूण । दिली दाखवून । नारायणें ॥५६२॥
तया गूढार्थाची । सोडोनि गाठोडी । झाडोनियां घडी । यथार्थाची ॥५६३॥
उघडोनि ती च । दाखविली येथें । ग्राहक हे श्रोते । जाणोनियां ॥५६४॥